नमस्कार,
विकसित भारताच्या संकल्पात सहभागी होण्याचा आणि देशवासीयांना जोडण्याचे हे अभियान सतत विस्तारत चालले आहे. दूर दूरच्या गावांमध्ये हे अभियान पोहोचत आहे. गरिबातल्या गरिबाला सहभागी करून घेत आहे.युवक असतील, महिला असतील, गावातील ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वजण आज मोदींच्या गाडीची वाट पाहत असतात आणि मोदीच्या गाडीच्या कार्यक्रमाचे आयोजन ही करत असतात आणि यासाठी या महाअभियानाला यशस्वी बनवण्यासाठी मी आपल्या सर्व देशवासीयांचे विशेष करून माझ्या माता , भगिनींचे आभार व्यक्त करत आहे. तरुण युवकांची ऊर्जा याबरोबर जोडली गेली आहे तरुण युवकांचे परिश्रम याबरोबर जोडले गेले आहेत.सर्व तरुण मंडळी सुद्धा या कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी अभिनंदनास पात्र आहेत.काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही कामाची वेळ असते.तेव्हा सुद्धा जेव्हा ही गाडी त्यांच्याजवळ पोहोचते तेव्हा ते आपले शेतीतले काम चार सहा तास सोडून या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. तर अशाप्रकारे खऱ्या अर्थाने गावागावात एक खूप मोठा विकासाचा महोत्सव साजरा होत आहे.
विकसित भारत संकल्प यात्रा सुरू होऊन आता कुठे 50 दिवस सुद्धा झालेले नाहीत परंतु ही यात्रा आता पर्यंत लाखो गावांपर्यंत पोहोचलेली आहे. हा स्वतःमध्येच एक विक्रम आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचे आहे जो काही कारणास्तव भारत सरकारच्या योजनांपासून दूर राहिलेला आहे.कधी कधी तर लोकांना असे वाटते की गावात दोन लोकांना योजनांचा फायदा मिळाला तर असे होऊ शकते की त्यांची कुठे ओळख असेल, त्यांना कुठे लाच द्यावी लागली असेल, अथवा त्यांचा कोणी ओळखीचा नातेवाईक असेल.
तर मी ही गाडी घेऊन गावागावात यासाठी निघालो आहे की मी सांगू इच्छितो की, इथे कोणतीही लाचखोरी चालू नाही आहे, कोणतेही भाऊबंदकी (घराणेशाही) नाही चालत आहे, कोणतेही संबंध नाते चालत नाहीत, हे काम असे आहे जे केवळ प्रामाणिकपणे केले जात आहे, समर्पण भावाने केले जात आहे आणि यासाठीच मी आपल्या गावात यासाठी आलेलो आहे की अजून पर्यंत जे लोक राहिलेले आहेत मी अशा लोकांचा शोध घेत आहे.
जसजशी माहिती होत जाईल, येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांच्यापर्यंत सुद्धा मी पोहोचणार आहे,याची गॅरंटी मी घेऊन आलेलो आहे. ज्यांना आतापर्यंत घर मिळाले नाही त्यांना आता घर मिळेल, ज्यांना स्वयंपाकाचा गॅस मिळाला नाही त्यांना गॅस मिळणार आहे, ज्यांना आयुष्यमान कार्ड मिळालेले नाही त्यांना आयुष्यमान कार्ड मिळणार आहे, योजना ज्या आपल्या लाभासाठी आम्ही चालवत आहोत त्या आपल्यापर्यंत पोहोचाव्यात हे गरजेचे आहे. यासाठी संपूर्ण देशात एवढे मोठे परिश्रम घेऊन हे कार्य सुरू आहे.
मागच्या काही दिवसांमध्ये जेव्हा जेव्हा मला या यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळाली, तेव्हा मी एका गोष्टीची नक्कीच नोंद घेतलेली आहे, ज्या प्रकारे देशातले गरीब, आपले शेतकरी बंधू भगिनी, आपले युवक, आपला महिलावर्ग मोठ्या आत्मविश्वासाने आपले म्हणणे मांडत आहेत, त्यांना जेव्हा मी ऐकतो तेव्हा मी स्वतः मोठ्या विश्वासाने भरून जातो. त्यांना, जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला वाटते, व्वा..माझ्या देशात ही कसली ताकत आहे, शक्ती आहे, कुठे कुठे ही शक्ती सामावलेली आहे. हेच ते लोक आहेत जे माझ्या देशाचा विकास करणारे आहेत. हा एक अद्भुत असा अनुभव आहे. देशभरात प्रत्येक लाभार्थ्याजवळ मागच्या दहा वर्षात त्यांच्या जीवनात आलेले परिवर्तन हे एका धाडसाने भरलेले, समाधानाने भरलेले आणि त्याचबरोबर मोठ्या आशा- आकांक्षाने भरलेल्या स्वप्नांनी भरलेली एक गाथा आहे आणि याबाबत मला आनंद आहे की, ते आपल्या जीवन यात्रेबाबत देशाबरोबर आपले अनुभव सांगण्यासाठी ते खूपच उत्सुक सुद्धा आहेत. हेच मी आत्ताच काही वेळापूर्वी जी चर्चा करण्याची संधी मला मिळाली, तेव्हा मी अनुभव घेत होतो की,आपल्याला एवढं सारं बोलायचं आहे, आपल्या जवळ एवढे मोठे चांगले अनुभव आहेत, आपण खूप काही बोलू इच्छित आहात.
माझ्या कुटुंबीयांनो,
आज देशातले कोटी कोटी लाभार्थी, सरकारच्या योजनांना पुढे घेऊन जाण्यासाठी एक माध्यम बनत आहेत. ते केवळ इथपर्यंतच मर्यादित राहत नाहीत की, चला आता मला पक्क घर मिळालेले आहे, वीज -पाणी- गॅस- उपचार- शिक्षण हे सर्व काही आता मला मिळालेले आहे, तेव्हा आता काही करायचेच नाही आहे. ते ही मदत मिळवल्यानंतरही थांबत नाही आहेत, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.
ते या कार्यातून एक मोठी शक्ती प्राप्त करत आहेत. एक नवीन ऊर्जा मिळवत आहेत आणि आपल्या भविष्याला अधिक चांगले बनवण्यासाठी अधिक परिश्रम घेण्यासाठी पुढे येत आहेत. ही सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. मोदीच्या गॅरंटीच्या पाठी जे कोणी खऱ्या अर्थाने आमचे जे सर्वात मोठे उद्दिष्ट होते ना ते हेच होते. आणि ते ती उद्दिष्ट्ये पूर्ण होताना जेव्हा मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहतो तेव्हा एवढा आनंद होतो,एवढे समाधान मिळते, आयुष्यभराचा सर्व थकवा निघून जातो आणि हीच भावना विकसित भारताची ताकत सुद्धा बनत चालली आहे.
मित्रांनो,
मोदीची गॅरंटी वाली गाडी जिथे जिथे जात आहे तिथे लोकांचा विश्वास अधिक दृढ करत आहे. लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करत आहे. यात्रा सुरू झाल्यानंतर उज्वला गॅस जोडण्या घेण्यासाठी साडेचार लाख नव्या लाभार्थ्यांनी आपले आवेदन दिलेली आहे. मी विचारले होते हे कसे काय आले ? तेव्हा त्यांनी सांगितले की, कुटुंब मोठे झाले आहे, मुलगा वेगळा राहतो आहे, तेव्हा नवीन घर निर्माण झाले, नवीन कुटुंब आहे ना..तर त्याला सुद्धा आता चूल लागणार ना, चला, मी म्हणतो ही तर चांगली गोष्ट आहे की सर्व लोक पुढे जात आहेत.
यात्रेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी एक कोटी आयुष्यमान कार्ड दिले गेले आहेत. पहिल्या वेळेस देशव्यापी आरोग्य तपासणी होत आहे. जवळजवळ सव्वा कोटी लोकांची आरोग्य तपासणी या माध्यमातून झालेली आहे. सत्तर लाख लोकांची क्षयरोगाशी संबंधित तपासणी पूर्ण झालेली आहे. 15 लाख लोकांची सिकलसेल, ऍनिमिया या आजारासाठी तपासणी झालेली आहे. आणि, आज-काल तर आयुष्यमान भारत कार्ड सोबत आभार कार्ड सुद्धा वेगाने तयार केले जात आहेत. लोकांना आधार कार्ड बाबत माहिती आहे मात्र आभा कार्ड बाबत थोडी कमी माहिती आहे.
हे आभा कार्ड अर्थात आयुष्मान भारत आरोग्य खाते याचे अनेक फायदे आहेत, यामुळे वैद्यकीय अहवाल, औषधांच्या चिठ्ठ्या, रक्त गटाविषयी माहिती, डॉक्टर कोण आहे, त्याबाबतची माहिती ही सर्व एका वेळेस या खात्यामध्ये नोंद होणार आहे.यामुळे वैद्यकीय इतिहास शोधण्यासाठी थोडे सुद्धा परिश्रम घ्यावे लागणार नाहीत, याचा अर्थ कधी आजारी पडले होते, कोणत्या डॉक्टरांना आपण दाखवले होते, त्यावेळी कोणकोणत्या तपासण्या झाल्या होत्या, कोणती औषध घेतली होती हे सर्व काही डॉक्टर खूपच सहजतेने माहिती करून घेऊ शकतील. हे कार्ड आरोग्या संबंधी संपूर्ण देशात नवीन जागरूकतेचा प्रसार करणार आहे.
मित्रांनो,
आज मोदी की गॅरंटी वाल्या या गाडीमुळे अनेक मित्रांना मोठा लाभ होत आहे. यामध्ये अनेक मित्र असे असतील ज्यांना क्वचितच कधीतरी हे माहिती झाले असते की ते सुद्धा या सरकारी योजनांचे हक्कदार आहेत. त्यानंतर, आपल्या जुन्या सवयीनुसार ते हेच विचार करत असतील की भाऊ आपला कोणी नातेवाईक नाही, कोणी ओळखीचा नाही तर मग आमचे कसे काय होईल? अरे, मोदी हाच तर आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे, कोणाच्या आणखी ओळखीची काय गरज लागणार आहे, आपण सुद्धा माझ्या कुटुंबामधील आहात. दहा वर्षांपूर्वीची परिस्थिती असती तर कदाचित माझे मित्र सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारून मारून आपला विश्वास गमावून बसले असते.
मी ग्रामपंचायत आणि दुसऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींना, कर्मचाऱ्यांना हेच सांगू इच्छितो की, आपल्या सर्वांवर खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला आपले गाव, वार्ड, नगर, आपल्या परिसरात पूर्ण प्रामाणिकपणे प्रत्येक गरजू व्यक्तींची ओळख करून घ्यायची आहे. मोदीच्या गॅरंटी वाली गाडी पर्यंत अधिकाधिक मित्र पोहोचतील आणि त्यांना जागेवरच ते विविध योजनांचीशी जोडले जातील, त्यांना जोडण्याचे काम व्हावे. त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न करावे लागतील.
ज्याप्रकारे गेल्या 4 वर्षांत नळाचे पाणी 11 कोटींहून अधिक नवीन ग्रामीण कुटुंबापर्यंत पोहोचले आहे. पाण्याचा नळ आला, आता पुरे झाले, एवढ्यापुरते मर्यादित राहण्याची गरज नाही. आता आपल्याला पाण्याचे उत्तम व्यवस्थापन, पाण्याची गुणवत्ता आणि अशा विषयांवरही भर द्यावा लागेल.त्याची जबाबदारी देखील घ्यावी लागेल. ग्रामस्थांच्या पाठिंब्याने यात यश मिळताना मला दिसत आहे. आणि मी पाहिले आहे की, जेव्हा गावकरी स्वतःहून अशी कामे आपल्या खांद्यावर घेतात, तेव्हा सरकारला काही पाहावे लागत नाही.ते काम व्यवस्थित होत असते. . आणि म्हणूनच तुम्ही सर्वांनी दक्ष राहून गावागावात जलदगतीने जल समित्या स्थापन करण्यासाठी कामाला लागा आणि मला मदत करा.
मित्रांनो,
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, भारत सरकार गावातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक मोठी मोहीम राबवत आहे. गेल्या काही वर्षांत देशातील सुमारे 10 कोटी भगिनी, मुली आणि दीदी बचत गटांमध्ये सहभागी झाल्या आहेत. या भगिनी -मुलींना बँकांनी साडेसात लाख कोटी रुपये दिले.. हा आकडा तुम्ही वर्तमानपत्रात कधीच वाचला नसेल…या देशात बचतगटांच्या दीदींना बँकांच्या माध्यमातून साडेसात लाख कोटी रुपये त्यांच्या हातात मिळवून देणे त्यांना याची मदत होणे म्हणजे किती क्रांतिकारी काम होत आहे.या मोहिमेद्वारे बचत गटातील कोट्यवधी महिला पुढे येत आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे दोन कोटी नव्या महिलांना लखपती बनवण्याचे माझे ध्येय आहे. आणि मला ही मोहीम माझ्या बचत गटातील भगिनींसोबत राबवायची आहे. या मोहिमेचा विस्तार करण्यासाठी तुम्ही जितके अधिक पुढे याल आणि जितके जास्त कष्ट कराल तितके 2 कोटी लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट आपण सहज पार करू. विकास भारत संकल्प यात्रेमुळे या मोहिमेला अधिक गती मिळत आहे.
मित्रांनो,
सरकारने कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आणि बचत गटांद्वारे भगिनी , मुली आणि ताईंना अधिक सक्षम करण्यासाठी एक मोठी नवीन मोहीम सुरू केली आहे. आणि यासोबतच मोदींची गाडीसह आकर्षणाचे केंद्र आहे ते म्हणजे – नमो ड्रोन दीदी. काही लोक याला नमो दीदी असेही म्हणतात. ही नमो ड्रोन दीदी योजना सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत पहिल्या फेरीत बचतगटांशी संबंधित दीदींना 15 हजार ड्रोन दिले जाणार आहेत. महिलांच्या हातात ड्रोन असतील, आता ट्रॅक्टरला कुणी विचारणार देखील नाही. नमो ड्रोन दीदींचे प्रशिक्षणही सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे बचतगटांचे उत्पन्न वाढेल, गावातील भगिनींना नवा आत्मविश्वास मिळेल आणि आपल्या शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल. त्यातून शेतीचे आधुनिकीकरण होईल, शेती शास्त्रोक्त होईल आणि होणारा अपव्यय नक्कीच दूर होईल, बचतही होईल.
माझ्या कुटुंबियांनो,
आजकाल छोट्या शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी देशभरात मोठी मोहीम सुरू आहे. आपल्या बहुतांश शेतकऱ्यांकडे फार कमी जमीन आहे. आपल्याकडील 80-85 टक्के शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे केवळ एक एकर किंवा दोन एकर जमीन आहे.अशा परिस्थितीत जेव्हा अधिकाधिक शेतकरी एका गटात एकत्र येतील तेव्हा त्यांची ताकदही वाढेल. यासाठी शेतकरी उत्पादक संघ स्थापन केले जात आहेत.पॅक्स आणि इतर सहकारी उपक्रम गावांमध्ये बळकट केले जात आहेत.
भारतातील ग्रामीण जीवनाचा सहकार एक सक्षम पैलू बनावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. आतापर्यंत आपण दूध आणि ऊस क्षेत्रात सहकाराचे फायदे पाहिले आहेत.आता त्याचा विस्तार शेतीच्या इतर क्षेत्रांमध्ये आणि मत्स्य उत्पादनासारख्या क्षेत्रांमध्ये केला जात आहे. आगामी काळात 2 लाख गावांमध्ये नवीन पॅक्स निर्माण करण्याचे उद्दिष्ट घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. जेथे दुग्धव्यवसाय संबंधित सहकारी संस्था नाहीत, तेथे त्यांचा विस्तार केला जाईल. जेणेकरून आपल्या पशुपालकांच्या दुधाला चांगला भाव मिळू शकेल.
मित्रांनो,
आपल्या गावांमध्ये आणखी एक समस्या म्हणजे साठवण सुविधांचा अभाव. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना आपला माल घाईघाईने विकावा लागत आहे. त्यामुळे अनेकवेळा त्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. या नाइलाजातून छोट्या शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी देशभरात मोठी साठवण क्षमता निर्माण केली जात आहे.लाखो गोदामे तयार करायची आहेत लाखो. त्याची जबाबदारी पॅक्स सारख्या शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांवरही टाकण्यात येत आहे.
अन्न प्रक्रिया क्षेत्रातील 2 लाखांहून अधिक सूक्ष्म उद्योगांना बळकटी देण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. तुम्ही सर्वजण एक जिल्हा , एक उत्पादन मोहिमेशी परिचित असाल. प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक तरी प्रसिद्ध उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.यामुळे प्रत्येक जिल्ह्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यात मोठी भूमिका मिळू शकते.
माझ्या कुटुंबियांनो,
या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. व्होकल फॉर लोकलचा संदेश प्रत्येक गावात आणि गल्लीबोळात गुंजत राहिला पाहिजे.आता आपण कोटा येथील आपल्या भगीनीकडून ऐकले, मग आपण देवासमधील रुबिका जी यांच्याकडून ऐकले, त्या देखील व्होकल फॉर लोकलबद्दल बोलत होत्या. भारतीय शेतकर्यांचे आणि भारतातील तरुणांचे श्रम ज्यात भारतीय मातीचा सुगंध आहे अशा वस्तूंची खरेदी आणि प्रचार करा. घरातील खेळणीही देशातच तयार केलेली हवीत. मुलांकडे आधीचपासूनच भारतात बनवलेली खेळणी असावीत. आपल्या जेवणाच्या टेबलावर भारतीय पदार्थ खाण्याची सवयही आपण लावली पाहिजे. दही चांगले पॅक करून आले असेल तरी चालू शकते.
मला सांगण्यात आले आहे की, ही विकास यात्रा जिथे पोहोचते तिथे स्थानिक उत्पादनांचे स्टॉल्स, दुकाने आणि त्यासंबंधीची माहितीही दिली जात आहे. बचतगटांनी बनवलेली उत्पादनेही तेथे दाखवली जात आहेत. जेम पोर्टलवर नोंदणी कशी करता येईल याचीही माहिती सरकारी कर्मचार्यांच्या माध्यमातून दिली जात आहे. अशा छोट्या छोट्या प्रयत्नांतूनच, प्रत्येक गावात, प्रत्येक कुटुंबात,काही ना काही प्रयत्न व्हायला हवेत, सगळे यांच्याशी जोडले गेल्यास हा देश विकसित भारताचा महान संकल्प पूर्ण करेल.
मोदी की गारंटीचे वाहन असेच निरंतर धावत राहील आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. या यात्रेला जितके जास्त यश मिळेल, जितके जास्त लोकांशी जोडली जाईल , तितक्या लोकांना माहिती मिळू शकेल, जितके लोक पात्र असतील त्यांना यापूर्वी कधीही मिळाले नव्हते ते लाभ मिळतील. हे देखील एक अतिशय पुण्य कर्म आहे. आणि माझी इच्छा आहे की जो पात्र आहे त्याला त्याचा हक्क मिळावा. आणि म्हणूनच इतकी मेहनत घेतली जात आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. तुम्ही दाखवलेला भरवसा , दाखवलेला विश्वास आणि तुमचा सततचा पाठिंबा आणि यामुळेच तुमच्यासाठी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याचा उत्साह आणि उमेद माझ्यात कायम आहे. माझ्या कामात मी कधीही मागे हटणार नाही याचीही मी हमी देतो. तुमच्या हितासाठी जे काही करावे लागेल ती माझी हमी आहे. याच विश्वासासह तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद !
***
NM/VikasY/SonalC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Delighted to speak to Viksit Bharat Sankalp Yatra beneficiaries. Government's welfare initiatives are making a noticeable difference in the lives of countless citizens. https://t.co/lD8sTvOSLJ
— Narendra Modi (@narendramodi) December 27, 2023
'Viksit Bharat Sankalp Yatra' focuses on saturation of government schemes. pic.twitter.com/gFyjHkjHO0
— PMO India (@PMOIndia) December 27, 2023
हमारा प्रयास है कि सहकारिता, भारत के ग्रामीण जीवन का एक सशक्त पहलू बनकर सामने आए: PM @narendramodi pic.twitter.com/cRWTK4jV9L
— PMO India (@PMOIndia) December 27, 2023
'One District, One Product' initiative will go a long way in furthering prosperity in the lives of many. pic.twitter.com/PD0i2hi45q
— PMO India (@PMOIndia) December 27, 2023
Let us be 'Vocal for Local'. pic.twitter.com/YyFTNjhDbs
— PMO India (@PMOIndia) December 27, 2023