माझ्या प्रिय देशवासियांनो,
नमस्कार. 2023 वर्षातला हा पहिलाच ‘मन की बात’ कार्यक्रम आणि त्याचबरोबरया कार्यक्रमाचा सत्त्याण्णववा भाग सुद्धा आहे. तुम्हा सर्वांसोबत पुन्हा एकदा संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात अनेक कार्यक्रम असतात. या महिन्यात 14 जानेवारीच्या सुमारालादेशभरात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सण साजरे केले जातात. यानंतर आपण देशाचा प्रजासत्ताक दिनही साजरा करतो. यावेळी सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातल्याविविध बाबींचे खूप कौतुक होते आहे. जैसलमेर येथील पुलकित यांनी मला लिहिले आहे की 26 जानेवारीच्या संचलनादरम्यान कर्तव्य पथतयार करणाऱ्या कामगारांना पाहून खूप आनंद झाला. कानपूरच्या जया यांनी लिहिले आहे की संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे विविध पैलू पाहून त्यांना आनंद झाला. या संचलनात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या महिला उंट चालक आणि सीआरपीएफच्या महिला तुकडीचेही खूप कौतुक होते आहे.
मित्रहो,
देहरादून येथील वत्सल जी यांनी मला लिहिले आहे की, मी नेहमी 25 जानेवारीची वाट बघतो, कारण त्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते आणि एका अर्थाने 25 तारखेची संध्याकाळ 26 जानेवारीसाठीचा माझा उत्साह वाढवते. समर्पण आणि सेवाभावनेसह तळागाळात काम करणाऱ्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या पीपल्स पद्म बद्दलच्या आपल्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये आदिवासी समाजाला आणि आदिवासी जीवनाशी निगडित लोकांना चांगले प्रतिनिधित्व मिळाले आहे. आदिवासींचे जगणे शहरांमधल्या गजबजाटापेक्षा वेगळे असते, त्यांच्यासमोरची आव्हानेही वेगळी असतात. मात्र तरीही आदिवासी समाज आपल्या परंपरा जपण्यासाठी सदैव तत्पर असतात. आदिवासी समाजाशी संबंधित बाबींचे जतन आणि संशोधन करण्याचाही प्रयत्न केला जातो. हे लक्षात घेत, टोटो, हो, कुई, कुवी आणि मांडा अशा आदिवासी भाषांवर काम करणाऱ्या अनेक महान व्यक्तींना पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.धानी राम टोटो, जानुम सिंग सोय आणि बी. रामकृष्ण रेड्डी जी यांची नावे आता संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली आहेत. सिद्धी, जारवा, ओंगे अशा आदीम आदिवासी जमांतींसोबत काम करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी गौरव करण्यात आला. जशा – हिराबाई लोबी, रतन चंद्र कार आणि ईश्वरचंद्र वर्मा जी. आदिवासी समाज हा आपल्या भूमीचा, आपल्या वारशाचा अविभाज्य घटक आहे. देशाच्या आणि समाजाच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केल्यास नव्या पिढीलाही प्रेरणा मिळेल. नक्षलग्रस्त असणाऱ्या भागांमध्येही यंदा पद्म पुरस्कारांचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत. सातत्यपूर्ण प्रयत्न करून नक्षलग्रस्त भागातील भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्ग दाखविणाऱ्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यात कांकेरमध्ये लाकडावर कोरीव काम करणारे अजयकुमार मंडावी आणि गडचिरोलीच्या प्रसिद्ध झाडीपट्टी रंगभूमीशी संबंधित परशुराम कोमाजी खुणे यांनाही हा सन्मान प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर ईशान्येकडील आपली संस्कृती जपणाऱ्या रामकुईवांगबे निउमे, बिक्रम बहादूर जमातिया आणि कर्मा वांगचू यांनाही सन्मानित करण्यात आले आहे.
मित्रहो,
यंदा पद्म पुरस्कारांनी सन्मानित झालेल्यांमध्ये संगीतविश्व समृद्ध करणाऱ्याही अनेक व्यक्ती आहेत. संगीत आवडत नाही, असे कोण असेल? प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे संगीत आवडत असू शकते, पण संगीत हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग असतो. यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये संतूर, बम्हुम, द्वितारा अशी आपली पारंपारिक वाद्ये वाजवण्यात नैपुण्य असणाऱ्या कलाकारांचा समावेश आहे. गुलाम मोहम्मद ज़ाज़, मोआ सु-पोंग, री-सिंहबोर कुरका-लांग, मुनी-वेंकटप्पा आणि मंगल कांती राय अशी कित्येक नावे आहेत ज्यांची सगळीकडे चर्चा होते आहे.
मित्रहो,
पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी अनेक जण, आपल्यातील असे सहकारी आहेत ज्यांनी देशाला सर्वोच्च प्राधान्य दिले, राष्ट्र प्रथम या तत्त्वासाठी आपले आयुष्य समर्पित केले. ते सेवाभावनेने त्यांचे कार्य करत राहिले आणि त्यासाठी त्यांनी कधीही पुरस्काराची अपेक्षा केली नाही. ज्यांच्यासाठी ते काम करत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. अशा समर्पित व्यक्तींचा गौरव करून आपणा संर्व देशवासीयांच्या अभिमानात भर पडली आहे. मला इथे सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे घेता येणार नाहीत, पण मी तुम्हाला आग्रहपूर्वक विनंती करतो की पद्म पुरस्कार प्राप्त करणाऱ्या या विजेत्यांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा.
मित्रहो,
आज आपण स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवादरम्यान प्रजासत्ताक दिनाबद्दल चर्चा करत आहोत, तर आज मी इथे एका मनोरंजक पुस्तकाचाही उल्लेख करेन. काही आठवड्यांपूर्वी मला मिळालेल्या या पुस्तकात एका अतिशय रंजक विषयावर चर्चा करण्यात आली आहे. India – The Mother of Democracy असे या पुस्तकाचे नाव आहे आणि त्यात अनेक उत्कृष्ट निबंध आहेत. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि आपला देश, ही लोकशाहीची जननी आहे, याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे. लोकशाही आपल्या धमन्यांमध्ये आहे, ती आपल्या संस्कृतीमध्ये आहे – ती शतकानुशतके आपल्या कामकाजाचा अविभाज्य घटक आहे. स्वभावाने आपण लोकशाहीप्रधान समाज आहोत. डॉ.आंबेडकरांनी बौद्ध भिक्षू संघाची तुलना भारतीय संसदेशी केली होती. त्यांनी एका अशा संस्थेचे वर्णन केले जिथे प्रस्ताव, ठराव, कोरम, मतदान आणि मतमोजणी यासाठी अनेक नियम होते. भगवान बुद्धांना तत्कालीन राजकीय व्यवस्थेतून याची प्रेरणा मिळाली असावी, असे बाबासाहेबांचे मत होते.
तामिळनाडूमध्ये उतीरमेरूर हे एक छोटेसे पण प्रसिद्ध गाव आहे. या गावातील अकराशे, बाराशे वर्षांपूर्वीचा शिलालेख अवघ्या जगाला चकित करतो. हा शिलालेख एखाद्या संक्षिप्त संविधानासारखा आहे. ग्रामसभा कशी घेतली पाहिजे आणि सदस्य निवडीची प्रक्रिया कशी असावी, हे त्यात सविस्तरपणे सांगितले आहे. आपल्या देशाच्या इतिहासातील लोकशाही मूल्यांचे आणखी एक उदाहरण म्हणजे 12 व्या शतकातील भगवान बसवेश्वर यांचा अनुभव मंडपम. येथे मुक्त वादविवाद आणि चर्चेला प्रोत्साहन दिले जात असे. हामॅग्ना कार्टाच्याही पूर्वीचा आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. वारंगळच्या काकतीय वंशाच्या राजांच्या प्रजासत्ताक परंपराही खूप प्रसिद्ध होत्या. भक्ती चळवळीने पश्चिम भारतात लोकशाहीची संस्कृती वाढवली. सर्व संमतीसाठी गुरू नानक देव जी यांनी घेतलेल्या निर्णयांवर प्रकाश टाकणारा, शीख पंथाच्या लोकशाही भावनेवर आधारित एक लेखही पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.
या पुस्तकात मध्य भारतातील उरांव आणि मुंडा जमातींमधील समुदाय-प्रेरित आणि सहमतीने निर्णय घेण्याबाबतही चांगली माहिती देण्यात आली आहे. शतकानुशतके देशाच्या प्रत्येक भागात लोकशाहीची भावना कशा प्रकारे प्रवाहित होत राहिली आहे, हे, हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जाणवेल. लोकशाहीची माता म्हणून आपण या विषयावर सातत्याने सखोल विचार केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि जगालाही त्याबद्दल माहिती दिली पाहिजे. यामुळे देशातील लोकशाहीची भावना अधिक दृढ होईल.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
जर मी तुम्हाला विचारले की योग दिवस आणि आपली वेगवेगळ्या प्रकारची भरड धान्ये, यांच्यात काय साम्य आहे, तर तुम्ही विचार कराल की ही काय तुलना आहे? दोघांमध्ये खूप साम्य आहे, असे मी म्हटले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरे तर, भारताच्या प्रस्तावानंतरच संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्ये वर्ष या दोन्ही बाबतचा निर्णय घेतला आहे. दुसरे म्हणजे योगविद्येचा संबंध सुद्धा आरोग्याशी आहे आणि भरड धान्ये सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावतात. तिसरी गोष्ट जास्त महत्त्वाची आहे – दोन्ही मोहिमांमध्ये लोकसहभागामुळे क्रांती होते आहे. ज्याप्रमाणे लोकांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदवून योगविद्या आणि तंदुरूस्तीला आपल्या जगण्याचा एक भाग बनवले आहे, त्याचप्रमाणे लोक मोठ्या प्रमाणावर भरड धान्यांचा अंगिकार करू लागले आहेत. लोक आता भरड धान्यांना आपल्या आहारात समाविष्ट करू लागले आहेत. या बदलाचा मोठा परिणामही दिसून येतो आहे. एकीकडे पारंपारिक पद्धतीने भरड धान्याचे उत्पादन घेणारे छोटे शेतकरी चांगलेच उत्साहात आहेत. जगाला आता भरड धान्यांचे महत्त्व कळू लागले आहे, याचा त्यांना मनापासून आनंद आहे. तर दुसरीकडे एफपीओ आणि उद्योजकांनी भरड धान्ये बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ती लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आंध्र प्रदेशातील नांदयाल जिल्ह्यातील रहिवासी के.व्ही. रामा सुब्बा रेड्डी यांनी भरड धान्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडली. आईच्या हातच्या भरड धान्यांच्या पदार्थाना अशी चव होती की त्यांनी आपल्या गावात बाजरी प्रक्रिया एकक सुरू केले. सुब्बा रेड्डी जी लोकांना बाजरीचे फायदे देखील समजावून सांगतात आणि ते सहज उपलब्ध सुद्धा करून देतात. महाराष्ट्रात अलिबागजवळील केनाड गावात राहणाऱ्या शर्मिला ओसवाल गेल्या वीस वर्षांपासून भरड धान्य उत्पादनात अनोख्या पद्धतीने योगदान देत आहेत. त्या शेतकऱ्यांना स्मार्ट शेतीचे प्रशिक्षण देत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे भरड धान्यांचे उत्पादन वाढले आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
जर तुम्हाला छत्तीसगडमध्ये रायगड येथे जाण्याची संधी मिळाली, तर तुम्ही तिथल्या मिलेट्स कॅफेला नक्की भेट द्या. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मिलेट्स कॅफेमध्ये चिला, डोसा, मोमोज, पिझ्झा आणि मंचुरियन असे पदार्थ चांगलेच लोकप्रिय होत आहेत.
मी तुम्हाला आणखी एक गोष्ट विचारू का? तुम्ही उद्योजक हा शब्द नक्कीच ऐकला असेल, पण मिलेटप्रिन्युअर हा शब्द तुम्ही ऐकला आहे का? ओदिशातील मिलेटप्रिन्युअर सध्या चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. सुंदरगढ या आदिवासी जिल्ह्यातील सुमारे 1500 महिलांचा स्वयंसहायता बचत गट हा ओदिशा मिलेट्स मिशनशी संलग्न आहे. तिथल्या महिला भरड धान्यापासून बिस्कीटे, रसगुल्ला, गुलाब जामुन आणि केक सुद्धा तयार करत आहेत. बाजारपेठेत या पदार्थांना मोठी मागणी असल्यामुळे महिलांचे उत्पन्नही वाढत आहे.
कर्नाटकमध्ये कलबुर्गी येथील आलंद भूताई मिलेट्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने गेल्या वर्षी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च या संस्थेच्या देखरेखीखाली काम सुरू केले. येथील खाकरा, बिस्किटे आणि लाडू लोकांना आवडत आहेत. कर्नाटकमधल्या बिदर जिल्ह्यात, हुलसूर मिलेट प्रोड्युसर कंपनीशी संबंधित महिला भरड धान्याची शेती करतात तसेच त्यांचे पीठही तयार करतात. त्यामुळे त्यांची कमाईही चांगलीच वाढली आहे. नैसर्गिक शेतीशी संबंधित छत्तीसगडमधले संदीप शर्माजी यांच्या FPO मध्ये 12 राज्यांमधले शेतकरी सहभागी झाले आहेत. बिलासपूरचा हा एफपीओ 8 प्रकारच्या भरड धान्याची पीठे आणि त्यांचे पदार्थ तयार करतो आहे.
मित्रहो,
आज भारताच्या कानाकोपऱ्यात जी-20 शिखर परिषदेच्या बैठका सातत्याने सुरू आहेत आणि मला आनंद वाटतो की, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, जिथे जिथे जी-20 शिखर परिषदेची बैठक होते आहे, तिथे भरड धान्यांपासून तयार केलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. तिथे बाजरीची खिचडी, पोहे, खीर आणि रोटी, तसेच नाचणीपासून तयार केलेले पायसम, पुरी आणि डोसा असे पदार्थही वाढले जातात. G20 परिषदेच्या बैठका असलेल्या सर्व ठिकाणी भरड धान्य प्रदर्शनांमध्ये भरड धान्यांपासून तयार केलेली हेल्थ ड्रिंक्स, सीरियल्स आणि नूडल्स प्रदर्शित करण्यात आली. जगभरातील भारतीय मोहिमा सुद्धा त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. देशाचा हा प्रयत्न आणि जगामध्ये भरड धान्याची वाढती मागणी, आपल्या छोट्या शेतकऱ्यांना बळ देणार आहे, याची कल्पना तुम्ही करू शकता. भरड धान्यापासून बनवलेले नवनवीन पदार्थ तरुण पिढीला तितकेच आवडत आहेत हे पाहूनही मला आनंद होतो. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाची अशी अप्रतिम सुरुवात केल्याबद्दल आणि ते सतत पुढे नेल्याबद्दल मी ‘मन की बात’च्या श्रोत्यांचेही अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, जेव्हा तुमच्याशी कोणी पर्यटन केंद्र असलेल्या गोव्याबद्दल बोलते, तेव्हा तुमच्या मनात कोणता विचार येतो? स्वाभाविकपणे, गोव्याचे नाव येताच, सर्वात प्रथम इथली सुंदर किनारपट्टी, समुद्रकिनारे आणि गोव्यात मिळणारे आवडते पदार्थ आठवतात. पण या महिन्यात गोव्यात अशी घटना घडली जिची सर्वत्र चर्चा होते आहे. आज ‘मन की बात’ मध्ये, मी तुम्हा सर्वांना त्याविषयी सांगू इच्छितो. गोव्यात ‘पर्पल फेस्ट’ नावाचा कार्यक्रम झाला. पणजी येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी केला गेलेला हा एक अनोखा प्रयत्न होता. आमचे जवळपास 50 हजारांहून अधिक बंधू-भगिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावरून तुम्ही सर्वजण अंदाज करू शकाल की ‘पर्पल फेस्ट’ किती मोठा कार्यक्रम होता. येथे आलेले लोक, आपण आता ‘मीरामार बीच’ला भेट देऊन, समुद्रकिनाऱ्याच्या आनंद उपभोगू शकतो या विचाराने खूप उत्साहित झाले होते. आता गोव्यातील ‘मीरामार बीच’ हा, आमच्या दिव्यांग बंधू भगिनींसाठी प्रवेशाला अनुकूल अशा समुद्र किनाऱ्यांपैकी एक किनारा बनला आहे. येथे क्रिकेट स्पर्धा, टेबल टेनिस स्पर्धा व मॅरेथॉनसोबतच एक मूकबधिर-अंध संमेलनही आयोजित करण्यात आले होते. इथे एका विशेष अशा पक्षी निरीक्षण कार्यक्रमा व्यतिरिक्त एक चित्रपटही दाखवण्यात आला. यासाठी अशी विशेष व्यवस्था करण्यात आली होती की ज्यामुळे आमचे सर्व दिव्यांग बंधू-भगिनी आणि मुले या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील.
पर्पल फेस्टची एक खास गोष्ट म्हणजे देशातील खाजगी क्षेत्राचाही ह्यात सहभाग होता. त्यांच्या वतीने दिव्यांगांना सोयीस्कर अशा उत्पादने प्रदर्शित केली गेली. या कार्यक्रमामध्ये दिव्यांगांच्या कल्याणासाठी जनजागृतीचे अनेक प्रयत्न केले गेले. पर्पल फेस्ट यशस्वी केल्याबद्दल,ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो. यासोबतच हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस प्रयत्न केला, त्या स्वयंसेवकांचे देखील अभिनंदन करतो. मला विश्वास वाटतो की सुलभ भारताची आमची संकल्पना साकार करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम खूप प्रभावी ठरतील.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आता ‘मन की बात’मध्ये मी अशा एका विषयावर बोलणार आहे , ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल, अभिमानही वाटेल आणि तुम्ही मनापासून म्हणाल , “व्वा! माझे मन प्रसन्न झाले आहे!”
देशातील सर्वात जुन्या विज्ञान संस्थांपैकी एक, अशी बेंगलुरू येथील भारतीय विज्ञान संस्था, म्हणजे IISc एक उत्तम उदाहरण घालून देत आहे. ‘मन की बात’ मध्ये मी ह्या आधीही सांगितले होते की ह्या संस्थेच्या स्थापनेमागे भारतातील दोन महान व्यक्तिमत्वांची, जमशेदजी टाटा आणि स्वामी विवेकानंदांची प्रेरणा आहे. तर तुमच्या आणि माझ्या साठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे 2022 ह्या वर्षामध्ये या संस्थेने आपल्या नावावर एकूण 145 पेटंट मिळवले आहेत. याचा अर्थ दर पाच दिवसांत दोन पेटंट!! हा विक्रम अद्भुत आहे. या यशासाठी मी IISc मधील सर्व चमूचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आज जगभरात पेटंट फाइलिंगमध्ये भारताचे 7वे स्थान आहे आणि ट्रेडमार्कमध्ये 5वे आहे. फक्त पेटंटविषयी बोलायचे तर, गेल्या पाच वर्षांत पेटंटसची संख्या सुमारे 50 टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक नवोपक्रम/संशोधन निर्देशांकात/ ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समधील भारताच्या क्रमवारीमध्ये, कमालीची सुधारणा झाली आहे आणि आता भारत 40 व्या स्थानावर आहे. 2015 मध्ये भारत जागतिक नवोपक्रम निर्देशांकात 80 व्या स्थानाच्या देखील मागे होता.
मला तुम्हाला आणखी एक मनोरंजक गोष्ट सांगायची आहे.
भारतात गेल्या 11 वर्षांत प्रथमच देशांतर्गत पेटंट दाखल करण्याची संख्या विदेशी पेटंट दाखल करण्याच्या संख्येपेक्षा जास्त दिसून आली आहे. हे भारताच्या वाढत्या वैज्ञानिक सामर्थ्याचे निदर्शक आहे.
मित्रांनो,
आपल्या सर्वांना माहित आहेच की 21 व्या शतकात जागतिक अर्थव्यवस्थेत ज्ञानाला सर्वश्रेष्ठ महत्व आहे. मला विश्वास वाटतो आहे की भारताचे Techade चे स्वप्न संशोधकांच्या आणि त्यांच्या पेटंटसच्या बळावर नक्कीच पूर्ण होईल. यामुळे आपण सर्वजण आपल्या देशातल्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा आणि उत्पादनांचा पुरेपूर लाभ घेऊ शकू.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
NaMoApp वर मी तेलंगणातील अभियंते विजयजी ह्यांची पोस्ट पाहिली. यात विजयजींनी ई-कचऱ्याबद्दल सांगितले आहे. त्यांनी मला अशी विनंती केली आहे की ‘मन की बात’ मध्ये मी ह्याविषयी चर्चा करावी. या कार्यक्रमात यापूर्वीही आपण ‘वेस्ट टू वेल्थ’ म्हणजेच “कचऱ्यातून संपत्ती /सोने ‘ या विषयावर बोललो आहोत. पण चला, आज या विषयाशी संलग्न अशा ई-कचऱ्याविषयी बोलू या.
मित्रांनो,
आज प्रत्येक घरात मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब्लेट अशी उपकरणे सहजपणे आढळतात. देशभरात मिळून त्यांची संख्या कोट्यावधीनी असेल. पण आजची नवीन आणि अत्याधुनिक उपकरणे देखील भविष्यातील ई-कचराच आहेत. जेव्हा आपण कोणी नवीन उपकरण खरेदी करतो किंवा आपले जुने उपकरण डिव्हाइस बदलतो तेव्हा आधीच्या उपकरणाची योग्यरित्या विल्हेवाट लावण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जर ई-कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली नाही तर आपल्या पर्यावरणाचीही हानी होईल. पण, तेच जर का काळजीपूर्वक व्यवस्था केली गेली तर, चक्रीय/ स्थूल / circular अर्थव्यवस्थेमध्ये पुनर्नविनीकरण आणि पुनर्वापर ही एक मोठी शक्ती बनेल.
संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालात असे म्हटले आहे की प्रत्येक वर्षी 50 दशलक्ष टन ई-कचरा टाकला जात आहे. आपण अंदाज करू शकता का की हा म्हणजे किती कचरा असेल? मानवी इतिहासात आत्तापर्यंत जितकी व्यावसायिक विमाने बनवली गेली आहेत, त्या सर्वांचे वजन जरी एकत्र केले तरी जितका ई कचरा टाकला जातो आहे, त्याची बरोबरी होणार नाही. हे म्हणजे असे आहे की प्रत्येक सेकंदाला 800 लॅपटॉप फेकले जात आहेत.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की इ कचऱ्यावर विविध प्रक्रिया करून त्यापासून सुमारे 17 प्रकारचे मौल्यवान धातू काढता येतात. यामध्ये सोने, चांदी, तांबे आणि निकेल ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे ई-कचऱ्याचा योग्य उपयोग करणे हे ‘कचऱ्यातून सोने’ बनवण्यासारखेच आहे.
आज अशा स्टार्ट अप्सची कमतरता नाही, जे या दिशेने संशोधनात्मक नाविन्यपूर्ण काम करत आहेत. आज, सुमारे 500 ई-कचरा पुनर्वापर करणारे या क्षेत्राशी निगडित आहेत आणि अजून अनेक नवीन उद्योजक देखील जोडले जात आहेत. या क्षेत्राने हजारो लोकांना रोजगारही दिला आहे.
बेंगळुरूचा ई-परिसरा हा असाच एक प्रयत्न आहे. त्यांनी मुद्रित सर्किट बोर्डमधून मौल्यवान धातू वेगळे करण्याची (/ वेगळे करून) स्वदेशी तंत्र प्रणाली विकसित केली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत काम करणाऱ्या इकोरेको (इको-रेको) ने ई-कचरा गोळा करण्यासाठी मोबाईल अँप वरून यंत्रणा तयार केली आहे. उत्तराखंडमधील रुडकीच्या अटेरो (एटेरो) रिसायकलिंगने तर या क्षेत्रात अनेक जागतिक पेटंट मिळवले आहेत. त्यांनी देखील स्वतःची ई-कचरा पुनर्वापर तंत्रप्रणाली विकसित करून खूप नाव कमावले आहे. भोपाळमध्ये ‘कबाडीवाला’ मोबाईलअँप आणि वेबसाइटद्वारे कित्येक टन ई-कचरा जमा केला जात आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. हे सर्व पर्यटन भारताला जागतिक पुनर्नविनीकरण केंद्र -ग्लोबल रिसायकलिंग हब म्हणून प्रस्थापित करण्यात मदत करत आहेत.
परंतु, ह्या सर्व उपक्रमांच्या यशासाठी एक अनिवार्य अट देखील आहे – ती म्हणजे ई-कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्याच्या उपयुक्त पद्धतींबद्दल लोकांना जागरूक करणे. त्यांना सतत ह्याची जाणीव करून देत राहिले पाहिजे. ई-कचरा क्षेत्रात काम करणारे लोक सांगतात की दरवर्षी केवळ 15-17 टक्के ई-कचऱ्याचे रिसायकल- पुनर्नविनीकरण केले जात आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आज संपूर्ण जगात हवामान-बदल आणि जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत बरीच चर्चा होत आहे. या दिशेने भारत करत असलेल्या ठोस प्रयत्नांबद्दल आपण नेहमी बोलत असतो. भारताने आपल्या पाणथळ ठिकाणांसाठी जे काम केले आहे ते ऐकून तुम्हाला देखील आनंद होईल. काही श्रोत्यांना प्रश्न पडला असेल की पाणथळ जागा म्हणजे काय?
पाणथळ जागा म्हणजेच पाणथळ माती असणारी ठिकाणे, जिथे वर्षभर जमिनीवर पाणी साचून राहते, दलदल असते. काही दिवसांनी, म्हणजे 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवस आहे. आपल्या पृथ्वीच्या अस्तित्वासाठी पाणथळ जागा खूप महत्त्वाच्या आहेत कारण त्यावर अनेक जीवजंतू, पक्षी आणि प्राणी अवलंबून असतात. जैवविविधता समृद्ध करण्यासोबतच पूर-नियंत्रण आणि भूजल पुनर्भरण सुनिश्चित करण्यात पाणथळ जागांची महत्वाची भूमिका असते.
आपल्यापैकी अनेकांना माहित असेल की रामसर साइट्स अशा पाणथळ जागा आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. पाणथळ जागा कोणत्याही देशात असो, परंतु त्यांना अनेक आंतराष्ट्रीय निकष पूर्ण करावे लागतात, मगच त्यांना रामसर साइट म्हणून घोषित केले जाते. रामसर साइटवर 20,000 किंवा त्याहून अधिक पाणपक्षी असावेत. स्थानिक माशांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली असताना, स्वाधीनता अमृत महोत्सवादरम्यान मला तुम्हाला चांगली बातमी सांगायची आहे. आपल्या देशातील रामसर स्थळांची एकूण संख्या आता 75 झाली आहे. तर 2014 पूर्वी देशात केवळ २६ रामसर स्थळे होती. ह्या साठी स्थानिक समुदायांचे अभिनंदन करायला हवे , ज्यांनी ही जैवविविधता जपली. निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याच्या आपल्या जुन्या संस्कृती आणि परंपरेचाही हा सन्मान आहे. भारतातील या पाणथळ जागा आपल्या नैसर्गिक सामर्थ्याचेही उदाहरण आहेत. ओडिशातील चिलिका तलाव 40 पेक्षा जास्त जलपक्षी प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. कैबुल-लमजा, लोकटाक हे बारशिंगा ( swamp deer )चे एकमेव नैसर्गिक निवासस्थान मानले जाते. तामिळनाडूच्या वेदथंगलला 2022 मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे. येथील पक्ष्यांची वस्ती जपण्याचे संपूर्ण श्रेय परिसरातील स्थानिक शेतकर्यांना जाते.
काश्मीरमधील पंजाथ नाग समाज आपल्या वार्षिक फळे बहार चा महोत्सवातील एक दिवस खास गावातील झऱ्यांची स्वच्छता करण्यासाठी राखून ठेवतो. जागतिक रामसर साइट्समध्ये जास्तकरून विशेष सांस्कृतिक वारसा देखील आहे. मणिपूरचे लोकटक आणि पवित्र रेणुका सरोवराशी तिथल्या संस्कृतींचे नाते जडलेले आहे. तसेच ‘सांभार’ हे दुर्गामातेचा अवतार असलेल्या शाकंभरी देवीशी संबंधित आहे. भारतात पाणथळ प्रदेशांचा हा विस्तार त्या लोकांमुळेच शक्य झाला आहे, जे रामसर साइट्सच्या आसपास राहतात. मला अशा सर्व लोकांचे खूप कौतुक वाटते, ‘मन की बात’च्या श्रोत्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
यावेळी आपल्या देशात, विशेषतः उत्तर भारतात कडाक्याची थंडी होती. या हिवाळ्यात लोकांनी डोंगरावर जाऊन बर्फवृष्टीचाही आनंद लुटला. जम्मू-काश्मीरमधील अशीच काही छायाचित्रे आली ज्यांनी संपूर्ण देशाचे मन मोहून टाकले. सोशल मीडियावर/ समज माध्यमांवर तर जगभरातील लोकांना ही छायाचित्रे आवडत आहेत. हिमवृष्टीमुळे आपले काश्मीर खोरे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप सुंदर झाले आहे. बनिहालहून बडगामला जाणाऱ्या ट्रेनचा व्हिडिओ तर लोकांना विशेष आवडत आहे. सुंदर हिमवर्षाव, आजूबाजूला पांढऱ्या शुभ्र चादरीप्रमाणे पसरलेला बर्फ. लोक म्हणत आहेत की ही दृश्ये परीकथेतील आहेत!! बरेच जण म्हणत आहेत की ही कोणत्याही परदेशातील नाही, तर आपल्याच देशातील काश्मीरची चित्रे आहेत. एका सोशल मीडिया यूजरने/ सामाजिक माध्यम वापरकर्त्याने लिहिले आहे की ‘तो स्वर्ग याहून आणखी काय सुंदर असेल?’ हे अगदी बरोबर आहे. म्हणूनच तर काश्मीरला धरतीवरचा स्वर्ग म्हणतात.
तुम्हीदेखील ही चित्रे पाहून काश्मीरच्या सहलीला जाण्याचा विचार करत असाल. मी तर म्हणेन की तुम्ही पण जा आणि तुमच्या मित्रांनादेखील सोबत घेऊन जा. काश्मीरमध्ये बर्फ़ाच्छादित पर्वत आणि नैसर्गिक सौंदर्य ह्या शिवाय देखील पाहण्यासारखे बरेच काही आहे. काश्मीरच्या सय्यदाबादमधील हिवाळी क्रीडा महोत्सव आयोजित केला होता. या खेळांची संकल्पना / थीम होती – स्नो क्रिकेट/ बर्फावरचे क्रिकेट ! तुम्ही विचार करत असाल की स्नो क्रिकेट हा अधिक रोमांचक खेळ असेल. तर तुमचा विचार अगदी बरोबर आहे. काश्मीरी तरुण बर्फावरील क्रिकेट अधिक रोमांचक बनवतात. याद्वारे काश्मीरमध्ये अशा युवा खेळाडूंचाही शोध सुरू आहे, जे नंतर टीम इंडियाचा/ भारतीय संघाचा भाग बनतील. हा एक प्रकारे खेलो इंडिया चळवळीचा विस्तार आहे. काश्मीरमधील तरुणांमध्ये खेळांविषयी उत्साह वाढतो आहे. आगामी काळात यातील अनेक युवक देशासाठी पदके जिंकतील, तिरंगा फडकवतील. मी तुम्हाला असे सुचवेन की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही काश्मीरच्या सहलीची योजना आखाल तेव्हा या प्रकारचे कार्यक्रम पाहण्यासाठी वेळ काढा. हे अनुभव तुमची सहल अधिक संस्मरणीय बनवतील.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
प्रजासत्ताक शक्तिशाली करण्यासाठी आमचे प्रयत्न निरंतर/ सतत चालत राहिले पाहिजे. प्रजासत्ताक मजबूत होते ‘लोकसहभागाने’ ‘सर्वांच्या प्रयत्नांनी ‘, ‘देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याने ‘, आणि मला आनंद वाटतो आहे की, आपली ‘मन की बात’ म्हणजे अशा कर्तव्यनिष्ठ लढवय्यांचा बुलंद आवाज असतो. पुढच्या वेळी भेटू या अशाच कर्तव्यदक्ष लोकांच्या मनोरंजक आणि प्रेरणादायी कथांसह.
खूप खूप धन्यवाद!
***
M.Jaybhaye/AIR/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Sharing the first #MannKiBaat of 2023. Do tune in! https://t.co/Bhoc7DDTsT
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2023
People from across the country have shared their thoughts with PM @narendramodi about Republic Day celebrations held at Kartavya Path. #MannKiBaat pic.twitter.com/k6gwaLgaqg
— PMO India (@PMOIndia) January 29, 2023
Request everyone to know in detail about the inspirational life of the Padma awardees and share with others as well: PM @narendramodi during #MannKiBaat pic.twitter.com/6LOtr0QbBi
— PMO India (@PMOIndia) January 29, 2023
India is the Mother of Democracy. #MannKiBaat pic.twitter.com/S0hGQAOT7i
— PMO India (@PMOIndia) January 29, 2023
Just as people have made yoga and fitness a part of their lives, they are increasingly making millets a part of their diet. #MannKiBaat pic.twitter.com/tD71i5Q4Nz
— PMO India (@PMOIndia) January 29, 2023
A unique 'Purple Fest' was organised in Goa recently for the divyangjan. #MannKiBaat pic.twitter.com/7GqEaCzQMz
— PMO India (@PMOIndia) January 29, 2023
Proper disposal of e-waste can become a great force to build a circular economy. #MannKiBaat pic.twitter.com/2xUfo3TySg
— PMO India (@PMOIndia) January 29, 2023
India has been taking concrete efforts towards conservation of biodiversity. #MannKiBaat pic.twitter.com/l9cxoxZxqH
— PMO India (@PMOIndia) January 29, 2023
There is a lot of enthusiasm among the youth of Jammu and Kashmir regarding sports. This was seen during the recently organised Winter Games. #MannKiBaat pic.twitter.com/VZCzh4JCkB
— PMO India (@PMOIndia) January 29, 2023
Began today's #MannKiBaat with a topic that has caught the imagination of lakhs of Indians - the #PeoplesPadma and the inspiring life journeys of the awardees. pic.twitter.com/dBwSnwUVDe
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2023
Talked about an interesting book I received, which highlighted why India is truly the Mother of Democracy. #MannKiBaat pic.twitter.com/0qUuw8Q26e
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2023
2023 has begun on a ‘Millet-full’ note and I hope this trend continues as the year progresses. #MannKiBaat pic.twitter.com/U0lNQ9CbBa
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2023
You will be happy to know about Purple Fest- an interesting effort in Goa aimed at furthering accessibility and inclusivity for persons with disabilities. #MannKiBaat pic.twitter.com/ESwnMk32UY
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2023
Referring to a recent accomplishment of @iiscbangalore, highlighted how India’s innovation eco-system is rapidly growing and how filing of patents is a lot easier now. #MannKiBaat pic.twitter.com/faIhRRlJRN
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2023
Talked about the emerging sector of electronic waste during #MannKiBaat. pic.twitter.com/7LybKNN5mn
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2023
Home to 75 Ramsar sites, India’s wetlands are testimony to our ethos of living in harmony with nature and also give an important message of sustainable development. #MannKiBaat pic.twitter.com/CT9EcMD8Mg
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2023
Snow sports and more…news from Jammu and Kashmir which will bring a smile on your face. #MannKiBaat pic.twitter.com/1K8dPbT7lK
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2023