Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 आणि 18 जून रोजी गुजरातला भेट देणार


नवी दिल्ली, 16 जून 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 आणि 18 जून रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 18 जूनला सकाळी सव्वा नऊ च्या सुमाराला पंतप्रधान, पावागडच्या टेकडीवरील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री कलिका माता मंदिराचे लोकार्पण करतीत आणि देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर साडेअकरा वाजता ते ‘विरासत वन’ ला भेट देतील. त्यानंतर, साधारण साडेबाराच्या सुमाराला ते वडोदरा इथे गुजरात गौरव दिन या कार्यक्रमात सहभागी होतील. इथे त्यांच्या हस्ते, 21000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल, तसेच काही प्रकल्पांचे उद्घाटनही ते करतील.

गुजरात गौरव अभियान

वडोदरा इथे होणाऱ्या गुजरात गौरव दिन ह्या कार्यक्रमात, केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी सहभागी होतील. तसेच, 16000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल, तसेच काही पूर्ण झालेले प्रकल्प ते राष्ट्राला समर्पित करतील. यात, समर्पित मालवाहू मार्गिकेवरील 357 किमी लांबीचा नवा पालनपूर-मदर रेल्वेमार्ग, अहमदाबाद-बोतड या 166 किमी मार्गावरील गेज रूपांतरण, पालनपूर-मीठा विभागाचे पूर्ण झालेले विद्युतीकरण अशा सुविधांचे ते लोकार्पण करतील.

पंतप्रधान सूरत, उधना, सोमनाथ आणि साबरमती या स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी देखील करतील. त्याशिवाय, रेल्वे विभागातील इतर काही उपक्रमांची कोनशिला त्यांच्या हस्ते ठेवली जाईल.

ह्या प्रकल्पांमुळे, लॉजिस्टीक खर्चात बचत होईल आणि उद्योग तसेच स्थानिक कृषिक्षेत्राला चालना मिळेल. त्यातून, या प्रदेशातल्या दळणवळण व्यवस्थेत सुधारणा होईल आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांमध्ये वाढ होईल.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधल्या गेलेल्या 1.38 लाख घरांचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्यात, 1,530 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ग्रामीण भागातील आणि 1800 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शहरी भागातील घरांचा समावेश आहे. त्याशिवाय, 310 कोटी रुपयांच्या 3000 घरांच्या बांधणीसाठी चा खतमूहुरत कार्यक्रम देखील यावेळी होईल.

याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते, खेडा, आणंद, वडोदरा, छोटा उदयपूर आणि पंचमहाल इथल्या विविध विकास प्रकल्पांचा कोनशिला समारंभ आणि लोकार्पण होईल.  680 कोटी रुपयांच्या ह्या प्रकल्पांमुळे इथल्या लोकांचे जीवनमान सुखकर होणार आहे.

गुजरातच्या दाभोई तालुक्यात कुंधेला गावात पंतप्रधानांच्या हस्ते गुजरात केंद्रीय विद्यापीठाची पायाभरणी देखील होईल. वडोदरा शहरापासून 20 किमी दूर असलेले हे विद्यापीठ 425 कोटी रुपये खर्चून बांधले जाणार आहे. यात 2500 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील.

माता आणि बाल आरोग्य सुधारण्यासाठी पंतप्रधान, ‘मुख्यमंत्री मातृशक्ती योजना’ सुरु करतील. या योजनेसाठी 800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत गरोदर आणि स्तनदा मतांना अंगणवाडी केंद्रातून दर महिन्याला मोफत 2 किलो चणे, 1 किलो तूर डाळ आणि 1 किलो खाद्य तेल देण्यात येईल. पंतप्रधानांच्या हस्ते ‘पोषण सुधा योजनेला’ 120 कोटी रुपये देण्यात येतील. या योजनेचा विस्तार आता राज्यातील सर्व आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत करण्यात आला आहे. आदिवासी जिल्ह्यांतील गरोदर आणि स्तनदा मातांना लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या पुरविण्याच्या तसेच पोषणा विषयी प्रशिक्षण देण्याच्या प्रयोगाला मिळालेल्या यशानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

काली मातेच्या मंदिरात पंतप्रधान

पावागड डोंगरावर असलेल्या काली मातेच्या मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला आहे, त्याचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल. हे या भागातील सर्व जुन्या मंदिरांपैकी एक आहे आणि येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येत असतात. या मंदिराचा जीर्णोद्धार दोन टप्प्यांत करण्यात आला. या वर्षी एप्रिलमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील कामाचे उद्घाटन करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यातील जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते 2017 मध्ये करण्यात आले होते, त्याचेच आता उद्‌घाटन होत आहे. यात मंदिराच्या पायाचा विस्तार आणि तीन स्तरीय परिसर, तसेच पथदिवे, सीसीटीव्ही अशा सुविधांचा समावेश आहे.   

 

 

 

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com