माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार ! “मन की बात’ चा हा 91 वा भाग आहे. आपण सगळ्यांनी याआधी खरंतर इतक्या विषयांवर भरपूर गप्पा मारल्या आहेत, पण तरीही, यावेळचं ‘मन की बात’ खूप विशेष आहे. याचे कारण आहे, यावर्षीचा आपला स्वातंत्र्यदिन. जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करणार आहे. आपण सगळे अत्यंत अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहोत. देवाने आपल्याला हे खूप मोठे सौभाग्य दिले आहे. आपणही विचार करा, जर आपण पारतंत्र्याच्या काळात जन्माला आलो असतो तर या दिवसाचं आपल्याला किती महत्त्व वाटलं असतं? आपल्या भावना कशा असत्या? पारतंत्र्यापासून मुक्ती मिळवण्याची ती आस, पराधीनतेच्या बेड्या तोडून स्वतंत्र होण्यासाठीची ती तडफड—किती मोठी असेल ! ते दिवस जेव्हा आपण, प्रत्येक दिवशी, लाखो देशबांधवांना स्वातंत्र्यासाठी लढा देतांना, कष्ट करतांना, बलिदान देतांना पहिले असते. जेव्हा आपण प्रत्येक सकाळी, आपल्या या एकाच स्वप्नासोबत जागे झालो असतो, की आपला हा भारत केव्हा स्वतंत्र होईल? आणि कदाचित असंही झालं असतं की आपल्या आयुष्यात तो ही दिवस आला असता, जेव्हा ‘वंदेमातरम’ आणि ‘भारत माता की जय’ असं म्हणत, आपणही आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपले आयुष्य समर्पित केले असते, आपले तारुण्य वेचले असते.
मित्रांनो,
31 जुलै म्हणजे आजच्याच दिवशी, आपण सर्व देशबांधव, शाहिद उधम सिंह जी यांच्या हौताम्याला वंदन करतो. मी अशा इतर सर्व महान क्रांतिकारकांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी देशासाठी आपले सर्वस्व वाहिले आहे.
मित्रांनो,
मला हे बघून खूप आनंद वाटतो, की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाने आता एका लोकचळवळीचे रूप घेतले आहे. सर्व क्षेत्रे आणि समजाच्या प्रत्येक वर्गातील लोक, त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घेत आहेत. असाच एक कार्यक्रम, या महिन्याच्या सुरुवातीला, मेघालय इथे झाला. मेघालयचे शूरवीर योद्धा, यू. टिरोत सिंह जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकांनी त्यांचे स्मरण केले. टिरोत सिंह जी यांनी खासी हिल्स वर नियंत्रण मिळवण्याच्या आणि तिथल्या संस्कृतीवर आक्रमण करण्याच्या ब्रिटिशांच्या कारस्थानाचा अतिशय ताकदीने विरोध केला होता. या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी खूप सुंदर कार्यक्रम सादर केले. कलाविष्कारातून त्यांनी इतिहासच जिवंत केला. त्यावेळी एका आनंदमेळयाचे पण आयोजन करण्यात आले होते. यात, मेघालयाची महान संस्कृती अत्यंत सुरेख पद्धतीने दाखवण्यात आली होती. काही आठवड्यांपूर्वी, कर्नाटकात, अमृता भारती कन्नडार्थी या नावाने एक आगळावेगळा उपक्रम देखील राबवण्यात आला. यात, राज्यातील 75 जागांवर, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाशी संबंधित अनेक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात कर्नाटकचया महान स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यासोबतच, स्थानिक साहित्यिकांच्या उपलब्धी समाजापुढे मांडण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.
मित्रांनो,
याच जुलै महिन्यात आणखी एक अतिशय रोचक प्रयत्न देखील करण्यात आला, ज्याचे नाव आहे- ‘आझादी की रेलगाडी और रेल्वे स्टेशन” या प्रयत्नाचे उद्दिष्ट आहे, स्वातंत्र्यलढ्यात भारतीय रेल्वेचे योगदान जाणून घेणे. देशांत अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत,जी स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी संबंधित आहेत. आपल्यालाही या रेल्वे स्थानकांविषयी जाणून आश्चर्य वाटेल. झारखंडच्या गोमो जंक्शनला, आता अधिकृतपणे नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन या नावाने ओळखले जाते. माहिती आहे का, का ते? कारण याच स्थानकावर, कालका मेल मध्ये बसून नेताजी सुभाष, ब्रिटिश अधिकाऱ्यांना गुंगारा देत, पळून जाण्यात यशस्वी होत असत. आपण सगळ्यांनी लखनौ जवळच्या काकोरी रेल्वे स्थानकाचे नावही नक्कीच ऐकले असेल. या स्थानकासोबत, राम प्रसाद बिस्मिल आणि अशफाक उल्लाह खान यांच्यासारख्या शूर क्रांतिकारकांची नावे जोडली गेली आहेत. इथून रेल्वेगाडीने जात असलेल्या इंग्रजांचा खजिना लूटून, वीर क्रांतिकारकांनी आपल्या ताकदीची चुणूक इंग्रजांना दाखवली होती. आपण जर कधी तामिळनाडूच्या लोकांशी संवाद साधला, तर आपल्याला थुथुकुडी जिल्हयातल्या वान्ची मणियाच्ची जंक्शन बद्दल माहिती मिळू शकेल. या स्थानकाला तमिळ स्वातंत्र्यसैनिक वान्चीनाथन जी यांचं नाव दिलेलं आहे. हे तेच रेल्वे स्थानक आहे, जिथे 25 वर्षांच्या युवा वान्ची यांनी ब्रिटिश जिल्हाधिकाऱ्याला त्याच्या कृत्याची शिक्षा दिली होती.
मित्रांनो,
ही यादी खूप मोठी आहे. देशभरातल्या 24 राज्यांत विखुरलेली अशी 75 रेल्वे स्थानकं शोधून काढण्यात आली आहेत. या 75 स्थानकांची अतिशय सुरेख सजावट करण्यात आली आहे. तिथे अनेक प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित केले जात आहेत. आपण देखील, वेळात वेळ काढून आपल्या जवळच्या रेल्वे स्थानकाला नक्की भेट द्यायला हवी.
आपल्याला स्वातंत्र्यसंग्रामाच्या अशा इतिहासाविषयी सविस्तर माहिती मिळेल, ज्यापासून आतापर्यंत आपण अनाभिज्ञ होते. मी, या स्थानका जवळच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही आग्रह करेन, शिक्षकांना आग्रह करेन, की त्यांनी आपल्या शाळेतल्या छोट्या छोट्या मुलांना या स्थानकांवर नक्की घेऊन जावे आणि तिथे घडलेला संपूर्ण घटनाक्रम त्यांना समजावून सांगावा.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट एक विशेष मोहीम- “हर घर तिरंगा- हर घर तिरंगा” चे आयोजन केले जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊ आपण सर्वांनी, 13 ते 15 ऑगस्ट या काळात, आपल्या घरावर तिरंगा ध्वज जरूर फडकवा. किंवा आपल्या घरात लावा. तिरंगा आपल्याला एका सूत्रात जोडतो. आपल्याला देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो. माझी एक अशीही सूचना आहे, की 2 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत आपण सगळे आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाईल पिक्चर्स मध्येही तिरंगा लावू शकतो. तसं तुम्हाला माहिती आहे का, 2 ऑगस्ट चा आपल्या तिरंग्याशी एक विशेष संबंध देखील आहे. याच दिवशी, आपल्या राष्ट्रध्वजाचे रेखाटन करणाऱ्या पिंगली व्यंकय्या जी यांची जयंती देखील असते. मि त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या राष्ट्रध्वजाविषयी बोलतांना मी महान क्रांतिकारक, मादाम कामा यांचेही स्मरण करेन. तिरंग्याला आकार देण्यात त्यांनी पार पाडलेली भूमिका अतिशय महत्वाची होती.
माझी प्रिय देशबांधवांनो,
कोरोनाच्या विरोधात आपली सर्वांची लढाई अजूनही सुरु आहे. संपूर्ण जग आजही या आजाराशी लढा देत आहे. अशावेळी, सर्वंकष आरोग्याकडे लोकांचा वाढत असलेला कल आपल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरला आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, जी यात भारतीय चिकित्सा परंपरा किती उपयुक्त ठरल्या आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत, आयुषने तर जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका पार पाडली आहे.
जगभरात आयुर्वेद आणि भारतीय वैद्यकशास्त्राविषयीची रुचि वाढटे आहे. आयुष उत्पादनांच्या निर्यातीत विक्रमी वाढ होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे आणि या क्षेत्रात अनेक नवीन स्टार्टअप्स उदयास येत आहेत हे देखील अतिशय आनंददायी आहे. नुकतीच जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष परिषद झाली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, यामध्ये सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट घडली आहे की, कोरोनाच्या काळात औषधी वनस्पतींवरील संशोधनात बरीच वाढ झाली आहे. याबाबत अनेक संशोधने प्रसिद्ध होत आहेत. ही एक नक्कीच चांगली सुरुवात आहे.
मित्रांनो,
देशात वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती आणि वनौषधींच्या बाबतीत एक उत्तम प्रयत्न झाला आहे. आता – आता जुलै महिन्यात भारतीय आभासी हर्बेरियम सुरु करण्यात आलं आहे. हे याचं देखील उदाहरण आहे, की आपण कसा डिजिटल जगाचा उपयोग आपल्या मुळाशी जोडण्यात करू शकतो. भारतीय आभासी हर्बेरियम, जतन केलेल्या रोपांचा किंवा रोपाच्या भागांच्या डिजिटल छायाचित्रांचा एक मनोरंजक संग्रह आहे, जो इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. या भारतीय आभासी हर्बेरियम मध्ये सध्या एक लाखापेक्षा जास्त नमुने आणि त्यांच्याशी निगडीत वैज्ञानिक माहिती उपलब्ध आहे. आभासी हर्बेरियममध्ये भारताच्या, वनस्पतीशास्त्र विविधतेचे समृद्ध चित्र देखील दिसून येते. मला विश्वास आहे, की भारतीय आभासी हर्बेरियम, भारतीय वनस्पतींवर संशोधन करण्यासाठी एक महत्वपूर्ण स्रोत बनेल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
‘मन की बात’ मध्ये दर वेळेस आपण देशबांधवांच्या यशोगाथांची चर्चा करतो, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलते. जर कुठली यशोगाथा, गोड हास्य फुलवत असेल, आणि त्यामुळे तोंडाला गोड चव देखील येणार असेल तर तुम्ही याला नक्कीच दुग्ध शर्करा योगच म्हणाल. आपल्या शेतकऱ्यांनी अलीकडच्या काळात मध उत्पादनात अशीच कमाल केली आहे. मधाची गोडी आपल्या शेतकऱ्यांचं आयुष्य देखील बदलत आहे, त्यांचे उत्पन्न वाढवत आहेत. हरियाणामध्ये, यमुनानगरला एक मधमाशी पालन करणारे सहकारी राहतात – सुभाष कांबोजजी. सुभाषजींनी वैज्ञानिक पद्धतीनं मधमाशी पालनाचं प्रशिक्षण घेतलं. या नंतर त्यांनी केवळ सहा बॉक्स सोबत आपलं काम सुरु केलं. आज ते जवळजवळ दोन हजार बॉक्स मध्ये मधमाशी पालन करत आहेत. त्याचं मध अनेक राज्यांत पाठवलं जातं. जम्मूच्या पल्ली गावात विनोद कुमारजी देखील दीड हजाराहून जास्त कॉलनीत मध माशी पालन करत आहेत. त्यांनी मघ्य वर्षी, राणी माशी पालन करण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. या कामातून ते वर्षाला 15 ते 20 लाख रुपये कमावत आहेत. कर्नाटकचे आणखी एक शेतकरी आहेत – मधुकेश्वर हेगडेजी. मधुकेश्वरजींनी सांगितलं की त्यांनी भारत सरकार कडून मधमाश्यांच्या 50 कॉलानीसाठी अनुदान घेतलं होतं. आज त्यांच्याकडे 800 पेक्षा जास्त कॉलनी आहेत, आणि ते अनेक टन मध विकतात. त्यांनी आपल्या कामात सुधारणा केल्या आहेत, आणि ते जांभूळ मध, तुळस मध, आवळा मध या सारखे वनस्पती मध देखील बनवत आहेत. मधुकेश्वरजी, मध उत्पादनात आपले संशोधन आणि सफलता आपले नाव देखील सार्थक करत आहेत.
मित्रांनो,
आपल्या सर्वांना माहितच आहे की, मधाला आपल्या पारंपारिक आरोग्य विज्ञानात किती महत्व दिले गेले आहे. आयुर्वेद ग्रंथांत तर मधला अमृत म्हटलं आहे. मधातून केवळ चव मिळत नाही, तर आरोग्य देखील मिळते. मध उत्पादनात आज इतक्या संधी आहेत की व्यावसायिक अभ्यास करणारा विद्यार्थी देखील यातून आपला स्वयंरोजगार तयार करत आहे. असेच एक युवक आहेत – उत्तर प्रदेशात गोरखपूरचे निमित सिंह. निमितजींनी बी. टेक. केलं. त्यांचे वडील सुद्धा डॉक्टर आहेत, मात्र, शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करण्याच्या ऐवजी निमितजींनी स्वतःचा उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी मध उत्पादनाचे काम सुरु केले. त्याच्या दर्जाची चाचणी करता यावी म्हणून लखनौ येथे स्वतःची एक प्रयोगशाळा देखील स्थापन केली. निमितजी आता मध आणि बी-वॅक्स म्हणजेच मधमाशांनी तयार केलेले विशिष्ट प्रकारचे मेण यांच्या व्यवसायातून उत्तम उत्पन्न मिळवत आहेत आणि विविध राज्यांमध्ये जाऊन तेथील शेतकऱ्यांना या व्यवसायाचे प्रशिक्षण देखील देत आहेत. अशा तरुणांनी केलेल्या मेहनतीमुळेच आज आपला देश एवढा मोठा मध उत्पादक देश होऊ लागला आहे. देशातून होणाऱ्या मधाच्या निर्यातीचे प्रमाण देखील वाढले आहे हे समजल्यावर तुम्हांला नक्कीच आनंद होईल.देशामध्ये राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मधु अभियानासारखे उपक्रम सुरु करण्यात आले, शेतकऱ्यांनी त्यात सहभागी होऊन परिश्रम केले आणि आपल्या देशातील मधाचा गोडवा जगात पोहोचू लागला. या क्षेत्रात अजूनही फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या युवकांनी या संधींची ओळख करून घेऊन त्यांचा लाभ घ्यावा आणि नव्या शक्यतांना आकार द्यावा.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
‘मन की बात’ कार्यक्रमाचे हिमाचल प्रदेशातील एक श्रोते आशिष बहल यांचे एक पत्र मला मिळाले आहे.त्यांनी या पत्रात चंबा येथील ‘मिंजर जत्रे’चा उल्लेख केला आहे. खरेतर मक्याच्या फुलांना मिंजर म्हणतात. जेव्हा मक्याच्या पिकांमध्ये मिंजर फुले फुलतात तेव्हा ही ‘मिंजर जत्रा’ आयोजित केली जाते आणि देशभरातील लांबलांबच्या ठिकाणांहून पर्यटक या जत्रेत सहभागी होण्यासाठी येतात. योगायोगाने सध्या ‘मिंजर जत्रा’ सुरु आहे. जर तुम्ही आत्ता हिमाचल प्रदेशात फिरायला गेला असाल तर ही जत्रा पाहायला चंबा येथे भेट देऊ शकता. चंबा हे गाव इतके सुंदर आहे की या भागातील लोकगीतांमध्ये अनेकदा म्हटले जाते –
“चंबे इक दिन ओणा कने महीना रैणा” |
म्हणजे, जे लोक एकदा चंबा येथे येतात ते इथले निसर्गसौंदर्य पाहून महिनाभर तरी मुक्काम करतात.
मित्रांनो,
आपल्या देशात मेळे किंवा जत्रा यांना फार मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे. या जत्रा,लोकांना आणि त्यांच्या मनांना एकमेकांशी बांधून ठेवतात. हिमाचल प्रदेशात पावसाळ्यानंतर जेव्हा खरीपाची पिके तयार होतात तेव्हा,म्हणजे साधारण सप्टेंबर महिन्यात, सिमला, मंडी, कुल्लू आणि सोलन या भागांमध्ये सिरी किंवा सैर नावाचा उत्सव साजरा केला जातो. सप्टेंबर महिन्यातच जागरा सुद्धा येतो आहे. जागराच्या मेळाव्यांमध्ये महासू देवतेला आवाहन करून बिसू गीते गायली जातात.महासूदेवतेचा हा जागर हिमाचल मधील सिमला, किन्नौर आणि सिरमौरसह उत्तराखंड राज्यात देखील साजरा केला जातो.
मित्रांनो,
आपल्या देशात विविध राज्यांतील आदिवासी समाजांमध्ये देखील अनेक पारंपारिक उत्सव किंवा जत्रा साजऱ्या होतात. यापैकी काही उत्सव आदिवासी संस्कृतीशी संबंधित आहेत तर काहींचे आयोजन आदिवासी इतिहास आणि वारशाशी संबंधित आहे. उदा. तुम्हांला संधी मिळाली तर तेलंगणामधील मेदारमचा चार दिवस चालणारा समक्का-सरलम्मा जातरा मेळा पाहायला जरूर जा. या जत्रेला तेलंगणाचा महाकुंभ मेळा म्हटले जाते. समक्का आणि सरलम्मा या दोन आदिवासी महिला नेत्यांच्या सन्मानार्थ सरलम्मा जातरा मेळा साजरा करण्यात येतो.ही जत्रा केवळ तेलंगणाच्याच जनतेसाठी नव्हे तर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेश मधील कोया आदिवासी समाजासाठी देखील अत्यंत श्रद्धेचे केंद्र आहे. आंध्रप्रदेशात मारीदम्मा ची जत्रा देखील आदिवासी समाजाच्या परंपरांशी जोडलेली एक मोठी जत्रा आहे. मारीदम्मा जत्रा ज्येष्ठ अमावास्येला सुरु होते आणि आषाढ अमावास्येला संपते. आणि आंध्रप्रदेशातील आदिवासी समाजाने या जत्रेचा संबंध शक्ती उपासनेशी जोडलेला आहे. आंध्रप्रदेशात गोदावरी नदीच्या पूर्वेला पेद्धापुरम येथे मरीदम्मा मंदिर देखील आहे. याच प्रकारे, राजस्थानच्या गरासिया जमातीचे लोक वैशाख शुक्ल चतुर्दशीला ‘सियावा चा मेळा’ किंवा ‘मनखां रो मेळा’ आयोजित केला जातो.
छत्तीसगडमधील बस्तर येथे नारायणपूरची ‘मावली जत्रा’ देखील वैशिष्ट्यपूर्ण असते. जवळच्या मध्य प्रदेशातील ‘भगोरिया जत्रा’ देखील फार प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, भगोरिया जत्रेची सुरुवात राजा भोजयाच्या काळात झाली आहे. तेव्हा कासूमरा आणि बालून या भिल्ल राजांनी आपापल्या राजधानीत पहिल्यांदा या जत्रेचे आयोजन केले होते. तेव्हापासून, आजपर्यंत या जत्रा तितक्याच उत्साहाने साजऱ्या होत आहेत. अशाच प्रकारे, गुजरातमधील तरणेतर आणि माधोपुर सारख्या ठिकाणच्या जत्रा अत्यंत प्रसिध्द आहेत. ‘मेळे’ किंवा ‘जत्रा’ या आपल्या समाजात, जीवनाच्या उर्जेचा फार मोठा स्त्रोत असतात.तुमच्या परिसरात, आसपासच्या ठिकाणी देखील अशाच जत्रा भारत असतील. आधुनिक काळात, समाजाच्या या जुन्या परंपरा ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या भावनेला मजबूत करण्यासाठी फार आवश्यक आहेत. आपल्या तरुणांनी यांच्याशी स्वतःला जोडून घेतले पाहिजे. तुम्ही जेव्हा अशा जत्रांमध्ये जाल तेव्हा तेथील छायाचित्रे समाज माध्यमांवर नक्की सामायिक करा. तुम्हांला हवे तर तुम्ही विशेष हॅशटॅग चा देखील वापर करू शकता. यामुळे बाकीच्या लोकांना देखील त्या जत्रांबद्दल माहिती मिळेल. तुम्ही ही छायाचित्रे सांस्कृतिक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देखील अपलोड करू शकता. येत्या काही दिवसांमध्ये सांस्कृतिक मंत्रालय एका स्पर्धेची सुरुवात करणार आहे. जत्रांच्या संदर्भातील सर्वात उत्तम छायाचित्रे पाठविणाऱ्यांना या स्पर्धेत पारितोषिक दिले जाणार आहे. मग उशीर करू नका,जत्रांमध्ये फिरा, तेथील छायाचित्रे सामायिक करा. कदाचित तुमच्या छायाचित्राला बक्षीस मिळून जाईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
तुमच्या लक्षात असेल, ‘मन की बात’च्या एका भागात मी म्हटले होते की भारतात खेळण्यांच्या निर्यातीचे पॉवर हाऊस होण्याची क्षमता आहे. मी क्रीडा आणि खेळांच्या बाबतीतभारताच्या समृद्ध वारशाची विशेष चर्चा केली होती. भारतातील स्थानिक खेळणी भारतीय परंपरा आणि निसर्ग अशा दोन्हींशी अनुरूप असतात, पर्यावरण-स्नेही असतात.मी आज तुम्हांला भारतीय खेळण्यांना मिळालेल्या यशाची माहिती देऊ इच्छितो. आपले युवक, स्टार्टअप्स आणि उद्योजक यांच्या बळावर आपल्या खेळणी उद्योगाने जी करामत करून दाखवली आहे, जेयश मिळविले आहे त्याची कल्पना सुद्धा यापूर्वी कोणीकेली नव्हती. आज जेव्हा भारतीय खेळण्यांचा विषय निघतो तेव्हा सगळीकडे ‘व्होकल फॉर लोकल’ चा उद्घोष ऐकू येऊ लागतो. तुम्हांला हे ऐकून खूप बरे वाटेल की आता विदेशातून भारतात येणाऱ्या खेळण्यांची संख्या सतत कमी होत आहे. पूर्वी 3 हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याची खेळणी परदेशातून आयात होत असत, आता मात्र ही आयात 70%नी कमी झाली आहे. आणखी आनंदाची एक गोष्ट म्हणजे या काळात भारताने 2 हजार सहाशे कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या खेळण्यांची निर्यात केली आहे, पूर्वी केवळ 300-400 कोटी रुपयांची भारतीय खेळणी निर्यात होत होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व घडामोड कोरोना काळात झाली आहे. भारताच्या खेळणी निर्मिती क्षेत्राने स्वतःमध्ये परिवर्तन घडवून दाखविले आहे.भारतीय खेळणी उत्पादक आता भारतीय पुराणकथा, इतिहास आणि संस्कृती यांवर आधारित खेळणी तयार करत आहेत. देशात खेळणी निर्मात्यांचे जे समूह आहेत, लहान-लहान खेळणी उत्पादक आहेत त्यांना याचा फार फायदा होतो आहे. या लहान उद्योजकांनी तयार केलेली खेळणी जगभरात पोहचत आहेत. भारतातील खेळणी उत्पादक जगातील मोठमोठ्या खेळण्यांच्या ब्रँडसोबत एकत्र येऊन काम करत आहेत. आपले स्टार्ट अप क्षेत्र देखील खेळण्यांच्या विश्वावर संपूर्ण लक्ष देत आहेत हे पाहून मला फार आनंद होतो आहे. हे उद्योजक या क्षेत्रात अनेक मनोरंजक गोष्टी देखील करत आहेत. बेंगळूरूमध्ये शूमी टॉइज नामक स्टार्ट अप उद्योग पर्यावरण-स्नेही खेळण्यांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करत आहे. गुजरातमध्ये आर्किडझू कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फ्लॅश कार्डस तसेचकृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गोष्टींची पुस्तके तयार करत आहे. पुण्याची फनव्हेंशन लर्निंग ही कंपनी खेळणी तसेच अॅक्टिव्हीटी कोड्यांच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित या विषयांमध्ये मुलांची रुची वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. खेळण्यांच्या विश्वात असे उल्लेखनीय काम करत असणाऱ्या सर्व उत्पादकांचे, स्टार्ट अपचे मी खूप खूप अभिनंदन करतो. चला,आपण सर्वजण एकत्र येऊन भारतीय खेळण्यांना जगभरात आणखी लोकप्रियता मिळवून देऊया. मी मुलांच्या पालकांकडे देखील हा आग्रह धरू इच्छितो की तुम्ही मुलांसाठी अधिकाधिक प्रमाणात भारतीय खेळणी, कोडी आणि खेळ खरेदी करा.
मित्रांनो,
अभ्यासाचा वर्ग असो किंवा खेळाचे मैदान, आज आपले तरुण प्रत्येक क्षेत्रात आपल्या देशाची मान गौरवाने उंचावत आहेत. याच महिन्यात पी.व्हि.सिंधूने सिंगापूर खुल्या स्पर्धेत तिचे पहिले पारितोषिक मिळविले आहे. नीरज चोप्रा यानेदेखील अत्यंत उत्कृष्ट कामगिरी सुरु ठेवत जागतिक अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत देशासाठी रौप्य पदक जिंकले आहे. आयर्लंड पॅराबॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील आपल्या खेळाडूंनी 11 पदकांची कमाई करून देशाचा मान वाढविला आहे. रोम येथे झालेल्या जागतिक कॅडेट कुस्ती विजेतेपद स्पर्धेत देखील भारतीय खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.सूरज या आपल्या खेळाडूने तर ग्रीको-रोमन स्पर्धेत कमालीची कामगिरी केली. 32 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर या स्पर्धेत त्याने देशाला कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले.खेळाडूंसाठी तर हा संपूर्ण महिना अत्यंत वेगवान घडामोडींचा आहे. चेन्नईमध्ये 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे यजमानपद भूषविणे ही भारतासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. 28 जुलै रोजी या स्पर्धेला प्रारंभ झाला आहे आणि या स्पर्धेच्या उद्घाटनपर सोहोळ्यात उपस्थित राहण्याचे भाग्य मला प्राप्त झाले. त्याच दिवशी युकेमध्ये राष्ट्रकुल स्पर्धांची देखील सुरुवात झाली. उसळत्या उत्साहाने भरलेला युवा भारतीय संघ तिथे देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. मी त्या सर्व खेळाडू आणि अॅथलिट्सना देशवासियांतर्फे शुभेच्छा देतो. मला हे सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की यावर्षी 17 वर्षांखालील महिलांच्या फिफा विश्वचषक स्पर्धांचे देखील यजमानपद भारत भूषविणार आहे. देशातील सुकन्यांचा खेळांप्रती उत्साह वाढविणारी ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास होईल.
मित्रांनो,
काही दिवसांपूर्वी देशभरात 10 वी आणि 12वी इयत्तांचे निकाल देखील घोषित झाले आहेत. कठोर परिश्रम आणि एकाग्रतेसह या परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. महामारीच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांचा काळ अत्यंत आव्हानात्मक होता. अशा परिस्थितीला तोंड देत आपल्या युवा वर्गाने जे धाडस आणि संयम दाखविला तो अत्यंत कौतुकास्पद आहे. मी या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आज आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत असताना, देशाच्या प्रवासासह आपण आपल्या चर्चेची सुरुवात केली होती. पुढच्या वेळी आपण जेव्हा भेटू तेव्हा आपला आगामी 25 वर्षांचा प्रवास सुरु झालेला असेल. आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या घरांवर आपला लाडका तिरंगा फडकविण्यासाठी देखील आपल्याला एकत्र यायचे आहे. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन तुम्ही कसा साजरा केलात, कोणत्या विशेष गोष्टी केल्या या सर्वांची माहिती मला जरूर कळवा. पुढच्या वेळेस, आपण, आपल्या या अमृतपरवाच्या विविध रंगांबद्दल पुन्हा चर्चा करू. तोपर्यंत मला अनुमती द्या. खूप खूप धन्यवाद.
***
S.Pophale/AIR/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
#MannKiBaat has begun. Hear LIVE! https://t.co/lUVmrLJfxS
— PMO India (@PMOIndia) July 31, 2022
इस बार ‘मन की बात’ बहुत खास है।
— PMO India (@PMOIndia) July 31, 2022
इसका कारण है, इस बार का स्वतंत्रता दिवस, जब भारत अपनी आज़ादी के 75 वर्ष पूरे करेगा।
हम सभी बहुत अद्भुत और ऐतिहासिक पल के गवाह बनने जा रहे हैं।
ईश्वर ने ये हमें बहुत बड़ा सौभाग्य दिया है: PM during #MannKiBaat https://t.co/ByoPHD02AO
Tributes to Shaheed Udham Singh Ji and other greats who sacrificed their all for the country. #MannKiBaat pic.twitter.com/Dt0M8m77ab
— PMO India (@PMOIndia) July 31, 2022
Glad that the Azadi Ka Amrit Mahotsav is taking the form of a mass movement.
— PMO India (@PMOIndia) July 31, 2022
People from all walks of life and from every section of the society are participating in different programmes across the country. #MannKiBaat pic.twitter.com/eJWpHBXi5P
An interesting endeavour has been undertaken by @RailMinIndia named 'Azadi Ki Railgadi Aur Railway Station.'
— PMO India (@PMOIndia) July 31, 2022
The objective of this effort is to make people know the role of Indian Railways in the freedom movement. #MannKiBaat pic.twitter.com/fs3LYmbuiG
Under the Azadi Ka Amrit Mahotsav, from the 13th to the 15th of August, a special movement – 'Har Ghar Tiranga' is being organised.
— PMO India (@PMOIndia) July 31, 2022
Let us further this movement by hoisting the National Flag at our homes. #MannKiBaat pic.twitter.com/NikI0j7C6Z
There is a growing interest in Ayurveda and Indian medicine around the world.
— PMO India (@PMOIndia) July 31, 2022
AYUSH exports have witnessed a record growth. #MannKiBaat pic.twitter.com/cGOcgYO5cu
Initiatives like National Beekeeping and Honey Mission are transforming the lives of our farmers by helping increase their income.
— PMO India (@PMOIndia) July 31, 2022
Here are some success stories... #MannKiBaat pic.twitter.com/aQzSYIaLay
Fairs have been of great cultural importance in our country.
— PMO India (@PMOIndia) July 31, 2022
PM @narendramodi refers to various fairs organised across the country... #MannKiBaat pic.twitter.com/DQz7saQDK9
Fairs strengthen the spirit of 'Ek Bharat, Shreshtha Bharat'. #MannKiBaat pic.twitter.com/K9MqXeUCWL
— PMO India (@PMOIndia) July 31, 2022
India is becoming a powerhouse in toys exports. #MannKiBaat pic.twitter.com/O6wPyOmRSX
— PMO India (@PMOIndia) July 31, 2022
The month of July has been full of action, when it comes to sports.
— PMO India (@PMOIndia) July 31, 2022
Indian players have performed exceptionally well on world stage. #MannKiBaat pic.twitter.com/v3flQQHob1
Few days ago the results of class 10th and 12th have been declared across the country.
— PMO India (@PMOIndia) July 31, 2022
I congratulate all those students who have achieved success through their hard work and dedication: PM @narendramodi during #MannKiBaat pic.twitter.com/WDkNdRm7mP