पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरित हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.
हरित हायड्रोजनवरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की जगभरात महत्त्वपूर्ण परिवर्तन होत आहे. हवामान बदल ही केवळ भविष्याची बाब नसून त्याचा प्रभाव आता जाणवू शकतो ही जाणीव आज वाढताना दिसत आहे यावर त्यांनी भर दिला. “आता आणि हीच कृती करण्याची वेळ आहे “, असे मोदी म्हणाले. ऊर्जा संक्रमण आणि शाश्वतता जागतिक धोरणात्मक चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वच्छ आणि हरित ग्रह निर्माण करण्याप्रति देशाची बांधिलकी अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की, हरित ऊर्जेवरील पॅरिस करारातील वचनबद्धतेची पूर्तता करणाऱ्या पहिल्या जी 20 राष्ट्रांपैकी भारत एक होता. या वचनबद्धतेची पूर्तता 2030 च्या उद्दिष्टाच्या 9 वर्षे आधीच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 10 वर्षांतील प्रगतीचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, भारताची स्थापित बिगर -जीवाश्म इंधन क्षमता सुमारे 300% वाढली आहे तर सौर ऊर्जा क्षमता 3,000 % पेक्षा अधिक झाली आहे. मोदी यांनी अधोरेखित केले की आम्ही केवळ या कामगिरींवर समाधान मानत नाही . सध्याच्या उपायांना बळकट करण्यावर देश लक्ष केंद्रित करत आहे त्याचबरोबर नवीन आणि अभिनव क्षेत्रांचा देखील शोध घेत असून हरित हायड्रोजन हे त्यापैकीच एक आहे.
“जागतिक ऊर्जा पटलावर हरित हायड्रोजन एक आशेचा किरण म्हणून उदयाला येत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले . विद्युतीकरण करणे कठीण असलेल्या उद्योगांचे कार्बन उत्सर्जन कमी करण्यात ते मदत करू शकते असे सांगत त्यांनी तेल शुद्धीकरण प्रकल्प, खते, पोलाद, अवजड माल – वाहतूक आणि इतर अनेक क्षेत्रांची उदाहरणे त्यांनी दिली ज्यांना याचा फायदा होईल. हरित हायड्रोजनचा वापर अतिरिक्त नवीकरणीय ऊर्जेसाठी साठवण उपाय म्हणून केला जाऊ शकतो अशी सूचना पंतप्रधानांनी केली.
2023 मध्ये सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाबाबत बोलताना पंतप्रधानांनी भारताला हरित हायड्रोजनचे उत्पादन, वापर आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या उद्दिष्टांची रूपरेषा सांगितली. “ राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान नवोन्मेष , पायाभूत सुविधा, उद्योग आणि गुंतवणूकीला चालना देत आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अत्याधुनिक संशोधन आणि विकासा मधील गुंतवणूक , उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील भागीदारी आणि या क्षेत्रातील स्टार्ट-अप्स आणि उद्योजकांसाठी प्रोत्साहन यांचाही त्यांनी ठळक उल्लेख केला. हरित रोजगार निर्मिती व्यवस्थेच्या विकासासाठी यात अफाट क्षमता असल्याचे नमूद करत या क्षेत्रात देशातील युवकांच्या कौशल्य विकासासाठी सरकार करत असलेले प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले.
हवामान बदल आणि ऊर्जा संक्रमणाच्या जागतिक समस्येची दखल घेत पंतप्रधान म्हणाले की, या समस्यांवरील उपाय देखील जागतिकच असायला हवेत. हरित हायड्रोजनच्या डीकार्बनायझेशनवरील प्रभावाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारीला महत्व असल्याचे अधोरेखित करत, ते म्हणाले की, उत्पादन वाढवणे, खर्च कमी करणे आणि पायाभूत सुविधा निर्माण करणे या कामाला गती देण्यासाठी परस्पर सहकार्य गरजेचे आहे. तंत्रज्ञानाला पुढे नेण्यासाठी संशोधन आणि नवोन्मेष यामध्ये एकत्रितपणे गुंतवणूक करण्याची गरजही त्यांनी विषद केली. सप्टेंबर 2023 मध्ये भारतात झालेल्या G20 शिखर परिषदेचा उल्लेख करून, पंतप्रधानांनी हरित हायड्रोजनवर विशेष भर दिला, आणि अधोरेखित केले की, नवी दिल्ली G-20 नेत्यांच्या घोषणापत्राने हायड्रोजनच्या मुद्द्यावर पाच उच्च-स्तरीय स्वयंसेवी तत्त्वे स्वीकारली असून, ती एकात्मिक पथदर्शक आराखडा तयार करण्यासाठी उपयोगी ठरत आहेत. “आपण सर्वांनी हे लक्षात ठेवायला हवे की, आपले आजचे निर्णय आपल्या भावी पिढ्यांचे भवितव्य ठरवतील,” ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी आज हरित हायड्रोजन क्षेत्राला पुढे नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागतिक सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले आणि डोमेन (संबंधित क्षेत्रातील) तज्ञ आणि वैज्ञानिक समुदायाने या उपक्रमाला मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले. “अशा महत्त्वाच्या क्षेत्रात, डोमेन तज्ञांनी मार्गदर्शन करणे आणि एकत्र येऊन काम करणे महत्वाचे आहे,” ते म्हणाले, आणि हरित हायड्रोजन उद्योगासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी सामूहिक कौशल्याच्या गरजेवर भर दिला. पंतप्रधानांनी शास्त्रज्ञ आणि नवोन्मेशींना सार्वजनिक धोरणातील बदल प्रस्तावित करण्याचे प्रोत्साहन दिले, ज्यामुळे या क्षेत्राला आणखी सहाय्य मिळेल. पंतप्रधान मोदी यांनी जागतिक वैज्ञानिक समुदायाला महत्वाचा प्रश्न विचारला, “आपण हरित हायड्रोजन उत्पादनातील इलेक्ट्रोलायझर आणि इतर घटकांची कार्यक्षमता सुधारू शकतो का? आपण उत्पादनासाठी समुद्राचे पाणी आणि नगरपालिकेच्या सांडपाण्याचा वापर करू शकतो का?” त्यांनी विशेषत:, सार्वजनिक वाहतूक, नौवहन आणि अंतर्देशीय जलमार्गांसाठी ग्रीन हायड्रोजनच्या वापरामधील आव्हानांचा सामना करण्याची गरज अधोरेखित केली. “अशा विषयांचा एकत्रितपणे विचार केला, तर जगभरातील हरित ऊर्जेच्या संक्रमणाला मोठे सहाय्य मिळेल,” असे नमूद करून, त्यांनी हरित हायड्रोजनवरील दुसर्या आंतरराष्ट्रीय परिषदेसारख्या मंचांमुळे या मुद्द्यांवर अर्थपूर्ण देवाणघेवाण होईल असा विश्वास व्यक्त केला.
आव्हानांवर मात करण्याच्या मानवाच्या इतिहासावर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले, “प्रत्येक वेळी आपण सामूहिक आणि नवोन्मेशी उपायांद्वारे संकटांवर मात केली.” सामूहिक कृती आणि नवोन्मेषाची भावनाच जगाला शाश्वत भविष्याच्या दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन करेल यावर त्यांनी भर दिला. “आपण एकत्रितपणे कोणतेही उद्दिष्ट साध्य करू शकतो,” असे सांगून, पंतप्रधान मोदी यांनी हरित हायड्रोजनचा विकास आणि वापराला गती देण्यासाठी जागतिक प्रयत्नांचे आवाहन केले. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी हरित हायड्रोजनवरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. “हरित हायड्रोजनच्या विकासाला आणि वापरला गती देण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करूया,” असे सांगून, त्यांनी हरित आणि अधिक शाश्वत जगाच्या निर्मितीसाठी एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली.
***
S.Patil/S.Kane/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com