Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (89 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद


माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज पुन्हा एकदा ‘मन की बात’ च्या माध्यमातून आपणा सर्वांची, माझ्या कोट्यवधी कुटुंबियांची भेट घेण्याची संधी मला लाभली आहे. ‘मन की बात’ मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या देशाने एक अशी कामगिरी केली आहे, जी आपल्या सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. भारताच्या सामर्थ्याप्रती नवा आत्मविश्वास निर्माण करणारी अशी ही कामगिरी आहे. क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडियाच्या कोणत्याही फलंदाजाने शतक फटकावल्याचे ऐकून तुम्हाला आनंद होत असेलच. यावेळी मात्र भारताने एका वेगळ्याच मैदानात शतक झळकावले आहे आणि ते खूपच विशेष असे आहे. या महिन्याच्या 5 तारखेला देशातील युनिकॉर्नची संख्या 100 वर पोहोचली आहे. एक युनिकॉर्न, म्हणजे किमान साडे सात हजार कोटींचा स्टार्टअप, हे तुम्हाला माहिती असेलच. या युनिकॉर्न्सचे एकूण मूल्य 330 अब्ज डॉलर्सपेक्षा म्हणजे 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. आणखी एका गोष्टीचे तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती म्हणजे आपल्या एकूण युनिकॉर्नपैकी 44 युनिकॉर्न गेल्या वर्षीच तयार झाले होते. इतकेच नाही तर या वर्षातील 3-4 महिन्यांत आणखी 14 नवीन युनिकॉर्न तयार झाले. याचा अर्थ असा की जागतिक साथरोगाच्या या काळातही आपले स्टार्ट-अप, संपत्ती आणि मूल्य निर्मिती करत राहिले आहेत. भारतीय युनिकॉर्नचा सरासरी वार्षिक वाढीचा दर अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा जास्त आहे. येत्या काही वर्षांत या संख्येत मोठी वाढ होईल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपले युनिकॉर्न वैविध्यपूर्ण आहेत.  ई-कॉमर्स, फिन-टेक, एड-टेक, बायो-टेक अशा अनेक क्षेत्रांत ते काम करत आहेत. मला अधिक महत्त्वाची वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे स्टार्ट-अप्सचे जग नव भारताच्या भावना प्रतिबिंबित करणारे आहे. आज, भारताची स्टार्ट-अप यंत्रणा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही, तर लहान नगरांमधून आणि शहरांमधूनही उद्योजक उदयाला येत आहेत. भारतात ज्याच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना आहे, तो संपत्ती निर्माण करू शकतो, हे यावरून दिसून येते.

 

मित्रहो, देशाच्या या यशासाठी देशाची युवाशक्ती, देशातील प्रतिभा आणि देशाचे सरकार असे सर्व मिळून एकत्रित प्रयत्न करत आहेत, यात प्रत्येकाचे योगदान आहे. पण या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे, स्टार्ट-अप जगतात योग्य मार्गदर्शन खूपच महत्वाचे आहे. एक चांगला मार्गदर्शक स्टार्टअपला यशाच्या नव्या शिखरांवर नेऊ शकतो. योग्य निर्णय घेण्यासाठी तो संस्थापकांना योग्य मार्गदर्शन करू शकतो. भारतात असे अनेक मार्गदर्शक आहेत, ज्यांनी वाढत्या स्टार्ट-अप्ससाठी स्वतःला समर्पित केले आहे आणि याचा मला अभिमान वाटतो.

   

    श्रीधर वेंबुजी यांना नुकताच पद्म पुरस्कार मिळाला आहे. ते स्वत: एक यशस्वी उद्योजक आहेत, पण आता त्यांनी आणखी काही उद्योजकांना घडविण्याचे कामही हाती घेतले आहे. श्रीधरजींनी आपल्या कामाची सुरुवात ग्रामीण भागातून केली आहे. गावातच राहून ग्रामीण तरुणांना या क्षेत्रात काहीतरी करण्यासाठी ते प्रोत्साहन देत आहेत. आपल्याकडे मदन पडाकी यांच्यासारखेही लोक आहेत, ज्यांनी ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी 2014 साली वन-ब्रिज नावाचा मंच तयार केला. आजघडीला दक्षिण आणि पूर्व भारतातील 75 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये वन-ब्रिज उपलब्ध आहे. या मंचाशी निगडित असलेले 9000 पेक्षा जास्त ग्रामीण उद्योजक ग्रामीण भागातील ग्राहकांना आपली सेवा देत आहेत. मीरा शेनॉय हे सुद्धा असेच आणखी एक उदाहरण आहे. त्या ग्रामीण, आदिवासी आणि दिव्यांगयुवकांसाठी मार्केट लिंक्ड स्किल्स ट्रेनिंगच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. मी इथे अगदी मोजकीच नावे घेतली आहेत, पण आज आपल्याकडे गुरूंची कमतरता नाही. देशात स्टार्ट-अपसाठी संपूर्ण आधारभूत यंत्रणा तयार केली जाते आहे, ही आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. आगामी काळात स्टार्ट-अप जगतात आपल्यालाभारताच्या प्रगतीची नवीझेप पाहायला मिळेल, अशी खात्री मला वाटते.

 

मित्रहो, काही दिवसांपूर्वी मला एक मनोरंजक आणि आकर्षक गोष्ट मिळाली, ज्यामध्ये देशवासीयांची सर्जनशीलता आणि कलात्मक प्रतिभा एकवटलेली आहे. तमिळनाडू येथील तंजावर मधल्या एका स्वयंसहायता गटाने ती भेट मला पाठवली आहे. या भेटीत भारतीयत्वाचा सुगंध आहे आणि मातृशक्तीचा आशीर्वाद आहे, माझ्याबद्दल त्यांच्या मनात असलेली स्नेहभावना आहे. ही भेट म्हणजे तंजावरची एक खास बाहुली आहे, जिला भौगोलिक मानांकन अर्थात GI टॅग देखील मिळाला आहे. स्थानिक संस्कृतीशी नाळ जपणारी ही भेट मला पाठवल्याबद्दल मी तंजावरच्या स्वयं-सहायता गटाचे विशेष आभार मानतो. खरे तर मित्रहो, तंजावरची ही बाहुली सुंदर आहे आणि आपल्या या सौंदर्यासह ती स्त्री सक्षमीकरणाची नवी गाथाही लिहित आहे. तंजावरमध्ये महिला स्वयं-सहायता गटांची दुकाने आणि केंद्रेही सुरू होत आहेत. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांचे जीवनमान बदलले आहे. अशा केंद्रांच्या आणि स्टोअर्सच्या मदतीने महिला आता थेट ग्राहकांना आपली उत्पादने विकू शकतील.

 

या उपक्रमाला ‘थरगाईगल कैविनाई पोरुत्तकल वीरप्पानई अंगडी’ असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे 22 स्वयं-सहायता गट या उपक्रमाशी संलग्न आहेत. महिला स्वयं-सहायता गट तसेच महिला बचत गटांची ही दुकाने तंजावरमध्ये अतिशय मोक्याच्या जागी उघडली आहेत, हे जाणून तुम्हाला निश्चितच आनंद होईल. या दुकानांची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारीही महिला घेत आहेत. महिलांचे हे बचत गट तंजावर बाहुली आणि कांस्याचे दिवे अशा जीआय उत्पादनांशिवाय खेळणी, चटई आणि कृत्रिम दागिने सुद्धा तयार करतात. अशा दुकानांमुळे जीआय उत्पादनांच्या तसेच हस्तकला उत्पादनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. या मोहिमेमुळे केवळ कारागिरांनाच चालना मिळाली नाही, तर महिलांचे उत्पन्न वाढून त्यांचे सक्षमीकरणही होत आहे. ‘मन की बात’च्या श्रोत्यांनाही माझी एक विनंती आहे. तुमच्या परिसरात कोणते महिला बचत गट कार्यरत आहेत ते शोधा. त्यांच्या उत्पादनांची माहिती देखील गोळा करा आणि शक्यतोवर या उत्पादनांचा वापर करा. असे केल्यानेतुम्ही केवळ बचत गटाचे उत्पन्न वाढवण्यास हातभार लावणार नाही तर त्यायोगे’आत्मनिर्भर भारत मोहिमेला’ चालनाही मिळेल.

 

मित्रहो, आपल्या देशात अनेक भाषा, लिपी आणि बोलींचा समृद्ध खजिना आहे. वेगवेगळ्या प्रदेशातील वैविध्यपूर्ण पेहराव, खाद्यपदार्थ आणि संस्कृती ही आपली ओळख आहे. ही विविधता, हे वैविध्य, एक राष्ट्र म्हणून आपल्याला अधिक समर्थ करते आणि आपल्यातील एकजूट कायम राखते. याच्याशी संबंधित एक अतिशय प्रेरक उदाहरण सांगता येईल कल्पनाचे. तिच्याबद्दल मी तुम्हां सर्वांना सांगू इच्छितो. तिचे नाव कल्पना आहे, पण तिने घेतलेले प्रयास हे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या वास्तविक भावनेने भारलेले आहेत. तर आपली ही कल्पना कर्नाटक राज्यातून नुकतीच 10 व्या इयत्तेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. पण तिच्या या यशाबद्दल विशेष सांगायचे म्हणजे कल्पनाला काही काळापूर्वी कन्नड भाषा येत नव्हती. अवघ्या तीन महिन्यांत ती कन्नड भाषा तर शिकलीच, पण तिने चक्क 92 वा क्रमांकही पटकावला. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरे आहे. तिच्याबद्दल अशा आणखीही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला चकित करतील आणि प्रेरणाही देतील. कल्पना ही मूळची उत्तराखंडमधील जोशी मठची रहिवासी आहे. तिला याआधी टीबीचा आजार होता आणि तिसऱ्या इयत्तेत असताना तिची दृष्टीही गेली होती, पण म्हणतात ना, ‘इच्छा तिथे मार्ग’. नंतरच्या काळात कल्पना म्हैसूरच्या रहिवासी असणाऱ्या प्रोफेसर तारमूर्ती यांच्या संपर्कात आली. त्यांनी तिला केवळ प्रोत्साहनच दिले नाही तर सर्व प्रकारे मदतही केली. आज तिने निव्वळ मेहनतीच्या बळावर आपल्या सर्वांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. कल्पनाच्या या धाडसाबद्दल मी तिचे अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे देशाच्या भाषिक वैविध्याला बळ देण्याचे काम करत आहेत. पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथील श्रीपती तुडू जी हे असेच एक सहकारी आहेत. तुडू जी हे पुरुलियाच्या सिद्धो-कानो-बिरसा विद्यापीठात संथाली भाषेचे प्राध्यापक आहेत. संथाली समाजासाठी त्यांनी स्वतःच्या ‘ओल चिकी’ लिपीमध्ये देशाच्या संविधानाची प्रत तयार केली आहे. श्रीपती तुडूजी म्हणतात की आपली राज्यघटना आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपली राज्यघटना माहिती असलीच पाहिजे. याच विचारातून त्यांनी संथाली समाजासाठी स्वतःच्या लिपीत संविधानाची प्रत तयार करून ती भेट दिली. श्रीपतीजींच्या या विचारसरणीचे आणि त्यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो.’एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेचे हे यथार्थ उदाहरण आहे. या भावनेला पुढे नेणाऱ्या अशा अनेक प्रयत्नांची माहिती तुम्हाला ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या संकेतस्थळावर मिळेल. तिथे तुम्हाला खाद्य, कला, संस्कृती, पर्यटन अशा अनेक विषयांवरील उपक्रमांची माहिती मिळेल. तुम्हीही या उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकता, यामुळे तुम्हाला आपल्या देशाबद्दल माहिती मिळेल आणि आपल्या देशातील विविधतेचीही जाणीव होईल.

 

    माझ्या प्रिय देशबांधवांनो, सध्या आपल्या देशात उत्तराखंडमध्ये ‘चार-धाम’ची पवित्र यात्रा सुरू आहे. ‘चार-धाम’ आणि विशेषतः केदारनाथमध्ये दररोज हजारो भाविक दाखल होत आहेत. ‘चार-धाम यात्रे’च्या आपल्या सुखद अनुभवांबद्दल ते सांगत आहेत. पण केदारनाथमध्ये काही यात्रेकरूंनी केलेल्या अस्वच्छतेमुळे भाविक खूप दुःखी आहेत, हे सुद्धा मी पाहिले आहे. सोशल मीडियावरसुद्धा अनेकांनी आपली मते मांडली आहेत. आपण पवित्र अशा यात्रेला जातो आणि तिथे घाणीचे, कचऱ्याचे ढीग असतात, हे योग्य नाही. पण मित्रहो, या तक्रारी येत असताना इतर अनेक ठिकाणी चांगले चित्रही पाहायला मिळते आहे. जिथे श्रद्धा आहे, तिथे सृजन आणि सकारात्मकता सुद्धा आहे. बाबा केदारजींच्या धामी पूजा-अर्चा करण्याबरोबरच स्वच्छतेची साधना करणारेही अनेक भक्त आहेत. कुणी मुक्कामाच्या ठिकाणी साफसफाई करत आहेत, तर कुणी प्रवाशांच्या मार्गावरील कचरा उचलत आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या चमूसोबत अनेक संस्था आणि स्वयंसेवी संघटनाही तिथे काम करत आहेत. मित्रहो,आपल्याकडे तीर्थयात्रा महत्वाची आहे, त्याचप्रमाणे तीर्थ सेवेचेही महत्त्व सांगितले आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तीर्थ सेवेशिवाय तीर्थयात्राही अपूर्ण आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांनी स्वत:ला स्वच्छता आणि सेवेच्या कामी वाहून घेतलेले आहे. रूद्र प्रयाग येथे राहणारे श्री. मनोज बैजवाल हे असेच एक प्रेरक व्यक्तिमत्व आहे. गेली 25 वर्षे त्यांनी पर्यावरणाची देखभाल करण्याचा विडा उचलला आहे. स्वच्छता मोहीम राबवण्याबरोबरच पवित्र स्थळे प्लास्टिकमुक्त करण्याच्या कामीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. गुप्तकाशीमध्ये राहणारे सुरेंद्र बगवाडी जी यांनीही स्वच्छता हा आपला जीवन मंत्र असल्याचे मानले आहे. ते गुप्तकाशीमध्ये नियमितपणे स्वच्छता कार्यक्रम राबवतात, आणि माझ्या कानावर आले आहे की त्यांनी आपल्या या मोहिमेलाही ‘मन की बात’ असे नाव दिले आहे. अशाच प्रकारे देवर गावातील चंपादेवी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या गावातील महिलांना कचरा व्यवस्थापनाचे धडे देत आहेत. चंपाजींनीही शेकडो झाडे लावली आहेत आणि त्यांनी आपल्या मेहनतीमधून एक हिरवेगार वनक्षेत्रनिर्माण केले आहे. मित्रहो, अशा लोकांच्या प्रयत्नांमुळेच, देवभूमीचीआणि तीर्थक्षेत्रांची ती दिव्य अनुभूती टिकून राहिली आहे, जी अनुभवण्यासाठी आपण तिथे जातो. हे दिव्यत्व आणि अध्यात्मिकता जपण्याची जबाबदारी आपली आहे. आता आपल्या देशात ‘चारधाम यात्रेबरोबरच आगामी काळात ‘अमरनाथ यात्रा’, ‘पंढरपूर यात्रा’, ‘जगन्नाथ यात्रा’ अशा अनेक यात्रा होणार आहेत. श्रावण महिन्यात तर प्रत्येक गावात हमखास जत्रा असतेच.

 

मित्रांनो आपण कुठेही गेलो तरी या तीर्थक्षेत्रांचा सन्मान  राखला  पाहिजे. तेथील  शुचिता, स्वच्छता, पवित्र वातावरण हे आपण कधीही विसरता काम नये, ते जपले पाहिजे आणि म्हणूनच आपण स्वच्छतेचा संकल्प लक्षात ठेवणे आवश्यक  आहे.

 

आता काही दिवसांनी येणारा 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिवस’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाबाबत आपण आपल्या आजूबाजूला सकारात्मक चळवळी  उभारल्या  पाहिजेत आणि हे काम  निरंतर चालणारे असले पाहिजे.  तुम्ही देखील  ह्या वेळी सर्वांना आपल्या समवेत  घेऊन स्वच्छता व वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करा. स्वतः झाड लावा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.
 

माझ्या प्रिय देशबांधवांनो, पुढील महिन्यात 21 जून रोजी आपण 8वा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करणार आहोत. यावेळी ‘योग दिवसाची  संकल्पना  आहे – “मानवतेसाठी योग”. मी तुम्हा सर्वांना ‘योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करतो. हो! पण  कोरोनाविषयी  काळजी  घ्या.   तशी तर  आता संपूर्ण जगात परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली दिसत आहे, लसीकरणाची व्याप्ती अधिकाधिक वाढत असल्याने आता लोक पूर्वीपेक्षा जास्त बाहेर पडत आहेत, त्यामुळे जगभरात योग दिवसासाठी बरीच तयारी  केली जात असल्याचे पाहायला मिळते आहे.

 

कोरोना महामारीने आपल्या सर्वांना याची जाणीव करून दिली आहे की आपल्या जीवनात आरोग्याचे किती जास्त महत्व आहे आणि त्यात योगाचा किती महत्वाचा वाटा आहे. योगामुळे शारीरिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक स्वास्थ्य निरामय राखण्यासाठी  कशी  चालना मिळते, हे लोकांना कळते  आहे. जगातील नामांकित व्यावसायिक व्यक्तींपासून ते चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींपर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते सामान्य माणसांपर्यंत, सर्वजण  योग हा  आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवत आहेत. मला खात्री आहे की जगभरात योगाची लोकप्रियता वाढत असलेली बघताना तुम्हा सर्वांनाच आनंद होत असेल.

 

मित्रांनो, यावेळी  देश-विदेशात ‘योग दिना’निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या काही अतिशय नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची मला माहिती मिळाली आहे. यापैकी एक म्हणजे ‘संरक्षक वलय’ guardian ring  हा एक अतिशय अनोखा कार्यक्रम असेल. यामध्ये सूर्याचे भ्रमण साजरे केले जाईल, म्हणजेच सूर्य पृथ्वीच्या विविध भागातून जसे जसे भ्रमण करत जाईल, तिथे तिथे आपण योगाद्वारे त्याचे स्वागत करू.

 

विविध देशांतील भारतीय संस्था तेथील स्थानिक वेळेनुसार सूर्योदयाच्या वेळी योगाचे कार्यक्रम आयोजित करतील. एका पाठोपाठ एक असे विविध देशातून कार्यक्रम सुरू होतील. पूर्वेकडून पश्चिमेकडे असा हा निरंतर प्रवास चालेल, मग तसेच कार्यक्रम देखील पुढे जात राहतील. या कार्यक्रमांचे प्रक्षेपण देखील एकामागोमाग एक जोडले जाईल, म्हणजेच हा एक प्रकारचा ‘योग  प्रक्षेपण साखळी कार्यक्रमच’   असेल. तुम्ही पण हा कार्यक्रम अवश्य पहा.

 

मित्रांनो, यावेळी आपल्या देशाचा ‘अमृत महोत्सव’ लक्षात घेऊन देशातील 75 प्रमुख ठिकाणी ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चे आयोजन केले जाणार आहे. या प्रसंगी, विविध संस्था आणि अनेक देशवासीय आपापल्या स्तरावर, आपल्या विभागातील विशेष स्थानांवर काही ना काही नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्याची तयारी करत आहेत.

 

मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो की, यावेळी योग दिन साजरा करण्यासाठी तुमच्या शहरातील, गावातील किंवा विभागातील असे कोणतेही ठिकाण निवडा, जे सर्वात विशेष असेल. हे ठिकाण एखादे प्राचीन मंदिर किंवा पर्यटन केंद्र असू शकते किंवा ते एखाद्या प्रसिद्ध नदीचा, सरोवराचा किंवा तळ्याचा किनारा देखील असू शकेल. यामुळे योगाबरोबरच आपल्या परिसराची ओळखही वाढेल आणि पर्यटनालाही चालना मिळेल.

 

सध्या ‘योग दिना’ संदर्भात 100 दिवसांची गणना (countdown) सुरू आहे, किंवा असे म्हणा ना की वैयक्तिक आणि सामाजिक प्रयत्नांतून योगसंबंधित कार्यक्रम तीन महिन्यांपूर्वीपासूनच सुरू झाले आहेत. जसे दिल्लीत 100 व्या आणि 75 व्या दिवशी काउंटडाउन कार्यक्रम झाले आहेत.  तसेच, शिवसागर, आसाम येथे 50 व्या आणि हैदराबादमध्ये 25 व्या दिवशी काउंटडाउन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तुम्हीही ‘योग दिना’ची तयारी आत्तापासूनच सुरू करावी असे मला वाटते. अधिकाधिक लोकांना भेटा, सर्वांना ‘योग दिना’च्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करा, प्रेरणा द्या. मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण ‘योग दिना’मध्ये उत्साहाने सहभागी व्हाल, तसेच तुमच्या दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब कराल.

मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी जपानला गेलो होतो. माझ्या अनेक कार्यक्रमांमुळे  मला काही महान व्यक्तिमत्त्वांना भेटण्याची संधी मिळाली. त्याच्याविषयी ‘मन की बात’मध्ये मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. आहेत तर ते जपानी  लोक, पण त्यांना भारताविषयी कमालीची ओढ आणि प्रेम आहे. यापैकी एक म्हणजे हिरोशी कोइके जी, जे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक आहेत. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की त्यांनीच महाभारत प्रोजेक्ट दिग्दर्शित केलेला आहे. ह्या प्रकल्पाची सुरुवात कंबोडियामध्ये करण्यात आली आणि गेल्या 9 वर्षांपासून तो अविरत  सुरू आहे. हिरोशी कोइके अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने हे सर्व करतात. ते  दरवर्षी आशिया खंडातील एका देशात जातात आणि तेथील स्थानिक कलाकार आणि संगीतकारांच्या साथीने महाभारतातील काही भाग तयार करतात. या प्रकल्पाद्वारे त्यांनी भारत, कंबोडिया आणि इंडोनेशियासह नऊ देशांमध्ये कार्यक्रमांची निर्मिती देखील केली आहे आणि रंगमंचावर कार्यक्रम देखील सादर केले आहेत.

हिरोशी कोइके जी शास्त्रीय आणि पारंपारिक आशियाई कला सादरीकरण करणाऱ्या आणि वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असलेल्या कलाकारांना एकत्र आणतात . त्यामुळे त्याच्या कामात विविध रंग छटा पाहायला मिळतात. इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि जपानमधील कलाकार जावा नृत्य, बालीनीज नृत्य, थाई नृत्याच्या माध्यमातून  ते अधिक आकर्षक बनवतात. विशेष म्हणजे यातील  प्रत्येक कलाकार आपापल्या मातृभाषेत बोलतो आणि नृत्य दिग्दर्शन देखील अतिशय सुंदरतेने  हे वैविध्य दाखवते आणि संगीतातील विविधता तर  ही निर्मिती अधिकच जिवंत करते. आपल्या समाजात विविधता आणि सह-अस्तित्वाचे किती महत्त्व आहे, शांतीचे वास्तविक स्वरूप नेमके कसे असावे, हे सर्वाना दाखवावे  हा  त्यांचा उद्देश आहे.

 

 याशिवाय, मी जपानमध्ये ज्या दोन इतर लोकांना भेटलो ते  म्हणजे आत्सुशी मात्सुओ-जी आणि केंजी योशी-जी. हे दोघेही टीईएम प्रॉडक्शन कंपनीशी संबंधित आहेत. ही कंपनी रामायणाच्या 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या जपानी ऍनिमेशन फिल्मशी संबंधित आहे.  हा प्रकल्प जपानमधील अतिशय प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक युगो साकोशी ह्यांच्याशी संबंधित होता.

सुमारे 40 वर्षांपूर्वी 1983 मध्ये त्यांना पहिल्यांदा रामायणाची माहिती मिळाली. ‘रामायण’ त्यांच्या हृदयाला भिडले, त्यानंतर त्यांनी त्यावर अधिक बारकाईने संशोधन सुरू केले. इतकेच नाही तर त्यांनी रामायणाच्या जपानी भाषेतील 10 वेगवेगळ्या  आवृत्त्या वाचल्या आणि एवढ्यावरच ते  थांबले  नाहीत  तर त्यांना रामायणाचे ऍनिमेशन देखील करायचे होते. यामध्ये भारतीय ऍनिमेटर्सनीही त्यांना खूप मदत केली. त्यांना चित्रपटात दाखवलेल्या भारतीय चालीरीती आणि परंपरांबद्दल मार्गदर्शन केले. त्यांना भारतातील लोक धोतर कसे नेसतात, साडी कशी नेसतात, केशरचना कशी करतात हे सांगण्यात आले. कुटुंबात मुले  सर्वांचा,  एकमेकांचा आदर कसा करतात, आशीर्वादाची परंपरा काय असते?  सकाळी उठणे, आपल्या घरातील ज्येष्ठांना नमस्कार करणे, त्यांचे आशीर्वाद घेणे  या सर्व गोष्टी.  आता 30 वर्षांनंतर हा ऍनिमेशन  चित्रपट 4K मध्ये रुपांतरीत  होत आहे.  हा प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 

आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर, जपानमध्ये बसलेले लोक, ज्यांना ना आपली भाषा येते , ना आपल्या परंपरांविषयी जास्त माहिती आहे, त्यांचे आपल्या संस्कृतीबद्दलचे समर्पण, श्रद्धा, आदर फारच प्रशंसनीय आहे.  कोणत्या भारतीयाला ह्याचा अभिमान वाटणार नाही?

माझ्या प्रिय देशबांधवांनो, ‘स्व’ च्या पुढे जाऊन समाजाची सेवा करण्याचा मंत्र, ‘समाजासाठी स्व’ हा मंत्र आपल्या संस्कारांचा भाग आहे. आपल्या देशातील असंख्य लोकांनी या मंत्राला आपले जीवन ध्येय बनवले आहे.  आंध्र प्रदेशातील मरकापुरम येथे राहणारे आपले मित्र राम भूपाल रेड्डी यांच्याविषयी मला माहिती मिळाली. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की रामभूपाल रेड्डी जी यांनी निवृत्तीनंतर मिळालेली आपली सर्व कमाई मुलींच्या शिक्षणासाठी दान केली आहे. त्यांनी ‘सुकन्या समृद्धी योजने’ अंतर्गत सुमारे 100 मुलींसाठी खाती उघडली आणि त्यात 25 लाखांहून अधिक रक्कम जमा केली.

 

अशा सेवेचे आणखी एक उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील आग्र्याच्या  कचोरा गावातील. या गावात अनेक वर्षांपासून गोड्या पाण्याची टंचाई होती. दरम्यान, गावातील शेतकरी कुंवर सिंग यांना गावापासून 6-7 किमी अंतरावरील  त्यांच्या शेतात गोडे  पाणी लागले. त्यांच्यासाठी ही खूपच  आनंदाची गोष्ट  होती. या पाण्याने इतर सर्व गावकऱ्यांची सेवा का करू नये, असा विचार त्यांनी केला. पण, शेतापासून  गावापर्यंत पाणी नेण्यासाठी 30-32 लाख रुपयांची आवश्यकता  होती. काही काळानंतर कुंवर सिंह यांचे धाकटे बंधू  श्याम सिंह सैन्यातून निवृत्त होऊन गावी आले, तेव्हा त्यांना ही गोष्ट कळली. निवृत्तीनंतर त्यांना मिळालेले सर्व पैसे त्यांनी या कामासाठी दिले आणि शेतापासून गावापर्यंत पाईपलाईन टाकून गावकऱ्यांना गोड्या पाण्याचा पुरवठा केला.

 ही उदाहरणे म्हणजे समर्पण भाव असेल, कर्तव्याविषयी गांभीर्य असेल, तर एकटा माणूसही संपूर्ण समाजाचे भविष्य कसे बदलू शकतो, ह्या विषयीची मोठी प्रेरणाच आहेत. कर्तव्याच्या मार्गावर चालूनच आपण समाजाला सक्षम बनवू शकतो, देशाला सक्षम बनवू शकतो. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात हाच  आपला संकल्प असावा आणि हीच आपली साधना असावी आणि त्याचा  एकच मार्ग आहे – कर्तव्य, कर्तव्य आणि कर्तव्य.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज ‘मन की बात’ मध्ये आपण समाजाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. तुम्ही सगळे  मला वेगवेगळ्या विषयांशी संबंधित महत्त्वाच्या सूचना पाठवता आणि त्या आधारेच आपली  चर्चा पुढे सरकते. ‘मन की बात’ च्या पुढील आवृत्तीसाठी देखील तुमच्या सूचना पाठवायला विसरू नका. सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासंबंधी जे कार्यक्रम सुरू असतील , ज्या कार्यक्रमात तुम्ही भाग घेत असाल, त्या विषयी  मला अवश्य कळवा. नमो अँप  आणि MyGov वर येणाऱ्या  तुमच्या सूचनांची मी प्रतीक्षा करतो.

पुढच्या वेळी पुन्हा एकदा भेटू या,  देशवासियांशी संबंधित अशाच विषयांवर पुन्हा बोलू या. तुम्ही, स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व प्राण्यांची देखील काळजी घ्या. या उन्हाळ्याच्या दिवसांत पशु-पक्ष्यांना अन्न-पाणी पुरवण्याचे आपले माणुसकीचे कर्तव्यदेखील आपल्याला निभवायचे आहे हे लक्षात ठेवा, तोपर्यंत तुमचे खूप खूप आभार.

***

AIR /S.Tupe/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com