Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत टेक्स 2024 चे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत टेक्स 2024 चे उद्घाटन


नवी दिल्‍ली, 26 फेब्रुवारी 2024 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  नवी दिल्लीत भारत मंडपम येथे देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रमांपैकी एक अशा भारत टेक्स 2024 चे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या प्रदर्शनाची देखील पंतप्रधानांनी पाहणी केली.

कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी प्रत्येकाला भारत टेक्स 2024 ला भेट देण्याचे आवाहन केले. आजचा सोहळा हा खऱ्या अर्थाने विशेष आहे कारण हा भारत मंडपम आणि यशोभूमी या भारतातील दोन मोठ्या प्रदर्शन केंद्रांवर आयोजित करण्यात आला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  या कार्यक्रमाला 3000 हून अधिक प्रदर्शक, 100 हून जास्त देशांतील अनेक व्यापारी आणि 40,000 हून अधिक व्यावसायिक अभ्यागत आल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले आणि भारत टेक्सने  सर्वांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, असे ते म्हणाले.

आजचा कार्यक्रम हा अनेक पैलूंना आपल्या कवेत घेत असून भारत टेक्सच्या धाग्याने भारताच्या गौरवशाली प्राचीन परंपरांची गुंफण आजच्या काळातील प्रतिभेशी  केली आहे; परंपरांसह तंत्रज्ञान आणि शैली, टिकाऊपणा, व्याप्ती आणि कौशल्य या सर्वांना एकत्र विणणारा हा धागा आहे, याबरोबरच हा उपक्रम म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारतचे मोठे उदाहरण असून, त्याद्वारे संपूर्ण भारतातील असंख्य वस्त्र परंपरांचा संगम बघायला मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. भारताच्या वस्त्र परंपरेची सखोलता, कित्येक वर्षांची परंपरा आणि क्षमता यांचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनाचे देखील त्यांनी कौतुक केले

वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील अनेक भागधारकांची उपस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधानांनी भारताचे वस्त्रोद्योग क्षेत्र समजून घेण्याबाबत तसेच आव्हाने आणि आकांक्षांची जाणीव ठेवण्याच्या त्यांच्या नैपुण्याचा उल्लेख केला.  विणकर हे मूल्य साखळीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून कार्यक्रमात उपस्थित असलेले विणकर आणि त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवाचीही नोंद पंतप्रधानांनी घेतली. विणकरांना संबोधित करताना पंतप्रधानांनी विकसित भारत संकल्प आणि त्याचे चार स्तंभ अधोरेखित केले. भारताचे वस्त्रोद्योग क्षेत्र गरीब, तरुण, शेतकरी आणि महिला या प्रत्येकाशी जोडलेले आहे. त्यामुळे भारत टेक्स 2024 सारख्या कार्यक्रमाचे महत्त्व अधिकच वाढते, असे पंतप्रधान म्हणाले.

विकसित भारताच्या प्रवासात वस्त्रोद्योग क्षेत्राची व्याप्ती अधिक विस्तारण्यासाठी सरकार कोणत्या परिक्षेत्रात काम करत आहे, हे पंतप्रधानांनी विशद केले. आम्ही परंपरा, तंत्रज्ञान, प्रतिभा आणि प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करत आहोत, असे ते म्हणाले. सध्याच्या युगातील मागणीनुसार पारंपरिक रचना अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे.त्यांनी 5 एफ दृष्टिकोन म्हणजे शेतकरी ते सूत बनविणे ते फॅक्टरी ते फॅशन ते परदेश निर्यात अशा पाच सूत्रांच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला ज्यामुळे मूल्य शृंखलेतील सर्व घटकांना एकाच वेळी बांधून ठेवले जाते. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राला सहकार्य करण्याच्या हेतूने  एम एस एम ई ची व्याप्ती वाढल्यानंतर देखील त्यांना निरंतर लाभ मिळावेत यासाठी एमएसएमईच्या व्याख्येत बदल केल्याचा उल्लेख त्यांनी केला. कारागीर आणि बाजारपेठ यांच्यातील अंतर कमी करणाऱ्या थेट विक्री, प्रदर्शने आणि ऑनलाइन पोर्टल्सबद्दलही त्यांनी सांगितले.

विविध राज्यांमध्ये सात पीएम मित्र पार्क तयार करण्याच्या सरकारच्या व्यापक  योजनांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला आणि ते, संपूर्ण वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी संधी निर्माण करण्यावर सरकारचा भर असल्याचे अधोरेखित केले. “मूल्य साखळीची संपूर्ण प्रणाली एकाच ठिकाणी निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून या ठिकाणी प्ले आणि  प्लग अशा आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जातील”, पंतप्रधान म्हणाले. यामुळे केवळ व्याप्ती आणि परिचालन सुधारणार नाही, तर लॉजिस्टिकचा खर्च देखील कमी होईल, असे ते म्हणाले.

वस्त्रोद्योग क्षेत्रात ग्रामीण भागाला आणि महिलांना सामावून घेण्याची आणि रोजगार देण्याची क्षमता लक्षात घेऊन पंतप्रधान म्हणाले की, 10 पैकी 7 पोशाख निर्मात्या, या महिला आहेत आणि हातमाग क्षेत्रात ही संख्या अधिक आहे.सरकारने गेल्या 10 वर्षात उचललेल्या पावलांमुळे खादी हे विकास आणि रोजगाराचे एक मजबूत साधन बनले आहे यावर भर देत ते म्हणाले की, गेल्या दशकातील कल्याणकारी योजना आणि पायाभूत सुविधांमुळे वस्त्रोद्योग क्षेत्रालाही फायदा झाला आहे.

कापूस, ताग आणि रेशीम उत्पादक म्हणून भारताच्या वाढत्या भूमिकेबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करत आहे आणि त्यांच्याकडून कापूस खरेदी करत आहे. ते म्हणाले की, सरकारने सुरू केलेले कस्तुरी कॉटन हे जागतिक स्तरावर भारताची ‘ब्रँड व्हॅल्यू’ निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल. ताग आणि रेशीम क्षेत्रासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. त्यांनी टेक्निकल टेक्सटाईल (तांत्रिक वस्त्रोद्योग) सारख्या नवीन क्षेत्रांबद्दलही सांगितले, आणि राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन अंतर्गत  या क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी असलेल्या संधींबद्दलही त्यांनी माहिती दिली.

पंतप्रधानांनी एकीकडे तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाची गरज तर दुसरीकडे वेगळेपण आणि अस्सलपणा यावर प्रकाश टाकला आणि म्हणाले की, या दोन्ही मागण्यांची एकाच ठिकाणी पूर्तता करणारा देश म्हणजे भारत हा आहे. भारतातील कारागिरांनी तयार केलेली उत्पादने नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण असतात हे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, वेगळ्या फॅशनच्या मागणीसह अशा प्रतिभेसाठी असलेली मागणी वाढत आहे. म्हणूनच, देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) या संस्थांची संख्या 19 पर्यंत वाढवून, सरकार कौशल्य आणि त्याबरोबरच त्याच्या व्याप्तीवर भर देत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, स्थानिक विणकर आणि कारागीरांनाही नवीन तंत्रज्ञानाबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थांशी जोडले जात आहे. पंतप्रधानांनी समर्थ योजनेचाही उल्लेख केला जिथे आतापर्यंत 2.5 लाखांहून अधिक लोकांनी क्षमता विकास आणि कौशल्य विकास प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी माहिती दिली की या योजनेत बहुसंख्य महिलांचा सहभाग असून, यामध्ये आतापर्यंत सुमारे 1.75 लाख लोकांना या उद्योगात रोजगार मिळाला  आहे.

पंतप्रधानांनी ‘व्होकल फॉर लोकल’ या अभियानाच्या व्याप्तीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “आज देशात ‘व्होकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल’ अशी लोकचळवळ सुरू आहे. ते म्हणाले की, सरकार छोट्या कारागिरांसाठी प्रदर्शने, मॉल यांसारखी व्यवस्था निर्माण करत आहे.

सरकारच्या सकारात्मक, स्थिर आणि दूरदृष्टी असलेल्या धोरणांच्या प्रभावावर भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय कापड बाजाराचे मूल्यांकन 2014 मध्ये 7 लाख कोटी पेक्षा कमी होते, ते आज 12 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. सूत, कापड आणि तयार कपड्यांच्या उत्पादनात 25 टक्के वाढ झाली आहे. 380 नवीन BIS मानके या क्षेत्रातील गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित करत आहेत. यामुळे गेल्या 10 वर्षांत या क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) दुप्पट झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राकडून असलेल्या मोठ्या अपेक्षांवर प्रकाश टाकत पंतप्रधान मोदी यांनी कोविड महामारीदरम्यान या उद्योगाने पीपीई किट आणि फेस मास्कच्या निर्मितीसाठी घेतलेल्या परिश्रमांचे स्मरण केले. त्यांनी अधोरेखित केले की, वस्त्रोद्योग क्षेत्रासह सरकारने पुरवठा साखळी सुव्यवस्थित केली आणि संपूर्ण जगाला पुरेशा प्रमाणात पीपीई किट आणि फेस मास्क उपलब्ध करून दिले. या यशाकडे पाहता, आगामी काळात भारत जगाचे निर्यात केंद्र बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. नजीकच्या भविष्यकाळात भारत जागतिक पातळीवरील निर्यात केंद्र होईल याबाबत पंतप्रधानांनी ठाम विश्वास व्यक्त केला. “तुमची प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी सरकार तुमच्यासोबत आहे,” भागधारकांना खात्री देत ते म्हणाले. वस्त्रोद्योग क्षेत्राच्या विकासाला आणखी गती देण्यासाठी व्यापक निर्धार करता यावा यासाठी या क्षेत्रातील विविध भागधारकांमध्ये सहयोगी संबंध वाढवण्याची सूचना देखील त्यांनी केली. अन्न, आरोग्यसुविधा आणि समग्र जीवनशैलीसह जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये ‘मूळ तत्वांचा परत स्वीकार करण्या’चा जगभरातील नागरिकांचा कल लक्षात घेत पंतप्रधान म्हणाले की ही बाब वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी देखील लागू होते. कापड उत्पादनात रसायन-मुक्त पद्धतीने रंगवलेल्या धाग्यांच्या वाढत्या मागणीकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. केवळ भारतीय बाजारपेठांच्या मागणीची पूर्तता करत राहण्याची मानसिकता सोडून देऊन निर्यातीकडे देखील लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी देशातील कापड उद्योगाला केल्या. यासंदर्भात त्यांनी आफ्रिकी बाजारपेठेच्या विशिष्ट गरजा किंवा जिप्सी समुदायाच्या गरजांचे उदाहरण देऊन ते म्हणाले की अशा क्षेत्रात वस्त्रोद्योगाला प्रचंड संधी उपलब्ध आहेत. यावेळी पंतप्रधानांनी मूल्यसाखळीत रसायन विभागाचा समावेश करण्यास सांगून, नैसर्गिक रसायनांच्या पुरवठादारांचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली.

खादीच्या कापडाच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देत खादी या वस्त्र प्रकाराला युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या फॅशन स्टेटमेंटमध्ये रुपांतरीत करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या प्रयत्नांचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला.वस्त्रांना आधुनिक स्वरूप देण्यासाठी तसेच वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रांचा नावलौकिक पुन्हा मिळवण्यासाठी अधिक संशोधन केले पाहिजे असे देखील त्यांनी सांगितले.हिरे उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपकरणांचे उत्पादन आता स्वदेशी पद्धतीने केले जाते याचे उदाहरण देऊन, वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी आवश्यक साधनांच्या निर्मिती क्षेत्रात अधिक संशोधन करण्याचा तसेच या क्षेत्रात नवीन कल्पना आणि परिणाम साध्य करणाऱ्यांना विशेष प्रोत्साहनपर मदत देखील देण्याचा आग्रह पंतप्रधानांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी या क्षेत्रातील भागधारकांना वैद्यकीय क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या कापडांसारख्या नव्या क्षेत्रांचा शोध घ्यायला सांगितले.जागतिक पातळीवरील फॅशनच्या पद्धतींचे केवळ अनुसरण न करता स्वतः या पद्धतींचे नेतृत्व करावे असा आग्रह त्यांनी भागधारकांकडे व्यक्त केला.

भाषण संपवताना, सरकार एक प्रोत्साहक म्हणून नेहमीच सज्ज असून लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटत आहे ही बाब अधोरेखित करत पंतप्रधानांनी उद्योजकांना, जगाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या आणि त्यांच्या बाजारपेठांमध्ये विविधता आणु शकणाऱ्या नव्या दृष्टीसह पुढे येण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोष यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

देशात 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत भारत टेक्स 2024 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या 5एफ संकल्पनेतून प्रेरणा घेऊन सूत, विणलेले कापड आणि फॅशन यांच्या माध्यमातून संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य साखळीचा समावेश करत, शेतापासून परदेशापर्यंत अशी संपूर्ण एकत्रित श्रुंखला सादर होणार आहे. हे प्रदर्शन भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील सामर्थ्याचे दर्शन घडवेल तसेच जागतिक पातळीवरील वस्त्रोद्योग विषयक प्रमुख केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत असल्याची पुष्टी करेल.

देशातील 11 वस्त्रोद्योग निर्यात प्रोत्साहन मंडळांनी आयोजित केलेले आणि सरकारचा पाठींबा असलेले  भारत टेक्स 2024 हे प्रदर्शन शाश्वततेवर व्यापक पद्धतीने लक्ष केंद्रित करण्यासह व्यापार आणि गुंतवणुक अशा दुहेरी आधारस्तंभांवर उभारण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात 65 हून अधिक ज्ञानविषयक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. या सत्रांमध्ये या क्षेत्राशी संबंधित 100 हून अधिक जागतिक तज्ञ सहभागी होऊन वस्त्रोद्योगाशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करतील. यामध्ये शाश्वतता आणि चक्राकारता या संकल्पनांवर आधारित समर्पित दालने उभारण्यात आली असून त्यामध्ये  ‘इंडी हाट’,  भारतीय वस्त्रांचा वारसा, टिकाऊपणा आणि जागतिक संरचना, तसेच आंतरसंवादी कापड चाचणी विभाग आणि उत्पादनांची प्रात्यक्षिके यासारख्या विविध संकल्पनांवर आधारित फॅशनविषयक सादरीकरणे आहेत.

भारत टेक्स 2024 या प्रदर्शनात धोरणकर्ते, जागतिक पातळीवरील प्रमुख उद्योगांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह वस्त्रोद्योगातील 3,500 हून अधिक सादरकर्ते, 100 हून जास्त देशांतून आलेले  ग्राहक आणि 40,000 हून अधिक व्यावसायिक अभ्यागत, तसेच वस्त्रोद्योग क्षेत्राचा अभ्यास करत असलेले विद्यार्थी, विणकर, कारागीर आणि कापड कामगार सहभागी होतील अपेक्षा आहे. या कार्यक्रमादरम्यान 50 हून अधिक घोषणा आणि सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा असल्याने, वस्त्रोद्योग क्षेत्रातील गुंतवणूक आणि व्यापाराला अधिक चालना मिळेल आणि त्यायोगे निर्यात वाढायला मदत होईल अशी अपेक्षा आहे. आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत ही पंतप्रधानांची संकल्पना साकार करण्याच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

* * *

N.Chitale/Bhakti/Rajshree/Sanjana/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai