Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रील प्रभूपाद जी यांच्या 150 व्या जयंतीदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमामध्ये केलेले भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रील प्रभूपाद जी यांच्या 150 व्या जयंतीदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमामध्ये केलेले भाषण


या पवित्र कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पूजनीय संतगण, आचार्य गौडीय मिशनचे श्रद्धेय भक्ती सुंदर सन्यासी जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी अर्जुनराम मेघवाल जी, मीनाक्षी लेखी जी, देश आणि दुनियेतून जोडले गेलेले कृष्णभक्त, अन्य मान्यवर, भगिनी आणि सद्गृहस्थ हो !! 

हरे कृष्ण! हरे कृष्ण! हरे कृष्ण! आज तुम्ही सर्वजण इथे आला आहात, त्यामुळे भारत मंडपम् ची भव्यता आणखी वाढली आहे. या भवनाची उभारणी करताना, त्याच्या मूळाशी असलेला विचार भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपम् बरोबर या भारत मंडपम् ची  सांगड घातली आहे. अनुभव मंडपम् प्राचीन भारतामध्ये आध्यात्मिक चर्चा-परिसंवाद यांचे केंद्र होते. अनुभव मंडपम् लोक कल्याणाची भावना आणि संकल्प यांचे ऊर्जा केंद्र होते. आज श्रील भक्तिसिद्धान्त सरस्वती गोस्वामी प्रभुपाद जी यांच्या  150 व्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमामध्येही अशीच ऊर्जा, असेच चैतन्य दिसून येत आहे. आमचा विचारही असाच होता की, हे भवन, भारताचे आधुनिक सामर्थ्य आणि प्राचीन मूल्ये  अशा दोन्ही गोष्टींचे केंद्र बनले पाहिजे.अलिकडेच, काही महिन्यांपूर्वी जी -20 शिखर परिषदेच्या माध्यमातून इथूनच नवीन भारताच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले होते. आणि आज इथेच, ‘वर्ल्ड वैष्णव कन्व्हेंशन’चे आयोजन करण्याची संधी मोठ्या सद्भाग्याने मिळत आहे.  आणि इतकेच नाही तर, भारताची जी प्रतिमा आहे… जिथे विकासही आहे आणि वारसाही आहे,  अशा दोन्ही गोष्टींचा संगम घडून आला आहे. जिथे आधुनिकतेचे स्वागतही आहे आणि आपल्या ओळखीविषयी अभिमानही आहे.

हे माझे सद्भाग्य आहे की, या पुण्यमयी कार्यक्रमांमध्ये तुम्हा सर्व संतांच्या बरोबर मला इथे उपस्थित राहता आले. आणि आपल्यापैकी बहुतांश संतांबरोबर माझे घनिष्ठ संबंध आहेत,  ही  गोष्ट  सुद्धा मला सद्भाग्याचीच  वाटते. मला अनेकवेळा तुम्हा सर्वांच्या सानिध्यामध्ये राहण्याची संधी मिळाली आहे. मी ‘कृष्णम् वंदे जगदगुरूम्’ च्या भावनेने श्रींच्या  चरणाशी वंदन करतो. मी श्रील भक्तिसिद्धान्त प्रभूपाद जी यांना भक्तिपूर्वक  वंदन करून, त्यांना आदरांजली अर्पण करतो. त्यांना श्रद्धापूर्वक नमन करतो. मी प्रभूपाद  यांच्या सर्व अनुयायींना त्यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त अगदी अंतःकरणापासून खूप-खूप शुभेच्छा देतो. आज याप्रसंगी  मला श्रील प्रभूपाद जी  यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ टपाल तिकीट आणि स्मृती नाणे जारी करण्याचे सद्भाग्यही मिळाले, आणि मी त्यासाठीही आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो.

पूज्य संतगण,

प्रभूपाद गोस्वामी जी यांची 150 जयंती,  आपण अशा काळामध्ये साजरी करीत आहोत, ज्यावेळी काही दिवस आधीच भव्य राममंदिराचे शेकडो वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आज आपल्या सर्वांच्या चेह-यांवर जो उत्साह, जो आनंद  दिसत आहे, तो पाहिल्यानंतर माझी खात्रीच झाली की,  श्रीरामाची मूर्ती जन्मभूमीमध्‍ये  विराजमान झाली, याचाही आनंद त्यामध्‍ये समाविष्ट आहे. हा इतका मोठा महायज्ञ, संतांच्या साधनेमुळे, त्यांच्या आशीर्वादानेच पूर्ण झाला आहे.  

मित्रांनो,

आज आपण सर्वजण  आपल्या जीवनामध्ये ईश्वराच्या प्रेमाला, कृष्णलीलांना, आणि भक्तीच्या तत्वाला अतिशय सहजपणाने समजून घेवू शकतो. अर्थात, असे या युगामध्ये शक्य व्हावे,  याच्यामागे चैतन्य महाप्रभूंच्या कृपेची खूप मोठी भूमिका आहे. चैतन्य महाप्रभू, कृष्ण प्रेमाचे जणू प्रतिमान होते. त्यांनी आध्यात्म आणि साधना या गोष्टी सर्वसामान्य लोकांसाठी सुलभ बनवल्या. आध्यात्म सरळ- सोपे बनवले. त्यांनी सांगितले की, ईश्वराची प्राप्ती केवळ संन्यास घेवून होत नाही, आनंदानेही होवू शकते. आणि मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. या परंपरेमध्ये मी वाढलो  आहे. माझ्या जीवनामध्ये जे वेगवेगळे टप्पे आले आहेत, त्यामध्ये एक टप्पा काही वेगळाच होता,  असे म्हणता येईल. मी अशा वातावरणामध्ये राहत होतो, बसत होतो भाज-कीर्तन सुरु असे आणि तिथेच मी एका कोप-यामध्ये बसून रहात असे. जे काही कीर्तन सुरू असे ती मी ऐकत असे. अगदी तो क्षण पूर्णपणे, मनापासून अगदी शंभर टक्के जगत होतो. मात्र त्याच्याशी  जोडला काही जात नव्हतो. त्यामुळे तिथेच बसून रहात होतो. ठाऊक नाही, एकदा मनामध्ये खूप, असंख्य विचारांची गर्दी दाटली होती. मी विचार केला की, असे सगळ्यांपासून दूर राहणं नेमकं आहे तरी काय? अशी कोणती गोष्ट आहे की, मला अडवून ठेवते. मी जगत तर होतोच,  परंतु जोडला जात नव्हतो. आणि त्यानंतर ज्यावेळी मी भजन-कीर्तनामध्ये बसू लागलो त्यावेळी मी स्वतःहून टाळ्या वाजवू लागलो, जे समोर सुरू असायचे, त्याच्याशी मी लगेच जोडला जावू लागलो. इतकेच नाही तर, मी त्या सर्व गोष्टींमध्ये रमतही  गेलो होतो. चैतन्य प्रभूंच्या या परंपरेमध्ये जे सामर्थ्य आहे, त्याचा मला साक्षात्कार झाला. आणि आता, ज्यावेळी सर्वजण हे कीर्तन, भजन करीत होते,  त्यावेळी माझ्याकडूनही आपोआपच टाळ्या वाजवणे सुरू झाले. हे पाहून लोकांना वाटतेय की, पंतप्रधान टाळ्या वाजवताहेत. मात्र इथे पंतप्रधान टाळ्या वाजवत नव्हते तर, प्रभूचा भक्त टाळी वाजवत होता.

चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला दाखवून दिले की, श्रीकृष्णाच्या लीला, त्यांच्या जीवनाला, उत्सव  स्वरूपामध्ये  आपल्या जीवनामध्ये अंगीकारत  कशा प्रकारे सुखी होता येते, हे त्यांनी दाखवून दिले. संकीर्तन, भजन, गीत आणि नृत्य यांच्या माध्यमातून आध्यात्माच्या शीर्षस्थानी कसे पोहोचता येते, याचा आज अनेक साधक प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. आणि त्यांना या अनुभवाचा आनंद किती होतो, त्याचा साक्षात्कार मला झाला आहे. चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला श्रीकृष्णाच्या लीलांचे लालित्यही समजावले आणि जीवनाचे लक्ष्य जाणून घेण्यासाठी त्याचे असलेले महत्वही सांगितले. म्हणूनच, भक्तांमध्ये आजच्या सारखी आस्था,  भागवतासारख्या ग्रंथाविषयी असलेले प्रेम, चैतन्य चरितामृत आणि ‘भक्तमाला’ विषयी भक्ती आहे.

मित्रांनो,  

चैतन्य महाप्रभू यांच्यासारख्या दैवी विभूती काळानुसार कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या कार्याला पुढे घेवून जात असतात. श्रील भक्तिसिद्धान्त प्रभूपाद, त्यांच्या म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या संकल्पांचे प्रतिमूर्ती  होते. साधनेतून सिद्धीपर्यंत कशा प्रकारे पोहोचता येते, अर्थापासून परमार्थापर्यंतचा प्रवास कसा होतो, हे श्रील भक्तिसिद्धान्त जी यांच्या  जीवनामध्ये आपल्याला पावला-पावलावर दिसून येते. 10 वर्षापेक्षाही कमी वयामध्ये प्रभूपाद जीं नी संपूर्ण गीता पाठ केली होती. किशोरवयामध्ये त्यांनी आधुनिक शिक्षणाबरोबरच संस्कृत, व्याकरण, वेद-वेदांग यामध्ये विद्वता प्राप्त केली होती. त्यांनी  ज्योतिष गणित यामध्ये सूर्य सिद्धान्त यासारख्या ग्रंथांची व्याख्या केली. सिद्धान्त सरस्वतीची उपाधी प्राप्त केली. वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी संस्कृत पाठशाळा सुरू केली. आपल्या जीवनामध्ये स्वामीजींनी 100 पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन केले. शेकडो लेख लिहिले. लाखो लोकांना दिशा दाखवली. याचा अर्थ एक प्रकारे ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग अशा दोन्ही गोष्टी  संतुलित जीवन व्यवस्थेने जोडल्या.  ‘‘वैष्णव जन तो तेने कहिए, पीर पराई जाने रे’’ हे भजन म्हणून गांधीजी ज्या वैष्णव भावाचे गुणगान करीत होते, श्रील प्रभुपाद स्वामीजींनी त्या भावनेला… अहिंसा आणि प्रेमाच्या त्या मानवीय संकल्पाला देश-विदेशामध्ये पोहोचवण्याचे काम केले.

मित्रांनो,

माझा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. गुजरातची ओळखच तर वैष्णव भाव असल्यामुळे, कुठेही याचा विषय निघाला की,  त्याच्याशी गुजरात आपोआपच जरूर जोडला जातो. स्वतः भगवान कृष्णांनी  मथुरेमध्ये अवतार घेतला. मात्र आपल्या लीलांना विस्तार देण्यासाठी ते द्वारकेला आले होते. मीराबाईसारख्या महान कृष्णभक्ताने राजस्थानात जन्म घेतला. मात्र श्रीकृष्णाबरोबर एकाकार होण्यासाठी मीराबाई गुजरातला आल्या. असे कितीतरी वैष्णव संत आहेत, ज्यांचा गुजरातच्या भूमीबरोबर, व्दारिकेबरोबर विशेष नाते निर्माण झाले आहे. संत कवी नरसी मेहता यांचीही जन्मभूमी  गुजरात आहे. म्हणूनच श्रीकृष्णाशी संबंध, चैतन्य महाप्रभूंची परंपरा, या गोष्टी माझ्या जीवनाचा सहज स्वाभाविक भाग  बनल्या आहेत.

मित्रांनो,

वर्ष 2016 मध्ये मी गौडीय मठाच्या शताब्दी कार्यक्रमाला आपल्यामध्ये आलो होतो. त्यावेळी मी आपल्याशी बोलताना भारताच्या आध्यात्मिक चेतनेचा विस्तार या विषयावर बोललो होतो. जर एखादा समाज आपल्या मूळांपासून दूर जात असेल, तर त्याला सर्वात प्रथम आपले सामर्थ्य नेमके कशात आहे, याचे विस्मरण होत असते.  याचा सर्वात मोठा प्रभाव असा होतो की, जी आपले वैशिष्ट्य, खुबी आहे, जी आपली ताकद आहे, याविषयी आपल्यामध्ये हीनभावना निर्माण होते आणि आपणच त्याचे शिकार बनतो. भारताच्या परंपरेमध्ये, आपल्या जीवनामध्ये भक्तीसारखे महत्वपूर्ण दर्शनक्षेत्रही त्यापासून दूर राहू शकत नाही. इथे बसलेले युवा मित्रांच्या दृष्‍टीने मी जे बोलतोय, त्याच्याशी जोडण्यासाठी काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहेत. ज्यावेळी भक्तीविषयी चर्चा होते, त्यावेळी काही लोक असा विचार करतात की, भक्ती, तर्क आणि आधुनिकता या गोष्टी विरोधाभासी आहेत. मात्र, प्रत्यक्षामध्ये ईश्वराची भक्ती म्हणजे आपल्या ऋषींनी दिलेली मोठी भेट  आहे.  भक्ती हताशपणातून येत नाही. आशा आणि आत्मविश्वास आहे.

भक्ती म्हणजे भय नसून उत्साह आहे, उल्हास आहे. राग आणि वैराग्य यांच्या दरम्यान जीवनात चैतन्याचा भाव  समाकलीत करण्याचे सामर्थ्य भक्तीमध्ये असते. युद्धाच्या मैदानात उभे असलेले श्रीकृष्ण गीतेच्या बाराव्या अध्यायात महान योग सांगतात, ती भक्ती आहे. जिच्या ताकदीमुळे, निराश झालेले अर्जुन अन्यायाच्या विरोधात आपले गांडीव उचलून घेतात, ती भक्ती आहे. म्हणूनच, भक्ती पराभव नाही तर प्रभावाचा संकल्प आहे.

पण मित्रांनो,

हा विजय आपल्याला दुसऱ्यांवर नाही, तर हा विजय आपल्याला स्वतःवरच मिळवायचा आहे. आपल्याला ही लढाई देखील आपल्यासाठी नाही तर ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ या भावनेने संपूर्ण मानवतेसाठी लढायची आहे. आणि हीच भावना आपल्या संस्कृतीमधून आणि आपल्या नसा-नसामधून वाहते आहे. म्हणूनच भारत आपल्या सीमा विस्तारासाठी कधीही दुसऱ्या देशांवर हल्ला करायला गेला नाही. जे लोक इतक्या महान भेटीपासून अपरिचित होते, जे याला समजू शकेल नाहीत, त्यांनी केलेल्या वैचारिक हल्ल्याने कुठे ना कुठे आपले मानस प्रभावित झाले आहे. मात्र, श्रील प्रभुपाद यांच्यासारख्या संतांचे आपण ऋणी आहोत ज्यांनी करोडो लोकांना पुन्हा एकदा सत्याचे दर्शन घडवले, त्यांना भक्तीचा गौरव करणाऱ्या भावनेने भारून टाकले.  आज स्वातंत्र्याच्या अमृत काळात देश ‘गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती’ चा संकल्प घेऊन संतांच्या त्या संकल्पाला पूर्णत्वाकडे नेत आहे. 

मित्रांनो,

येथे भक्ती मार्गातील अनेक विद्वान संतगण उपस्थित आहेत.  आपण सर्वजण भक्ती  मार्गाशी चांगलेच परिचित आहात. आपल्या भक्तिमार्गी संतांचे योगदान, स्वातंत्र्याच्या आंदोलनात भक्ती आंदोलनाची भूमिका अमूल्य होती. भारताच्या प्रत्येक आव्हानात्मक कालखंडात कोणी ना कोणी महान संत किंवा आचार्य कोणत्या ना कोणत्या रूपात राष्ट्राला दिशा दाखवण्यासाठी समोर आले आहेत. आता हेच पहा, मध्यकाळातील कठीण समयी जेव्हा पराजयामुळे भारत हताश झाला होता, तेव्हा भक्ती आंदोलनातील संतांनी आपल्याला ‘हारे को हरिनाम’, ‘हारे को हरिनाम’ मंत्र दिला. समर्पण केवळ परम सत्तेसमोरच करायचे असते, याची शिकवण आपल्याला दिली. अनेक शतके आपल्याला आक्रमणकर्त्यांनी लुटल्यामुळे देश गरीबीच्या खोल गर्तेत सापडला होता. तेव्हा, आपल्याला त्याग आणि सहनशीलतेने जीवन व्यतीत करुन आपल्या मुल्यांचे रक्षण करण्याची शिकवण संतांनीच दिली. सत्याचे रक्षण करण्यासाठी जेव्हा आपण सर्वस्व  बलिदान करतो तेव्हा असत्याचा अंत नक्कीच होतो, हा आत्मविश्वास आपल्याला पुन्हा एकदा प्राप्त झाला आहे. सत्याचाच विजय होत असतो – ‘सत्यमेव जयते’. म्हणूनच स्वातंत्र्याच्या चळवळीत देखील स्वामी विवेकानंद आणि श्रील स्वामी प्रभुपाद यांच्यासारख्या संतांनी लोकांमध्ये असीम ऊर्जा निर्माण केली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महामना मालवीय यांसारख्या महान व्यक्ती आध्यात्मिक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी प्रभुपाद स्वामींकडे येत असत. 

मित्रांनो,

बलिदान देऊनही अमर राहण्याचा हा आत्मविश्वास आपल्याला भक्ती योगातून मिळतो. म्हणूनच आपले ऋषीगण म्हणतात ‘अमृत-स्वरूपा च’ अर्थात ही भक्ती अमृत स्वरुपा आहे. आज याच आत्मविश्वासाने भारलेल्या करोडो देशवासीयांनी राष्ट्र भक्तीची ऊर्जा घेऊन अमृत काळात प्रवेश केला आहे. या अमृत काळात आपण आपल्या भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. आपण राष्ट्राला देव मानून ‘देवापासून देश’ हा दृष्टिकोन ठेवून मार्गक्रमण करत आहोत. आपण आपल्या विविधतेला आपली ताकद बनवले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील सामर्थ्य हीच आपली ऊर्जा, आपली ताकद, आपली चेतना आहे.

मित्रांनो,

तुम्ही सर्वजण येथे इतक्या मोठ्या संख्येने एकत्रित जमला आहात. कोणी कोणत्या राज्यातील आहे, तर कोणी कोणत्या प्रदेशातील आहे. भाषा, बोली, रहाण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे. मात्र, एक सामायिक चिंतन सर्वांना किती सहजतेने एकमेकांशी जोडत आहे. ‘अहम् आत्मा गुडाकेश सर्व भूताशय स्थितः’ अर्थात सर्व प्राण्यांमध्ये त्यांच्या आत्म्याच्या रूपात एकच ईश्वर वास करत आहे, अशी शिकवण भगवान श्रीकृष्णाने आपल्याला दिली आहे. हाच विश्वास भारताच्या अंतर्मनात ‘नरापासून नारायण’ आणि ‘जिवापासून शिवापर्यंत’ या संकल्पनेच्या रुपात सामावलेला आहे. म्हणूनच विविधतेमध्ये एकतेचा मंत्र इतका सहज आहे आणि इतका व्यापक आहे की त्यामध्ये विभाजनाची शक्यताच नाही. आपण एकदा ‘हरे कृष्ण’ म्हणतो आणि त्यामुळे एकमेकांची मने जोडली जातात. म्हणूनच, जगासाठी राष्ट्र एक राजनैतिक संकल्पना असू शकते, मात्र भारतासाठी तर ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना एक आध्यात्मिक आस्था आहे.

श्रील भक्ति सिद्धान्त गोस्वामी यांचे स्वतःचे जीवन आपल्यासाठी देखील एक उदाहरण आहे. प्रभुपाद जी यांचा जन्म पुरी शहरात झाला, त्यांनी दक्षिणेतील रामानुजाचार्य जी यांच्या परंपरेत दीक्षा घेतली आणि चैतन्य महाप्रभू यांच्या परंपरेतला पुढे नेले. आणि आपल्या या आध्यात्मिक यात्रेचे केंद्र बनवले ते बंगालमध्ये स्थापित आपल्या मठाला. बंगालच्या भूमीत असे काही असामान्य गुण आहेत की तेथे अध्यात्म आणि बौद्धिकता यांना निरंतर ऊर्जा मिळत राहते. ती बंगालचीच भूमी आहे जिने आपल्याला रामकृष्ण परमहंस यांच्या सारखे संत दिले, स्वामी विवेकानंद यांच्यासारखे राष्ट्र ऋषी दिले. याच भूमीने आपल्याला श्री अरबिंदो आणि गुरु रवीन्द्रनाथ टागोर यांच्यासारखे महापुरुष देखील दिले, ज्यांनी संत भावनेने राष्ट्रीय आंदोलनाला पुढे नेले. याच भूमीत राजा राममोहन रॉय यांच्यासारखे समाजसुधारक देखील जन्माला आले. बंगाल हीच चैतन्य महाप्रभु आणि प्रभुपाद यांच्यासारख्या अनेक अनुयायांची तर कर्मभूमि राहीली आहे. त्यांच्या प्रभावामुळेच आज प्रेम आणि भक्ती एक जागतिक चळवळ बनली आहे.

मित्रांनो,

आणि भारताच्या गती आणि प्रगतीची सर्वत्र चर्चा होत आहे. आधुनिक पायाभूत सुविधा क्षेत्रात, उच्च तंत्रज्ञान सेवा क्षेत्रात भारत विकसित देशांची बरोबरी करत आहे. अनेक क्षेत्रात आपण मोठमोठ्या देशांच्याही पुढे जात आहोत. आपल्याकडे नेतृत्वाच्या भूमिकेतून पाहिले जात आहे. मात्र सोबतच आज भारताचा योग देखील जगातील प्रत्येक घरात पोहोचत आहे. आपल्या आयुर्वेद आणि निसर्गोपचारावर जगाचा विश्वास आणखी वाढत चालला आहे. इतर सर्व देशांचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान किंवा प्रतिनिधी जेव्हा भारतात येतात तेव्हा ते आवर्जून आपली प्राचीन मंदिरे पाहण्यासाठी जातात. इतक्या कमी वेळेत हा बदल कसा काय झाला ? युवा उर्जेमुळे हा बदल घडून आला आहे. आजचा भारतीय युवक बोध आणि शोध या दोन्हींना सोबत घेऊन वाटचाल करत आहे. आपली नवी पिढी आता आपल्या संस्कृतीला संपूर्ण सन्मान देऊन आपल्या मस्तकावर धारण करत आहे. आजची युवा पिढी आध्यात्मिकता आणि स्टार्टअप्स या दोन्हींना महत्त्वपूर्ण समजते, आणि या दोन्हीची क्षमता बाळगून आहे. म्हणूनच आज काशी असो की अयोध्या, तीर्थस्थळांना भेट देणाऱ्यांमध्ये खूप मोठी संख्या आपल्या युवकांची असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

जेव्हा देशाची नवी पिढी इतकी जागरूक असते तेव्हा देश चांद्रयान देखील बनवेल आणि चंद्रशेखर महादेव यांचे धाम देखील सजवेल, हे स्वाभाविक आहे. देशाचे नेतृत्व जेव्हा युवा पिढीकडे असेल तेव्हा देश चंद्रावर रोव्हर उतरवेल आणि त्या स्थानाला ‘शिवशक्ती’ नाव देऊन आपल्या परंपरेचे जतन देखील करेल. आता देशात वंदे भारत ट्रेन देखील धावतील आणि वृंदावन, मथुरा, अयोध्या या शहरांचा कायापालट देखील होईल. आम्ही नमामि गंगे योजनेअंतर्गत बंगालच्या मायापूर शहरात सुंदर अशा गंगा नदीवरील घाटाच्या निर्मितीची देखील सुरुवात केली आहे हे सांगताना देखील मला खूप आनंद होतो आहे. 

मित्रांनो,

विकास आणि वारशाची ही आपली वाटचाल आगामी 25 वर्षांच्या अमृतकाळात अशीच चालू राहणार आहे, संतांच्या आशीर्वादाने चालू राहणार आहे. संतांच्या आशीर्वादाने आपण विकसित भारताची निर्मिती करणार आहोत. आणि, आपले आध्यात्म संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त बनवेल. याच कामनेसह तुम्हा सर्वांना हरे कृष्ण! हरे कृष्ण! हरे कृष्ण! खूप खूप धन्यवाद.

***

NilimaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai