Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (95 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद


 

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन कि बात’ मध्ये पुन्ह: एकदा तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाचा हा 95 वा भाग आहे. आपण जलदगतीने या कार्यक्रमाच्या 100 व्या भागाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. हा कार्यक्रम माझ्यासाठी 130 कोटी देशवासीयांशी संवाद साधण्याचे आणखी एक माध्यम आहे.प्रत्येक भागाच्या आधी, गावांमधून तसेच शहरांमधून आलेली असंख्य पत्रे वाचणे, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी पाठवलेले ऑडीओ ऐकणे, या सगळ्या बाबी माझ्यासाठी एक अध्यात्मिक अनुभवासारख्या आहेत.

 

मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाची सुरवात मी, एकाअनोख्या भेटवस्तूच्या चर्चेने करणार आहे. तेलंगणाच्या राजन्ना सिर्सिल्ला जिल्ह्यात एक विणकर बंधू आहे – येल्धी हरिप्रसाद गारू. त्यांनी स्वतःच्या हाताने विणलेला हा जी-२०चा लोगो मला पाठवला आहे. ही अप्रतिम भेट पाहून मला आश्चर्य वाटलं. हरिप्रसादजींचे त्यांच्या कलेवर इतके प्रभुत्व आहे की, ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. हरिप्रसादजी यांनी स्वतः विणलेल्या या जी-20 च्या लोगो सोबत मला एक चिठ्ठी देखील पाठवली आहे.पुढील वर्षी होणाऱ्या जी-20 परिषदेचे आयोजन भारताने करणे हि भारतासाठी अभिमानास्पद बाब आहे असे त्यांनी या चिठ्ठीत लिहिले आहे.  देशाच्या या यशस्वी कामगिरीच्या आनंदा प्रीत्यर्थ त्यांनी जी-20 चा हा लोगो स्वतःच्या हाताने तयार केला आहे. विणकामाच्या या महान प्रतिभेचा वारसा त्यांना आपल्या वडिलांकडून मिळाला आहे आणि आज ते तन्मयतेने आपले काम करत आहेत.

 

मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मला जी-20 चा लोगो आणि भारताच्या प्रेसिडेन्सीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्याचा बहुमान मिळाला होता. या लोगोची निवड जाहीर स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आली होती. हरिप्रसाद गारू यांनी पाठवलेली ही भेट जेव्हा मला मिळाली तेव्हा मनात आणखी एक विचार आला. तेलंगणाच्या एका जिल्ह्यातील व्यक्ती जी-20 सारख्या शिखर परिषदेशी जोडली जात आहे हे पाहून मला खूप आनंद झाला. आज हरिप्रसाद गारू यांच्यासारख्या अनेकांनी मला पत्र पाठवून कळविले आहे की, एवढ्या मोठ्या शिखर परिषदेचे यजमानपद आपला देश भूषवणार असल्यामुळे आमचे उर अभिमानाने भरून आले आहे. पुण्याचे रहिवासी सुब्बा राव चिल्लाराजी आणि कोलकात्याचे तुषार जगमोहन यांच्या पत्राचा देखील मी इथे नक्की उल्लेख करेन. जी-20 संदर्भातील भारताच्या सक्रिय प्रयत्नांचे त्यांनी खूप कौतुक केले आहे.

 

मित्रांनो, जी-20 ची जागतिक लोकसंख्येमध्ये दोन तृतीयांश, जागतिक व्यापारात तीन चतुर्थांश आणि जागतिक जीडीपीमध्ये 85% भागीदारी आहे. तुम्ही कल्पना करू शकता –भारत आजपासून बरोबर 3 दिवसांनी म्हणजे 1 डिसेंबरला इतक्या मोठ्या समूहाचे, इतक्या शक्तिशाली समूहाचे अध्यक्षपद भूषवणार आहे. भारतासाठी, प्रत्येक भारतीयासाठी ही किती मोठी संधी चालून आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारताला ही जबाबदारी मिळाल्याने ही बाब अधिकच खास झाली आहे.

 

मित्रांनो, जी-20 चे अध्यक्षपद आमच्यासाठी एक मोठी संधी आहे. आपल्याला या संधीचा पुरेपूर उपयोग करून जागतिक हित, विश्वकल्याणावर भर दिला पाहिजे. शांतता असो वा ऐक्य, पर्यावरणाप्रती संवेदनशीलता असो किंवा मग शाश्वत विकास असो, भारताकडे या सर्वांशी निगडीत आव्हानांवर उपाय आहेत. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य (One Earth, One Family, One Future) या विषयातून वसुधैव कुटुम्बकमप्रती  आपली बांधिलकी दिसून येते, आपण नेहमी म्हणतो –

ॐ सर्वेषां स्वस्तिर्भवतु ।

सर्वेषां शान्तिर्भवतु ।

सर्वेषां पुर्णंभवतु ।

सर्वेषां मङ्गलंभवतु ।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

म्हणजे प्रत्येकाचे कल्याण होवो, प्रत्येकाला शांती मिळो, प्रत्येकाला पूर्णत्व प्राप्त होवो आणि सर्वांचे कल्याण होऊ दे. आगामी काळात देशाच्या विविध भागांमध्ये जी-20 शी संबंधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. या काळात जगाच्या विविध भागांमधील लोकांना तुमच्या राज्यात येण्याची संधी मिळणार आहे. यावेळी तुम्ही आपल्या संस्कृतीचे वैविध्यपूर्ण आणि विशिष्ट रंग जगासमोर आणाल याची मला खात्री आहे आणि तुम्ही हि गोष्ट देखील विसरू नका की जी-20 मध्ये येणारे लोक, हे आता जरी प्रतिनिधी म्हणून आले असले, तरी तेही भविष्यातील पर्यटकच आहेत. माझी तुम्हा सर्वांना आणखी एक विनंती आहे, विशेषत: माझ्या तरुण सहका-यांना, तुम्ही देखील हरिप्रसाद गारू यांच्यासारखे कोणत्या ना कोणत्या प्रकारे जी-20 मध्ये सामील व्हा. कपड्यावर जी-20 चा भारतीय लोगो खूप मस्त पद्धतीने, स्टायलिश पद्धतीने छापता येईल. मी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांना आवाहन करतो की, त्यांनी जी-20 शी संबंधित चर्चा, संवाद , स्पर्धा आयोजित कराव्यात. G20.in या संकेतस्थळावर गेल्यास तुमच्या आवडीनुसार तिथे अनेक गोष्टी सापडतील.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, 18 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशाने अंतराळ क्षेत्रात एक नवा इतिहास रचताना पाहिला. या दिवशी भारताने, भारताच्या खाजगी क्षेत्राने डिझाइन आणि निर्मित केलेले पहिले रॉकेट अंतराळात पाठवले. ‘विक्रम-एस’ असे या रॉकेटचे नाव आहे.  स्वदेशी अंतराळ स्टार्ट अपच्या या पहिल्या रॉकेटने श्रीहरिकोटा येथून, ऐतिहासिक उड्डाण करताच प्रत्येक भारतीयाचे शिर अभिमानाने उंचावले.

 

मित्रांनो, ‘विक्रम-एस’ रॉकेट अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. इतर रॉकेटच्या तुलनेत ते वजनाने हलके आणि स्वस्त आहे. अंतराळ मोहिमांशी संबंधित इतर देशांच्यातुलनेत याचा विकास खर्च खूपच कमी आहे. कमी खर्चात जागतिक दर्जा देणे, ही आता, अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची ओळख झाली आहे. या रॉकेटच्या निर्मितीमध्ये आणखी एका आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या रॉकेटचे काही महत्त्वाचे भाग हे थ्रीडी प्रिंटिंगच्या माध्यमातून बनवण्यात आले आहेत हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ‘विक्रम-एस’च्या लाँच मिशन ला दिलेले ‘प्रारंभ’ हे नाव अगदी योग्य आहे. भारतातील खासगी अंतराळ क्षेत्रासाठी हा एका नवीन युगाचा उदय आहे. देशातील आत्मविश्वासाने भरलेल्या नव्या युगाची ही सुरुवात आहे. आपण कल्पना करू शकता की जी मुले कधीकाळी कागदाचे विमान बनवून उडवायची त्यांना आता भारतातच विमाने बनविण्याची संधी मिळत आहे. आपण कल्पना करू शकता की एकेकाळी चंद्र आणि ताऱ्यांकडे पाहून आकाशात आकार तयार करणाऱ्या मुलांना आता भारतातच क्षेपणास्त्र बनविण्याची संधी मिळत आहे. अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले झाल्यानंतर तरुणांची ही स्वप्नंही प्रत्यक्षात उतरत आहेत. रॉकेटची निर्मिती करणारे हे तरुण जणू काही म्हणतायत – Sky is not the limit.

 

मित्रांनो, अंतराळ क्षेत्रातील आपले हे यश भारत आपल्या शेजारील देशांसोबत देखील सामायिक करीत आहे. कालच भारताने एक उपग्रह प्रक्षेपित केला, जो भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे. हा उपग्रह खूप उत्तम दर्जाची छायाचित्रे पाठवेल ज्यामुळे भूतानला त्याच्या नैसर्गिक स्रोतांचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल. या उपग्रहाचे प्रक्षेपण म्हणजे भारत आणि भूतान यांच्यातील दृढ संबंधांचे प्रतिबिंब आहे.

 

मित्रांनो, ‘मन की बात’च्या मागील काही भागांमध्ये आपण अवकाश, तंत्रज्ञान, नवनिर्मिती या विषयांवर खूप बोललो आहोत, हे तुमच्या लक्षात आले असेलच. याची दोन खास कारणे आहेत, एक म्हणजे आपली तरुणाई या क्षेत्रात उत्तम काम करत आहे. ते आता मोठा विचार करीत आहेत आणि मोठे यश संपादन करत आहेत. आता छोट्या छोट्या यशाने त्यांचे समाधान होणार नाही. दुसरं म्हणजे नाविन्य आणि मूल्यनिर्मितीच्या या रोमांचक प्रवासात ते त्यांच्या इतर तरुण सहकाऱ्यांना आणि स्टार्ट अप्सनाही प्रोत्साहन देत आहेत.

मित्रांनो, जेव्हा आपण तंत्रज्ञानाशी संबंधित नवनिर्मिती संदर्भात बोलत असतो, तेव्हा आपण ड्रोनला  कसे विसरू शकतो? ड्रोनच्या क्षेत्रातही भारत वेगाने पुढे जात आहे. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये कशाप्रकारे ड्रोनच्या माध्यमातून सफरचंदांची वाहतूक केली हे आपण पाहिले. किन्नौर हा हिमाचल प्रदेशातील दुर्गम जिल्हा असून या हंगामात येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. अशा बर्फवृष्टीत किन्नौरचा उर्वरित राज्याशी कित्येक आठवडे संपर्क होणे अत्यंत कठीण होते. अशा परिस्थितीत तेथून सफरचंदांची वाहतूक करणेही तितकेच कठीण आहे. आता ड्रोन तंत्रज्ञानामुळे हिमाचलची चविष्ट किन्नौरी सफरचंदं  लोकांपर्यंत लवकर पोहोचतील. यामुळे आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचा खर्च कमी होईल – सफरचंद वेळेवर बाजारात पोहचेल,  सफरचंदाची नासाडी कमी होईल.

 

मित्रांनो, ज्या गोष्टींची आपण कधी कल्पना देखील केली नव्हती त्या गोष्टी आज आपले नागरिक आपल्या नवकल्पनांच्या माध्यमातून शक्य करून दाखवत आहेत. हे पाहून कोणाला आनंद होणार नाही?  अलिकडच्या वर्षांत, आपल्या देशाने यशाचा मोठा पल्ला गाठला आहे. मला विश्वास आहे की, आपण भारतीय, विशेषत: आपली तरुण पिढी आता थांबणार नाही.

 

प्रिय देशवासियांनो, मी तुमच्यासाठी एक छोटेसे गाणे वाजवत आहे.

##(Song)##

 

तुम्ही सगळ्यांनीच हे गाणं कधीतरी नक्कीच ऐकलं असेल. हे बापूंचं आवडतं गाणं आहे, परंतु मी जर तुम्हाला सांगितले की या गाण्याचा गायक ग्रीक आहे तर  तुम्हाला आश्चर्य वाटेल! आणि ही गोष्ट तुमच्यासाठी अभिमानास्पद देखील असेल. हे गाणं गाणारा ग्रीसचा गायक आहे- ‘कॉन्स्टँटिनोस कलाइत्झीस’. गांधीजींच्या 150 व्या जयंती उत्सवाच्या वेळी त्यांनी हे गाणे गायले होते. पण आज मी एका वेगळ्या कारणासाठी याची चर्चा इथे करत आहे. त्यांना भारत आणि भारतीय संगीताची प्रचंड आवड आहे. त्यांना भारताची इतकी ओढ आहे की, गेल्या 42 (बेचाळीस) वर्षांत ते जवळजवळ दरवर्षी भारतात आले आहेत. भारतीय संगीताचे मूळ, विविध भारतीय संगीत, विविध प्रकारचे राग, ताल आणि रस तसेच विविध घराण्यांचा देखील त्यांनी अभ्यास केला आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील अनेक महान व्यक्तींच्या योगदानाचा देखील त्यांनी अभ्यास केला आहे, भारतातील शास्त्रीय नृत्यांचे विविध पैलू देखील त्यांनी बारकाईने समजून घेतले आहेत. भारताशी संबंधित या सर्व अनुभवांना त्यांनी आता एका पुस्तकात अतिशय सुंदरपणे गुंफले आहे. इंडियन म्युझिक नावाच्या त्यांच्या पुस्तकात सुमारे 760 छायाचित्रे आहेत. यातील बहुतांश छायचित्रे त्यांनी स्वत: काढलेली आहेत. इतर देशांमध्ये असलेला भारतीय संस्कृतीविषयीचा असा उत्साह आणि आकर्षण खरोखरच उल्हासित करणारा आहे.

 

मित्रांनो, काही आठवडे अगोदर एक बातमी आली होती ज्यामुळे आमची मान गर्वाने ताठ होणार आहे. आपल्याला हे जाणून खूप छान वाटेल की, गेल्या ८ वर्षांमध्ये भारतातून संगीत वाद्यांची निर्यात तीन पटींनी वाढली आहे. विद्युत आधारे सगीत वाद्यांपुरते बोलायचं तर त्यांची निर्यात ६० पटींनी वाढली आहे. यावरून भारतीय संस्कृती आणि संगीत यांचे वेड जगभरातच वाढलं आहे, हे लक्षात येईल. भारतीय संगीत वाद्यांचे सर्वात मोठे खरेदीदार अमेरिका, जर्मनी, फ्रान्स,  जपान आणि युनायटेड किंग्डम यासारखे विकसित देश आहेत. आमच्या देशाला संगीत, नृत्य आणि कलेची अत्यंत समृद्ध असा वारसा आहे, ही आमच्या सर्वांसाठीच सद्भाग्याची बाब आहे.

 

मित्रांनो, महान मनीषी कवी भर्तृहारी यांना त्यांनी रचलेल्या नीतीशतक या काव्यासाठी आम्ही सर्व ओळखतो. एका श्लोकात ते म्हणतात की, कला, संगीत आणि साहित्याप्रति असलेली आमची आवड ही मानवतेची खरी ओळख आहे. वास्तवात, आमची संस्कृती याला मानवतेच्याही वर अध्यात्मिकतेकडे घेऊन जाते. वेदांमध्ये सामवेदाला तर आमच्या विविध प्रकारच्या संगीतांचा स्त्रोत म्हणून म्हटलं आहे. माता सरस्वतीच्या हातातीतल वीणा असो, भगवान श्रीकृष्णाच्या हातातील बासरी असो, किंवा भोलनाथ यांच्या हातातील डमरू असो, आमच्या देवीदेवताही संगीतापासून अलग राहिलेल्या नाहीत. आम्ही भारतीय प्रत्येक गोष्टीत संगीताचा शोध घेत असतो. मग तो नदीच्या वाहत्या पाण्याचा झुळुझुळू वाहणारा नाद असो, पावसाच्या थेंबांचा स्वर असो, पक्ष्यांचा गुंजारव असो की हवेचा घुमणारा आवाज असो, आमच्या संस्कृतीमध्ये संगीत सर्वत्र भरून राहिलं आहे.  हे संगीत केवळ शरिराला सुखद जाणीव देत नाही तर मनालाही उल्हसित करते. संगीत आमच्या समाजाला जोडतही असतं. जर भांगडा आणि लावणीमध्ये आनंदाची भावना आहे, तर रवींद्र संगीत आमच्या आत्म्याला आल्हाद देतं. देशभरातील आदिवासींची वेगवेगळ्या प्रकारांची संगीत परंपरा आहे. ती आम्हाला सगळ्यांशी मिळून मिसळून रहाण्यासाठी आणि निसर्गासह रहाण्याची प्रेरणा देंत असते.

मित्रांनो, संगीताच्या वेगवेगळ्य़ा शैलीनं केवळ आमच्या संस्कृतीला समृद्ध केलं आहे असं नाही तर जगभरातील संगीतावर आपला कधीही न मिटणारा ठसा उमटवला आहे. भारतीय संगीताची ख्याती जगभरातील कानाकोपर्यात पसरली आहे. मी एका गीताची एक ध्वनिमुद्रिका आपल्याला ऐकवतो.

गीत…

आपण विचार करत असाल की, घराच्या जवळच कुठल्या तरी मंदिरात भजन कीर्तन सुरू आहे. परंतु हा स्वर भारतापासून दूर हजारो मैल वसलेल्या दक्षिण अमेरिकेतील गयाना इथला आहे. १९  आणि २० व्या शतकात खूप मोठ्या संख्येनं आमचे लोक इथनं गयानात गेले होते. ते इथून भारताच्या अनेक परंपरा आपल्याबरोबर घेऊन गेले होते. उदाहरण पहायचं तर, जसे आम्ही भारतात  होळी साजरी करतो, गयानामध्येही होळीचे रंग अत्यंत जोशात खेळले जातात. जिथं होळीचे रंग असतात, तेथे फगवा म्हणजे होळीचे संगीतही गायिलं जातं.  गयानामध्ये फगवामध्ये भगवान राम आणि भगवान कृष्ण यांच्या विवाहाशी संबंधित गीतं गाण्याची एक विशेष परंपरा आहे. या गीतांना चौताल असं म्हटलं जातं. या गीतांना त्याच प्रकारची चाल आणि वरच्या पट्टीत गायिलं जातं, जसं की आमच्या इथं गायलं जातं. इतकंच नव्हे तर, गयानात चौताल स्पर्धाही होत असते. याच प्रकारे, खूप सारे भारतीय विशेषतः उत्तरप्रदेश आणि बिहारमधनं लोक फिजीलाही गेले होते. ते पारंपरिक भजन कीर्तनं गात असत, ज्यात मुख्यतः रामचरित मानसमधील दोहे असत. त्यांनी फिजीमध्येसुद्धा भजन कीर्तनाशी जोडलेली अनेक मंडळं स्थापन केली. फिजीमध्ये रामायण मंडळं या नावाची आजसुद्धा दोन हजाराहून अधिक भजन कीर्तन मंडळं आहेत. ते आज प्रत्येक गाव आणि गल्लीत पहाता येतात. मी तर इथं केवळ काहीच उदाहरणं दिली आहेत. आपण पूर्ण जगभर पहाल तर भारतीय संगीताची आवड असलेल्या लोकांची यादी खूपच मोठी आहे.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, आमचा देश जगातील सर्वात प्राचीन परंपरांचं माहेरघर आहे, याचा आम्ही खूप अभिमान बाळगतो. म्हणून, आम्ही आपल्या परंपरा आणि पारंपरिक ज्ञान सुरक्षित आणि जपून ठेवावं, त्याचं संवर्धन करावं आणि जितकं शक्य असेल तितकं त्याला  पुढे न्यावं. ही आमची जबाबदारीसुद्धा  आहे. असाच एक प्रशंसनीय प्रयत्न आमचे ईशान्येतील नागालँड राज्यामधील काही मित्र करत आहेत. मला हा प्रयत्न चांगला वाटला, म्हणून मी असा विचार केला की तो मन की बातच्या श्रोत्यांशी सामायिक करू.

 

मित्रांनो, नागालँडमध्ये नागा समाजाची जीवनशैली, त्यांची कला संस्कृती आणि संगीत, प्रत्येकाला आकर्षित करून घेत असतं. हा आमच्या गौरवशाली वारशाचा महत्वपूर्ण भाग आहे. नागालँडच्या लोकांचं जीवन आणि त्यांचं कौशल्य शाश्वत जीवनशैलीसाठीही खूप महत्वपूर्ण आहे. या परंपरा आणि कौशल्य सांभाळून ठेवून पुढ्ल्या पिढीसाठी पोहचवण्यासाठी तिथल्या लोकांनी एक संस्था स्थापन केली आहे, जिचं नाव आहे लिडि-क्रो-यू. नागा संस्कृतीचे अत्यंत सुंदर आयाम हळूहळू विस्मृतीत चालले होते, लिडि-क्रो-यू संस्थेनं पुन्हा त्यांना  पुनरूज्जीवित करण्याचं काम केलं आहे. उदाहरणार्थ, नागा लोकसंगीत स्वतःच एक समृद्ध शैली आहे. या संस्थेंनं नागा संगीताचे अल्बम आणण्याचं काम सुरू केलं आहे. आतापर्यंत असे तीन अल्बम बाजारात आणले गेले आहेत. हे लोक लोकसंगीत, लोकनृत्याशी संबंधित कार्यशाळाही आयोजित करत असतात. युवकांना या सर्व बाबींसाठी प्रशिक्षण दिलं जात असतं. इतकंच नाही तर, नागालँडच्या पारंपरिक शैलीमध्ये कपडे शिवणं, शिलाई आणि विणण्याचं जे काम आहे, त्याचंही प्रशिक्षण तेथील युवकांना दिलं जातं. ईशान्येत बांबूची कितीतरी उत्पादनं बनवली जातात. नव्या पिढीच्या युवकांना बांबू उत्पादनं बनवण्यासही शिकवलं जातं. यामुळे हे युवक आपल्या संस्कृतीशी जोडले जातातच, पण त्याचबरोबर त्यांच्या रोजगारासाठी नवीन संधीही तयार होतात. नागा लोकसंस्कृतीच्या बाबतीत जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी, म्हणून लिडि-क्रो-यू ही संस्था  प्रयत्न करत असते.

 

मित्रांनो, आपल्या प्रदेशातही  अशा अनेक सांस्कृतिक वैशिष्ट्यं आणि परंपरा असतील. आपणही आपापल्या प्रदेशात अशा प्रकारचे प्रयत्न करू शकता. आपल्या माहितीत असा एखादा आगळावेगळा प्रयत्न होत असेल तर, आपण त्याची माहिती मला त्याची जरूर द्या.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आमच्या इथं असं म्हटलं गेलं आहे की,

           विद्याधनं सर्वधनप्रधानम्

म्हणजे, कुणी विद्येचं दान करत असेल तर तो समाजाच्या हिताचं सर्वात मोठं काम करत आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात लावलेला एक लहानसा दिवाही पूर्ण समाजाला  उजळून टाकू शकतो. आज देशभरात असे कितीतरी प्रयत्न केले जात आहेत, याचा मला मोठा आनंद होतो. उत्तरप्रदेशची राजधानी लखनौपसून ७०-८० किलोमीटर अंतरावर हरदोईजवळ बानसा गाव वसलं आहे. मला या गावातील जतिन ललितसिंह यांच्याबाबत माहिती मिळाली आहे. जे शिक्षणाचं महत्व प्रस्थापित करण्यात गुंतलेले आहेत. जतिन जींनी दोन वर्षांपूर्वी इथं समुदायासाठी वाचनालय आणि साधनसंपत्ती केंद्र सुरू केलं होतं. त्यांच्या या केंद्रामध्ये हिंदी आणि इंग्रजी साहित्य, संगणक. कायदा आणि सरकारी परीक्षांच्या तयारीशी संबंधित तीन हजारहून अधिक पुस्तकं उपलब्ध आहेत. या वाचनालयात मुलांच्या आवडीची पूर्णपणे जाणीव ठेवली गेली आहे. इथं उपलब्ध कॉमिक्सची पुस्तकं असतील किंवा शैक्षणिक खेळणी असतील, मुलांना त्यांची खूप आवड निर्माण झाली आहे. लहान मुलं खेळता खेळताच इथं नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी येतात. शिक्षण ऑनलाईन असो की ऑफलाईन, जवळपास ४० स्वयंसेवक या केंद्रात विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यासाठी जुंपून घेतात. दररोज गावातील जवळपास ८० विद्यार्थी या वाचनालयात वाचण्यासाठी येतात.

 

मित्रांनो, झारखंडचे संजय कश्यप हेही गरीब मुलांच्या स्वप्नांना नवीन पंख लावण्याचे प्रयत्न करत आहेत. आपल्या विद्यार्थी जीवनात संजय जी यांनी चांगल्या पुस्तकांच्या उणीवेचा सामना करावा लागला होता. त्यातच त्यांनी मनाशी असा निश्चय केला की, पुस्तकांची कमतरता असल्याने ते आपल्या प्रदेशातील मुलांचं भवितव्य अंधकारमय होऊ देणार नाही. आपल्या या मोहीमेच्या मुळे, ते आज झारखंडच्या अनेक जिल्हयांमध्ये मुलांसाठी लायब्ररी मॅन झाले आहेत. संजयजींनी जेव्हा आपल्या नोकरीस सुरूवात केली, तेव्हा पहिले पुस्तकालय त्यांनी आपल्या वडिलोपार्जित जागेत सुरू केलं होतं. नोकरी करत असताना, त्यांची जिथं बदली होत असे, तिथं ते गरीब आणि आदिवासी मुलांसाठी वाचनालय उघडण्याच्या प्रयत्नांना लागत असत. असं करत करत त्यांनी झारखंडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुलांसाठी वाचनालयं सुरू केली आहेत. वाचनालय सुरू करण्याची त्यांच्या मोहीमेनं आज एका सामाजिक आंदोलनाचं स्वरूप घेतलं आहे. संजय जी असोत किंवा जतिनजी, त्यांच्या अनेक प्रयत्नांसाठी मी त्यांची विशेष प्रशंसा करतो.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, वैद्यकीय शास्त्राच्या जगानं संशोधन आणि नावीन्यपूर्णेतेच्या बरोबरीनंच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या सहाय्यानं खूपच प्रगती केली आहे. परंतु काही आजार;आजही आपणा सर्वांसाठी एक खूप मोठं आव्हान म्हणून आहे. असाच एक आजार आहे मस्क्युलर डिस्ट्रोफी. हा एक स्नायुंचा आजार असून तो मुख्यतः अनुवंशिक आजार आहे आणि तो कोणत्याही वयात होऊ शकतो. त्यात शरीरातील स्नायू कमकुवत होऊ लागतात. रोग्याला आपल्या दैनंदिन जीवनातील कामकाज करणंही अवघड होतं. अशा रोग्यांवरील उपचार आणि त्यांच्या शुश्रुषेसाठी खूप मोठ्या सेवाभावाची आवश्यकता असते. आमच्या कडे हिमाचल प्रदेशात सोलनमध्ये असं एक केंद्र आहे जे मस्क्युलर डिस्ट्रॉफी रोग्यांसाठी आशेंचा नवा किरण बनलं आहे. या केंद्राचं नाव आहे-मानव मंदिर. इंडियन असोसिएशन ऑफ मस्क्युलर डिस्ट्रॉफी ही संस्था त्याचं संचालन करत असते. मानव मंदिर  आपल्या नावाप्रमाणेच मानव सेवेचं अद्भुत उदाहरण आहे. इथं रूग्णांना ओपीडी आणि प्रवेशाची सेवा तीन चार वर्षे अगोदर सुरू झाली होती. मानव मंदिरात जवळपास ५० रोग्यांसाठी खाटांची सुविधाही आहे. फिजिओथेरपी, इलेक्ट्रोथेरपी आणि हायड्रोथेरपी यांच्याबरोबरीनंच योग प्राणायामाच्या सहाय्यानं इथं रोगावर उपचार केले जातात.

 

मित्रांनो, सर्व प्रकारच्या उच्च तंत्रज्ञानाच्या सुविधांच्या माध्यमातून या केंद्रात रोग्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणण्याचे प्रयत्न होतात. मस्क्युलर डिस्ट्रॉफीशी संबंधित आव्हानाच्या बाबतीत जागरूकतेचाही अभाव आहे. म्हणून, या केंद्रातर्फे हिमाचल प्रदेशातच नव्हे तर देशभरातील रोग्यांसाठी जनजागृती शिबीरे आयोजित केली जातात. या संस्थेचं व्यवस्थापनही या आजारानं त्रस्त लोकच करत असतात, ही सर्वात मोठी स्फूर्तीदायक बाब आहे. सामाजिक कार्यकर्त्या उर्मिला बाल्दीजी, इंडियन असोसिएशन ऑफ मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या अध्यक्ष संजना गोयलजी आणि या संघटनेच्या स्थापनेत महत्वपूर्ण भूमिका बजावणारे विपुल गोयल जी या संस्थेसाठी अत्यंत महत्वपूर्ण काम करत आहेत. मानव मंदिरला रूग्णालय आणि संशोधन केंद्र या रूपात विकसित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. यामुळे इथं रोग्यांना अधिक चांगले उपचार मिळू शकतील. मी या दिशेनं प्रयत्न करत असलेल्या सर्व लोकांची मनापासून प्रशंसा करतो. त्याचबरोबर, मस्क्युलर डिस्ट्रोफी या रोगाचा सामना करत असलेल्या सर्व लोकांच्या आरोग्याची कामना करतो.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मन की बातमध्ये आम्ही देशवासियांच्या ज्या विधायक आणि सामाजिक कार्याची चर्चा केली, ते देशातील उर्जा आणि उत्साहाचे उदाहरण आहे. आज प्रत्येक देशवासी कोणत्या नं कोणत्या क्षेत्रात प्रत्येक स्तरावर देशासाठी काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या चर्चेत आम्ही पाहिलं की, जी २० सारख्या आंतरराष्ट्रीय उपक्रमात आमचे एक विणकर मित्रांनी आपली जबाबदारी ओळखून ते पुढे आले. याच प्रकारे, कुणी पर्यावरणासाठी प्रयत्न करत आहे तर कुणी पाण्यासाठी काम करत आहे. कितीतरी लोक शिक्षण, वैद्यकीय आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रापासून ते संस्कृती आणि परंपरापर्यंत असामान्य काम करत आहेत. आज आमचा प्रत्येक नागरिक आपलं कर्तव्य समजून आहे त्यामुळे हें होत आहे. अशी कर्तव्य भावना जेव्हा एखाद्या राष्ट्राच्या नागरिकांमध्ये येते, तेव्हा त्याचं सोनेरी भविष्य आपोआपच निश्चित होतं आणि देशाच्या सोनेरी भविष्यातच आमचंही सोनेरी भविष्य आहे. मी आपणा सर्व देशवासियांना त्यांच्या प्रयत्नांबद्दल नमन करतो. पुढील महिन्यात आम्ही पुन्हा  भेटू आणि अशाच काही उत्साहवर्धक विषयांवर अवश्य चर्चा करू. आपल्या सूचना आणि विचार आम्हाल अवश्य पाठवत रहा. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद.

***

S.Pophale/AIR/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai