पंतप्रधान नरेंद्र मोदी काल आणि आज म्हणजेच 6 आणि 7 रोजी जयपूर इथे पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या 58 व्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी झाले होते.
यावेळी, नवे फौजदारी कायदे लागू होण्याबद्दल चर्चा करताना पंतप्रधान म्हणाले की हे कायदे फौजदारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणारे आहेत. नवे फौजदारी कायदे, ‘ नागरिक प्रथम , प्रतिष्ठा प्रथम आणि न्याय प्रथम ‘ या तत्वानुसार तयार करण्यात आले असून ‘दंडा हातात घेऊन काम करण्याऐवजी पोलिसांनी आता ‘डेटा’सोबत काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. नव्याने लागू करण्यात आलेल्या कायद्यांमागचा भाव समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस प्रमुखांना कल्पकतेने विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. नवीन गुन्हेगारी विषयक कायद्यांतर्गत महिला आणि मुलींना त्यांचे हक्क आणि संरक्षण प्रदान करण्याबाबत पंतप्रधानांनी विशेष लक्ष केंद्रित केले. स्त्रिया निर्भयपणे ‘ कुठेही आणि कधीही, , काम करू शकतील हे सुनिश्चीत करून महिला सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी पोलिसांना आवाहन केले.
नागरिकांमध्ये पोलिसांची सकारात्मक प्रतिमा मजबूत करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. नागरिकांच्या हितासाठी सकारात्मक माहिती आणि संदेश प्रसारित करण्यासाठी पोलिस स्टेशन स्तरावर समाज माध्यमांचा वापर करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला. नैसर्गिक आपत्ती आणि आपत्ती निवारणाची आगाऊ माहिती प्रसारित करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करण्याची सूचनाही त्यांनी केली. नागरिक-पोलीस यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचेही त्यांनी सुचवले. सीमा भागातील गावे ही भारतातील ‘पहिली गावे‘ असल्याने स्थानिक लोकांशी अधिक चांगले ‘कनेक्ट‘ अर्थात संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना या गावांमध्ये राहण्याचे आवाहन केले.
भारताची पहिली सौर मोहीम आदित्य-एल 1 चे यश आणि अरबी समुद्रातून अपहरण केलेल्या जहाजावरून 21 सदस्यांची भारतीय नौदलाने केलेली त्वरित सुटका अधोरेखित करत भारत जगातली महत्वाची शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचे यातून प्रतीत होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय नौदलाच्या या यशस्वी आणि उत्तम कामगिरीबद्दल त्यांनी अभिमान देखील व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी, जागतिक आधुनिक बदलांशी जुळवून घेत आणि देशाच्या वाढत्या राष्ट्रीय सामर्थ्याच्या अनुषंगाने, भारतीय पोलिसांनी स्वतःला आधुनिक आणि जागतिक तोडीचे पोलिस म्हणून घडवले पाहिजे.
पंतप्रधानांनी विशिष्ट सेवांसाठीची पोलीस पदके यावेळी प्रदान केली आणि जयपूर इथे आयोजित तीन दिवसांच्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेचा समारोप केला.
या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृह राज्यमंत्री, केंद्रीय गृह सचिव, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक-पोलीस निरीक्षक आणि केंद्रीय पोलीस दले/केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे प्रमुख आदी उपस्थित होते. गतवर्षांप्रमाणे, यावेळी देखील ही परिषद संकरित पद्धतीने (हायब्रीड मोड) आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये देशभरातील विविध ठिकाणांहून विविध श्रेणीतील 500 हून अधिक पोलीस अधिकारी उपस्थित होते. या परिषदेत, राष्ट्रीय सुरक्षेतील महत्त्वाच्या घटकांवर चर्चा करण्यात आली. यात नव्याने लागू करण्यात आलेले प्रमुख गुन्हेगारीविषयक कायदे, दहशतवादविरोधी धोरणे, डाव्या विचारसरणीचा कट्टरतावाद, उदयोन्मुख सायबर धोके, जगभरातील कट्टरतावादाविरोधातील उपाययोजना यांचा समावेश होता.
***
N.Chitale/R.Aghor/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Over the last two days, took part in the DGP/IGP conference. We had extensive deliberations on ways to make policing more modern and data oriented. We also discussed ways on furthering public safety and increasing connect with the people, especially in remote areas.… pic.twitter.com/kwj3WAaMCK
— Narendra Modi (@narendramodi) January 7, 2024