Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे गांधीनगर इथे उद्‌घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे गांधीनगर इथे उद्‌घाटन


नवी दिल्ली, 4 जुलै 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर इथे डिजिटल इंडिया सप्ताह 2022 चे उद्घाटन केले. नव भारताची तंत्रज्ञान प्रेरणा  ही याची संकल्पना आहे. जीवन सुखकर करण्यासाठी आणि स्टार्ट अप्सना चालना देण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि सेवा प्रदान करणे अधिक  सुव्यवस्थित करण्यासाठी विविध डिजिटल उपक्रमांचा प्रारंभ पंतप्रधानांनी यावेळी केला. चिप्स टू स्टार्ट अप्स (C2S) कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या 30 संस्थांच्या समूहाची पंतप्रधानांनी घोषणा केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल,केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, लोकप्रतिनिधी, स्टार्ट अप्सचे प्रतिनिधी आणि या  क्षेत्रातले संबंधित यावेळी उपस्थित होते.

आजचा कार्यक्रम म्हणजे  21 व्या शतकात सातत्याने  आधुनिकीकरण होणाऱ्या भारताची झलक आहे. मानवतेच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा अचूक वापर किती क्रांतिकारक आहे याचे भारताने डिजिटल इंडिया द्वारे दर्शन घडवल्याचे पंतप्रधान म्हणाले. आठ वर्षांपूर्वी सुरु झालेले हे अभियान बदलत्या काळानुरूप स्वतः विस्तारत आहे याचा आपल्याला आनंद असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

काळाबरोबर जो देश आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत नाही त्याला मागे टाकत काळ पुढे जातो. तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये  भारत याचा बळी ठरला होता. मात्र चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये भारत जगाला मार्गदर्शन करत आहे असे आज आपण अभिमानाने सांगू शकतो असे त्यांनी सांगितले. या संदर्भातही गुजरातने आघाडी  घेतल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

8-10 वर्षांपूर्वीचा काळ आठवत जन्म दाखल्यापासून ते देयके भरणे, रेशन, प्रवेश, निकाल, बँका अशा सर्व ठिकाणी लागणाऱ्या रांगांवर भारताने ऑनलाईन होत मात केली आहे.हयातीचा दाखला,आरक्षण, बँकिंग अशा अनेक सेवा आवाक्यात ,जलद आणि परवडण्याजोग्या  झाल्या आहेत.  त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या माधमातून  थेट लाभ हस्तांतरणाद्वारे, गेल्या आठ वर्षात 23 लाख कोटी रुपयांहून जास्त रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे देशाने 2 लाख 23 हजार कोटी रुपये अयोग्य हाती जाण्यापासून वाचवले असल्याचे सांगत भ्रष्टाचाराला आळा घालण्यात डिजिटल इंडियाची भूमिका  त्यांनी अधोरेखित केली.   

ते म्हणाले, डिजिटल इंडियाने सरकारला नागरिकांच्या दारात आणि फोनच्या टप्प्यात आणले आहे. 1.25 लाखांहून अधिक सामायिक  सेवा केंद्रे आणि ग्रामीण दुकानांच्या माध्यमातून आता ग्रामीण भारतात ई-कॉमर्सला चालना मिळत आहे असे ते म्हणाले. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील मालमत्तांचे दस्तावेज  उपलब्ध करून दिले  जात आहेत.

महामारीच्या काळातील तंत्रज्ञानाच्या वापराबाबत पंतप्रधान म्हणाले की, गेल्या आठ वर्षांत डिजिटल इंडियाने देशात जे सामर्थ्य  निर्माण केले आहे त्यामुळे भारताला कोरोना जागतिक महामारीचा सामना करण्यात मोठी मदत झाली. आम्ही एका क्लिकवर देशातील कोट्यवधी  महिला, शेतकरी, मजूर यांच्या बँक खात्यात हजारो कोटी रुपये हस्तांतरित  केले आहेत. एक राष्ट्र एक शिधापत्रिकाच्या मदतीने आम्ही 80 कोटींहून अधिक देशवासियांना मोफत अन्नधान्य सुनिश्चित केले आहे. आम्ही जगातील सर्वात मोठा आणि सर्वात कार्यक्षम कोविड लसीकरण आणि कोविड पासून बचावाचा  कार्यक्रम राबवला आहे. आमच्या Cowin प्लॅटफॉर्मद्वारे सुमारे 2 अब्ज लसींच्या मात्रा  देण्यात आल्या  आहेत तसेच  प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, भारताचा फिनटेक प्रयत्न हा खऱ्या अर्थाने लोकांद्वारे, लोकांचा लोकांसाठी शोधलेला उपाय  आहे. त्यातील तंत्रज्ञान हे भारताचे स्वतःचे म्हणजेच लोकांचे आहे. देशवासीयांनी त्याला  आपल्या जीवनाचा म्हणजेच लोकांच्या जीवनाचा भाग बनवले आहे. त्याने  देशवासीयांचे व्यवहार सोपे केले आहेत  म्हणजे लोकांसाठी केले आहेत . जागतिक स्तरावर 40 टक्के डिजिटल व्यवहार भारतात होतात, असेही पंतप्रधान म्हणाले. “आमच्या डिजिटल सोल्यूशन्समध्ये मोठी व्याप्ती सुरक्षा आणि लोकशाही मूल्ये आहेत”, असे ते म्हणाले.

पुढील  4-5 वर्षात उद्योग  4.0 साठी 14-15 लाख युवकांचे कौशल्य वाढवण्यावर ( अपस्किल आणि रीस्किल)  लक्ष केंद्रित करण्याबाबत पंतप्रधानांनी माहिती दिली. ते म्हणाले, अंतराळ , मॅपिंग, ड्रोन, गेमिंग आणि अॅनिमेशन अशी अनेक क्षेत्रे आहेत जी डिजिटल तंत्रज्ञानाच्या भविष्याचा विस्तार करणार आहेत, ती अभिनव संशोधनासाठी खुली करण्यात आली आहेत. IN-SPACE सारख्या तरतुदी आणि नवीन ड्रोन धोरण या दशकात पुढील काही वर्षांत भारताच्या तंत्रज्ञान क्षमतेला नवी ऊर्जा देईल.

पंतप्रधान म्हणाले  की, पुढील तीन-चार वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे लक्ष्य  300 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक नेण्यावर  आज भारत काम करत आहे.  चिप आयातदार  भारताला चिप निर्मिती करणारा देश  बनवायचे आहे. सेमीकंडक्टरचे उत्पादन वाढवण्यासाठी भारतात वेगाने गुंतवणूक  वाढत आहे.

डिजिटल इंडिया मोहीम स्वतःमध्ये नवीन आयाम जोडत राहील आणि देशाच्या नागरिकांची सेवा करत राहील अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

नव्या उपक्रमांचा तपशीलः

‘डिजिटल इंडिया भाषिनी ’ व्हॉइस-आधारित वापरासह भारतीय भाषांमध्ये इंटरनेट आणि डिजिटल सेवा सुगम्य करेल आणि भारतीय भाषांमध्ये सामग्री तयार करण्यास मदत करेल. भारतीय भाषांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भाषा तंत्रज्ञान संशोधनामुळे  बहुभाषिक डेटासेटची निर्मिती होईल. डिजिटल इंडिया भाषिनीमुळे   भाषादान नावाच्या क्राउडसोर्सिंग उपक्रमाद्वारे हे डेटासेट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होऊ शकतील.

डिजिटल इंडिया जेनेसिस – भारताच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पातळीवरील शहरांमध्ये स्टार्ट अप उद्योग शोधणे, त्यांना पाठबळ पुरविणे, विकासासाठी मदत करणे आणि हे स्टार्ट अप्स यशस्वी करणे या उद्देशाने डिजिटल इंडिया जेनेसिस (अभिनव स्टार्ट-अप्ससाठी नव्या युगातील पाठबळ) हा राष्ट्रीय सखोल तंत्रज्ञानावर आधारित स्टार्ट अप मंच  आहे. या योजनेचा एकूण खर्च अंदाजे 750 कोटी इतका आहे.

‘इंडियास्टॅक.ग्लोबल’इंडियास्टॅक अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या आधार, यूपीआय अर्थात एकीकृत भरणा मंच, कोविन लसीकरण मंच, जीईएम अर्थात सरकारी ई-बाजार, दीक्षा मंच आणि आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य अभियान यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे जागतिक भांडार. भारताने जागतिक सार्वजनिक डिजिटल वस्तू भांडाराला दिलेली ही भेट भारताला डिजिटल परिवर्तन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेण्यास मदत करतील आणि अशा तंत्रज्ञानविषयक उपाययोजना शोधणाऱ्या इतर देशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील.

‘मायस्कीम’- हा सेवा शोधक मंच असून त्यातून सरकारी योजनांसाठी सुलभ पोहोच मिळण्याची सुविधा आहे.हे एककेंद्री तपास आणि शोधक पोर्टल असून त्यावर वापरकर्त्याला तो पात्र असणाऱ्या योजनांचा शोध घेता येईल. एनएसएसओ ही वापरकर्त्याच्या प्रमाणीकरणासाठीची सेवा असून त्यात ओळखपत्रांच्या एका संचाच्या वापराने अनेक ऑनलाईन सुविधा किंवा सेवा वापरता येऊ शकतील.

सीटूएस कार्यक्रम पदवी, मास्टर्स आणि संशोधन पातळीवर सेमीकंडक्टर चीपच्या संरचनेच्या क्षेत्रात विशेष मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने आखला आहे आणि हा कार्यक्रम देशातील सेमीकंडक्टर चीपच्या संरचनेमध्ये सहभागी असणाऱ्या स्टार्ट अप उद्योगांच्या वाढीसाठी उत्प्रेरक म्हणून काम करतो.यातून संघटनात्मक पातळीवर मार्गदर्शन मिळते आणि संस्थांना संरचनेसाठी अत्यंत आधुनिक सुविधा उपलब्ध होतात. सेमीकंडक्टर्ससाठी  सशक्त संरचना परिसंस्था उभारण्यासाठी भारताने सुरु केलेल्या सेमीकंडक्टर अभियानाचा हा भाग आहे.

डिजिटल भारत सप्ताह 2022 मधील प्रत्यक्ष कार्यक्रम 4 ते 6 जुलै या कालावधीत गांधीनगर येथे होत  आहेत. या कार्यक्रमात डिजिटल भारताचा वर्धापनदिन साजरा होत  असून आधार, युपीआय,कोविन,डिजीलॉकर इत्यादी सरकारी डिजिटल मंचानी नागरिकांचे रे जीवन कशा प्रकारे अधिक सुलभ केले आहे याचे प्रदर्शन होईल. या कार्यक्रमातून जागतिक पातळीवरील प्रेक्षकांना भारताच्या तंत्रज्ञानविषयक तज्ञतेचे दर्शन होईल, मोठ्या प्रमाणातील भागीदारांशी सहकार्याच्या तसेच व्यापारविषयक संधींचा शोध घेता येईल. या कार्यक्रमात स्टार्ट अप्स आणि सरकार, उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तींचा सहभाग असेल. या कालावधीत डिजिटल मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे, यात तसेच भारतीय युनिकॉर्न उद्योग तसेच स्टार्ट अप उद्योगांनी विकसित केलेल्या आणि आपले जगणे सुलभ करणाऱ्या काही डिजिटल सोयी-सुविधांचे दर्शन घडविणारे सुमारे 200 स्टॉल आहेत. डिजिटल भारत सप्ताहात 7 ते 9 जुलै या कालावधीत आभासी पद्धतीने इंडिया स्टॅक नौलेज एक्स्चेंज  कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

S.Kulkarni/Nilima/Sushama/Sanjana/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com