Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (85वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद


माझ्या प्रिय देशवासियानो, नमस्कार,
 
आज‘मन की बात’ च्या आणखी एका भागाद्वारे आपण जोडले जात आहोत. 2022 या वर्षामधली ही पहिली ‘मन की बात’ आहे. आपला देश आणि देशवासीयांच्या सकारात्मक प्रेरणा आणि सामुहिक प्रयत्नांशी संबंधित चर्चा आज आपण पुन्हा एकदा पुढे नेणार आहोत.आज आपले पूज्य बापू, महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी ही आहे. 30 जानेवारी हा दिवस आपल्याला बापूंच्या शिकवणीचे स्मरण देतो.काही दिवसांपूर्वीच आपण प्रजासत्ताक दिनही साजरा केला.दिल्लीमध्ये राजपथावर आपल्या देशाचे शौर्य आणि सामर्थ्य यांची झलक दर्शवणारे चित्ररथ पाहून सर्वांच्या मनात उत्साह आणि अभिमान दाटून आला. एक बदल आपणपाहिला असेल आता प्रजासत्ताक दिन सोहळा 23 जानेवारी म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती दिनी सुरु होईल आणि 30 जानेवारी पर्यंत म्हणजे गांधीजींच्या पुण्यतिथीपर्यंत सुरु राहील. इंडिया गेट वर नेताजींचा डिजिटल पुतळा स्थापन करण्यात आला आहे. याचे देशाने ज्या प्रकारे स्वागत केले आहे,देशाच्या कानाकोपऱ्यातून आनंदाची जी लकेर उमटली आहे,प्रत्येक देशवासियाने ज्या प्रकारे भावना व्यक्त केल्या आहेत त्या अविस्मरणीय आहेत.
 
मित्रहो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात, या प्रयत्नांच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय प्रतीकांची देश पुनर्स्थापना करत आहे. इंडिया गेट जवळची अमर जवान ज्योत आणि जवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावरची प्रज्वलित ज्योत एकत्र करण्यात आल्याचे आपण पाहिले.या भावूक क्षणी अनेक देशवासीय आणि शहीदांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले.राष्ट्रीय युद्ध स्मारकावर, देशाच्या स्वातंत्र्यानंतर शहीद झालेल्या शूरवीरांची नावे कोरलेली आहेत.लष्कराच्या माजी सैनिकांनी मला पत्र लिहून कळवले आहे की शहिदांच्या स्मारकासमोर प्रज्वलित होत असलेली ‘अमर जवान ज्योत’ शहिदांच्या अमरत्वाचे प्रतिक आहे. खरोखरच अमर जवान ज्योतीप्रमाणेच आपले शहीद,त्यांची प्रेरणा आणि त्यांचे योगदानही अमर आहे. जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा राष्ट्रीय युध्द स्मारकाला आवर्जून भेट द्या असे माझे आपणा सर्वाना सांगणे आहे.आपले कुटुंबीय आणि मुलानाही घेऊन जा.इथे आपल्याला आगळीच उर्जा आणि प्रेरणा यांची प्रचीती येईल.
 
मित्रहो, अमृत महोत्सवाच्या या आयोजनांच्या दरम्यान देशात अनेक महत्वाचे राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान करण्यात आले. एक आहे तो म्हणजे, राष्ट्रीय बाल पुरस्कार.लहान वयात धाडसी आणि प्रेरणादायी काम करणारी मुलांना हा पुरस्कार दिला जातो. आपणा सर्वांनी, या पुरस्काराबाबत आपल्या घरात आवर्जून माहिती दिली पाहिजे. यातून आपल्या मुलानाही प्रेरणा मिळेल आणि देशाचे नाव उज्वल करण्याचा उत्साह त्यांच्या निर्माण होईल.देशात नुकतीच पद्म पुरस्कारांचीही घोषणा झाली. पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या नामावलीत अशी अनेक नावे आहेत ज्यांच्या बद्दल लोकांना फारशी माहिती नाही. आपल्या देशाचे हे प्रसिद्धीपासून दूर असलेले हे नायक आहेत, ज्यांनी सर्वसामान्य परिस्थितीमध्ये असामान्य कार्य केले आहे. उत्तराखंडमधल्या बसंती देवी जी यांना पद्मश्री ने सन्मानित करण्यात आले आहे. बसंती देवी यांनी आपल्या आयष्यात सदैव संघर्ष केला. त्यांच्या पतीचे अकाली निधन झाल्यानंतर त्या एका आश्रमात राहू लागल्या. इथे राहून त्यांनी नदी वाचवण्यासाठी संघर्ष केला आणि पर्यावरणासाठी बहुमोल योगदान दिले.महिला सबलीकरणासाठीही त्यांनी मोठे कार्य केले आहे. अशाच प्रकारे मणिपूरच्या 77 वर्षाच्या लौरेम्बम बीनो देवी दशकांपासून मणिपूरच्या लिबा टेक्सटाईल आर्टचे संरक्षण करत आहेत.त्यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या अर्जुन सिंह यांना बैगा आदिवासी नृत्य कलेला ओळख प्राप्त करून दिल्याबद्दल पद्म सन्मान मिळाला आहे. पद्म सन्मान प्राप्त करणारी आणखी एक व्यक्ती आहे श्रीमान अमाई महालिंगा नाईक. हे कर्नाटकमध्ये राहणारे एक शेतकरी आहेत. त्यांनाकाही लोक टनेलमॅनही म्हणतात.शेतीमध्ये त्यांनीअसे कल्पक प्रयोग केले आहेत, जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. त्यांच्या प्रयत्नाचा छोट्या शेतकऱ्यांना मोठाफायदा होत आहे. असे आणखीही अनसंग हिरो आहेत,ज्यांचा देशाने त्यांच्या योगदानासाठी गौरव केला आहे. त्यांच्या बद्दल जाणून घेण्याचा आपणही नक्कीच प्रयत्न करा. यातून जीवनात आपल्याला बरच शिकायला मिळेल.
 
माझ्या प्रिय देशवासीयानो, अमृत महोत्सवाबाबत आपण सर्वजण मला अनेक पत्र आणि मेसेज पाठवत आहात अनेक सूचनाही करत आहात. याच शृंखलेत मला काही अविस्मरणीय अनुभव आले. मला एक कोटीहून अधिक मुलांनी आपली ‘मन की बात’ पोस्ट कार्ड द्वारे लिहून पाठवली. ही एक कोटी पोस्ट कार्ड देशाच्या वेगवेगळ्या भागातून आली आहेत, परदेशातूनही आली आहेत. वेळ काढून यातली बरीचशी पोस्ट कार्ड वाचण्याचा मी प्रयत्न केला. देशाच्या भविष्याप्रती आपल्या नव्या पिढीचे विचार किती व्यापक आहेत याची प्रचीती या पोस्ट कार्ड मधून येते. ‘मन की बात’ च्या श्रोत्यांसाठी काही पोस्ट कार्ड मी सामायिक करू इच्छितो. आसाममधल्या गुवाहाटी इथून रिद्धिमा स्वर्गियारीचे हे पोस्ट कार्ड आहे.रिद्धिमा सातवीची विद्यार्थिनी आहे, तिने लिहिले आहे स्वातंत्र्याच्या 100व्यावर्षात एका असा भारत ती पाहू इच्छिते जो जगातला सर्वात स्वच्छ देश असेल, जो दहशतवादापासून संपूर्णपणे मुक्त असेल, शंभर टक्के साक्षर देशात त्याचा समावेश असेल, ज्यामध्ये शून्य अपघात असतील आणि शाश्वत तंत्रज्ञानातून अन्नसुरक्षेत सक्षम असेल. रिद्धिमा,आपल्या देशाच्या कन्या जो विचार करतात,जी स्वप्ने देशासाठी पाहतात ती तर पूर्ण होतातच.जेव्हा सर्वांचे प्रयत्न एकत्रित होतील, आपली युवा पिढी हे लक्ष्य समोर ठेवून काम करेल तेव्हा आपण जसा भारत घडवू इच्छित आहात तसा नक्कीच घडेल.उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथल्या नव्या वर्मा कडूनही एक पोस्ट कार्ड आले आहे.नव्याने लिहिले आहे,
 
2047 मध्ये अशा भारताचे स्वप्न आहे, जिथे सर्वाना सन्मानाचे जीवन मिळावे, जिथे शेतकरी समृध्द असावा आणि भ्रष्टाचाराला थारा नसावा. नव्या, देशासाठीचे आपले स्वप्न अतिशय प्रशंसनीय आहे. या दिशेने देश झपाट्याने वाटचालही करत आहे.भ्रष्टाचारमुक्त भारताचा उल्लेख आपण केला आहे.भ्रष्टाचार एखाद्या वाळवी प्रमाणे देश पोखरून काढतो. त्यापासून मुक्त होण्यासाठी 2047 ची वाटकशाला पहायची ? हे काम आपण सर्व देशवासियांनी, आजच्या युवा पिढीने मिळून करायचे आहे, लवकरात लवकर करायचे आहे आणि त्यासाठी सर्वात आवश्यक आहे ते म्हणजे आपण आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्यायचे. जिथे कर्तव्य बजावण्याची जाणीव असते. कर्तव्याला सर्वात पहिले प्राधान्य असते तिथे भ्रष्टाचार फिरकतही नाही.
 
मित्रहो, आणखी एक पोस्ट कार्ड माझ्या समोर आहे, चेन्नई मधून मोहंमद इब्राहीम याचे. 2047 मध्ये भारत संरक्षण क्षेत्रात एक सामर्थ्यवान शक्ती म्हणून पाहण्याची त्याची इच्छा आहे. चंद्रावर भारताचा आपला संशोधन तळ असावा,मंगळावर मानवी वस्ती वसवण्याचे काम भारताने सुरु करावे. त्याच बरोबर आपली वसुंधरा प्रदूषण मुक्त करण्यात भारताची मोठी भूमिका इब्राहीम पाहत आहे. इब्राहीम, आपल्यासारखे युवा ज्या देशाकडे आहेत त्या देशासाठी काहीच अशक्य नाही.
 
मित्रहो, माझ्यासमोर आणखी एक पत्र आहे. मध्यप्रदेश मधल्या रायसेनच्या सरस्वती विद्या मंदिरात 10वीत शिकणारी विद्यार्थिनी भावना हिचे. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ज्या प्रकारे आपण पोस्ट कार्ड तिरंग्यानेसजवले आहे ते मला खूपच आवडले. क्रांतिकारक शिरीष कुमार बद्दल भावनाने लिहिले आहे.
 
मित्रहो, गोव्यामधून मला लॉरेन्शियो परेराचे पोस्टकार्ड ही मिळाले आहे.ही बारावीची विद्यार्थिनी आहे. या पत्राचा विषय आहे स्वातंत्र्याचे अनसंग हिरो.याचा आशय मी आपल्याला सांगतो. यात लिहिले आहे, भिकाजी कामा, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या शूर महिलांपैकी एक होत्या.मुलींच्या सबलीकरणासाठी त्यांनी देश-विदेशात अनेक अभियाने हाती घेतली. अनेक प्रदर्शने भरवली.भिकाजी कामा या निश्चितच स्वातंत्र्यलढ्यातल्या सर्वात धाडसी महिलांपैकी एक होत्या.1907 मध्ये त्यांनी जर्मनी मध्ये तिरंगा फडकवला होता. हा तिरंगा डिझाईन करण्यामध्ये ज्या व्यक्तीने त्यांना साथ दिली ती व्यक्ती होती श्री श्यामजी कृष्ण वर्मा.श्री श्यामजी कृष्ण वर्मा जी यांचे निधन 1930 मध्ये जिनिव्हा इथे झाले. त्यांची अंतिम इच्छा होती की, भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर आपल्या अस्थी भारतात आणल्या जाव्यात.1947 मध्ये स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांच्या अस्थी भारतात परत आणायला हव्या होत्या. मात्र हे घडले नाही. कदाचित परमात्म्याची इच्छा असावी की हे काम मी करावे आणि हे काम करण्याचे भाग्य मला लाभले. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो, तेव्हा 2003 मध्ये त्यांच्या अस्थी भारतात आणण्यात आल्या. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या स्मृती प्रीत्यर्थत्यांच्या जन्म स्थळी कच्छ च्या मांडवी इथे एक स्मारक उभारण्यात आले आहे.
 
मित्रहो, भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह फक्त आपल्याच देशात आहे असे नव्हे. भारताचा मित्र असलेल्या क्रोएशिया या देशातूनही मला 75 पोस्ट कार्ड आली आहेत. क्रोएशियाच्या जाग्रेब इथे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टस् अ‍ॅन्ड डीझाईनच्या विद्यार्थ्यांनी ही 75कार्डे भारताच्या जनतेसाठी पाठवली आहेत आणि अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपणा सर्व देशवासीयांच्या वतीने मी क्रोएशिया आणि तिथल्या जनतेला धन्यवाद देतो.
 
माझ्या प्रिय देशवासीयानो, भारत शिक्षण आणि ज्ञानाची तपो भूमी राहिला आहे. आपण शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरतेच मर्यादित ठेवले नाही. तर जीवनाचा समग्र अनुभव म्हणून त्याकडे पाहिले.आपल्या देशाच्या थोर व्यक्तीमत्वांचे शिक्षणाशीदृढ नाते राहिले आहे. पंडित मदन मोहन मालवीय जी यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केलीतर महात्मा गांधी यांनी गुजरात विद्यापीठ निर्मितीत महत्वाची भूमिका बजावली. गुजरात मधल्या आणंद इथे एक खुपच उत्तम स्थान आहे-वल्लभ विद्यानगर.सरदार पटेल यांच्या आग्रहावरून त्यांचे दोन सहकारी, भाई काका आणि भिखा भाई यांनी तिथल्या युवकांसाठी शिक्षण केंद्राची स्थापना केली. अशाच प्रकारे पश्चिम बंगाल मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी शांती निकेतनची स्थापना केली. महाराजा गायकवाड हे ही शिक्षणाच्या प्रमुख समर्थकांपैकी एक होते. त्यांनी अनेक शिक्षण संस्था उभारल्या आणि डॉ आंबेडकर आणि श्री ऑरोबिन्दो यांच्यासह अनेकांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले.अशाच महान व्यक्तींमध्ये एक नाव आहे ते म्हणजे राजा महेंद्र प्रताप सिंह यांचे.राजा महेंद्र प्रताप सिंह जीयांनी एका टेक्निकल शाळा स्थापन करण्यासाठी आपले घरच सुपूर्द केले होते. अलीगड आणि मथुरा इथे शिक्षण केंद्राच्या निर्मितीसाठी त्यांनी मोठी आर्थिक मदत केली. काही दिवसांपूर्वी अलीगडमध्ये त्यांच्या नावाच्या एका विद्यापीठाचे भूमिपूजन करण्याचे भाग्य मला लाभले. शिक्षणाचा प्रकाश जनतेपर्यंत पोहोचवण्याची ती भावना भारतात आजही कायम आहे याचा मला आनंद आहे. या भावनेमधली सर्वात सुंदर बाब काय आहे हे आपण जाणता का ? ही बाब म्हणजे शिक्षणाबाबतची ही जागरूकता समाजाच्या प्रत्येक स्तरावर दिसून येत आहे. तमिळनाडूतल्या त्रीप्पूर जिल्ह्यतल्या उदुमलपेट ब्लॉक इथे राहणाऱ्या तायम्मल जी यांचे उदाहरण तर अतिशय प्रेरणादायी आहे.तायम्मल जी यांच्याकडे स्वतःची जमीन नाही.अनेक वर्षापासून त्यांचे कुटुंब नारळ पाण्याची विक्री करून आपला चरितार्थ चालवत आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी आपल्या मुला-मुलीना शिक्षण देण्यात तायम्मल जी यांनी कोणतीही उणीव ठेवली नाही. त्यांची मुले चिन्नवीरमपट्टी पंचायत युनियन मिडल स्कूल मध्ये शिकत होती.
 
एक दिवस शाळेतल्या पालकांच्या बैठकीत असा विषय निघाला की वर्गांची आणि शाळेची स्थिती सुधारली पाहिजे. शाळेतील पायाभूत सुविधा व्यवस्थित केल्या पाहिजेत. तायम्मलजी देखील त्या बैठकीत उपस्थित होते.त्यांनी सगळे ऐकले.या बैठकीतील चर्चा शेवटी या कामांना पैसे कमी पडतात ह्या विषयावर आली. याच्यानंतर तायम्मलजींनी जे केले त्याची कोणी कल्पना देखील करू शकले नसते! नारळपाणी विकून थोडेफार पैसे कमावणाऱ्या तायम्मलजींनी एक लाख रुपये शाळेसाठी दान केले! खरंच असं करण्यासाठी खूप मोठं मन पाहिजे सेवाभाव पाहिजे. तायम्मलजींचे म्हणणे आहे की आत्ताच्या शाळेत आठव्या वर्गापर्यंत शिक्षण होते.आता जेव्हा शाळेतील पायाभूत सुविधा सुधारतील तेव्हा शाळेत उच्च माध्यमिक वर्गापर्यंत शिक्षण सुरू होईल.आमच्या देशातल्या शिक्षण विषयक ह्याच भावनेचे मी वर्णन करत होतो.मला IIT BHUच्या माजी विद्यार्थ्याने केलेल्या अशाच प्रकारच्या दानाविषयी कळले आहे.BHU चे माजी विद्यार्थी असलेल्या जय चौधरीजींनी IIT BHU फाउंडेशनला एक मिलियन डॉलर म्हणजे जवळजवळ साडेसात करोड रुपये देणगीदाखल दिले आहेत!
 
मित्रांनो, आमच्या देशात वेगवेगळ्या क्षेत्रांशी जोडले गेलेले खूप लोक आहेत, जे दुसऱ्यांना मदत करून समाजाच्या विषयीचे आपले कर्तव्य बजावत आहेत.मला खूप आनंद आहे की अशा प्रकारचे प्रयत्न उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात, खास करून आमच्या वेगवेगळ्या आयटीजमध्ये नेहमी बघायला मिळत आहेत. केंद्रीय विश्वविद्यालयांमध्ये देखील अशा प्रकारच्या प्रेरक उदाहरणांची कमतरता नाही.या प्रकारचे प्रयत्न आणखी वाढवण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये देशभरात विद्यांजली अभियानाची सुरुवात झाली आहे. याचा उद्देश वेगवेगळ्या संघटनांच्याकडून,CSR आणि खाजगी क्षेत्रातील योगदानातून देशभरातील शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा आणणे हा आहे.विद्यांजली अभियान सामुदायिक भागीदारी आणि जबाबदारीची भावना वाढवत आहे. आपल्या शाळा महाविद्यालयाशी नेहमी संपर्कात राहणे, आपल्या क्षमतेनुसार काही न काही योगदान देत राहणे ही एक अशी गोष्ट आहे जिचे समाधान आणि आनंद हा त्याचा अनुभव घेतल्यावरच कळतो!
 
माझ्या प्रिय देशवासीयांनो, निसर्गाविषयी प्रेम आणि प्रत्येक जीवाविषयी करुणा ही आमची संस्कृती देखील आहे आणि आमचा सहज स्वभाव देखील आहे. नुकतीच जेव्हा मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील एक वाघीण हे जग सोडून गेली तेव्हा आमच्या याच संस्कारांची झलक दिसली. या वाघिणीला लोक कॉलरवाली वाघीण असे म्हणत. वनविभागाने तिला T-१५ असे नाव दिले होते. या वाघिणीच्या मृत्यूने लोकांना इतके भावूक केले की जसे काही त्यांचे आपले कोणीतरी नातेवाईक हे जग सोडून गेले आहे.लोकांनी वाघिणीचे रीतसर अंतिम संस्कार केले, संपूर्ण सन्मानाने आणि प्रेमाने वाघिणीला निरोप दिला.आपण पण ही छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर नक्कीच पाहिली असतील.आम्हां भारतीयांच्या मनात असलेल्या निसर्ग आणि जीवसृष्टी विषयीच्या प्रेमाचे संपूर्ण जगात खूप कौतुक झाले. कॉलरवाल्या वाघिणीने आपल्या आयुष्यभरात 29 बछड्यांना जन्म दिला आणि पंचवीस बछड्यांचे संगोपन करून मोठे केले. आम्ही T -१५ चे जगणे देखील साजरे केले आणि जेव्हा तिने हे जग सोडले तेव्हा अत्यंत भावनापूर्ण निरोप देखील दिला.हीच तर भारतीय लोकांची विशेषता आहे! आम्ही प्रत्येक चैतन्यपूर्ण जीवाशी प्रेमाने संबंध जोडतो.
 
असेच एक दृश्य आम्हांला या वेळी गणतंत्र दिवसाच्या परेडमध्ये देखील बघायला मिळाले. या परेडच्या वेळी राष्ट्रपतींच्या अंगरक्षकदलातील विराट घोड्याने आपल्या शेवटच्या परेडमध्ये भाग घेतला होता. विराट घोडा 2003 मध्ये राष्ट्रपती भवनात आला होता आणि प्रत्येक वर्षी गणतंत्र दिवसात कमांडंट चार्जर म्हणून आघाडीवर राहत असे. जेव्हा कोणा विदेशी राष्ट्राध्यक्षांचे राष्ट्रपतिभवनात स्वागत होत असे त्या वेळीदेखील तो आपली ही महत्त्वाची भूमिका बजावत असे. यावर्षी सैन्य दिवसाच्यावेळी विराट घोड्याला सेनाप्रमुखांच्या कडून COAS प्रशस्ती पत्र दिले गेले होते. विराटच्या विराट सेवा पाहून त्याला त्याच्या सेवानिवृत्तीच्या नंतर तितक्याच विराट रीतीने निरोप दिला गेला.
 
 
 
माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा निष्ठापूर्वक प्रयत्न होतात, उदात्त वृत्तीने काम होते तेव्हा त्याचे चांगले परिणाम देखील दिसून येतात. याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे, ते आसामचे. आसामचे नाव घेतल्यावर तिथले चहाचे मळे आणि अनेक नॅशनल पार्कसचा विचार जसा मनात येतो तसेच एकशिंगी गेंड्याचे चित्र पण आपल्या मनात उमटते.आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एकशिंगी गेंडा नेहमीच आसामी संस्कृतीचा भाग राहिला आहे. भारतरत्न भूपेन हजारिकांचे हे गाणे प्रत्येक मनात नेहमीच गुंजत असते.
 
मित्रांनो याचा अर्थ खालीलप्रमाणे आहे आणि तो या भावनेशी खूप सुसंगत आहे.
 
या गाण्यात म्हटले गेले आहे की काझीरंगाचा हिरवागार परिसर, हत्ती आणि वाघांचे घर, एक शिंगी गेंड्यांची भूमी बघा आणि पक्ष्यांचा मधुर आवाज ऐका.आसामच्या हातमागावर विणल्या जाणाऱ्या विश्व प्रसिद्ध मुंगा आणि एरी पोशाखावर ही गेंड्यांची आकृती असते . पण आसामच्या संस्कृतीत ज्या गेंड्यांचे इतके महत्त्व आहे त्या गेंड्यानादेखील संकटांचा सामना करायला लागत होता. वर्ष 2013 मध्ये 37 आणि 2014 मध्ये 32 गेंड्यांना तस्करांनी मारून टाकले होते.या आव्हानाचा सामना करण्यासाठी, आसाम सरकारने विशेष प्रयत्न करून, गेंड्यांच्या शिकारी विरुद्ध एक खूप मोठी मोहीम चालवली होती. गेल्या 22 सप्टेंबरला विश्व गेंडा दिनाच्यावेळी, तस्करांकडून जप्त केली गेलेली 2400 हून जास्त शिंगे जाळून टाकली गेली होती. हा तस्करांसाठी सख्त इशारा होता. अशाच प्रयत्नांचा परिणाम म्हणून आता आसाममधील गेंड्यांच्या शिकारीची संख्या खूप कमी झाली आहे. 2013 मध्ये ३७ गेंडे मारले गेले होते, २०१४ मध्ये ३२ गेंडे तस्करांनी मारून टाकले होते. पण आता 2020 मध्ये दोन आणि 2021 मध्ये फक्त एका गेंड्याची शिकार केली गेल्याची बाब समोर आली आहे. आसामच्या लोकांनी गेंड्याना वाचवण्यासाठी केलेल्या संकल्पाची मी प्रशंसा करतो.
 
भारतीय संस्कृतीमधील विविध रंगांमुळे आणि अध्यात्मिक शक्तीमुळे, भारतीय संस्कृतीने नेहमीच जगभरच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. जर मी आपल्याला सांगितले की भारतीय संस्कृती अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, पश्चिम युरोप आणि जपान मध्ये खूप लोकप्रिय आहे तर ही गोष्ट आपल्याला खूप सामान्य/ साधारण वाटेल, त्यात तुम्हाला काहीच विशेष आश्चर्य वाटणार नाही. पण जर का मी असे सांगितले की लॅटिन अमेरिका आणि साऊथ अमेरिकेतदेखील भारतीय संस्कृतीचे खूप आकर्षण आहे तर आपण नक्कीच विचार कराल. मेक्सिकोमध्ये खादीला प्रोत्साहन देण्याची गोष्ट असेल किंवा ब्राझीलमध्ये भारतीय परंपरांना लोकप्रिय बनवण्याचा प्रयत्न असेल, ‘मन की बात’ मध्ये आपण या विषयांवर याआधीही चर्चा केलेली आहे.
 
आज मी तुम्हाला अर्जेंटिनामध्ये भारतीय संस्कृतीचा जो झेंडा फडकत आहे त्याच्याविषयी सांगणार आहे. अर्जेंटिना मध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचे खूप आकर्षण आहे. 2018 मध्ये मी जेव्हा अर्जेंटिना दौरा केला होता तर तेव्हा त्यात, योग कार्यक्रमात – ‘योग फॉर पीस’ मध्ये भाग घेतला होता. अर्जेंटिनात एक संस्था आहे ‘हस्तिनापुर फाउंडेशन’. तुम्हाला आश्चर्य वाटेल ना ऐकून? कुठे अर्जेंटिना आणि तिथे देखील हस्तिनापुर फाउंडेशन!!! हे फाउंडेशन, अर्जेंटिनातील भारतीय वैदिक परंपरांच्या प्रचारासाठी कार्यरत आहे. याची स्थापना चाळीस वर्षांपूर्वी मॅडम प्रोफेसर ऎडा एलब्रेक्ट ह्यांनी केली होती. आता प्रोफेसर ऎडा एलब्रेक्ट नव्वद वर्षांच्या होणार आहेत. भारतासोबत त्यांचा ऋणानुबंध कसा जोडला गेला हे पण खूप मनोरंजक आहे! जेव्हा त्या अठरा वर्षांच्या होत्या तेव्हा पहिल्यांदा भारतीय संस्कृतीच्या शक्तीचा परिचय त्यांना झाला. त्यांनी भारतात बराच काळ व्यतीत केला. भगवद्गीता आणि उपनिषदांविषयी सखोल माहिती घेतली. आज हस्तिनापुर फाऊंडेशनचे चाळीस हजाराहुन अधिक सदस्य आहेत आणि अर्जेंटिना आणि इतर लॅटिन अमेरिकी देशात याच्या जवळपास तीस शाखा आहेत. हस्तिनापुर फाउंडेशनने स्पॅनिश भाषेत शंभरहून अधिक वैदिक आणि दार्शनिक ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. त्यांचा आश्रम देखील खूप मनमोहक आहे. आश्रमात 12 मंदिरांचे निर्माण केले गेले आहे, ज्याच्यात अनेक देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. या सगळ्यांच्या मध्यभागी एक मंदिर असेही आहे की जे अद्वैतवादी ध्यानासाठी बनवले गेले आहे.
 
मित्रांनो, अनेक उदाहरणे आपल्याला असे सांगतात की आपली संस्कृती केवळ आपल्यासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी एक अनमोल वारसा आहे. जगभरातील लोक आपल्या संस्कृतीची माहिती करून घेऊ इच्छितात, समजून घेऊ इच्छितात आणि तसे जगू इच्छितात. आपण देखील संपूर्ण उत्तरदायित्व घेऊन आपल्या या सांस्कृतिक वारश्याला, आपल्या आयुष्याचा भाग बनवून, ती सर्व लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी आता तुम्हाला आणि खास करून आपल्या युवकांना एक प्रश्न विचारू इच्छितो. मला सांगा, तुम्ही एका वेळी किती पुश-अप्स करू शकता? मी जे आपल्याला सांगणार आहे ते ऐकून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल! मणिपूरचा 24 वर्षांचा युवक थौनाओजम निरंजॉय सिंह ह्याने एका मिनिटात 109 पुश-अप्स करून एक नवा विक्रम स्थापित केला आहे. निरंजॉय सिंह ह्याच्यासाठी विक्रम स्थापित करणे ही काही नवी गोष्ट नाही! याच्याआधी देखील त्याने एका मिनिटात एका हाताने सर्वात जास्त नकल पुश-अप्स करण्याचा विक्रम केला होता. मला पूर्ण विश्वास आहे की निरंजॉय सिंहमुळे आपल्याला देखील प्रेरणा मिळेल आणि शारीरिक तंदुरुस्ती हा आपण आपल्या आयुष्याचा एक भाग बनवाल.
 
मित्रांनो, आज मी आपल्याला लडाखची अशी एक माहिती सांगू इच्छितो ज्याविषयी कळल्यावर आपल्याला खूप अभिमान वाटेल. लडाखला लवकरच एक शानदार ओपन सिंथेटिक ट्रॅक आणि ऍस्ट्रो टर्फ फुटबॉल स्टेडियमची भेट मिळणार आहे. हे स्टेडियम दहा हजार फूट पेक्षाही जास्त उंचीवर बनवले जात आहे आणि ते लवकरच तयार होईल. लडाखमधील हे सर्वात मोठे स्टेडियम असेल जिथे तीस हजार प्रेक्षक एका वेळी बसू शकतील. लडाखच्या या आधुनिक फुटबॉल स्टेडियम मध्ये आठ लेन्सचा सिंथेटीक ट्रॅक देखील असेल. याच्या शिवाय इथे 1000 जण राहू शकतील अशी वसतीगृहाची सुविधादेखील असेल. आपल्याला हे ऐकून खूप आनंद वाटेल की या स्टेडियमला फुटबॉलची सर्वात मोठी संस्था असलेल्या फिफा ने देखील प्रमाणित केले आहे. जेव्हा कधी खेळासाठी अशी भव्य सुविधा तयार होते तेव्हा देशभरातील युवकांना एक चांगली संधी मिळते. त्यासोबतच जिथे अशी व्यवस्था तयार होते आहे तिथे देखील देशभरातील लोकांचे येणे जाणे होते, पर्यटनाला चालना मिळते. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. ह्या स्टेडियमच्या फायदा लडाखमधील आमच्या अनेक युवकांना देखील होणार आहे.
 
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ मध्ये यावेळी देखील आपण अनेक विषयांवर चर्चा केली. एक विषय अजून असा आहे की जो सध्या सर्वांच्याच मनात आहे आणि तो आहे कोरोना .कोरोनाच्या नव्या लाटेशी भारत यशस्वीपणे लढत आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे की आतापर्यंत जवळजवळ साडे चार करोड मुलांनी कोरोना लसीचा डोस घेतलेला आहे. याचा अर्थ असा झाला की पंधरा ते अठरा वर्षांच्या वयोमर्यादेतील जवळजवळ साठ टक्के युवकांनी तीन ते चार आठवड्यांतच लस घेतलेली आहे. यामुळे आमच्या युवकांचे केवळ संरक्षणच होणार नाही आहे तर त्यांना त्यांचे शिक्षण निर्वेधपणे सुरू ठेवण्यात देखील मदत होणार आहे. अजून एक चांगली गोष्ट ही पण आहे की वीस दिवसांच्या आतच एक करोड लोकांनी precaution dose देखील घेतलेला आहे. आपल्या देशातील लसीवर देशवासीयांच्या असलेला विश्वास ही आपली खूप मोठी शक्ती आहे. आता तर कोरोना संक्रमणाच्या केसेस देखील कमी व्हायला सुरुवात झाली आहे. हा खूपच सकारात्मक संकेत आहे. लोक सुरक्षित राहोत, देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग कायम राहो हीच प्रत्येक देशवासीयाची इच्छा आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की ‘मन की बात’ मध्ये काही गोष्टी सांगितल्याशिवाय मी राहूच शकत नाही! जसे की ‘स्वच्छता अभियान’ आपण विसरून चालणार नाही, एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या ‘प्लास्टिकच्या विरुद्धच्या अभियानाला’ आणखी गती आणण्याची आवश्यकता आहे, ‘वोकल फोर लोकल’चा मंत्र ही आमची जबाबदारी आहे आणि आम्हाला ‘आत्मनिर्भर भारत ‘अभियानासाठी देखील मनापासून कार्यरत राहायचे आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनीच देश प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचणार आहे. याच कामनेसह मी आपला निरोप घेतो. खूप खूप धन्यवाद!
***
AIR/JPS/DY
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com