पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
उभय नेत्यांनी सप्टेंबर 2023 मधील युवराजांच्या भारत दौऱ्याचा पाठपुरावा करताना द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी भविष्यातील द्विपक्षीय भागीदारीच्या अजेंड्याबाबतही चर्चा केली.
पश्चिम आशियातील सद्यस्थितीबाबत उभय नेत्यांनी आपली मते व्यक्त केली. त्यांनी दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.
इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या दीर्घकालीन आणि तत्त्वनिष्ठ भूमिकेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आणि युद्धग्रस्त लोकांसाठी मानवतावादी मदत सुरू ठेवण्याचे आवाहन केले. दोन्ही नेत्यांनी प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्यासाठी एकत्र काम करण्याबाबत सहमती दर्शवली. सागरी सुरक्षा आणि जलवाहतुकीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यावरही त्यांनी भर दिला.
एक्स्पो 2030 आणि फिफा फुटबॉल विश्वचषक 2034 चे यजमान म्हणून निवड झाल्याबद्दल सौदी अरेबियाचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याबाबत सहमती दर्शवली.
***
S.Bedekar/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai