नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील जळगाव आणि राजस्थानमधील जोधपूरला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे सव्वाअकरा वाजता ते लखपती दीदी संमेलनात सहभागी होणार आहेत. तर साडेचार वाजण्याच्या सुमाराला जोधपूर येथील राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान महाराष्ट्रात
पंतप्रधान जळगावला भेट देणार असून लखपती दीदी संमेलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात नुकत्याच लखपती बनलेल्या नवीन 11 लाख लखपती दीदींना ते सन्मानित करणार असून त्यांना प्रमाणपत्र देणार आहेत. याशिवाय ते देशभरातील लखपती दीदींशी संवाद देखील साधणार आहेत.
पंतप्रधान 2,500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी करतील, ज्याचा लाभ 4.3 लाख बचत गटातील सुमारे 48 लाख सदस्यांना होईल. याशिवाय ते 5,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित करणार असून त्याचा लाभ 2.35 लाख बचत गटातील 25.8 लाख सदस्यांना होईल.
लखपती दीदी योजनेच्या आरंभापासून एक कोटी महिला याआधीच लखपती दीदी झाल्या आहेत. 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.
पंतप्रधानांचा राजस्थान दौरा
पंतप्रधान जोधपूर येथील उच्च न्यायालयाच्या परिसरात आयोजित, राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी समारंभाच्या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते राजस्थान उच्च न्यायालय वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन देखील होणार आहे.
* * *
M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai