नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूमधील तुतिकोरीन आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलच्या उद्घाटन समारंभाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.यावेळी बोलताना पंतप्रधानांनी
अधोरेखित केले की आज विकसित देश बनण्याच्या प्रवासात भारताने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे आणि तुतिकोरीन आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनल म्हणजे भारताच्या सागरी पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक नवा तारा असे वर्णन केले. व्ही. ओ. चिदंबरनार बंदराच्या क्षमतेचा विस्तार करण्यातील त्याची भूमिका अधोरेखित पंतप्रधान म्हणाले, “ 14 मीटर पेक्षा जास्त खोली आणि 300 मीटरपेक्षा जास्त लांबीचा बर्थ यांच्यासह हे टर्मिनल व्ही ओ सी बंदराच्या क्षमतेत वाढ करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.” या नव्या टर्मिनलमुळे बंदरावरील लॉजिस्टिक्स खर्चात कपात होण्याची आणि भारताच्या परकीय चलनाची बचत होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी तामिळनाडूच्या जनतेचे अभिनंदन केले आणि दोन वर्षांपूर्वी त्यांच्या भेटीदरम्यान सुरू करण्यात आलेल्या व्ही ओ सी बंदराशी संबंधित अनेक प्रकल्पांची आठवण करून दिली. त्यांची झपाट्याने पूर्तता झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या टर्मिनलचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या टर्मिनलमधल्या कर्मचाऱ्यांमध्ये 40% महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे,त्यामुळे सागरी क्षेत्रात महिला प्रणीत विकासाचे ते प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले.
भारताच्या आर्थिक विकासात तामिळनाडूच्या किनारपट्टीने बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेची दखल घेऊन मोदी म्हणाले, “तीन प्रमुख बंदरे आणि सतरा अन्य बंदरांसह, तामिळनाडू हे सागरी व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले आहे”.ते पुढे म्हणाले की,बंदराच्या नेतृत्वाखालील विकासाला चालना देण्यासाठी भारत बंदराबाहेरील कंटेनर टर्मिनल च्या उभारणीत 7,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करत आहे तसेच व्ही.ओ.सी बंदराची क्षमता निरंतर वाढतच आहे.”भारताच्या सागरी विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी व्ही.ओ.सी बंदर सज्ज आहे”,अशी पुष्टीही मोदींनी जोडली.
पायाभूत सुविधांच्या विकासापलीकडील भारताच्या व्यापक सागरी अभियानाबद्दल मोदींनी अवगत केले.व्ही.ओ.सी. बंदर हे हरित हायड्रोजन केंद्र आणि ऑफशोअर पवन ऊर्जेसाठी नोडल पोर्ट म्हणून ओळखले जात असल्याचे नमूद करताना “भारत जगाला शाश्वत आणि भविष्यवेधी विकासाचा मार्ग दाखवत आहे,” असे ते म्हणाले.हवामान बदलाच्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी हे उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील याकडे त्यांनी लक्ष वेधले.
टर्मिनलचे लोकार्पण हे सामूहिक सामर्थ्याचे द्योतक असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले “नवोन्मेष आणि सहयोग ही भारताच्या विकासयात्रेतील सर्वात मोठी ताकद आहे.” भारत आता रस्ते, महामार्ग, जलमार्ग आणि हवाई मार्गांच्या मोठ्या नेटवर्कशी जोडला गेला आहे आणि जागतिक व्यापारात देशाचे स्थान मजबूत झाले आहे यावर मोदींनी प्रकाश टाकला. “भारत जागतिक पुरवठा साखळीतील प्रमुख हितधारक बनत असून ही वाढती क्षमता आपल्या आर्थिक विकासाचा पाया आहे” यावर पंतप्रधानांनी भर दिला. ही गती भारताला लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यास प्रवृत्त करेल आणि या वाढीला चालना देण्यात तामिळनाडू महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, असा विश्वास व्यक्त करून मोदींनी भाषणाचा समारोप केला.
Sharing my remarks during inauguration of new international container terminal at Thoothukudi port.https://t.co/MSYb6KQBjY
— Narendra Modi (@narendramodi) September 16, 2024
N.Chitale/S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
Sharing my remarks during inauguration of new international container terminal at Thoothukudi port.https://t.co/MSYb6KQBjY
— Narendra Modi (@narendramodi) September 16, 2024