माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा मन की बात साठी एकमेकांसमोर आलो आहोत. अवघ्या दोन दिवसानंतर डिसेंबर महिना सुरू होणार आहे आणि डिसेंबर महिना आला की मनाला असे वाटू लागते की चला, हे वर्ष संपले. हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि या महिन्यात आपण नव्या वर्षासाठीचे संकल्प विचारात घेऊ लागतो. या महिन्यात आपला देश नौदल दिवस आणि सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करतो. येत्या 16 डिसेंबर रोजी आपला देश 1971च्या युद्धाचे स्वर्ण जयंती वर्ष साजरे करत आहे, हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. या सर्व दिनविशेषांनिमित्त मी देशाच्या संरक्षण दलांचे स्मरण करतो, आपल्या वीरांचे स्मरण करतो. आणि विशेष म्हणजे अशा वीरांना जन्म देणाऱ्या वीर मातांचे स्मरण करतो. नेहमीप्रमाणेच या वेळीसुद्धा मला नमो ॲप आणि माय गव्ह वर आपणा सर्वांकडून अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. आपण सर्वांनीच मला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानले आहे आणि आपल्या आयुष्यातली सुख-दुःखे माझ्यासोबत वाटून घेतली आहेत. या सर्वांमध्ये अनेक युवा आहेत, विद्यार्थी- विद्यार्थिनी आहेत. मन की बात चे आपले हे कुटुंब सातत्याने वाढते आहे, मनांशीही जोडले जाते आहे, उद्दिष्टांनीही जोडले जाते आहे आणि परिणामी दृढ होणाऱ्या आपल्या या नात्यामुळे आपल्या अंतर्मनात सातत्याने सकारात्मकतेचा एक प्रवाह खेळता राहतो आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सीतापूरच्या ओजस्वींनी मला लिहिले आहे की, अमृत महोत्सवाशी संबंधित चर्चा त्यांना खूप आवडते. ते आपल्या मित्रांसोबत ‘मन की बात’ ऐकतात आणि स्वातंत्र्यलढ्याबद्दल खूप काही जाणून घेण्याचा, शिकण्याचा सतत प्रयत्न करत करत असतात. मित्रांनो, अमृत महोत्सव हा शिकण्यासोबतच देशासाठी काहीतरी करण्याचीही प्रेरणा देतो आणि आता तर देशभरातील सामान्य जनता असो वा सरकारे असो, पंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र अमृत महोत्सवाचाच गाजावाजा सुरू आहे आणि या उत्सवाशी जोडलेले कार्यक्रम सतत सुरू आहेत. असाच एक रंजक कार्यक्रम नुकताच दिल्लीत पार पडला. “आजादी की कहानी-बच्चों की जुबानी” असे नाव असणाऱ्या या कार्यक्रमात मुलांनी स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित कथा अगदी मनापासून सादर केल्या. विशेष म्हणजे यात भारताबरोबरच नेपाळ, मॉरिशस, टांझानिया, न्यूझीलंड आणि फिजी येथील विद्यार्थीही सहभागी झाले. ओएनजीसी ही आपल्या देशातील महारत्न कंपनी. ही ओएनजीसी कंपनीसुद्धा अभिनव पद्धतीनेअ मृत महोत्सव साजरा करत आहे. अलिकडे ओएनजीसी आपल्या विद्यार्थ्यांसाठी तेल क्षेत्रात अभ्यास दौरे आयोजित करत आहे. या दौऱ्यांमध्ये तरुणांना ओएनजीसी तेल क्षेत्रातील कामांबद्दल माहिती दिली जात आहे. आमच्या नवोदित अभियंत्यांना राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांमध्ये उत्साहाने आणि उत्कटतेने यात योगदान देता यावे, हा यामागचा उद्देश आहे.
मित्रहो, आदिवासी समाजाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात घेत देशाने आदिवासी गौरव सप्ताहसुद्धा साजरा केला आहे. देशाच्या विविध भागांत यासंबंधीचे कार्यक्रम सुद्धा झाले. अंदमान आणि निकोबार बेटांवर, जारवा आणि ओंगे अशा आदिवासी समुदायांच्या लोकांनी त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. हिमाचल प्रदेशातील उना येथील लघुलेखक राम कुमार जोशी यांनी सुद्धा एक अद्भुत काम केले आहे. त्यांनी टपाल तिकिटांवरच, म्हणजे इतक्या लहान टपाल तिकिटांवरच नेताजी सुभाषचंद्र बोस आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची अनोखी रेखाचित्रे रेखाटली आहेत. हिंदीत लिहिलेल्या ‘राम’ या शब्दावर त्यांनी रेखाटने केली असून त्यात दोन्ही महापुरुषांचे चरित्रही थोडक्यात नोंदवले आहे. मध्य प्रदेशातील कटनी येथील काही सहकाऱ्यांनीसुद्धा एका अविस्मरणीय दास्तानगोई कार्यक्रमाची माहिती दिली आहे. यामध्ये राणी दुर्गावतीच्या दुर्दम्य साहसाच्या आणि त्यागाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. असाच एक कार्यक्रम काशीमध्ये सुद्धा आयोजित करण्यात आला. गोस्वामी तुलसीदास, संत कबीर, संत रविदास, भारतेंदू हरिश्चंद्र, मुन्शी प्रेमचंद आणि जयशंकर प्रसाद या महान व्यक्तींच्या स्मरणार्थ तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वांनी वेगवेगळ्या काळात देशात जनजागृती घडवून आणण्यात मोठी भूमिका निभावली आहे. तुम्हाला आठवत असेल की, ‘मन की बात’च्या मागच्या भागात मी तीन स्पर्धांचा उल्लेख केला होता, पहिली म्हणजे देशभक्तीपर गीत लेखन, दुसरी म्हणजे देशभक्तीशी संबंधित, स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित घटनांवर आधारित रांगोळ्या काढणे आणि तिसरी म्हणजे आपल्या मुलांच्या मनात भव्य भारताची स्वप्ने जागवण्यासाठी अंगाई लिहिणे. या स्पर्धेसाठी तुम्ही सुद्धा निश्चितच प्रवेशिका पाठवल्या असतील, अशी आशा मला वाटते. तुम्ही विचार केला असेल आणि तुमच्या सहकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा केली असेल. भारताच्या कानाकोपऱ्यात तुम्ही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने नक्कीच पुढे न्याल, अशी आशा मला वाटते.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, या चर्चेतून आता मी तुम्हाला थेट वृंदावनात घेऊन जाणार आहे. वृंदावनाबद्दल असे म्हटले जाते की ते भगवंताच्या प्रेमाचे प्रत्यक्ष स्वरूप आहे. आपल्या संतांनीही म्हटले आहे,
यह आसा धरि चित्त में, यह आसा धरि चित्त में,
कहत जथा मति मोर |
वृंदावन सुख रंग कौ, वृंदावन सुख रंग कौ,
काहु न पायौ और |
म्हणजे वृंदावनाची महती, आपण सगळे आपापल्या कुवतीनुसार वर्णन करतो, पण वृंदावनाचे जे सुख आहे, इथला जो रस आहे, त्याचा अंत कोणालाही जाणता येणार नाही. येथील सुख अमर्याद आहे. त्यामुळेच वृंदावन जगभरातील लोकांना आकर्षित करत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला त्याचा प्रभाव दिसून येईल.
पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ नावाचे एक शहर आहे. क्रिकेटप्रेमी या जगताशी चांगलेच परिचित असतील, कारण पर्थमध्ये वरचेवर क्रिकेटचे सामने होत असतात. पर्थमध्ये ‘सॅक्रेड इंडिया गॅलरी’ या नावाचे एक कलादालनही आहे. स्वान नामक दरीच्या सुंदर परिसरात हे कलादालन तयार करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील रहिवासी जगत तारिणी दासी यांच्या प्रयत्नांचे हे फळ आहे. जगत तारिणी खरे तर ऑस्ट्रेलियाच्या आहेत. त्यांचा जन्मही तिथेच झाला, तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण त्यांनी 13 वर्षांपेक्षा जास्त काळ वृंदावनात व्यतीत केला. त्या म्हणतात की त्या ऑस्ट्रेलियात परतल्या, आपल्या देशात परतल्या, पण त्या वृंदावनाला विसरू शकल्या नाहीत. त्याचमुळे वृंदावन आणि तिथल्या आध्यात्मिक भावनेशी जुळल्यासारखे वाटत राहावे, या भावनेतून त्यांनी ऑस्ट्रेलियातच वृंदावन वसवले. आपल्या कलेच्याच माध्यमातून त्यांनी अद्भूत असे वृंदावन घडवले. येथे येणाऱ्या लोकांना विविध प्रकारच्या कलाकृती पाहण्याची संधी मिळते. त्यांना भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे – वृंदावन, नवाद्वीप आणि जगन्नाथपुरी येथील परंपरांचे आणि संस्कृतीचे दर्शन घडते. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी संबंधित अनेक कलाकृतीही येथे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. एका कलाकृतीमध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला आहे आणि त्याच्या खाली वृंदावनातील लोकांनी आश्रय घेतला आहे. जगत तारिणीजींचा हा अप्रतिम प्रयत्न, खरोखरच, आपल्याला कृष्णभक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन घडवतो. या प्रयत्नाबद्दल मी त्यांना अनेकानेक शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आताच मी ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ येथील वृंदावनबद्दल बोलत होतो. इतिहासातील आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि आपल्या बुंदेलखंडच्या झाशीचेही एक वेगळे नाते आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध कायदेशीर लढा देत होत्या तेव्हा त्यांचे वकील जॉन लँग होते. हे जॉन लँग मूळचे ऑस्ट्रेलियाचे रहिवासी होते. भारतात राहून त्यांनी राणी लक्ष्मीबाईंचा खटला लढवला होता. आपल्या स्वातंत्र्यलढ्यात झाशी आणि बुंदेलखंडचे योगदान आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई यांसारख्या विरांगनाही येथे घडल्या आणि मेजर ध्यानचंद यांच्यासारखी क्रीडारत्नेही या प्रदेशाने देशाला दिली आहेत.
मित्रांनो, शौर्य केवळ रणांगणावरच गाजवले जाते, असे नाही. शौर्य हे व्रत म्हणून स्वीकारले जाते आणि त्याचा विस्तार होत जातो, तेव्हा प्रत्येक क्षेत्रात अनेक कामे मार्गी लागतात. अशा शौर्याबाबत श्रीमती ज्योत्स्ना यांनी मला पत्र लिहिले आहे. जालौनमध्ये पुरातन काळापासून नून नावाची एक नदी होती. ही नदीच येथील शेतकर्यांसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत होती. मात्र कालांतराने ही नून नदी नामशेष होईल, असे चित्र दिसू लागले. या नदीचे जे लहानसे पात्र उरले होते, ते नाल्यासारखे होऊ लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी जालौनच्या लोकांनी पुढाकार घेतला. याच वर्षी मार्चमध्ये यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या मोहिमेत हजारो ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. येथील पंचायतींनी ग्रामस्थांच्या सहकार्याने काम सुरू केले आणि आज एवढ्या कमी वेळात आणि अत्यंत कमी खर्चात नदीला पुन्हा जीवदान मिळाले आहे. अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होतो आहे. रणांगणाव्यतिरिक्त गाजवलेल्या शौर्याचे हे उदाहरण आपल्या देशवासीयांच्या संकल्प शक्तीचे दर्शन घडवते. आपण दृढनिश्चय केला तर अशक्य असे काहीच नाही, हेच यातून दिसून येते आणि यालाच मी म्हणतो – सर्वांचे प्रयत्न, सबका प्रयास.
माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा आपण निसर्गाचे रक्षण करतो, त्या बदल्यात निसर्गही आपले संरक्षण करतो, आपल्याला सुरक्षा प्रदान देतो. अनेकदा वैयक्तिक आयुष्यातही आपल्याला हे अनुभवता येते. तामिळनाडूच्या जनतेने असाच एक आदर्श घालून दिला आहे. तामिळनाडूच्या तुतूकुडी जिल्ह्यातले हे उदाहरण आहे. आपल्याला ठाऊक आहे की किनारपट्टीच्या भागातील जमीन काही वेळा पाण्याखाली जाण्याची शक्यता असते. तुतूकुडीमध्येही अनेक छोटी बेटे आणि भूभाग होते, ज्यांना समुद्रात बुडण्याचा धोका वाढत होता. निसर्गाच्याच माध्यमातून या नैसर्गिक आपत्तीपासून कसा बचाव करायचा, हे येथील लोकांनी आणि तज्ज्ञांनी शोधून काढले. हे लोक आता या बेटांवर पाल्मिराची झाडे लावत आहेत. ही झाडे चक्रीवादळे आणि वादळातही ठाम उभी राहतात आणि जमिनीचे संरक्षण देतात. त्यामुळे आता हा परिसर वाचवता येईल, असा नवा विश्वास निर्माण झाला आहे.
मित्रहो, जेव्हा आपण निसर्गाचे संतुलन बिघडवतो किंवा त्याचे पावित्र्य नष्ट करतो, तेव्हाच आपल्याला निसर्गापासून धोका उद्भवतो. मातेप्रमाणे निसर्गही आपले पालन पोषण करतो आणि आपल्या जगात नवनवे रंग भरतो. अलिकडेच मी सोशल मीडियावर पाहत होतो. मेघालयातील एका होडीचा फोटो खूप व्हायरल होतो आहे. हे छायाचित्र आपले लक्ष वेधून घेते. तुमच्यापैकी बहुतेकांनी ते ऑनलाइन पाहिले असेल. हवेत तरंगणारी ही बोट जवळून पाहिल्यावर लक्षात येते की ती नदीच्या पाण्यात फिरते आहे. नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे की आपल्याला तिचा तळ दिसतो आणि बोट हवेत तरंगत असल्याप्रमाणे दिसू लागते. आपल्या देशात अनेक राज्ये आहेत, अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे लोकांनी आपल्या नैसर्गिक वारशाच्या रंगांची जोपासना केली आहे. निसर्गाशी तादात्म्य पावणारी जीवनशैली या लोकांनी आजही जिवंत ठेवली आहे. आपल्या सर्वांसाठीही हे प्रेरक आहे. आपल्या आजूबाजूला जे नैसर्गिक स्रोत आहेत, ते आपण जपले पाहिजेत, त्यांना पुन्हा मूळ स्वरूपात आणले पाहिजे. यातच आपल्या सर्वांचे हित आहे, जगाचे हित आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा सरकार योजना बनवते, अर्थसंकल्पातून खर्च करते, प्रकल्प वेळेवर पूर्ण करते, तेव्हा लोकांना वाटते की ते काम करत आहे. मात्र अनेक सरकारी कामांमध्ये, विकासाच्या अनेक योजना राबविताना मानवी संवेदनांशी निगडित कामे नेहमीच अनोखा आनंद देतात. सरकारच्या प्रयत्नांमुळे, सरकारच्या योजनांमुळे जीवनात कसे बदल झाले, त्या बदललेल्या जगण्याचा अनुभव काय? हे ऐकून आपणही भावविभोर होतो. त्यातून मनाला समाधानही मिळते आणि ती योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणाही मिळते. म्हणजेच असे करणे एका अर्थाने ‘स्वांत: सुखाय’ आहे आणि म्हणूनच आज “मन की बात” मध्ये दोन सहकारी आज आपल्यासोबत आहेत जे निव्वळ हिमतीच्या बळावर एक नवे आयुष्य जिंकून आले आहेत. आयुष्मान भारत योजनेच्या सहाय्याने त्यांनी उपचार केले आणि नव्या आयुष्याला सुरूवात केली. आमचे पहिले सहकारी आहेत, राजेश कुमार प्रजापती आहे, जे हृदयरोगाने त्रासले होते.
चला तर मग, राजेश जीं सोबत गप्पा मारूया –
पंतप्रधान – राजेश जी नमस्कार.
राजेश प्रजापती – नमस्कार सर नमस्कार.
पंतप्रधान – राजेश जी तुम्ही कशामुळे आजारी होता? मग तुम्ही कुठल्यातरी डॉक्टरकडे गेला असाल. जरा मला समजावून सांगा, स्थानिक डॉक्टरांनी काही सांगितले असले, मग तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेला असाल? मग तुम्हाला निर्णय घेता येत नसता, किंवा निर्णय देता आला असता तर काय केले असते? काय विचार केला होता तुम्ही?
राजेश प्रजापती – सर, माझ्या हृदयात दोष निर्माण झाला होता. माझ्या छातीत जळजळ होत असे. डॉक्टरना दाखवले तर आधी ते म्हणाले की बाळा, तुला पित्ताचा त्रास होत असे. मग त्यानंतर अनेक दिवस मी पित्ताच्या गोळ्या घेतल्या. पण मला त्याचा काहीच फायदा झाला नाही. मग डॉक्टर कपूर यांना दाखवले तर ते म्हणाले की तुझी जी लक्षणे आहेत, त्यानुसार angiography केली तर दोष कळून येईल. त्यांनी मला श्री राम मूर्ति यांच्याकडे पाठवले. त्यानंतर अमरेश अग्रवाल यांची भेट घेतली आणि त्यांनी माझी angiography केली. ते म्हणाले की तुझ्या रक्तवाहिनीत ब्लॉकेज आहे. आम्ही विचारले की साहेब किती खर्च येईल? तर त्यांनी विचारले की आयुष्मान कार्ड आहे का तुझ्याकडे, जे पंतप्रधानांनी दिले आहे. मग मी म्हणालो की हो, माझ्याकडे कार्ड आहे. मग त्यांनी माझे ते कार्ड घेतले आणि माझे सर्व उपचार त्या कार्डाच्या माध्यमातूनच केले. सर आणि तुम्ही हे कार्ड खूप चांगल्या पद्धतीने बनवले आहे आणि ते आमच्यासारख्या गरीब लोकांसाठी खूपच सोयीचे आहे. मी तुमचे आभार कसे मानू…
पंतप्रधान – राजेश जी, तुम्ही काय करता?
राजेश प्रजापती – सर, सध्या मी खाजगी नोकरी करतो.
पंतप्रधान – आणि तुमचे वय किती?
राजेश प्रजापती – मी एकोणपन्नास वर्षांचा आहे सर.
पंतप्रधान– इतक्या लहान वयात तुम्हाला हृदयाशी
संबंधित आजार झाला..
राजेश प्रजापती – हो सर. आता काय बोलायचे
पंतप्रधान – तुमच्या कुटुंबात तुमच्या आईला, वडीलांना
किंवा इतर कोणाला असा आजार होता का?
राजेश प्रजापती – नाही सर, कोणालाच नव्हता. मलाच पहिल्यांदा हा आजार झाला.
पंतप्रधान – हे आयुष्मान कार्ड. भारत सरकार हे कार्ड देते, गरीबांसाठी ही एक फार मोठी योजना आहे. तुम्हाला त्याबद्दल कसे समजले
राजेश प्रजापती – सर, ही एवढी मोठी योजना आहे, गरिबांना याचा खूप फायदा होतो आणि खूप आनंद होतो सर, या कार्डचा लोकांना किती फायदा होतो, हे आम्ही हॉस्पिटलमध्ये पाहिले आहे. जेव्हा रूग्ण डॉक्टरला सांगतात की माझ्याकडे कार्ड आहे, तेव्हा, सर, डॉक्टर म्हणतात ठीक आहे ते कार्ड घेऊन या. त्याच कार्डचा वापर करून मी तुमच्यावर उपचार करीन.
पंतप्रधान – बरं. कार्ड नसतं तर डॉक्टरने तुम्हाला किती खर्च सांगितला होता?
राजेश प्रजापती – डॉक्टर म्हणाले होते की बेटा खूप खर्च येईल. कार्ड नसेल तर. मग मी म्हणालो की सर माझ्याकडे एक कार्ड आहे. तर ते म्हणाले, लगेच दाखवा बरे. मग मी लगेच ते कार्ड दाखवले आणि त्याच कार्डवर सगळे उपचार झाले. माझा एक पैसाही खर्च झाला नाही, सर्व औषधेसुद्धा त्याच कार्डवरून मिळाली आहेत.
पंतप्रधान– मग राजेश, आता तुम्ही खुश आहात, तब्येत ठीक आहे तुमची?
राजेश प्रजापती – हो सर. तुमचे मनापासून आभार. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुम्हीच सतत सत्तेवर राहा. आणि आमच्या कुटुंबातले लोक सुद्धा तुमच्यावर इतके खुश आहेत की तुम्हाला काय सांगू?
पंतप्रधान – राजेशजी, तुम्ही मला सत्तेत राहण्यासाठी शुभेच्छा देऊ नका, मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही सत्तेमध्ये जायची माझी इच्छा नाही. मला केवळ सेवेत रहायचे आहे, माझ्या साठी हे पद, हे पंतप्रधान या सर्व गोष्टी सत्तेसाठी नाहीत, तर सेवेसाठी आहेत.
राजेश प्रजापति – आम्हा लोकांना सेवाच तर हवी आहे आणि काय
पंतप्रधान – बघा, गरीबांसाठीही आयुष्मान भारत योजना
राजेश प्रजापति – हो, सर, खूप चांगली गोष्ट आहे
पंतप्रधान – मात्र हे पहा, राजेशजी, तुम्ही आमचे एक काम कराल ?
राजेशप्रजापति – हो, नक्की करेन, सर
पंतप्रधान – हे पहा, होतं काय की लोकांना याची माहिती नसते, तुम्ही एक जबाबदारी पार पाडा,तुमच्या आजूबाजूला अशी जितकी गरीब कुटुंबे आहेत, त्यांना तुम्ही सांगा,तुम्हाला याचा कसा लाभ झाला, कशी मदत झाली ?
राजेश प्रजापति – हो, नक्की सांगेन, सर .
पंतप्रधान – आणि त्यांना सांगा की तुम्ही देखील असं कार्ड बनवून घ्या, कारण कुटुंबावर कधी कसे संकट कोसळेल सांगता येत नाही आणि आजच्या स्थितीत गरीब माणूस औषधांपासून वंचित राहणे हे बरोबर नाही. आता पैशांमुळे तो औषधे घेत नसेल किंवा आजारावर उपचार घेत नसेल तर ती मोठी चिंतेची बाब आहे. आणि गरीबांचे काय असतं, उदा. तुम्हाला हृदयरोगाचा त्रास आहे, तर किती महिने तुम्ही काम करू शकला नसाल.
राजेश प्रजापति – मी तर दहा पावलं देखील चालू शकत नव्हतो, जिने चढू शकत नव्हतो, सर .
पंतप्रधान – तर मग राजेशजी, तुम्ही माझे एक चांगले सहकारी बनून किती गरीबांना तुम्ही या आयुष्मान भारत योजने बाबत समजावू शकाल, अशा आजारी लोकांची मदत करू शकाल हे पहा, तुम्हालाही आनंद होईल आणि मला खूप आनंद होईल कि चला, राजेशजींची तब्येत तर सुधारली मात्र राजेशजींनी शेकडो लोकांची तब्येत सुधारण्यात मदत केली, ही आयुष्मान भारत योजना, ही
गरीबांसाठी आहे, मध्यमवर्गासाठी आहे, सामान्य कुटुंबासाठी आहे, त्यामुळे ती घरोघरी तुम्ही पोहचवाल.
राजेश प्रजापति – नक्की पोहचवेन, सर. मी तिथे रुग्णालयात तीन दिवस होतोना, तेव्हा सर, गरीब बिचारे खूप लोक तिथे आले होते, त्यांना सगळे फायदे सांगितले, कार्ड असेल तर मोफत उपचार होतील.
पंतप्रधान – चला, राजेशजी,तुम्ही स्वतःची तब्येत सांभाळा, थोडी शरीराची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या आणि खूप प्रगती करा, माझ्या कडून तुम्हाला खूप शुभेच्छा.
मित्रांनो, आपण राजेशजी काय म्हणाले ते ऐकलं, चला आता आपल्याबरोबर सुखदेवीजी सहभागी होत आहेत, गुडघ्याच्या दुखण्याने त्या त्रस्त होत्या, चला आपण सुखदेवीजी यांच्याकडून त्यांच्या वेदना जाणून घेऊया आणि मग कसे बरं वाटलं ते समजून घेऊया.
मोदीजी – सुखदेवीजी नमस्कार! तुम्ही कुठून बोलत आहात ?
सुखदेवीजी – दानदपरा इथून .
मोदीजी – हे कुठे येतं ?
सुखदेवीजी – मथुरा मध्ये.
मोदीजी – मथुरा मध्ये, मग तर सुखदेवीजी, तुम्हाला नमस्कार देखील म्हणावं लागेल आणि त्याच बरोबर राधे-राधे देखील म्हणावं लागेल.
सुखदेवीजी – हो, राधे-राधे
मोदीजी – अच्छा आम्ही असे ऐकलं की तुम्हाला त्रास होत होता. तुमची कुठली शस्त्रक्रिया झाली का? जरा सांगाल का काय झालं होतं ?
सुखदेवीजी – हो, माझा गुडघा खराब झाला होता, त्यामुळे माझी शस्त्रक्रिया झाली. प्रयागरुग्णालयात.
मोदीजी – मचं वय किती आहे सुखदेवीजी ?
सुखदेवीजी – वय 40वर्षे.
मोदीजी – 40 वर्ष आणि सुखदेव नाव,आणि सुखदेवीला आजार जडला.
सुखदेवीजी – आजारतर मला 15-16 वर्षांपासून जडला होता.
मोदीजी – अरे बापरे! एवढ्या कमी वयात तुमचे गुडघे खराब झाले.
सुखदेवीजी – सांधे दुखी म्हणतात याला, सांध्यातील वेदनांमुळे गुडघे खराब झाले.
मोदीजी – म्हणजे 16 वर्ष ते 40 वर्षे वयापर्यंत तुम्ही यावर उपचार करून घेतले नाहीत.
सुखदेवीजी – नाही करून घेतले. वेदना शमवण्यासाठी गोळ्या खात राहिले, छोट्या-मोठ्या डॉक्टरांनी तर देशी औषधे आहेत, विदेशी औषधे आहेत असं सांगितलं. अशाने गुडघेच नव्हे तर पायदेखील दुखायला लागले. 1-2 किलोमीटर पायी चालले तर माझा गुडघा दुखावला गेला.
मोदीजी – तर सुखदेवीजी, शस्त्रक्रिया करून घेण्याचा विचार कसा आला? त्यासाठी पैशाची व्यवस्था कशी केली? कसे झालं हे सगळं ?
सुखदेवीजी – मी त्या आयुष्मान कार्डा द्वारे इलाज करून घेतला आहे.
मोदीजी – म्हणजे तुम्हाला आयुष्मान कार्ड मिळाले होतं ?
सुखदेवीजी – हो.
मोदीजी – आणि आयुष्मान कार्ड द्वारे गरीबांना मोफत उपचार मिळतात. हे माहित होतं ?
सुखदेवीजी – शाळेत बैठक सुरु होती. तिथे माझ्या नवऱ्याला समजले तेव्हा माझ्या नावाचं कार्ड बनवून घेतलं.
मोदीजी – अच्छा.
सुखदेवीजी – मग कार्ड वापरून इलाज करून घेतला आणि मला एकही पैसा द्यावा लागला नाही. कार्ड द्वारेच माझ्यावर उपचार झाले. खूप छान उपचार झाले आहेत.
मोदीजी – अच्छा, डॉक्टरांनी आधी कार्ड नव्हतं तेव्हा किती खर्च सांगितला होता ?
सुखदेवीजी – अडीच लाख रुपये, तीन लाख रुपये. 6-7 वर्षांपासून बिछान्यावर पडून आहे, देवाला म्हणत होते की मला घेऊन जा, मला जगायचं नाही.
मोदीजी – 6-7 वर्षांपासून बिछान्यावर होतात. बाप-रे-बाप.
सुखदेवीजी – हो.
मोदीजी – ओह.
सुखदेवीजी –अजिबात उठता-बसता येत नव्हतं.
मोदीजी – तर मग आता तुमचा गुडघा पूर्वीपेक्षा बरा झाला आहे ना ?
सुखदेवीजी – मी खूप फिरते. स्वयंपाक घरात काम करते. मुलांना जेवण बनवून वाढते.
मोदीजी – म्हणजे आयुष्मान भारत कार्डाने तुम्हाला खरोखरच आयुष्मान बनवलं.
सुखदेवीजी – खूप-खूप धन्यवाद. तुमच्या योजनेमुळे बरी झाले, आपल्या पायावर उभी राहिले .
मोदीजी – तर मग आता मुले देखील खूष असतील
सुखदेवीजी – हो. मुलांना तर खूपच त्रास व्हायचा. आई दुःखी असेल तर मुलंदेखील दुखी असतात.
मोदीजी – हे पहा, आपल्या आयुष्यात सर्वात मोठं सुख आपलं आरोग्य हेच असतं. हे सुखी जीवन सर्वांना मिळावं हीच आयुष्मान भारतची भावना आहे, चला,सुखदेवीजी, माझ्या तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा तुम्हाला राधे-राधे.
सुखदेवीजी- राधे- राधे, नमस्कार !
माझ्या प्रिय देशबांधवांनो, युवकांनी समृद्ध प्रत्येक देशात तीन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि त्याच कधी-कधी युवकांची खरी ओळख बनतात. पहिली गोष्ट आहे– कल्पना आणि नाविन्य पूर्ण संशोधन. दुसरी आहे- जजोखीम घेण्याची भावना आणि तिसरी आहे मी करू शकते म्हणजे कुठलंही काम पूर्ण करण्याची जिद्द , मग परिस्थिती कितीही विपरीत का असेना जेव्हा या तीन गोष्टी परस्परांशी मिळतात,तेव्हा अभूतपूर्व परिणाम मिळतात.चमत्कार होतात.आजकाल आपण चोहो बाजुंनी ऐकत असतो Start-Up,Start-Up, Start-Up. खरी गोष्टही आहे हे Start-Upचं युग आहे, आणि हे देखील खरं आहे की Start-Upच्या जगात आज भारत जगात एक प्रकारे नेतृत्व करत आहे. वर्षानुवर्षे Start-Upला विक्रमी गुंतवणूक मिळत आहे. हे क्षेत्र अतिशय वेगाने पुढे जात आहे. इथपर्यंत की देशातल्या छोट्या-छोट्या शहरातदेखील Start-Upची व्याप्ती वाढली आहे. आजकाल ‘Unicorn’ शब्द खूप चर्चेत आहे. तुम्ही सर्वांनी याबाबत ऐकलं असेल. ‘Unicorn’ एक असा Start-Up असतो ज्याचं मूल्य किमान 1 अब्ज डॉलर असतं म्हणजे अंदाजे सात हज़ार कोटी रुपयांहून अधिक असतं.
मित्रांनो, वर्ष 2015 पर्यंत देशात मोठ्या मुश्किलीनं नऊ किंवा दहा Unicorns असायचे. तुम्हाला हे ऐकून खूप आनंद झाला असेल की आता Unicorns च्या जगातही भारत वेगाने भरारी घेत आहे. एका अहवालानुसार याच वर्षी एक मोठा बदल घडून आला आहे. केवळ दहा महिन्यातच भारतात प्रत्येक दहा दिवसात एक युनिकॉर्न तयार झाला आहे. ही यासाठी देखील मोठी गोष्ट आहे कारण आपल्या युवकांनी हे यश कोरोना महामारीच्या काळात प्राप्त केलं आहे. आज भारतात 70 हून अधिक Unicorns झाले आहेत. म्हणजे 70 पेक्षा अधिक Start-Up असे आहेत ज्यांनी 1 अब्जा पेक्षा अधिक मूल्य पार केले आहेत. मित्रांनो, Start-Upच्या यशामुळे प्रत्येकाचे त्याकडे लक्ष गेलं आणि ज्याप्रकारे देशातून, विदेशातून गुंतवणूकदारांचा त्याला पाठिंबा मिळत आहे. कदाचित काही वर्षांपूर्वी कुणी त्याची कल्पनाही करू शकलं नसतं. मित्रांनो, Start-Upsच्या माध्यमातून भारतीय युवा जागतिक समस्येवर तोडगा काढण्यात आपलं योगदान देत आहेत. आज आपण एक युवक मयूर पाटील यांच्याशी बोलूया. त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
मोदीजी – मयूरजी नमस्कार.
मयूर पाटील – नमस्ते सरजी
मोदीजी – मयूरजी तुम्ही कसे आहात ?
मयूर पाटील – एकदम छान, सर तुम्ही कसे आहात.
मोदीजी – मी खूप आनंदी आहे. अच्छा मला सांगा की आज तुम्ही एका Start-Upच्या जगात आहात.
मयूर पाटील – हो.
मोदीजी – आणि कचऱ्या पासून संपत्ती देखील निर्माण करत आहात.
मयूर पाटील – हो.
मोदीजी – पर्यावरणासाठी देखील करत आहात. मला थोडं स्वतःविषयी सांगा. तुमच्या कामा बद्दल सांगा आणि हे काम करण्याचा विचार कसा आला ?
मयूर पाटील – सर, जेव्हा महाविद्यालयात होतो तेव्हाच माझ्याकडे मोटर सायकल होती. ज्याचे मायलेज खूप कमी होतं आणि उत्सर्जन खूप जास्त होतं. ती Two stroke Motorcycle होती. त्यामुळे उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि तिचे मायलेज थोडे वाढवण्यासाठी मी प्रयत्न सुरु केले होते. साधारण 2011-12 मध्ये मी तिचे मायलेज अंदाजे 62 किलोमीटर प्रतिलिटर पर्यंत वाढवलं होतं. तर त्यातून मला प्रेरणा मिळाली कि एखादी अशी गोष्ट बनवावी जिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येईल जेणेकरून इतरांनादेखील त्याचा फायदा होईल, तर 2017-18 मध्ये आम्ही मित्रांनी त्याचे तंत्रज्ञान विकसित केलं आणि प्रादेशिक परिवहन महामंडळात आम्ही 10 बसेस मध्ये ते वापरलं. त्याचे परिणाम तपासण्यासाठी आणि आम्ही त्यांचे सुमारे चाळीस टक्के उत्सर्जन कमी केलं, बस मधले.
मोदीजी – हम्म! आता हे तंत्रज्ञान जे तुम्ही शोधले आहे, त्याचे पेटंट करून घेतलं का?
मयूर पाटील – हो. पेटन्ट झालं आहे. यावर्षी आम्हाला पेटंट मिळालं.
मोदीजी – आणि पुढे त्याचा विस्तार करण्याची तुमची काय योजना आहे? कशा प्रकारे करत आहात? जसे बसचे निष्कर्ष आले, त्याच्याही सर्व गोष्टी समोर आल्या असतील. तर पुढे काय विचार आहे?
मयूरपाटिल – सर, Start-Up India अंतर्गत नीति आयोगाचे अटल न्यू इंडिया चॅलेंजजे आहे त्यातून आम्हाला अनुदान मिळालं आहे आणि त्याअनुदानाच्या आधारे आम्ही मित्रांनी आता कारखाना चालू केला आहे जिथे आम्ही एअर फिल्टर्सची निर्मिती करू शकतो.
मोदीजी– तर भारत सरकारच्या वतीनं तुम्हाला किती अनुदान मिळालं?
मयूर पाटील – 90 लाख रुपये.
मोदीजी – 90 लाख .
मयूरपाटिल – हो सर.
मोदीजी – आणि त्यातून तुमचं काम झालं?
मयूर पाटील – हो आता तर चालू झालं आहे, प्रक्रिया सुरु आहे.
मोदीजी – तुम्ही किती मित्र मिळून करत आहात हे सगळं?
मयूरपाटिल – आम्ही चार मित्र आहोत,सर
मोदीजी – आणि चारही मित्र आधी पासून एकत्र शिकत होतात आणि त्यातूनच तुमच्या मनात एक विचार आला पुढेजाण्याचा.
मयूर पाटील – हो,हो. आम्ही महाविद्यालयातच एकत्र होतो आणि तिथेच आम्ही सर्वानी यावर विचार केला आणि ही माझी कल्पना होती की माझ्या मोटरसायकलमुळे किमान प्रदूषण कमी व्हावं आणि तिचं मायलेज वाढावं.
मोदीजी – अच्छा, प्रदूषण कमी करता आणि मायलेज वाढवता तर सरासरी खर्चाची किती बचत होईल ?
मयूर पाटील – सर, आम्ही लोकांनी मोटर सायकल वर चाचणी घेतली, तिचे मायलेज 25 किलोमीटर प्रति लिटर होतं, ते आम्ही 39 किलोमीटर प्रतिलिटर पर्यंत वाढवलं म्हणजे अंदाजे 14 किलोमीटरचा फायदा झाला आणि त्यातलं 40 टक्के कार्बन उत्सर्जन कमी झालं आणि जेव्हा बसेस मध्ये केलं तेव्हा तिथं 10 टक्के इंधन कार्यक्षमतेत वाढ झाली आणि त्यातही 35-40 टक्के उत्सर्जन कमी झालं.
मोदीजी – मयूर, मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमच्या मित्रांचे माझ्या वतीनं अभिनंदन करा. महाविद्यालयीन जीवनात तुमची जी समस्या होती त्यावर तुम्ही तोडगा काढलात आणि त्यातून जो मार्ग निवडला त्याद्वारे पर्यावरण समस्या सोडवण्याचा विडा तुम्ही उचलला. आणि हे आपल्या देशातील युवकांचं सामर्थ्य आहे की कुठलंही मोठं आव्हान स्वीकारतात आणि मार्ग शोधतात. माझ्या कडून तुम्हाला खूप शुभेच्छा. खूप-खूप धन्यवाद .
मयूर पाटील – धन्यवाद ,सर ! आभारी आहे !
मित्रांनो, काही वर्षांपूर्वी जर कुणी म्हटले असतं की त्याला व्यवसाय करायचा आहे किंवा एक नवी कंपनी सुरु करायची आहे, तर त्यावर कुटुंबातील वडीलधाऱ्यामंडळींचे उत्तर असायचं की – “तुला नोकरी का करायची नाही, नोकरी कर. नोकरीत सुरक्षितता असते, पगार मिळतो. कटकटी कमी असतात, मात्र आज जर कुणी स्वतःची कंपनी सुरु करू इच्छित असेल तर त्याच्या आसपासचे सगळेजण खूप उत्साहित होतात आणि यात त्याला सर्वतोपरी मदतही करतात.
मित्रांनो, भारताच्या विकास गाथेला इथेच वळण मिळालं आहे जिथे आता लोक केवळ नोकरी शोधण्याचे स्वप्न पाहत नाही तर रोजगार देणारे देखील बनत आहेत. यामुळे जागतिक पटलावर भारताची स्थिती आणखी मजबूत होईल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज ‘मनकीबात’ मध्ये आपण अमृत महोत्सवा बद्दल बोललो. अमृत काळात आपले देशबांधव कशा प्रकारे नवनवीन संकल्प पूर्ण करत आहेत, याची चर्चा केली आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात सैन्याच्या शौर्याशी निगडित प्रसंगांचा देखील उल्लेख केला. डिसेंबर महिन्यातच एक आणखी मोठा दिवस आपल्या समोर येतो ज्या पासून आपण प्रेरणा घेतो. हा दिवस आहे 6 डिसेंबर. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथि. बाबासाहेबानी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी आणि समाजासाठी आपली कर्तव्ये बजावण्यात समर्पित केलं होतं. आपण देशवासियांनी हे कधीही विसरता कामा नये की आपल्या संविधानाची मूळ भावना, आपले संविधान आपणा सर्व देशवासियांकडून आपापली कर्तव्ये पार पाडण्याची अपेक्षा करतं – चला, आपणही संकल्प करू या कि अमृतमहोत्सवात आपण पूर्ण निष्ठेने कर्तव्य बजावण्याचा प्रयत्नकरू. हीच बाबासाहेबांप्रति आपली खरी श्रद्धांजली असेल.
मित्रांनो, आता आपण डिसेंबर महिन्यात प्रवेश करत आहोत, स्वाभाविक आहे, पुढली ‘मन की बात’ 2021 ची यावर्षाची अखेरची ‘मन की बात’ असेल. 2022 मध्ये पुन्हा प्रवास सुरु करू. आणि माझी तुमच्या कडून भरपूर सूचना आणि मते जाणून घेण्याची अपेक्षा असते आणि यापुढेही असेल. तुम्ही यावर्षाला कसा निरोप देत आहात, नव्या वर्षात काय करणार आहात हे देखील अवश्य सांगा आणि हो, हे कधीही विसरू नका की कोरोना अजून गेलेला नाही. सावधगिरी बाळगणेही आपली सर्वांची जबाबदारीआहे.
खूप-खूप धन्यवाद !
Tune in to #MannKiBaat November 2021. https://t.co/2qQ3sjgLSa
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2021
Today’s #MannKiBaat covered diverse topics. One of them was the public enthusiasm towards ‘Azadi Ka Amrit Mahotsav.’ Across India we are seeing interesting efforts to mark this special occasion… pic.twitter.com/is06Yl14pB
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2021
The vibrant spirituality and culture of Vrindavan finds resonance in Perth in Australia! Find out more… #MannKiBaat pic.twitter.com/avQnUj0qdY
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2021
A commendable effort in Jalaun, Uttar Pradesh towards bringing a river back to life.
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2021
Such community efforts are very advantageous to our society. #MannKiBaat pic.twitter.com/GNwC1G74Od
I keep getting several letters from people across India appreciating Ayushman Bharat PM-JAY. This scheme has changed countless lives.
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2021
During #MannKiBaat I spoke to Rajesh Prajapati Ji from Uttar Pradesh who got good quality treatment for his heart ailment. pic.twitter.com/fYvOHslcIm
A prolonged knee problem has been giving trouble to Sukh Devi Ji but Ayushman Bharat changed that.
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2021
Hear what she had to say… #MannKiBaat pic.twitter.com/PKx1lGEdmr
India’s start-up eco-system is filled with inspiring life journeys of youngsters who are using their entrepreneurial abilities to solve persisting challenges.
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2021
During #MannKiBaat today, I spoke to one such person, Mayur Patil who is working to minimise pollution. pic.twitter.com/1ZQyoMJ9a2