नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाची पहिली बैठक 7, लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी झाली. भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राविषयी तसेच संशोधन आणि विकास कार्यक्रमांची पुनर्रचना करण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
आज अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाच्या पहिल्या बैठकीमुळे नवी नांदी झाल्याचे पंतप्रधानांनी या बैठकीत नमूद केले. देशाच्या संशोधन परिसंस्थेतील अडथळे ओळखून ते दूर करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. मोठी उद्दिष्टे निश्चित करून ती साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास आणि आगळेवेगळे संशोधन करण्याचे आवाहन त्यांनी केले. संशोधनाने विद्यमान समस्यांवर नवीन उपाय शोधण्यावर भर दिला पाहिजे याकडे त्यांनी लक्ष वेधले. समस्या जागतिक स्वरूपाच्या असू शकतात परंतु त्यांचे निराकरण भारतीय गरजांनुसार स्थानिक पातळीवर झाले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
पंतप्रधानांनी संस्थांचे अद्यतनीकरण आणि मानकीकरणाच्या गरजेवर चर्चा केली. विशिष्ट कार्यक्षेत्रातील तज्ञांची यादी त्या तज्ञांच्या कौशल्याच्या आधारे तयार करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली. देशात होत असलेल्या संशोधन आणि विकासाशी संबंधित माहितीचा मागोवा सहज घेता येईल असा डॅशबोर्ड विकसित करण्याबाबतही त्यांनी सांगितले.
संशोधन आणि नवोन्मेषासाठी उपयोगी असणाऱ्या संसाधनांच्या वापरावर वैज्ञानिक देखरेख करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. ही एक महत्त्वाकांक्षी सुरुवात असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, देशातील वैज्ञानिक समुदायाने त्यांच्या प्रयत्नांसाठी संसाधनांची कसलीही कमतरता भासणार नाही यावर विश्वास ठेवला पाहिजे. अटल टिंकरिंग लॅबच्या सकारात्मक परिणामांवर चर्चा करताना पंतप्रधानांनी या लॅबची प्रतवारी केली जाऊ शकते, असे सुचवले. पर्यावरणातील बदलांसाठी नवीन उपाय शोधणे, इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरीचे घटक, प्रयोगशाळेत विकसित हिरे इत्यादींसारख्या विविध क्षेत्रांतील संशोधनावरही त्यांनी चर्चा केली.
बैठकीदरम्यान, नियामक मंडळाने मेंटॉरशिप मोडमध्ये संशोधन सुरू उच्च स्तरीय प्रस्थापित संस्थांसोबत संशोधन बाल्यावस्थेत असलेल्या विद्यापीठांची जोडी तयार करून हब आणि स्पोक मोडमध्ये एक कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.
नियामक मंडळाने अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन (ANRF) च्या धोरणात्मक उपाययोजनांच्या अनेक क्षेत्रांवर देखील चर्चा केली. यामध्ये प्रमुख क्षेत्रांमध्ये भारताचे जागतिक स्थान, राष्ट्रीय प्राधान्यक्रमांना संशोधन आणि विकासाशी संरेखित करणे, सर्वसमावेशक वाढीस प्रोत्साहन देणे, क्षमता निर्माण करणे, वैज्ञानिक प्रगती आणि नवोन्मेषी परिसंस्थांना प्रोत्साहित करणे, तसेच उद्योग-संरेखित अनुवादात्मक संशोधनाद्वारे शैक्षणिक संशोधन आणि औद्योगिक उपयोजनामधील अंतर कमी करणे यांचा समावेश आहे.
अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (एनआरएफ) इलेक्ट्रिक वाहन (EV) गतिशीलता, प्रगत साहित्य, सौर सेल, स्मार्ट पायाभूत सुविधा, आरोग्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान, शाश्वत शेती आणि फोटोनिक्स यांसारख्या निवडक प्राधान्य क्षेत्रांमध्ये मोहीम पातळीवर समाधान-केंद्रित संशोधनावर कार्यक्रम सुरू करेल. हे प्रयत्न आत्मनिर्भर भारताच्या दिशेने सुरु असलेल्या आपल्या वाटचालीला पूरक ठरतील असे निरीक्षण नियामक मंडळाने निरीक्षण नोंदवले. उद्योगाच्या सक्रिय सहभागासह अनुवादात्मक संशोधनाला अधोरेखित करताना, नियामक मंडळाने ज्ञानाच्या प्रगतीसाठी मूलभूत संशोधनाला चालना देण्यावरही भर दिला. मानवता आणि सामाजिक विज्ञान क्षेत्रात आंतरशाखीय संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याशिवाय आपल्या संशोधकांना संशोधन करण्यासाठी अनुकूल वातावरण असावे यादृष्टीने लवचिक आणि पारदर्शक निधी यंत्रणा बनवण्याची गरज असल्याचेही मान्य करण्यात आले. अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनची धोरणे विकसित भारत 2047 च्या उद्दिष्टांशी सुसंगत असावीत आणि त्यांची अंमलबजावणी करताना जगभरातील संशोधन आणि विकास संस्थांनी स्वीकारलेल्या जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींचे पालन केले पाहिजे असे निर्देश नियामक मंडळाने दिले.
या बैठकीला नियामक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. तसेच भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार सदस्य सचिव, सदस्य (विज्ञान), नीती आयोग आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, जैवतंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग आणि उच्च शिक्षण विभागांचे सचिव त्यांचे पदसिद्ध सदस्य म्हणून उपस्थित होते. इतर प्रमुख सहभागींमध्ये प्रा. मंजुल भार्गव (प्रिन्सटन युनिव्हर्सिटी, यूएसए), डॉ. रोमेश टी वाधवानी (सिम्फनी टेक्नॉलॉजी ग्रुप, यूएसए), प्रो. सुब्रा सुरेश (ब्राऊन युनिव्हर्सिटी, यूएसए),डॉ. रघुवेंद्र तन्वर (इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च), प्रा. जयराम एन. चेंगलूर (टाटा मूलभूत संशोधन संस्था) आणि प्रा. जी रंगराजन (भारतीय विज्ञान संस्था) यांचा समावेश होता.
अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (एनआरएफ) विषयी :
अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (एनआरएफ) ची स्थापना संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी आणि भारतातील विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्था आणि संशोधन आणि विकास प्रयोगशाळांमध्ये संशोधन आणि नावीन्यपूर्ण संस्कृती वाढवण्यासाठी करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींनुसार देशातील वैज्ञानिक संशोधनाची उच्च-स्तरीय धोरणात्मक दिशा प्रदान करण्यासाठी एनआरएफ ही सर्वोच्च संस्था म्हणून काम करते. एनआरएफ उद्योग, शैक्षणिक संस्था आणि सरकारी विभाग आणि संशोधन संस्था यांच्यात समन्वय साधते.
S.Patil/Vasanti/Shraddha/Bhakti/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai