माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आजचा हा भाग मला भावूक करणारा आहे, अनेक जुन्या आठवणी माझ्याभोवती रुंजी घालत आहेत याचं कारण असं की आपल्या या ‘मन की बात’ च्या प्रवासाला आता 10 वर्षे पूर्ण होत आहेत.दहा वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर रोजी, विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. आणि पवित्र योगायोग असा की या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ ला 10 वर्षे पूर्ण होतील तेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस असेल. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या वाटचालीत असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे कोट्यवधी श्रोते, आपल्या या प्रवासातील असे सहकारी आहेत ज्यांचा सहयोग मला निरंतर लाभत राहिला आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातून त्यांनी मला माहिती उपलब्ध करून दिली. ‘मन की बात’चे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. सहसा असं मानलं जातं की जोपर्यंत एखाद्या कार्यक्रमात चटपटीत बाबींची चर्चा नसेल किंवा काही नकारात्मक बाबी समाविष्ट नसतील तर अशा कार्यक्रमाकडे श्रोते फारसे लक्ष देत नाहीत. पण ‘मन की बात’ या कार्यक्रमाने हे सिध्द करून दाखवले आहे की देशातील लोकांना सकारात्मक माहितीची किती ओढ आहे. सकारात्मक विचार, प्रेरणात्मक उदाहरणे, धैर्य वाढवणाऱ्या कहाण्या लोकांना फारच आवडतात. ‘चकोर’ नावाच्या पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की तो पक्षी फक्त आकाशातून पडणारे पावसाचे थेंबच पितो. ‘मन की बात’ या कार्यक्रमात आपण पाहिलं की लोक देखील तशाच प्रकारे, चकोर पक्ष्याप्रमाणेच देशाची कामगिरी इतरांच्या सामुहिक यशोगाथा अत्यंत अभिमानाने ऐकतात. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 10 वर्षांच्या वाटचालीने एक अशी श्रुंखला तयार केली आहे ज्याच्या प्रत्येक भागात नव्या कहाण्या, नव्या सफलतेच्या गाथा आणि नवी व्यक्तिमत्वे यांची ओळख होते.आपल्या समाजात सामुदायिकतेच्या भावनेने जे जे कार्य केलं जात आहे त्या कार्याचा ‘मन की बात’ मध्ये गौरव केला जातो. जेव्हा मी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आलेली लोकांची पत्रे वाचतो तेव्हा माझं मन देखील अभिमानाने फुलून येतं. आपल्या देशात कितीतरी प्रतिभावंत आहेत आणि त्यांच्यामध्ये देश आणि समाजाची सेवा करण्याची उत्कट इच्छा आहे. असे लोक निःस्वार्थ भावनेनं सेवा करण्यात स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित करतात. अशा लोकांचं कार्य जाणून घेतल्यानंतर माझ्यात देखील उर्जेचा संचार होतो. ‘मन की बात’ ची ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याप्रमाणे आहे. ‘मन की बात’ मधील प्रत्येक विषय, प्रत्येक घटना आणि प्रत्येक पत्राची मी आठवण काढतो तेव्हा असं वाटतं की माझ्यासाठी देवाचं रूप असलेली ही सर्वसामान्य जनता, तिचं जणूकाही दर्शन मी घेत आहे.
मित्रांनो, मी आज दूरदर्शन, प्रसारभारती तसंच आकाशवाणीशी जोडल्या गेलेल्या सर्वांचंच कौतुक करतो. या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘मन की बात’ हा कार्यक्रम या महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. विविध दूरचित्रवाणी वाहिन्या, प्रादेशिक दूरचित्रवाणी वाहिन्या यांचा देखील मी आभारी आहे कारण या सर्वांनी हा कार्यक्रम सतत प्रसारित केला. ‘मन की बात’ मध्ये आपण ज्या विषयांवर चर्चा केली त्यांच्या संदर्भात अनेक माध्यम संस्थांनी मोहिमा देखील सुरु केल्या. या कार्यक्रमाची माहिती घरोघरी पोहोचवण्यात हातभार लावल्याबद्दल मी मुद्रित माध्यमांचे देखील आभार मानू इच्छितो. ‘मन की बात’ कार्यक्रमावर आधारित अनेक कार्यक्रम करणाऱ्या युट्युबर्सचे देखील मी आभार मानतो. आपल्या देशातील 22 भाषांसह श्रोते 12 विदेशी भाषांमध्ये देखील हा कार्यक्रम ऐकू शकतात. जेव्हा लोक म्हणतात की आम्ही ‘मन की बात’ हा कार्यक्रम आमच्या स्थानिक भाषेत ऐकला तेव्हा मला अत्यंत आनंद होतो. तुमच्यापैकी अनेकांना हे माहित असेल की ‘मन की बात’ कार्यक्रमावर आधारित प्रश्नमंजुषा देखील सुरु करण्यात आली आहे आणि त्यात कोणतीही व्यक्ती भाग घेऊ शकते. Mygov.in वर जाऊन तुम्ही या स्पर्धेत भाग घेऊ शकता आणि पारितोषिक देखील जिंकू शकता. आजच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांकडून आशीर्वाद मागतो आहे. पवित्र मन आणि संपूर्ण समर्पित वृत्तीनं, मी अशाच पद्धतीने भारतातील लोकांच्या महानतेचे गीत गात राहीन. देशाच्या सामुहिक शक्तीचा आपण सर्वजण अशाच प्रकारे उत्सव साजरा करत राहू- हीच माझी देवाकडे आणि जनता जनार्दनाकडे प्रार्थना आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेले काही आठवडे, देशाच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसाळ्याचे हे दिवस आपल्याला ‘जल-संरक्षण’ किती आवश्यक आहे तसंच पाण्याची बचत करणं किती गरजेचं आहे, याची आठवण करून देतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बचत करून साठवलेलं पाणी, टंचाईच्या महिन्यांमध्ये आपल्याला अत्यंत उपयोगी पडतं आणि ‘कॅच द रेन’ सारख्या अभियानांच्या मागे हीच संकल्पना आहे. जल संरक्षणाच्या संदर्भात अनेक जण नवनव्या उपक्रमांची सुरुवात करत आहेत याचा मला आनंद आहे. असाच एक उपक्रम उत्तर प्रदेशात झाशीमध्ये पाहायला मिळाला. तुम्हाला माहितच आहे की झाशी शहर बुंदेलखंडात आहे आणि, पाण्याची टंचाई ही या भागातली नेहमीची समस्या आहे. तर, या झाशी शहरात काही महिलांनी एकत्र येऊन घुरारी नदीला पुनरुज्जीवित केलं आहे. स्वयंसहाय्यता बचत गटाशी जोडल्या गेलेल्या या महिलांनी ‘जल सहेली’ म्हणजेच ‘जल सखी’ बनून या अभियानाचे नेतृत्व केलं. मरणासन्न अवस्थेतल्या घुरारी नदीला या महिलांनी ज्या पद्धतीने वाचवलं त्याची कोणी कधी कल्पना देखील केली नसेल. या जल सख्यांनी पोत्यांमध्ये वाळू भरुन चेकडॅम म्हणजे बंधारा तयार केला, पावसाचे पाणी वाया जाण्यापासून अडवलं आणि नदीला पाण्यानं काठोकाठ भरून टाकलं. या महिलांनी शेकडो जलाशयांची निर्मिती करण्यात आणि त्यांना नवजीवन देण्यात देखील हिरिरीनं मदत केली आहे. यामुळे त्या भागातील जनतेचा पाण्याचा प्रश्न तर सुटलाच पण त्याच सोबत त्यांच्या चेहेऱ्यांवर आनंद देखील परत आला आहे.
मित्रांनो, काही ठिकाणी नारी शक्ती, जल शक्तीला पाठबळ देते तर काही ठिकाणी जलशक्ती देखील नारी शक्तीला मजबूत करते. मला मध्य प्रदेशातील दोन अत्यंत प्रेरणादायक उपक्रमांची माहिती मिळाली आहे. दिंडोरीच्या रयपुरा गावात एका मोठ्या तलावाच्या निर्मितीमुळे भूजलपातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गावातील महिलांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. तेथील ‘शारदा आजीविका स्वयंसहाय्यता बचत गटा’तील महिलांना मत्स्यपालनाचा नवा व्यवसाय देखील मिळाला आहे. या महिलांनी फिश-पार्लर देखील सुरु केलं आहे आणि तिथे होणाऱ्या मत्स्यविक्रीतून या महिलांच्या उत्पन्नात देखील वाढ होत आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर मधल्या महिलांनी देखील मोठा प्रशंसनीय उपक्रम राबवला आहे. तेथील खोंप गावातला एक मोठा तलाव जेव्हा कोरडा पडू लागला तेव्हा त्याला पुनरुज्जीवन देण्यासाठी या महिलांनी संकल्प केला. ‘हरि बगिया स्वयं सहाय्यता गटाच्या या सदस्य महिलांनी तलावातून मोठ्या प्रमाणावर गाळ उपसला. तलावातून काढलेल्या गाळाचा उपयोग करून त्यांनी नापीक जमिनीवर फळबागा लावल्या. या महिलांच्या परिश्रमामुळे तलावात मोठा जल संचय तर झालाच शिवाय पिकांची उत्पादकता देखील मोठ्या प्रमाणात वाढली. देशाच्या काना-कोपऱ्यात जल संरक्षणासाठी केले जाणारे असे प्रयत्न पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील. तुम्ही सर्वजण तुमच्या परिसरात सुरु असलेल्या अशा उपक्रमांमध्ये नक्कीच सहभागी व्हाल असा विश्वास मला वाटतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, उत्तराखंडात उत्तरकाशी भागात ‘झाला’ नावाचं एक सीमावर्ती गाव आहे. या गावातल्या युवकांनी गावाच्या स्वच्छतेसाठी एक विशेष उपक्रम सुरु केला आहे. हे युवक त्यांच्या गावात ‘Thank you नेचर’ म्हणजेच ‘निसर्गाला धन्यवाद’ नामक अभियान चालवत आहेत. या उपक्रमाअंतर्गत गावात रोज दोन तास साफसफाई केली जाते. गावाच्या गल्ल्यांमध्ये पडलेला कचरा गोळा करुन, तो गावाबाहेर ठराविक ठिकाणी टाकला जातो. यातून झाला गाव देखील स्वच्छ होत आहे आणि गावातले लोक जागरुक देखील होऊ लागले आहेत. तुम्हीच विचार करा, जर अशा प्रकारे प्रत्येक गावाने, तेथील प्रत्येक गल्लीत-मोहल्ल्यात अशाच प्रकारे ‘Thank you’ अभियान सुरु केलं तर केवढं मोठं परिवर्तन होऊ शकेल.
मित्रांनो, पुदुचेरी भागात समुद्रकिनारी देखील एक मोठी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. तिथे रम्या नावाची महिला, माहे महानगरपालिका आणि आसपासच्या परिसरातील युवकांच्या पथकाचे नेतृत्व करत आहे.या पथकातले लोक स्वतःच्या प्रयत्नांनी माहे परिसर आणि खास करून तिथल्या सागर किनाऱ्यांची संपूर्ण स्वच्छता करत आहेत.
मित्रांनो, मी इथे फक्त दोन उपक्रमांची चर्चा केली आहे. पण आपण आजूबाजूला पाहिलं तर देशाच्या प्रत्येक भागात, स्वच्छतेसंदर्भात काहीतरी अनोखा उपक्रम नक्कीच सुरु असलेला दिसेल. काही दिवसांतच, येत्या 2 ऑक्टोबरला ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंमलबजावणीला 10 वर्षं पूर्ण होत आहेत. ज्यांनी या अभियानाला भारतीय इतिहासातल्या इतक्या मोठ्या लोक चळवळीचं रूप दिलं त्या सर्वांचं याप्रसंगी अभिनंदन. ज्या महात्मा गांधीजींनी त्यांचं संपूर्ण जीवन या उद्देशासाठी समर्पित केलं त्या गांधीजींना देखील ही खरी श्रद्धांजली आहे.
मित्रांनो, आज जनतेमध्ये ‘कचऱ्यापासून संपत्ती’ हा मंत्र लोकप्रिय होत आहे हे ‘स्वच्छ भारत अभियाना’चंच यश आहे. लोक आता ‘रिड्यूस, रियुज आणि रिसायकल’ संकल्पनेची चर्चा करू लागले आहेत, त्या संदर्भातली उदाहरणं देऊ लागले आहेत. मला नुकतीच केरळमधील कोझिकोडे येथे सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती मिळाली. तेथील 74 वर्षांचे सुब्रमण्यम यांनी 23 हजारांहून जास्त खुर्च्यांची दुरुस्ती करून त्यांना पुन्हा वापर करण्यायोग्य बनवलं. तिथले लोक तर त्यांना ‘रिड्यूस, रियुज आणि रिसायकल (ट्रिपल आर) चँपियन’ असही म्हणतात. त्यांच्या या अनोख्या प्रयत्नांचं मूर्त रूप कोझिकोडेचं नागरी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय तसंच जीवन विमा निगमच्या कार्यालयात पाहायला मिळतं.
मित्रांनो, स्वच्छतेच्या संदर्भात सुरु असलेल्या मोहिमांमध्ये आपल्याला अधिकाधिक लोकांना सहभागी करून घ्यायचं आहे. आणि अशा मोहिमा एका दिवसाच्या,एका वर्षाच्या नसतात तर त्यासाठी सातत्याने निरंतर काम करावं लागतं. जोपर्यंत ‘स्वच्छता’ हा आपल्या स्वभावाचा भाग बनत नाही तोपर्यंत हे कार्य सुरूच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी देखील तुमची कुटुंबे, मित्रपरिवार, शेजारी आणि सहकाऱ्यांसह एकत्रितपणे स्वच्छता अभियानात नक्की सहभागी व्हा असा माझा आग्रह आहे. स्वच्छ भारत अभियाना’ला मिळालेल्या यशाबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या सर्वांनाच आपल्या वारशाबाबत अभिमान आहे. आणि मी नेहमीच म्हणतो विकास वारसा. याचमुळे मी नुकत्याच केलेल्या अमेरिका दौऱ्याच्या एका विशिष्ट पैलूबद्दल मला अनेक संदेश मिळत आहेत. आपल्या प्राचीन कलाकृतींची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. याबाबतीत तुम्हा सर्वांच्या भावना मी समजू शकतो आणि ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या श्रोत्यांना देखील याबाबत माहिती देऊ इच्छितो.
मित्रांनो, माझ्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अमेरिकेच्या सरकारने भारताला सुमारे 300 प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी खूप आपलेपणाने डेलावेअर येथील त्यांच्या वैयक्तिक निवासात त्यापैकी काही कलाकृतींचं दर्शन घडवलं. परत करण्यात आलेल्या कलाकृती टेराकोटा, दगड, हस्तिदंत, लाकूड, तांबे आणि काशासारख्या साहित्यापासून घडवलेल्या आहेत. यापैकी काही कलाकृती तर चार हजार वर्ष जुन्या आहेत. चार हजार वर्ष प्राचीन कालाकृतींपासून 19 व्या शतकातील कलाकृतींपर्यंतच्या कालावधीतल्या अनेक कलाकृती अमेरिकेने परत केल्या- यामध्ये फुलदाण्या, देवी-देवतांच्या टेराकोटा पट्टिका, जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा, शिवाय भगवान बुद्ध आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्तींचा देखील समावेश आहे. परत करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये प्राणांच्या आकृत्या देखील आहेत. पुरुष आणि स्त्रियांची चित्र असलेली जम्मू-काश्मीरची टेराकोटा टाईल तर अत्यंत सुंदर आहे.यामध्ये काशापासून घडवलेल्या गणपतीच्या अनेक प्रतिमा आहेत ज्या मूळ दक्षिण भारतातल्या आहेत. परत करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये भगवान विष्णूच्या तसबिरी मोठ्या प्रमाणात आहेत. या तसबिरी मुख्यतः उत्तर आणि दक्षिण भारतातल्या आहेत. आपले पूर्वज किती बारकाईने हे काम करत होते ते या कलाकृतींकडे पाहून आपल्या लक्षात येतं. कलेच्या संदर्भात ते खुप जाणकार होते. या कलाकृतींपैकी बऱ्याचशा कलाकृती तस्करी करून अथवा इतर अवैध मार्गांनी देशाबाहेर नेण्यात आल्या होत्या- हा एक गंभीर गुन्हा आहे, एका अर्थी हे आपला वारसा संपवण्यासारखे आहे. मात्र गेल्या दशकभरात अशा अनेक कलाकृती, आणि आपल्या अनेक प्राचीन वारसा विषयक वस्तू देशात परत आणण्यात आल्या आहेत याचा मला अत्यंत आनंद वाटतो. याच संदर्भात आज भारत अनेक देशांसह एकत्रितपणे काम करत आहे.
आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असतो, तेव्हा जगही त्याचा आदर करतं याची मला खात्री आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज जगातले विविध देश आपल्याकडून गेलेल्या अशा कलाकृती आपल्याला परत करत आहेत.
माझ्या प्रिय मित्रांनो,
एखादं मूल कोणती भाषा अगदी सहज आणि पटापट शिकून घेतं असं विचारलं तर तुम्ही उत्तर द्याल – मातृभाषा. आपल्या देशात जवळपास वीस हजार भाषा आणि बोली आहेत, आणि या सगळ्या भाषा कोणाची ना कोणाची तरी मातृभाषा आहेतच. काही भाषा बोलणाऱ्यांची संख्या अगदी कमी आहे. पण त्या भाषांच्या जपणुकीसाठीही आज आगळे वेगळे प्रयत्न होत आहेत हे ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. अशीच एक भाषा आहे, आपली संथाली भाषा. संथालीला डिजिटल नवोन्मेषाच्या मदतीने नवी ओळख देण्याचं अभियान सुरू करण्यात आलं आहे. आपल्या देशात अनेक राज्यांमध्ये राहणारे संथाल जमातीच्या समुदायाचे बांधव संथाली भाषा बोलतात. भारताखेरीज बांग्लादेश, नेपाळ आणि भूटानमध्येही संथाली बोलणारे आदिवासी समुदाय राहतात. संथाली भाषेला ऑनलाईन ओळख निर्माण करून देण्यासाठी ओडिशातील मयूरभंजमध्ये राहणारे श्रीमान रामजीत टुडू यांनी एक मोहीम उघडली आहे. रामजीतजींनी संथाली भाषेशी संबंधित साहित्य वाचता येईल असा, आणि संथाली भाषा लिहिता येईल असा एक डिजिटल मंच तयार केला आहे. खरंतर काही वर्षांपूर्वी जेव्हा रामजीतजींनी मोबाईल वापरायला सुरुवात केली, तेव्हा आपल्या मातृभाषेत संदेश पाठवता येत नाही याचा त्यांना खेद वाटला. मग त्यांनी ‘ओल चिकी‘ ही ‘संथाली भाषे‘ची लिपी टाइप म्हणजे टंकित करण्याच्या शक्यता पडताळून पाहायला सुरुवात केली. आपल्या काही मित्रांच्या मदतीने त्यांनी ‘ओल चिकी‘मध्ये टंकलेखन करण्याचं तंत्र विकसित केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज, संथाली भाषेत लिहिलेले लेख लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचत आहेत.
मित्रहो,आपल्या दृढसंकल्पाचा सामूहिक भागीदारीशी संगम होतो तेव्हा संपूर्ण समाजासाठी अद्भुत गोष्टी घडून आलेल्या दिसतात. याचं सगळ्यात ताजं उदाहरण म्हणजे, ‘एक पेड माॅं के नाम‘ हे अभियान. जन-भागीदारीचं अतिशय प्रेरक असं उदाहरण म्हणजे हे अद्भुत अभियान. पर्यावरण संरक्षणासाठी सुरू केलेल्या या अभियानानं देशाच्या कानाकोपऱ्यात चमत्कार घडवून आणला आहे. उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांनी ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक संख्येने वृक्षारोपण करून नवा विक्रम केला आहे. या अभियानांतर्गत उत्तर प्रदेशात 26 कोटी पेक्षा जास्त रोपं लावण्यात आली. गुजरातच्या लोकांनी पंधरा कोटींपेक्षा अधिक रोपं लावली. राजस्थानमध्ये केवळ ऑगस्ट महिन्यातच सहा कोटींपेक्षा अधिक रोपं लावण्यात आली. देशातल्या हजारो शाळाही या अभियानात मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या आहेत.
मित्रांनो, आपल्या देशात झाडं लावण्याच्या अभियानाशी संबंधित कितीतरी उदाहरणं आढळून येतात. असंच एक उदाहरण आहे तेलंगणाच्या के.एन.राजशेखरजी यांचं. झाडं लावण्याप्रति त्यांची कटिबद्धता आपल्या सगळ्यांना थक्क करणारी आहे! जवळपास चार वर्षांपूर्वी त्यांनी झाडं लावण्याची मोहीम सुरू केली. रोज एक झाड नक्की लावायचंच, असा त्यांनी निश्चय केला. अगदी कठोर व्रताप्रमाणे त्यांनी याचं पालन केलं. आजवर त्यांची दीड हजाराहून अधिक झाडं लावून झाली आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट अशी की, यावर्षी एक दुर्घटना घडल्यानंतरही ते आपल्या संकल्पापासून ढळले नाहीत. अशा सर्व प्रयत्नांचं मला मनापासून कौतुक वाटतं. ‘एक पेड मा के नाम‘ या पवित्र अभियानात अवश्य सहभागी व्हा, असा माझा तुम्हालाही आग्रह आहे.
माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की, संकटकाळात हातपाय गाळून न बसता, त्यापासून शिकणारे असे काही लोक आपल्या आसपास असतात. अशाच एक महिला आहेत सुबाश्री. त्यांनी दुर्मिळ आणि अत्यंत उपयुक्त अशा वनौषधींची स्वकष्टांनी एक अद्भुत वाटिका तयार केली आहे. त्या तमिळनाडूमध्ये मदुरै इथे राहतात. तशा तर व्यवसायानं त्या शिक्षिका, परंतु औषधी वनस्पती, medical herbs विषयी त्यांना विलक्षण ओढ आहे. त्यांना ही ओढ लागली 80 च्या दशकात.. कारणही तसंच होतं. त्यांच्या वडिलांना विषारी सर्पानं दंश केल्यावर, त्यांची प्रकृती सुधारायला पारंपरिक वनौषधींचीच मोठी मदत झाली होती. या घटनेनंतर त्यांनी पारंपरिक औषधं आणि वनौषधींचा शोध घ्यायला सुरुवात केली. आज मदुरैच्या वेरीचियूर गावात त्यांची आगळीवेगळी ‘वनौषधी वाटिका‘ आहे. त्यामध्ये पाचशेहून अधिक दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. या वाटिकेची निर्मिती करायला त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले आहेत. एक एक रोपटं मिळवायला त्यांनी दूरदूर प्रवास केला, माहिती गोळा केली, अनेकदा लोकांकडे मदतही मागितली. कोविडकाळात प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या वनौषधी त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या. आज त्यांची वनौषधी-वाटिका बघायला दूरवरून लोक येतात. त्या सर्वांनाच औषधी वनस्पतींची माहिती देतात आणि त्यांच्या उपयोगांबद्दल सांगतात. शेकडो वर्षांपासून आपल्या संस्कृतीचा एक भाग असणारा पारंपरिक वारसा सुबाश्री पुढे चालवत आहेत. त्यांचं हर्बल गार्डन म्हणजे वनौषधी वाटिका आपल्या भूतकाळाला भविष्याशी जोडत आहे. त्यांना आपल्या सर्वांकडून खूप शुभेच्छा.
मित्रहो, आजच्या बदलत्या काळात कामाचं स्वरूप बदलत चाललं आहे, आणि नवनवी क्षेत्रं उदयाला येत आहेत. उदाहरणार्थ गेमिंग, ॲनिमेशन, रील मेकिंग, फिल्म मेकिंग किंवा पोस्टर मेकिंग. यापैकी एखाद्या कामात आपण निपुण असाल आणि एखाद्या बँडशी संलग्न असाल किंवा कम्युनिटी रेडिओसाठी काम करत असाल तर आपल्या प्रतिभेला खूप मोठ्या मंचावर संधी मिळू शकते. तुमच्या प्रतिभेला आणि सृजनशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं, ‘Create in India’ या मध्यवर्ती संकल्पनेअंतर्गत 25 चॅलेंजेस म्हणजे आह्वानांची आखणी केली आहे. ही आह्वानं तुम्हाला नक्कीच रोचक वाटतील. यापैकी काही आह्वानं तर संगीत, शिक्षण आणि अगदी Anti- Piracy वरही आधारीत आहेत. या उपक्रमात अनेक व्यावसायिक संघटनाही सहभागी आहेत आणि त्या या आव्हानांना पूर्ण पाठबळ देत आहेत. यात सहभागी होण्यासाठी आपण wavesindia.org वर लॉग इन करू शकता. देशभरच्या creators नी यात अवश्य भाग घ्यावा आणि आपली सर्जनशीलता जगासमोर आणावी असा माझा विशेष आग्रह आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,या महिन्यात आणखी एका महत्वपूर्ण अभियानाला दहा वर्षं पूर्ण झाली. या अभियानाच्या यशात, देशातल्या मोठ्या उद्योगांपासून छोट्या दुकानदारांपर्यंत सर्वांच्या योगदानाचा वाटा आहे. मी ‘मेक इन इंडिया‘ बद्दल बोलतोय. गरीब, मध्यमवर्ग आणि MSME अशा सर्वांना या अभियानाचा खूप फायदा होत असल्याचं पाहून, मला खूप आनंद होत आहे. या अभियानानं प्रत्येक वर्गातल्या लोकांना आपली प्रतिभा जगासमोर आणण्याची संधी दिली आहे. आज भारत manufacturing powerhouse बनला आहे आणि देशाच्या युवाशक्तीमुळे, जगभरच्या नजरा आपल्यावर खिळल्या आहेत. वाहन-उद्योग असो की वस्त्रोद्योग, विमान-प्रवास असो, इलेक्ट्रॉनिक्स असो की संरक्षण असो, प्रत्येक क्षेत्रात देशाकडून होणारी निर्यात सतत वाढत आहे. देशात एफडीआयचं सातत्याने वाढतं प्रमाणही, आपल्या make in India मोहिमेचीच यशोगाथा सांगतं. आता मुख्यत्वे दोन गोष्टींवर आपला भर आहे. पहिली आहे गुणवत्ता, म्हणजे आपल्या देशात तयार झालेल्या गोष्टी जागतिक दर्जाच्या असाव्यात. दुसरी आहे व्होकल फोर लोकल, म्हणजे स्थानिक उत्पादनांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावं. ‘मन की बात‘ मध्ये आपण #MyProductMyPride विषयीही चर्चा केली आहे. स्थानिक उत्पादनांना चालना देण्यामुळे देशातल्या लोकांचा कसा फायदा होतो हे एका उदाहरणाने समजून घेता येईल.
महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यात वस्त्रउद्योगाची एक जुनी परंपरा आहे- भंडारा टसर सिल्क हॅण्डलूम. टसर रेशमाची नक्षी, संरचना, रंग आणि मजबूती ही त्याची ओळख आहे. भंडाऱ्याच्या काही भागांतले 50 पेक्षा अधिक स्वयंसहायता गट याच्या जपणुकीचं काम करत आहेत. यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. हे रेशीम जलद गतीने लोकप्रिय होत आहे आणि स्थानिक समुदायांना सक्षम करत आहे, आणि हाच तर ‘मेक इन इंडिया‘चा गाभा आहे.
मित्रहो,या सणासुदीच्या दिवसात आपण पुन्हा एकदा आपल्या जुन्या संकल्पाची अवश्य उजळणी केली पाहिजे. कोणतीही वस्तू खरेदी कराल तर ती ‘मेड इन इंडिया‘च असली पाहिजे, काही भेटवस्तू द्याल तर तीही ‘मेड इन इंडिया‘च असली पाहिजे. केवळ मातीचे दिवे खरेदी करणं म्हणजे व्होकल फोर लोकल नव्हे. आपल्या क्षेत्रात तयार होणाऱ्या स्थानिक उत्पादनांना आपण अधिकाधिक चालना दिली पाहिजे. ज्या उत्पादनासाठी भारतातल्या एखाद्या कारागिराने घाम गाळला आहे, जे भारतातल्या मातीपासून बनलं आहे, त्याचा आपल्याला अभिमान आहे. याच गौरवाला आपल्याला नेहमी झळाळी द्यायची आहे.
मित्रांनो, ‘मन की बात‘च्या या भागात आपण सर्वांना भेटून मला खूप छान वाटलं. या कार्यक्रमाविषयीचे आपले विचार आणि सूचना आम्हाला अवश्य कळवा. मी आपल्या पत्रांची आणि संदेशांची वाट पाहतो. काही दिवसातच सणावारांचं पर्व सुरू होत आहे. नवरात्रीपासून याचा प्रारंभ होईल आणि पुढचे दोन महिने पूजापाठ, व्रतवैकल्यं, आणि सगळीकडे उत्साहाचंच वातावरण पसरलं असेल. या आगामी सणासुदीनिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! आपल्या परिवार आणि प्रियजनांसह आपण सर्वांनी सणावारांचा मनसोक्त आनंद लुटा आणि इतरांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घ्या. पुढच्या महिन्यात आणखी काही नवे विषय घेऊन ‘मन की बात‘च्या माध्यमातून आपली भेट होईल. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद!
***
S.Tupe/AIR/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
#MannKiBaat has begun. Tune in! https://t.co/C8EALW43BA
— PMO India (@PMOIndia) September 29, 2024
— PMO India (@PMOIndia) September 29, 2024
— PMO India (@PMOIndia) September 29, 2024
As this episode marks the completion of 10 incredible years of #MannKiBaat, PM @narendramodi says that the listeners are the real anchors of this show.
— PMO India (@PMOIndia) September 29, 2024
The PM also expresses his gratitude to countless people who send letters and suggestions for the programme every month. pic.twitter.com/YXipdgkxom
Water conservation efforts across the country will be instrumental in tackling water crisis. Here are some praiseworthy efforts from Uttar Pradesh and Madhya Pradesh...#MannKiBaat pic.twitter.com/kRqjQCJa01
— PMO India (@PMOIndia) September 29, 2024
Inspiring efforts from Uttarakhand and Puducherry towards cleanliness. #MannKiBaat pic.twitter.com/TLnI6n9Wca
— PMO India (@PMOIndia) September 29, 2024
On the 2nd of October, the Swachh Bharat Mission is completing 10 years. This is an occasion to commend those who turned it into a mass movement. It is also a befitting tribute to Mahatma Gandhi, who dedicated his entire life to this cause. #MannKiBaat pic.twitter.com/lpLV9X5U1F
— PMO India (@PMOIndia) September 29, 2024
The US government returned nearly 300 ancient artifacts to India. #MannKiBaat pic.twitter.com/nnq3j7jDfA
— PMO India (@PMOIndia) September 29, 2024
A noteworthy campaign to give 'Santhali' a new identity with the help of digital innovation. #MannKiBaat pic.twitter.com/ByZAH7GxBd
— PMO India (@PMOIndia) September 29, 2024
The overwhelming public participation in the 'Ek Ped Maa Ke Naam' campaign is truly heartwarming. #MannKiBaat pic.twitter.com/tnB45D7Jff
— PMO India (@PMOIndia) September 29, 2024
Madurai's Subashree Ji has created an incredible garden of rare and highly useful medicinal herbs. Know more about it here...#MannKiBaat pic.twitter.com/qF42wl1N3F
— PMO India (@PMOIndia) September 29, 2024
Create in India - A wonderful opportunity for the creators. #MannKiBaat pic.twitter.com/ucsWT6d6ZO
— PMO India (@PMOIndia) September 29, 2024
This month marks 10 years of the transformative @makeinindia campaign. Thanks to the dynamic youth, India has emerged as a global manufacturing powerhouse, with the world now looking to us for leadership and innovation. #MannKiBaat pic.twitter.com/A0ZuY1ELb4
— PMO India (@PMOIndia) September 29, 2024
Let us reaffirm our commitment to 'Made in India.' #MannKiBaat pic.twitter.com/rYJw7B1eff
— PMO India (@PMOIndia) September 29, 2024
A special #MannKiBaat episode! Over 10 years, it has become a unique platform that celebrates the spirit of India and showcases collective strength of the nation. https://t.co/hFvmDL1lzV
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2024
It's been a decade of highlighting the inspiring life journeys of outstanding Indians! #MannKiBaat pic.twitter.com/MXzeA8T8e1
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2024
Water conservation has become a mass movement, as these efforts of Uttar Pradesh and Madhya Pradesh illustrate. #MannKiBaat pic.twitter.com/RXGqmcSj8f
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2024
As we mark 10 years of the Swachh Bharat Mission, I bow to the collective spirit of 140 crore Indians for making this movement a vibrant one. #MannKiBaat pic.twitter.com/q00IrRO0ZC
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2024
Glad to see immense curiosity on the return on antiquities from USA. #MannKiBaat pic.twitter.com/kwh4DY5IGT
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2024
I invite the creators community to showcase their talent and strengthen the ‘Create in India’ movement by taking part in these challenges. https://t.co/AElwWPTepe pic.twitter.com/Fkm2ypWoaU
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2024
Spoke about the success of @makeinindia and also highlighted why our manufacturers must keep focussing on quality. #MannKiBaat pic.twitter.com/W9EC8UsBNI
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2024