Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियामध्ये भारतीय समुदायाला केलेले संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियामध्ये भारतीय समुदायाला केलेले संबोधन


नवी दिल्ली, 9 जुलै 2024

नमस्कार, प्रिय प्रिव्येत मस्क्वा! काक देला?

आपले हे प्रेम, आपला हा स्नेह,आपण सर्वांनी इथे येण्यासाठी वेळ काढला, आपणा  सर्वांचा मी खूप- खूप आभारी आहे. मी एकटाच आलो नाही.माझ्यासमवेत खूप काही घेऊन आलो आहे. मी माझ्यासमवेत हिंदुस्तानच्या मातीचा गंध घेऊन आलो आहे. मी 140 कोटी देशवासीयांचे प्रेम माझ्यासोबत घेऊन आलो आहे.आपणा सर्वांसाठी  त्यांच्या शुभेच्छा  घेऊन आलो आहे आणि तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर भारतीय समुदायासमवेत माझा पहिला संवाद इथे मॉस्कोमध्ये आपणा समवेत होत आहे ही आनंदाची बाब आहे.

मित्रहो,

आज 9 जुलै आहे आणि पदाची शपथ घेऊन आजच्या दिवशी मला एक महिना झाला. एक महिन्यापूर्वी  9 जूनला, भारताच्या पंतप्रधान पदाची मी तिसऱ्यांदा शपथ घेतली आणि त्याच दिवशी मी एक निश्चय केला होता. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट जोमाने काम करण्याचा प्रण मी केला.तिप्पट वेगाने काम करेन आणि योगायोग असा आहे की सरकारने जी लक्ष्य ठेवली आहेत त्यापैकी अनेकांमध्ये तीन हा अंक आहे. तिसऱ्या कार्य काळात भारताला जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था करणे हे सरकारचे लक्ष्य आहे, तिसऱ्या कार्य काळात गरिबांसाठी तीन कोटी घरे उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, तिसऱ्या कार्य काळात तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. कदाचित आपणासाठी हा शब्दही नवा असेल.

भारतात गावांमध्ये जे महिला स्वयं सहाय्यता गट आहेत, आम्ही त्यांचे सबलीकरण करू इच्छितो, त्यांचा कौशल्य विकास आम्हाला साधायचा आहे,वैविध्य आणण्याचे आहे.माझ्या तिसऱ्या कार्यकाळात गावातल्या गरीब महिलांपैकी तीन कोटी दीदी लखपती व्हाव्यात असा आमचा प्रयत्न आहे.म्हणजे त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त व्हावे, ते नेहमीसाठी व्हावे, फार मोठे लक्ष्य आहे.मात्र आपणासारख्या मित्रवर्गाचा आशीर्वाद असला की कितीही मोठी लक्ष्य अगदी सहजपणे साध्यही होतात.आजचा भारत जे लक्ष्य ठेवतो ते साध्य करतोच हे आपण सर्व जाणताच.आज भारत असा देश आहे जो,चंद्राच्या ज्या भागावर जगातला कोणताही देश पोहोचला नाही तिथे चंद्रयान पोहोचवणारा आहे. आज भारत असा देश आहे जो जगाला डिजिटल व्यवहारांचे सर्वात विश्वासार्ह मॉडेल जगाला देत आहे. आज भारत असा देश आहे जो सामाजिक क्षेत्रातल्या सर्वोत्तम धोरणांमधून आपल्या नागरिकांचे सबलीकरण साधत आहे. आज भारत असा देश आहे जिथे जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्ट अप्स परीसंस्था आहे.  2014 मध्ये जनतेने मला देशाची सेवा करण्याची पहिली संधी दिली तेव्हा स्टार्ट अप्सची संख्या शेकड्यांमध्ये होती आता  ही संख्या लाखांमध्ये आहे. आजचा भारत असा देश आहे जो  विक्रमी संख्येने पेटंटची नोंदणी करत आहे,संशोधन प्रबंध प्रकाशित करत आहे आणि हेच माझ्या देशातल्या युवकांचे सामर्थ्य आहे, हीच त्यांची शक्ती आहे आणि हिंदुस्तान मधल्या युवकांचे कौशल्य पाहून जगही अचंबित आहे.

मित्रहो,

गेल्या 10 वर्षात देशाने विकासाचा जो वेग घेतला आहे तो पाहून जगही  आश्चर्यचकित झाले आहे. जगभरातले  लोक भारतात येतात तेव्हा म्हणतात…भारतात बदल होत आहे. आपण येता तेव्हा आपल्यालाही असेच वाटते ना त्यांना काय दिसून येते ?ते पाहतात भारताचा काया पालट, भारताचे नव निर्माण, त्यांना हा बदल स्पष्ट दिसून येत आहे. जेव्हा भारत जी -20 सारखे यशस्वी आयोजन करतो तेव्हा संपूर्ण जग एकमुखाने म्हणते भारत  कात टाकत आहे.जेव्हा भारत केवळ दहा वर्षात आपल्या विमानतळांची संख्या दुपटीने वाढवतो तेव्हा जग म्हणते भारत खरोखरच बदलत आहे. जेव्हा भारत केवळ दहा वर्षात 40 हजार किलोमीटरपेक्षा जास्त, हा आकडा लक्षात ठेवा,40 हजार किलोमीटरपेक्षा जास्त रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करतो तेव्हा जगालाही भारताच्या सामर्थ्याची जाणीव होते.भारत बदलत आहे.आज भारत जेव्हा डिजिटल पेमेंटचे नवे विक्रम करत आहे, आज भारत जेव्हा एल- वन पॉइंटवरून सूर्य परिक्रमा पूर्ण करतो, आज भारत जेव्हा जगातला सर्वात उंच रेल्वे पूल बांधतो,आज भारत जेव्हा जगातला सर्वात उंच पुतळा उभारतो तेव्हा जग म्हणते भारत खरेच बदलला आहे आणि भारत कसा बदलत आहे ? कसा बदलत आहे ? भारत बदलत आहे कारण भारताचा आपल्या 140 कोटी नागरिकांच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, अभिमान आहे.भारत बदलत आहे कारण 140 कोटी भारतीय विकसित भारताचा संकल्प साध्य करू इच्छितात.हिंदुस्तान परिश्रम घेत आहे, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक युवक प्रत्येक गरीब मेहनत करत आहे.

आज जगातल्या वेगवेगळ्या भागात  माझे जे भारतीय बंधू-भगिनी राहतात,आपणा सर्व भारतीयांना,आपल्या मातृभूमीच्या कामगिरीचा अभिमान आहे.आपला भारत आज कोणकोणती शिखरे साध्य करत आहे हे आपण अभिमानाने मान उंचावून सांगत आहोत.आपल्या परदेशी मित्रांसमवेत भारताचा उल्लेख येताच आपण देशाची कामगिरी मांडतो आणि तेही ऐकताच राहतात.मी आपणाला विचारू इच्छितो, मी म्हणतो  ते खरे आहे की नाही ? आपण असे करता की नाही ? आपल्याला आभिमान वाटतो की नाही ?जगाचा आपणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे की नाही ?140 कोटी भारतीयांनी हे करून दाखवले आहे. आज 140 कोटी भारतीय, दशकांपासून सुरु असलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचा विश्वास बाळगतात. समस्या तशाच  दडपून जगत राहणे देशाला आता मान्य नाही,मित्रहो

आज 140 कोटी भारतीय प्रत्येक क्षेत्रात सर्वात पुढे जाण्याच्या तयारीत गुंतलेले असतात. तुम्ही देखील पाहिले आहे, आम्ही आमच्या अर्थव्यवस्थेला केवळ कोविड संकटातूनच बाहेर काढले नाही… तर भारताने आपल्या अर्थव्यवस्थेला जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्थांपैकी एक बनवले आहे. आम्ही आपल्या पायाभूत सुविधांमधील कमतरता तर दूर करत आहोतच, पण आम्ही जागतिक मानकांचे मैलाचे दगड निर्माण करत आहोत. आम्ही केवळ आपल्या आरोग्य सेवांमध्येच सुधारणा करत आहोत असे नाही, तर देशातील प्रत्येक गरिबाला मोफत उपचारांच्या सुविधा देखील देत आहोत आणि आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी  आरोग्य विमा योजना  चालवत आहोत . ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. हे सर्व कसे होत आहे मित्रांनो? हे कोण करत आहे? मी पुन्हा एकदा सांगतो, 140 कोटी देशवासी. ते स्वप्नेही पाहतात, संकल्पही करतात आणि सिद्धीसाठी पूर्णपणे झोकून देऊन काम करत असतात. हे आमच्या नागरिकांचे कष्ट,एकाग्रता आणि निष्ठा यामुळे शक्य होत आहे.

मित्रांनो,

भारतात हा बदल केवळ प्रणाली आणि पायाभूत सुविधांचाच नाही आहे. हा बदल देशातील प्रत्येक नागरिकाच्या, प्रत्येक तरुणाच्या आत्मविश्वासात देखील दिसत आहे. आणि तुम्हाला ठाऊक आहे यशाची जी पहिली पायरी असते ना ती स्वतःचा आत्मविश्वास असते.2014 च्या आधी आम्ही निराशेच्या गर्तेत बुडालो होतो. हताशपणा, निराशा यांनी आम्हाला जखडले होते. आज देश आत्मविश्वासाने भरलेला आहे. एकाच आजाराचे दोन रुग्ण रुग्णालयात असतील, तितकेच निष्णात डॉक्टर देखील असतील, मात्र, एक निराशेत बुडालेला रुग्ण आहे, दुसरा आत्मविश्वासाने भरलेला आहे तर तुम्ही पाहिले असेल की आत्मविश्वासाने भरलेला रुग्ण काही आठवड्यातच बरा होऊन रुग्णालयाच्या बाहेर येतो.  निराशेत बुडालेल्या रुग्णाला कोणाला तरी दुसऱ्याने उचलून न्यावे लागते. आज देश आत्मविश्वासाने भरलेला आहे आणि हीच भारताची सर्वात मोठी पूंजी आहे. 

आता मला पक्की खात्री आहे की तुम्ही देखील अलीकडेच टी-ट्वेंटी विश्वचषकातहा विजय साजरा केला असेलच. केला होता की नाही? अभिमान वाटत होता की नव्हता? विश्वचषक जिंकण्याची खरी गाथा, विजयाच्या प्रवासाची देखील आहे. आजचा युवा आणि आजचा युवा भारत,अखेरचा चेंडू आणि अखेरच्या क्षणापर्यंत हार मानत नाही आणि विजय त्यांच्याच पायाचे चुंबन घेतो जे हार मानायला तयार नसतात. ही भावना केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नाही आहे, तर दुसऱ्या खेळात देखील दिसत आहे. गेल्या काही वर्षात प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यावेळी पॅरिस ऑलिंपिकमध्ये देखील भारताकडून एक शानदार संघ पाठवला जात आहे. तुम्ही बघा, संपूर्ण संघ, सर्व खेळाडू कसे आपली क्षमता दाखवतील. भारताच्या युवाशक्तीचा हाच आत्मविश्वास, भारताची खरी पूंजी आहे. आणि हीच युवाशक्ती भारताला 21व्या शतकाच्या नव्या उंचीवर पोहोचवण्याचे सर्वात मोठे सामर्थ्य दाखवत आहे. 

मित्रांनो,

तुम्ही निवडणुकीचे वातावरण देखील पाहिले असेल, टीव्ही वर पाहात असाल कसे चालले आहे, कोण कोण काय काय बोलत आहे, कोण काय करत आहे.

मित्रांनो,

निवडणुकीच्या काळात मी सांगत होतो गेल्या 10 वर्षात भारताने जो विकास केला…. तो तर केवळ एक ट्रेलर आहे. येणाऱ्या 10 वर्षात आणखी वेगवान विकास होणार आहे. सेमी कंडक्टर  पासून इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनापर्यंत , हरित हायड्रोजन पासून इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा भारताची नवी गती,जगाचा विकास आणि मी खूप जबाबदारीने हे सांगत आहे, जगाच्या विकासाचा अध्याय लिहील. आज जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात भारताचे 15 टक्के  योगदान आहे. आगामी काळात याचा आणखी जास्त विस्तार होणे निश्चित आहे. वैश्विक गरीबी  पासून हवामान बदल पर्यंत, प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यात भारत सर्वात पुढे राहील, आणि माझ्या तर डीएनएमध्येच आहे आव्हानाला आव्हान देणे.

मित्रांनो,

मला आनंद आहे, हेच जे प्रेम आहे ना मित्रांनो, जेव्हा देशवासियांसोबत विभाजनाचे अवकाशच नसेल, जी विचारसरणी नेत्याच्या मनात असते तीच विचारसरणी जेव्हा जनमनात असेल तर त्यावेळी अपार ऊर्जा निर्माण  होत जाते मित्रांनो, आणि मी हेच पाहात आहे मित्रांनो.

मित्रांनो,

मला आनंद आहे की  जागतिक समृद्धीला नवी ऊर्जा देण्यासाठी भारत आणि रशिया खांद्याला खांदा लावून चालत आहेत. या ठिकाणी उपस्थित तुम्ही सर्व लोक भारत आणि रशियाच्या संबंधांना नवी उंची देत आहात. तुम्ही तुमचे कष्ट, आपला प्रामाणिकपणा यांद्वारे रशियाच्या समाजात आपले योगदान दिले आहे.

मित्रांनो,

भारत आणि रशिया यांच्यातील अनोख्या संबंधांचा मी अनेक दशकांपासून चाहता राहिलेलो आहे. रशिया हा शब्द ऐकल्याबरोबरच… प्रत्येक भारतीयाच्या मनात पहिला शब्द येतो… भारताच्या सुख-दुःखाचा सोबती…. भारताचा विश्वासू मित्र. आमचे रशियन मित्र याला द्रुजबा म्हणतात  आणि आम्ही हिंदीत याला दोस्ती म्हणतो. रशियामध्ये हिवाळ्यात तापमान कितीही उणे च्या खाली जाऊ देत…भारत-रशियाची मैत्री नेहमीच प्लसमध्ये राहिलेली आहे, जिव्हाळ्याने भरलेली आहे. हे नाते परस्पर विश्वास  आणि आदर याच्या भक्कम पायावर बनलेले आहे. आणि ते गाणे तर येथील घराघरात कधी काळी गायले जात होते. ‘सर पे लाल टोपी रूसी, फिर भी? फिर भी? फिर भी? दिल है हिंदुस्तानी’… हे गीत भलेही जुने झाले असेल पण, भावना चिरतरुण  आहेत. जुन्या काळात  राज कपूर, मिथुन दा, अशा कलाकारांनी भारत आणि रशियाच्या संस्कृतीची मैत्री मजबूत केली… भारत-रशियाच्या संबंधांना आमच्या सिनेमाने पुढे नेले… आणि आज तुम्ही सर्व भारत-रशियाच्या  संबंधांना नवी उंची देत आहात.

आपल्या संबंधांची ताकद अनेक वेळा पारखली गेली आहे. आणि प्रत्येक वेळी, आपली  मैत्री अधिक मजबूत झाली आहे.

मित्रहो,

भारत आणि रशिया यांच्यातील या मैत्रीसाठी मी माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या नेतृत्वाची विशेष प्रशंसा  करेन. दोन दशकांहून अधिक काळ ही भागीदारी मजबूत करण्याचे  मोठे काम त्यांनी  केले आहे.गेल्या 10 वर्षांत मी सहाव्यांदा रशियात आलो आहे. आणि या इतक्या वर्षांमध्ये आम्ही 17 वेळा एकमेकांना भेटलो आहोत. या सर्व बैठकांमुळे विश्वास आणि आदर वाढला  आहे. जेव्हा आमचे विद्यार्थी युद्धाच्या संकटात अडकले होते तेव्हा त्यांना भारतात परत आणण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आम्हाला मदत केली होती . त्याबद्दल मी पुन्हा एकदा रशियाची जनता , माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आभार मानतो.

मित्रहो,

आज आमचे युवक मोठ्या संख्येने रशियामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. मला सांगण्यात आले आहे की इथे वेगवेगळ्या राज्यांच्या संघटना देखील आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यातील सण-उत्सव, खाद्यपदार्थ , भाषा, बोली, गाणी, संगीत यातील वैविध्यही येथे पहायला मिळते. रशियामध्ये  तुम्ही होळीपासून दिवाळीपर्यंत प्रत्येक सण मोठ्या उत्साहात  साजरा करता. भारताचा स्वातंत्र्यदिनही येथे उत्साहात आणि जल्लोषात  साजरा केला जातो. आणि मला आशा आहे की यावेळी 15 ऑगस्ट आणखीनच शानदार होईल. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय योग दिनी  हजारो लोकांनी येथे सहभाग घेतला होता. अजून एक गोष्ट पाहून मला बरे वाटते. इथले आमचे रशियन मित्र जे आहेत ते देखील हे सण तितक्याच उत्साहात साजरे करण्यासाठी तुमच्यात सामील होतात. लोकांमधील हे संबंध  सरकारांच्या कार्यकक्षेपेक्षा खूप वरचे असतात  आणि ती एक मोठी शक्ती देखील आहे.

आणि मित्रहो,

याच सकारात्मकतेच्या पार्श्वभूमीवर मला तुम्हाला  आणखी एक आनंदाची बातमी सांगायची आहे. कोणती चांगली बातमी आली याचा  तुम्ही विचार करत असाल. कझान आणि येकातेरिनबर्ग येथे दोन नवीन वाणिज्य दूतावास उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आवागमन आणि व्यापार -उद्योग अधिक सुलभ  होईल.

मित्रहो,

अस्त्राखानमधील इंडिया हाऊस हे देखील आपल्या  संबंधांचे एक प्रतीक आहे. 17 व्या शतकात गुजरातमधील व्यापारी तेथे स्थायिक झाले होते . जेव्हा मी गुजरातचा नवा मुख्यमंत्री बनलो होतो, तेव्हा मी तिथे गेलो होतो. दोन वर्षांपूर्वी उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरमधून पहिली व्यावसायिक खेपही  येथे पोहोचली होती. हा कॉरिडॉर मुंबई आणि अस्त्राखानच्या बंदर शहराला एकमेकांशी जोडतो. आता आम्ही चेन्नई-व्लादिवोस्तोक इस्टर्न मेरिटाइम कॉरिडॉरवरही काम करत आहोत. आपण  दोन्ही देश गंगा-व्होल्गा सांस्कृतिक संवादाच्या  माध्यमातून एकमेकांचा पुनर्शोध घेत आहोत.

मित्रहो,

2015 मध्ये जेव्हा  मी इथे आलो होतो , तेव्हा मी म्हटले होते की 21वे शतक भारताचे असेल. तेव्हा मी म्हणत होतो, आज संपूर्ण जग म्हणत आहे. जगभरातील तज्ञांमध्ये आता या मुद्द्यावर कुठलेही दुमत नाही. सगळे म्हणतात 21वे शतक भारताचे शतक आहे. आज विश्व बंधू म्हणून भारत जगाला नवा विश्वास देत आहे. भारताच्या वाढत्या क्षमतांनी संपूर्ण जगाला स्थैर्य आणि समृद्धीचा आशेचा किरण दिला आहे.  नवीन उदयोन्मुख बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेत भारताकडे एक मजबूत स्तंभ म्हणून पाहिले जात आहे. जेव्हा भारत शांतता, संवाद आणि मुत्सद्देगिरी बद्दल बोलतो, तेव्हा संपूर्ण जग ऐकते.  जेव्हा जगावर संकट येते, तेव्हा भारत सर्वप्रथम पोहचणारा देश बनतो. आणि  भारत, जगाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. दीर्घकाळ जगाने एक प्रभाव -आधारित जागतिक व्यवस्था पाहिली आहे. आज जगाला प्रभावाची नव्हे तर एकमेकांना सामावून घेण्याची गरज आहे. हा संदेश समागम आणि संगम यांना पूजणाऱ्या भारतापेक्षा कोण अधिक चांगले समजू शकतो कोण देऊ शकतो ?

मित्रहो,

तुम्ही सर्वजण, रशियामध्ये भारताचे राजदूत आहात. जे इथे दूतावासात बसतात ना ते राजदूत आहेत आणि जे दूतावासाबाहेर आहेत ते राष्ट्रदूत आहेत.  तुम्ही असेच रशिया आणि भारताचे संबंध मजबूत बनवत रहा.

मित्रहो,

60 वर्षानंतर भारतात एखादे सरकार तिसऱ्यांदा निवडून येणे ही खूप मोठी गोष्ट आहे. मात्र या निवडणुकांमध्ये सर्वांचे लक्ष , सर्व कॅमेरे  मोदी वर लागलेले होते, त्यामुळे इतर  अनेक महत्वपूर्ण घटनांकडे लोकांचे लक्ष गेले नाही. जसे या निवडणुकीच्या वेळी  अरूणाचल प्रदेश, सिक्किम, आंध्र , ओदिशा या  चार राज्यांमध्येही निवडणूक झाल्या आणि या चारही राज्यांमध्ये रालोआ स्पष्ट बहुमतासह विजयी झाला. आणि सध्या  तर महाप्रभु जगन्नाथ जींची यात्रा सुरु आहे , जय जगन्नाथ.  ओदिशाने तर खूप मोठी क्रांती केली आहे  . म्हणूनच मी आज तुम्हाला भेटायला येताना उड़िया स्कार्फ घालून आलो आहे.

मित्रहो,

तुम्हा सर्वांवर महाप्रभु जगन्नाथ जींचे आशीर्वाद कायम रहावेत, तुम्ही निरोगी रहा, समृद्ध रहा या शुभेच्छांसह मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार मानतो. आणि ही अमर प्रेमाची कहाणी आहे मित्रांनो, ही दिवसेंदिवस वाढत राहील, स्वप्ने संकल्पात बदलत राहतील आणि आपल्या कठोर परिश्रमाने प्रत्येक संकल्प सिद्धीला जाईल. याच विश्वासासह  मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून खूप-खूप आभार मानतो. माझ्याबरोबर म्हणा –

भारत-माता की जय !

भारत-माता की जय !

भारत-माता की जय !

वंदे मातरम !

वंदे मातरम !

वंदे मातरम !

वंदे मातरम !

वंदे मातरम !

वंदे मातरम !

वंदे मातरम !

खूप-खूप धन्यवाद!

SK/Nilima/Shailesh/Sushama/PM

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai

 

 

 

 

 

\