Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान भेटीदरम्यान ( 11 नोव्हेंबर, 2016) प्रसारमाध्यमांना जारी केलेले निवेदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान भेटीदरम्यान ( 11 नोव्हेंबर, 2016) प्रसारमाध्यमांना जारी केलेले निवेदन


महामहिम पंतप्रधान ॲबे,

मित्रांनो,

मिना-सामा, कोम्बान वा !

“इचिगो, इची” हा जपानी भाषेतला एक झेन बुद्धीस्ट उद्‌गार आहे. याचा अर्थ आमची प्रत्येक भेट आगळी वेगळी आहे आणि आम्ही त्यातील प्रत्येक क्षण जपून ठेवला पाहिजे.

मी जपानला अनेक वेळा भेट दिली आहे, आणि पंतप्रधान म्हणून माझी ही दुसरी भेट आहे. आणि प्रत्येक भेट आगळी-वेगळी, विशेष, शिकवणूक देणारी आणि फलदायी ठरली.

मी महामहिम ॲबे यांना जपान, भारत आणि जगात इतर ठिकाणीही अनेक प्रसंगी भेटलो आहे. तसेच गेल्या दोन वर्षात जपानमधील उच्चस्तरीय राजकीय आणि व्यावसायिक नेत्यांचे स्वागत करण्याचा बहुमान मला लाभला आहे.

आमच्यात वारंवार होणारा सुसंवाद हा आमच्यातील दृढ बंध आणि स्फुर्तीचे मूर्तीमंत उदाहरण आहे. या सुसंवादात आमच्यातील विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारीची पूर्ण क्षमता जाणून घेण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण कटिबद्धतेचे प्रतिबिंबही उमटले आहे.

मित्रांनो, पंतप्रधान ॲबे आणि माझ्यात आज झालेल्या संवादादरम्यान आम्ही गेल्या शिखर परिषदेनंतर आमच्यातील मैत्रीपूर्ण संबंधात झालेल्या विकासाचा आढावा घेतला. आमच्यातील सहकार्य बहुविध स्तरांवर वृद्धींगत झाल्याचे आम्हा दोघांनाही स्पष्टपणे जाणवले.

सखोल आर्थिक करार, व्यापारातील वृद्धी, निर्मिती आणि गुंतवणुकीतील संबंध, स्वच्छ ऊर्जेवर केंद्रित केलेले लक्ष्य, आमच्या नागरीकांच्या सुरक्षिततेबाबतची भागीदारी आणि पायाभूत सुविधा तसेच कौशल्य विकासातील सहकार्य ही क्षेत्रे आमच्या महत्त्वपूर्ण प्राधान्यांपैकी आहेत.

अणुऊर्जेच्या शांततामय वापरासाठीच्या सहकार्याबाबतच्या करारावर आज झालेली स्वाक्षरी ही स्वच्छ ऊर्जा भागीदारीच्या निर्मितीसाठी उचलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे.

या क्षेत्रातील आमचे सहकार्य हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्हाला सहाय्यभूत ठरेल. जपानसाठी अशा कराराच्या असलेल्या विशेष महत्त्वाचा मी स्वीकार करतो.

मी पंतप्रधान ॲबे, जपान सरकार आणि संसद यांनी या कराराला दिलेल्या पाठिंब्याबाबत त्यांना धन्यवाद देतो.

मित्रांनो,

भारत आणि भारताची अर्थव्यवस्था अनेक बदलांचा पाठपुरावा करत आहे. निर्मिती, गुंतवणूक तसेच 21 व्या शतकातील ज्ञानाधारित उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण केंद्र बनण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

विशिष्ट प्रकल्पांच्या संदर्भात आम्ही मुंबई-अहमदाबाद अति वेगवान रेल्वे प्रकल्पाच्या विकासावर आम्ही लक्षकेंद्रीत करुन आहोत. आर्थिक क्षेत्रातील सहकार्याबाबत आमच्यातील करार हे आम्हाला पायाभूत विकासासाठी मोठे स्रोत उपलब्ध होण्याकरता सहाय्यक ठरतील.

कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाबाबतच्या आमच्यातील संवादामुळे नवीन पाया निर्माण झाला आहे. आणि हा पाया आमच्या आर्थिक भागीदारीतील महत्त्वाचा घटक आहे. याशिवाय अवकाश तंत्रज्ञान, सागरी आणि भू-विज्ञान, वस्रोद्योग क्षेत्र, क्रीडा, कृषी आणि टपाल बँकिंग सेवा या क्षेत्रांमध्येही आमची नवीन भागीदारी उदयाला येत आहे.

मित्रांनो,

आमची रचनात्मक भागीदारी फक्त चांगल्यासाठी आणि समाजाच्या सुरक्षेसाठी नाही, तर यामुळे क्षेत्रीय शांतता, स्थिरता आणि समतोल प्रस्थापित होणार आहे. तसेच आशिया-पॅसिफिक खंडामध्ये असलेल्या संधी आणि आव्हाने यांना प्रतिसाद देण्यासाठी ती उपयुक्त ठरु शकते.

सर्वंकष दृष्टीकोन असलेले देश म्हणून आम्ही इंडो-पॅसिफिक यांना सांधणाऱ्या जलमार्गाचा समावेश असणाऱ्या भागात संपर्क यंत्रणा, पायाभूत सुविधा आणि क्षमता वृध्दीसाठी अधिक सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.

विशेष म्हणजे मलाबार नाविक कवायतींच्या यशस्वीतेमुळे इंडो-पॅसिफिक जल विस्तारातील आमचे सामरिक हेतू अधोरेखित झाले आहे.

लोकशाहीचा पुरस्कार करणारी आम्ही राष्ट्रे असून मुक्तता, पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य यांना आम्ही पाठिंबा देतो. दहशतवाद, विशेषत: सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादाशी लढा देण्याच्या आमच्या निर्धारावर आमचे एकमत आहे.

मित्रांनो,

आमच्या उभय देशातील संबंधांना सांस्कृतिक आणि माणसामाणसातील बंध याचे वरदान लाभले आहे. पंतप्रधान ॲबे यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये भारताला भेट दिली होती. त्याचवेळी उभय देशातील ऋणानुबंध अधिक दृढ करण्यासाठी पावले उचलू अशी ग्वाही मी दिली होती. आणि त्याचाच परिपाक म्हणजे मार्च 2016 पासून आम्ही सर्व जपानी नागरिकांना “व्हिजा ऑन अरायव्हल” ची सुविधा बहाल केली. याचाच पुढचा टप्पा म्हणजे पात्र जपानी उद्योजकाला 10 वर्षांचा, दीर्घ कालावधीचा व्हिजा देण्याची सोय आम्ही उपलब्ध करुन देणार आहे.

मित्रांनो,

क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आणि जपान संयुक्तपणे चर्चा आणि सहकार्य करीत आहेत. संयुक्त राष्ट्रात सुधारणा करण्यासाठी आम्ही एकत्रित कार्यरत राहणार आहोत. तसेच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत आपल्याला स्थान देण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

अणु पुरवठादारांच्या समुहाचे भारताला सदस्यत्व देण्यासाठी जपानने देऊ केलेल्या पाठिंब्याबद्दल मी पंतप्रधान ॲबे यांचे आभार मानतो.

महामहिम ॲबे,

आपल्या भागीदारीचे भविष्य हे मौल्यवान आणि मजबूत असल्याचे आम्ही दोघांनी मान्य केले आहे. एकत्रित आल्यानंतर आपण दोन्ही देशांसाठी आणि या विभागासाठी कुठल्या प्रमाणात आणि किती कार्य करु शकतो, याला मर्यादा नाही.
तुमच्यासारखे सामर्थ्यवान आणि गतिमान नेतृत्व हे यामागचे महत्त्वाचे कारण आहे. तुमच्यासारखा भागीदार आणि मित्र लाभणे ही आमच्यासाठी खरोखरच आनंददायी गोष्ट आहे. या शिखर परिषदेच्या मौल्यवान फलनिष्पत्तीबाबत तसेच तुमच्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी आभार व्यक्त करतो.

Anata No O Motenashi O Arigato Gozaimashita!

(आपल्या आदरातिथ्याबद्दल आभार!)

धन्यवाद, मन:पूर्वक धन्यवाद.

M.Desai/S.Tupe/J.Patankar/P.Malandkar