Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेला- 10 लाख कर्मचाऱ्यांच्या भरती मोहीमेचा येत्या 22 ऑक्टोबरला होणार शुभारंभ


नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  येत्या 22 ऑक्टोबरला, सकाळी 11 वाजता रोजगार मेला- ह्या 10 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरभरती मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या समारंभात, 75 हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात येतील. यावेळी पंतप्रधान नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देखील करतील. 

पंतप्रधान मोदी यांच्या, युवकांना रोजगाराच्या संधी प्रदान करण्याच्या तसेच नागरिकांच्या कल्याणाप्रति असलेल्या कटिबद्धतेची पूर्तता करण्याच्या दृष्टीने, हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशांनुसार, सर्व मंत्रालये आणि विभागांमध्ये असलेल्या मंजुरीप्राप्त रिक्त जागा भरण्याचे काम मिशन मोडवर सुरु झाले आहे.

देशभरातून निवडले गेलेले नवनियुक्त कर्मचारी, केंद्र सरकारच्या 38 मंत्रालये/विभागांमध्ये कामावर रुजु होतील. यात अ श्रेणी, ब श्रेणी (राजपत्रित अधिकारी) तसेच ब श्रेणी( अ-राजपत्रित) आणि क श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या भरतीयोग्य पदांमध्ये, केंद्रीय सशस्त्र दलाचे कर्मचारी, उपनिरीक्षक, हवालदार, स्टेनो, स्वीय सचिव, प्राप्तिकर निरीक्षक, एमटीएस (शिपाई) अशा पदांचा समावेश आहे.

मंत्रालये आणि विभागांद्वारे, स्वतः ही भरतीप्रक्रिया मिशन मोडवर पूर्ण केली जात आहे, अथवा, केंद्रीय लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे भरती मंडळ अशा संस्थांच्या माध्यमातून ही प्रक्रिया होत आहे. भरती प्रक्रिया जलद गतीने व्हावी, यासाठी ती सुलभ आणि तंत्रज्ञानयुक्त करण्यात आली आहे. 

* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai