Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन


नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2021

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! काल माघ पौर्णिमेचा दिवस होता. माघ या महिन्याचा संबंध विशेषत्वानं नद्या, सरोवर आणि जलस्त्रोतांबरोबर असतो, असं मानलं जातं. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की –

‘‘माघे निमग्नाः सलिले सुशीते, विमुक्तपापाः त्रिदिवम् प्रयान्ति।।’’

याचा अर्थ असा आहे की, माघ महिन्यामध्ये कोणत्याही पवित्र जलाशयामध्ये स्नान करणं, पवित्र मानलं जातं. दुनियेतल्या प्रत्येक समाजामध्ये नदीशी संबंधित काही ना काहीतरी परंपरा असतातच. नदीकाठच्या भागांमध्येच अनेक संस्कृती, वसाहती विकसित झाल्या आहेत. आपली संस्कृती हजारो वर्षांची आहे, त्यामुळे तिचा विस्तार आपल्या इथं खूप जास्त झाला आहे.देशाच्या कोणत्या ना कोणत्या कानाकोप-यामध्ये पाण्याशी संबंधित एखादा उत्सव, सण नाही,  असा भारतामध्ये  एकही  दिवस जाणार नाही. माघातल्या दिवसांमध्ये तर लोक आपलं घर, परिवार, घरातल्या सुख-सुविधा सोडून संपूर्ण महिनाभर नदीकिनारी ‘कल्पवास’  करण्यासाठी जाणारी अनेक मंडळी आहेत. यंदा हरिव्दारमध्ये कुंभही होत आहे. आपल्यासाठी जल म्हणजे जीवन आहे. आस्था आहे आणि विकासाची धारासुद्धा आहे. एकप्रकारे पाणी हे परिसापेक्षा जास्त महत्वपूर्ण आहे. लोखंडाला जर परिसाच्या स्पर्श झाला, तर त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं असं म्हणतात. त्याचप्रमाणं पाण्याचा स्पर्श जीवनासाठी जरूरीचा आहे. विकासासाठीही पाण्याची गरज आहे.

मित्रांनो, माघ महिना आणि पाणी यांचा संबंध जोडला जाण्यामागं कदाचित आणखी एक कारण असू शकेल. माघानंतरच थंडी कमी होत जाते आणि उन्हं तापायला लागतं. यासाठी पाण्याच्या बचतीसाठी आपण आत्तापासूनच प्रयत्न सुरू केले पाहिजेत. काही दिवसांनंतर म्हणजे दिनांक 22 मार्च या तारखेला ‘जागतिक जल दिन’ येत आहे.

उत्तर प्रदेशातल्या आराध्या जी यांनी मला लिहिलं आहे की, दुनियेमध्ये कोट्यवधी लोकांना आपल्या जीवनाचा खूप मोठा काळ पाण्याच्या कमतरतेची-अभावाची पूर्तता करण्यासाठीच घालवावा लागतो. ‘पाण्याविना सर्व  काही व्यर्थ’ असं उगाच म्हटलेलं नाही. पाणीसंकट सोडविण्यासाठी एक खूप चांगला संदेश पश्चिम बंगालमधल्या उत्तर दीनाजपूर इथल्या सुजीत जी, यांनी मला पाठवला आहे. सुजीत यांनी लिहिले आहे की, निसर्गाने पाण्याच्या रूपानं आपल्या सर्वांना एक सामूहिक भेट दिली आहे. त्यामुळे ती भेट जपून खर्च करण्याची जबाबदारीही सामूहिक आहे. ज्याप्रमाणे सामूहिक भेट आहे, त्याप्रमाणे ती भेट सांभाळण्याची जबाबदारीही सामूहिक, ही गोष्ट तर अगदी  योग्य आहे. सुजीत जी, यांचं म्हणणं, एकदम बरोबर आहे. नदी, तलाव, सरोवर, पावसाचं  अथवा जमिनीतलं असं सर्व पाणी, प्रत्येकासाठी आहे.

मित्रांनो, एके काळी गावामध्ये असलेल्या विहिरी, वाव, पोखर, गावतळी यांची देखभाल सर्व गावकरी मिळून करीत असत. आत्ताही असाच प्रयत्न तामिळनाडूतल्या तिरूवन्नामलाई इथं होत आहे. इथल्या स्थानिक लोकांनी आपल्या विहिरी संरक्षित करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. हे लोक आपल्या भागातल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या सार्वजनिक विहिरींना पुन्हा एकदा जीवंत करीत आहेत.

मध्य प्रदेशातल्या अगरोथा गावातल्या बबीता राजपूत जी जे काही करीत आहेत, त्यापासून आपल्या सर्वांनाच प्रेरणा मिळेल. बबीताजींचे गाव बुंदलखंडात आहे. त्यांच्या गावाजवळच आधी एक खूप मोठा तलाव होता. तो तलाव सुकून गेला. त्यांनी गावातल्याच इतर महिलांना बरोबर घेऊन त्या तलावापर्यंत पाणी घेऊन जाण्यासाठी एक कालवा बनवला. या कालव्याच्या माध्यमातून पावसाचं पाणी थेट तलावामध्ये जायला लागलं. आता हा तलाव पाण्यानं भरलेला असतो.

मित्रांनो, उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये वास्तव्य करणारे जगदीश कुनियाल जी यांनी केलेल्या कामातूनही खूप काही शिकता येणार आहे. जगदीशजी यांचं  गाव आणि आजू-बाजूचा परिसर पाण्याची गरज भागविण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांवर अवलंबून होता. परंतु काही वर्षे झाली, हे नैसर्गिक स्त्रोत आटून गेले. यामुळं  त्यांच्या संपूर्ण भागामध्ये पाण्याचं  संकट अधिकाधिक बिकट बनायला लागलं. जगदीशजी यांनी या संकटावर उत्तर म्हणून वृक्षारोपण करण्याचा दृढनिश्चय केला. त्यांनी संपूर्ण परिसरामध्ये गावातल्या लोकांना बरोबर घेऊन हजारों रोपांची-वृक्षांची लागवड केली आणि आज त्यांच्या भागामध्ये जो आटलेला जलस्त्रोत होता, तो आता पुन्हा पाण्यानं भरला आहे.

मित्रांनो, पाण्याच्याबाबतीत आपण अशा पद्धतीनं आपली सामूहिक जबाबदारी जाणून घेतली पाहिजे. भारताच्या बहुतांश भागामध्ये मे-जूनमध्ये पावसाला प्रारंभ होतो. आपल्या परिसरातल्या जलस्त्रोतांची स्वच्छता करण्यासाठी आणि येणा-या पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी, आपण सर्वजण आत्तापासूनच 100 दिवसांचं एखादं अभियान सुरू करू शकतो का? हाच विचार करून आता काही दिवसांतच जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनंही जल शक्ती अभियान म्हणजेच ‘कॅच द रेन’ ही सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाचा मूलमंत्र आहे, – ‘‘कॅच द रेन, व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स’’ या मोहिमेसाठी आपण आत्तापासूनच काम सुरू करूया. आापल्याकडं  ज्या आधीपासूनच  रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम आहेत, त्यांची दुरूस्ती करून घ्यायची आहे. गावांची, तलावांची, पोखर,वाव यांची स्वच्छता करून घेऊ. जलस्त्रोतांपर्यंत जात असलेल्या पाण्यामध्ये जर कुठे अडथळा येत असेल, तर ते दूर करूया आणि जास्तीत जास्त पावसाच्या पाण्याचा संचय कसा होईल, याकडे लक्ष देऊया.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ज्यावेळी माघ महिना आणि त्याच्या आध्यात्मिक, सामाजिक महत्वाची चर्चा होते, त्यावेळी ती चर्चा एक नावाशिवाय पूर्णच होत नाही. हे नाव आहे- संत रविदास जी यांचं! माघ पौर्णिमेला संत रविदास जी यांची जयंती असते. आजही संत रविदास जींचे शब्द, त्यांचे ज्ञान, आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांनी म्हटलं  होतं की –

एकै माती के सभ भांडे,

सभ का एकौ सिरजनहार।

रविदास व्यापै एकै घट भीतर,

सभ कौ एकै घडै़ कुम्हार ।।

याचा अर्थ असा आहे की, आपण सर्वजण एकाच मातीनं बनलेली भांडी आहोत. आपल्या सर्वांना एकानंच बनवलंय-घडवलंय. संत रविदासजी यांनी समाजामध्ये असलेल्या विकृतीविषयी नेहमीच मोकळेपणानं आपलं मनोगत व्यक्त केलंय.   त्यांनी त्या विकृती समाजासमोर मांडल्या. त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मार्ग दाखवला आणि म्हणूनच मीरा जी यांनी रविदास यांच्याविषयी म्हटलं होतं –

‘‘गुरू मिलिया रैदास, दीन्हीं ज्ञान की गुटकी’’।

संत रविदास यांचं  जन्मस्थान असलेल्या वाराणसी या क्षेत्राबरोबर माझा खूप मोठा संबंध आहे, हे मी स्वतःचं भाग्य मानतो. संत रविदास जी यांनी जीवनामध्ये गाठलेली आध्यात्मिक उंची आणि त्यांच्याठायी असलेली अपार ऊर्जा यांचा अनुभव मी वाराणसी या तीर्थक्षेत्री घेतला आहे. मित्रांनो, रविदास सांगत होते-

करम बंधन में बन्ध रहियो, फल की ना तज्जियो आस।

कर्म मानुष का धर्म है, सत् भाखै रविदास ।।

याचा अर्थ असा की, आपण निरंतर आपलं कर्म करीत राहिलं पाहिजे, मग त्याचं फळ तर नक्कीच मिळेल. म्हणजेच कर्मानं सिद्धी साध्य होतेच. संत रविदास यांची आणखी एक गोष्ट आजच्या युवावर्गानं जरूर शिकली पाहिजे. युवकांनी कोणतंही काम करताना, स्वतःला, जुन्या पद्धती, रिती यांच्यामध्ये स्वतःला अडकवून घेता कामा नये. आपल्या जीवनात, नेमकं  कोणतं  काम करायचंय , कसं  करायचंय, हे स्वतःच ठरवावं. कामाची पद्धतही आपण स्वतःच निश्चित करावी. आपलं लक्ष्यही स्वतः ठरवावं. जर आपली सद्सद्विवेकबुद्धी आणि आत्मविश्वास मजबूत असेल तर मग तुम्हाला दुनियेतल्या कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही. असं मी का सांगतोय, हे जाणून घ्या. पूर्वापार सुरू असलेल्या पद्धतीप्रमाणं काम करणं अनेकवेळा युवकांना खरोखरीच आवडत नाही, तरीही त्यामध्ये बदल कसा काय करायचा- असा विचार करून आपल्याकडचे युवक दबावामुळं मनपसंत काम करू शकत नाहीत, हे मी पाहिलं आहे. वास्तविक तुम्हा मंडळींना कधीही नवा विचार करणं, नवीन काही काम करणं यासाठी संकोच वाटता कामा नये. संत रविदास जी यांनी आणखी एक महत्वपूर्ण संदेश दिला आहे. हा संदेश आहे, तो म्हणजे-  ‘‘आपल्या पायावर उभं राहणं’’  आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण दुस-या कुणावर तरी अवलंबून रहावं, हे तर अजिबातच बरोबर नाही. जे काही- जसं आहे, तसंच सुरू रहावं, असं रविदासजींना कधीच वाटत नव्हतं. आणि आज आपण पाहतो की, देशातले युवकही असा विचार कधीच करणार नाहीत. आज ज्यावेळी देशातल्या युवकांमध्ये मी नवसंकल्पनांचे चैतन्य पाहतो, त्यावेळी वाटतं की, आमच्या युवकांविषयी संत रविदासजींना नक्कीच अभिमान वाटला असता.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ही आहे. आजचा दिवस भारताचे महान वैज्ञानिक, डॉक्टर सी.व्ही. रमण यांनी शोधून काढलेल्या ‘रमण इफेक्ट’ला समर्पित आहे. केरळच्या योगेश्वरन यांनी ‘नमोॲप’वर लिहिलं आहे की, रमण इफेक्टच्या शोधामुळं  संपूर्ण विज्ञानाची दिशाच बदलली गेली होती. यासंबंधित एक खूप चांगला संदेश मला नाशिकच्या स्नेहीलजी यांनीही पाठवला आहे. स्नेहीलजी यांनी लिहिलं आहे की, आपल्या देशात अगणित संशोधक आहेत, त्यांनी दिलेल्या योगदानाशिवाय विज्ञानामध्ये इतकी प्रगती झाली नसती. आपल्याला दुनियेतल्या इतर वैज्ञानिकांची माहिती असते, तशीच आपण भारतातल्या संशोधकांची माहितीही जाणून घेतली पाहिजे. ‘मन की बात’च्या या श्रोत्यांनी व्यक्त केलेल्या मताशी मीही सहमत आहे. आपल्या युवकांनी भारतातल्या संशोधकांचा इतिहास- आमच्या वैज्ञानिकांनी केलेलं कार्य याविषयी माहिती वाचावी आणि त्यांना जाणून घ्यावं, अशी माझीही इच्छा आहे.

मित्रांनो, ज्यावेळी आपण विज्ञान-शास्त्र याविषयावर बोलतो, त्यावेळी लोकांना भौतिक-रसायन शास्त्र अथवा प्रयोगशाळा यांच्यापुरता हा विषय सीमित आहे असं वाटतं. मात्र विज्ञानाचा विस्तार त्यापेक्षा खूप प्रचंड आहे आणि ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ मध्ये तर विज्ञानाच्या शक्तीचे खूप जास्त योगदानही आहे. आपण विज्ञानाला ‘लॅब टू लँड’ म्हणजेच ‘प्रयोगशाळेपासून ते भूमीपर्यंत’ असा मंत्र मानून पुढं नेलं पाहिजे.

यासंदर्भात उदाहरण म्हणून हैद्राबादच्या चिंतला वेंकट रेड्डी यांचं देता येईल. रेड्डी जी यांच्या एका डॉक्टर मित्रानं त्यांना एकदा ‘विटामिन-डी’ च्या कमतरतेमुळं  होणारे आजार आणि त्याचे धोके, यांच्याविषयी सांगितलं. रेड्डी जी शेतकरी आहेत. त्यांनी या समस्येवर उपाय योजना म्हणून आपण काय करू शकतो? यावर विचार करायला सुरूवात केली. त्यांनी खूप परिश्रम केले आणि गहू, तांदूळ या पिकांचे ‘विटामीन-डी’ युक्त वाण विकसित केलं. याच महिन्यामध्ये जिनिव्हाच्या ‘जागतिक बौद्धिक संपदा संघटनेकडून त्यांनी  विकसित केलेल्या पिकांच्या वाणांचे बौद्धिक स्वामित्वही त्यांना मिळालं आहे. अशा संशोधक वेंकट रेड्डी यांना आमच्या सरकारनं गेल्या वर्षी पद्मश्रीचा पुरस्कार देऊन गौरवलं होतं.

अशाच अनेक नवसंकल्पना प्रत्यक्षात आणून लडाखचे उरगेन फुत्सौग काम करीत आहेत. उरगेनजी इतक्या उंचस्थानीही सेंद्रीय पद्धतीने शेती करून जवळपास 20 प्रकारची पिके घेतात. चक्राकार पद्धतीनं ते शेती करतात. म्हणजेच एका पिकाच्या वाया जाणा-या कच-याचा ते दुस-या पिकासाठी खत म्हणून वापर करतात. आहे की नाही कमाल?

याच पद्धतीनं गुजरातमधल्या पाटण जिल्ह्यात कामराज भाई चौधरी यांनी घरामध्येच शेवग्याचं  अतिशय चांगले बियाणं  विकसित केलं  आहे. शेवग्याला काही लोक सहजन किंवा सर्गवा, मोरिंगा असंही म्हणतात. इंग्लिशमध्ये याला ‘ड्रम स्टिक’ असं म्हणतात. जर चांगलं बियाणं असेल तर झाडाला खूप शेवग्याच्या शेंगा लागतात. शेंगांचा दर्जाही चांगला असतो. आपल्या शेवग्याच्या शेंगा आता तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाठवून त्यांनी उत्पन्न वाढवलंय.

मित्रांनो, आजकाल चिया सीडस् हे नाव तुम्ही लोकांनी खूप ऐकलं असेल. आरोग्याविषयी जे जागरूक आहेत, त्या लोकांना चिया सीडचं  महत्व वाटतं. जगभरातून त्याला खूप मोठी मागणी आहे. भारतामध्ये बहुतांश प्रमाणात चिया सीड बाहेरून मागवले जाते. परंतु आता  चिया सीडस् बाबतीत आत्मनिर्भर बनण्याचा संकल्पही अनेक लोकांनी केला आहे. अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथल्या हरिश्चंद्र जी यांनी चिया सीडस्ची शेती सुरू केली आहे. चिया सीडस्च्या शेतीमुळे त्यांच्या कृषी उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि आत्मनिर्भर भारत अभियानालाही मदत मिळणार आहे.

मित्रांनो, कृषी कच-यातून संपत्ती निर्माण करण्याचेही अनेक प्रयोग देशभरामध्ये यशस्वी होत आहेत. ज्याप्रमाणे मदुराईच्या मुरूगेसन जी यांनी केळाच्या कच-यापासून दोरखंड बनविण्याचे यंत्र तयार केलं आहे. मुरूगेसनजी यांच्या या नवसंकल्पनेमुळे पर्यावरण आणि कचरा यांच्या समस्येवर उपाय मिळणार आहे तसंच शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न कमावण्याचा मार्गही मिळणार आहे.

मित्रांनो, ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना इतक्या सर्व लोकांविषयी माहिती देण्यामागं  माझा हेतू हाच आहे की, आपण सर्वांनी या वेगळं काम करणा-या लोकांकडून प्रेरणा घ्यावी. ज्यावेळी देशाचा प्रत्येक नागरिक आपल्या जीवनामध्ये विज्ञानाचा विस्तार करेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञान येईल, त्यावेळी प्रगतीचे मार्गही मुक्त होणार आहेत आणि देश आत्मनिर्भर बनणार आहे. अशा अनेक गोष्टी देशाचा प्रत्येक नागरिक करू शकतो, असा मला विश्वास आहे.

माझ्या प्रिय मित्रांनो, कोलकाताचे रंजन जी यांनी आपल्या पत्रामध्ये खूप चांगला आणि मूलभूत म्हणावा असा प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्याचबरोबर एका चांगल्या पद्धतीनं त्या प्रश्नाला उत्तर देण्याचाही प्रयत्न केला आहे. रंजन जी यांनी लिहिलं आहे, ज्यावेळी आपण आत्मनिर्भर होण्याची चर्चा करतो, त्यावेळी त्याचा  आमच्यासाठी नेमका काय अर्थ असतो? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनीच पुढं  लिहिलं आहे की, – ‘‘ आत्मनिर्भर भारत अभियान’ केवळ सरकारी धोरण नाही, तर एक राष्ट्रीय चैतन्य आहे. त्यांना असं वाटतं की, आत्मनिर्भर होण्याचा अर्थ असा आहे की, आपल्या नशीबाचा निर्णय स्वतः करणं-घेणं. याचाच अर्थ आपण स्वतःच आपल्या भाग्याचे नियंता होणं. आपल्या जीवनाचं शिल्पकार आपणच होणं. रंजनबाबू यांचं म्हणणं अगदी शंभर टक्के योग्य आहे. त्यांचं हे म्हणणं मी पुढे नेत असंही म्हणतो की, आत्मनिर्भरतेची पहिली अट असते – आपल्या देशाच्या वस्तूंविषयी, मालाविषयी अभिमान बाळगणे. आपल्या देशातल्या लोकांनी बनविलेल्या वस्तूंचा अभिमान वाटणं. ज्यावेळी प्रत्येक देशवासीयाला असा अभिमान वाटेल, त्यावेळी देशवासी त्या वस्तूशी जोडला जाईल  आणि मग आत्मनिर्भर भारत बनेल. फक्त हे एक आर्थिक अभियान राहणार नाही. ते एक राष्ट्रीय चैतन्य बनेल. ज्यावेळी आपण आकाशामध्ये आपल्या देशामध्ये बनवलेल्या तेजस लढाऊ विमानांची उत्तुंग भरारी आणि कलाकारी पाहतो, ज्यावेळी भारतामध्ये बनलेले रणगाडे, भारतामध्ये बनलेली क्षेपणास्त्रे, पाहतो, त्यावेळी आपल्याला गौरव वाटतो. ज्यावेळी समृद्ध देशांमध्ये आपण मेट्रो ट्रेनमध्ये ‘मेड इन इंडिया’ असा शिक्का असलेले कोच पाहतो, ज्यावेळी डझनभर देशांमध्ये ‘मेड इन इंडिया’ कोरोनाची लस पोहोचताना पाहतो, त्यावेळी आमची मान अभिमानानं  अधिक उंचावते. असं नाही की, मोठ-मोठ्या गोष्टींमुळेच भारताला आत्मनिर्भरता येईल. भारतामध्ये बनणारे कापड, भारतातल्या प्रतिभावंत कारागिरांनी बनविलेल्या हस्तकलेच्या वस्तू, भारतातली इलेक्ट्रॉनिक उपकरणं, भारतात बनणारे मोबाइल, प्रत्येक क्षेत्रामध्ये, आपल्याला गौरव वाढवायचा आहे. ज्यावेळी आपण असा विचार करून पुढची वाटचाल करणार आहोत, त्याचवेळी ख-या अर्थाने देश आत्मनिर्भर बनणार आहे. आणि मित्रांनो, आत्मनिर्भर भारताचा हा  मंत्र, देशातल्या गावां-गावांमध्ये पोहोचतोय, याचा मला आनंद होत आहे. बिहारमधल्या बेतियामध्येही असंच झालं आहे. याविषयीची माहिती  मला प्रसार माध्यमांतून वाचायला मिळाली.

बेतियाचे रहिवासी प्रमोदजी दिल्लीत एका एलईडी बल्ब बनविणाऱ्या कारखान्यात तंत्रज्ञ म्हणून काम करायचे,  कारखान्यात काम करत असताना त्यांनी ही संपूर्ण निर्मिती प्रक्रिया व्यवस्थित समजून घेतली. परंतु कोरोनना काळात प्रमोद जी यांना त्यांच्या घरी परत जावे लागले. प्रमोद जी घरी परत आल्यावर त्यांनी काय केले हे तुम्हाला माहित आहे का? त्यांनी एलईडी बल्ब तयार करण्याचा स्वतःचा एक छोटासा कारखाना सुरु केला. त्यांनी या कामात आपल्या परिसरातील काही तरुणांना सोबत घेतले घेतले आणि काही महिन्यांमध्येच कारखान्यात काम करणारा एक कामगार ते कारखान्याचा मालक असा प्रवास पूर्ण केला. तोही आपल्या स्वतःच्या घरात राहून.

अजून एक उदाहरण आहे- उत्तरप्रदेशातील गढमुक्तेश्वर मधील. गढमुक्तेश्वर येथे राहणाऱ्या संतोष जी यांनी कोरोना काळातील संकटाचे रूपातंर कसे संधीत केले हे त्यांनी एका पत्राद्वारे आम्हाला कळवले. संतोषजी यांचे पूर्वज हुशार कारागीर होते, ते चटई बनवायचे. कोरोना काळात जेव्हा सर्व कामकाज ठप्प झाले होते तेव्हा या लोकांनी उत्साहाने चटई बनविण्याचे काम सुरू केले. आणि अगदी अल्पावधीतच त्यांना केवळ उत्तर प्रदेशमधूनच नव्हे तर इतर राज्यांकडूनही त्यांच्या चटईला मागणी वाढू लागली. या भागातील शेकडो वर्ष जुन्या सुंदर कलेलाही यामुळे एक नवीन पाठबळ  मिळाल्याचे संतोष जी यांनी सांगितले आहे.

मित्रांनो, देशभरात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे लोक ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ मध्ये अशाच प्रकारे आपले योगदान देत आहेत. आज सर्वसामान्यांच्या हृदयात वाहणारी ही एक भावना बनली आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, मी नामोॲपवर गुडगाव येथे राहणारे मयूर यांची एक मनोरंजक पोस्ट पहिली. ते पक्षी निरीक्षक आणि निसर्ग प्रेमी आहेत. मी हरियाणामध्ये राहतो, परंतु, तुम्ही आसाम आणि विशेषतः काझीरंगा येथे राहणाऱ्या लोकांविषयी बोलावे अशी माझी इच्छा आहे असे त्यांनी पोस्ट मध्ये लिहिले आहे. मला वाटले मयूरजी तिथले गौरव असणाऱ्या गेंड्या (रिनोस) बद्दल बोलतील परंतु त्यांनी काझीरंगामधल्या पाण पक्षांच्या (वॉटर-फॉउल्स) वाढलेल्या आकड्यासाठी त्यांनी आसामच्या लोकांचे कौतुक केले. वॉटर-फॉउल्सला सोप्या शब्दात काय म्हणतात याचा मी शोध घेत होतो, तेव्हा मला एक शब्द सापडला – पाणपक्षी. असे पक्षी ज्यांचे घरटे झाडांवर नाही तर पाण्यावर आहेत, जसे बदके इत्यादी. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प प्राधिकरण मागील काही काळापासून पाण पक्ष्यांची वार्षिक गणना करत आहे. या गणनेत पाण पक्ष्यांची संख्या आणि त्यांचे आवडते निवासस्थान याची माहिती मिळते. दोन-तीन आठवड्यांपूर्वी पुन्हा सर्वेक्षण केले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेळी पाण पक्ष्यांची संख्या सुमारे एकशे पंचाहत्तर (175) टक्क्यांनी वाढली आहे हे जाणून तुम्हालाही आनंद होईल. या गणनेदरम्यान काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पक्ष्यांच्या एकूण 112 प्रजाती पाहायला मिळाल्या. यापैकी 58 प्रजाती या युरोप, मध्य आशिया आणि पूर्व आशियासह जगाच्या विविध भागांमधून आलेले हिवाळी स्थलांतरित पक्षी आहेत. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात जलसाठा असण्या सोबतच मानवी हस्तक्षेप फारच कमी आहे. काही ठिकाणी, सकारात्मक मानवी हस्तक्षेप देखील खूप महत्वाचा आहे.

आसामचे जादव पायेंग यांचीच गोष्ट पहा. आपल्यातील काही लोकांना त्यांच्याबद्दल माहित देखील असेल. त्यांच्या कामांसाठी त्यांना पद्म पुरस्कार मिळाला आहे. जादव पायेंग यांनी  आसाममधील माजुली बेटात सुमारे 300 हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण कार्यात सक्रिय योगदान दिले आहे. ते वन संवर्धनासाठी काम करतात तसेच ते लोकांना वृक्षारोपण आणि जैवविविधता संवर्धनासाठी प्रेरित देखील करतात.

मित्रांनो, आसाममधील मंदिरे देखील निसर्ग संवर्धनात आपली स्वतःची एक वेगळी भूमिका बजावत आहेत, जर तुम्ही लक्षपूर्वक पहिले तर इथल्या प्रत्येक मंदिराच्या परिसरात तुम्हाला एक तलाव दिसेल. हाजो येथील हयाग्रीव मधेब मंदिर, सोनीतपूर येथील नागाशंकर मंदिर आणि गुवाहाटी येथील उग्रतारा मंदिराच्या जवळ अशी अनेक तळी आहेत. कासव्यांच्या नामशेष होत असलेल्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी या तळ्यांचा उपयोग केला जात आहे. आसाममध्ये कासवांची सर्वाधिक प्रजाती आहेत. कासवांचे संवर्धन, प्रजनन व प्रशिक्षण यासाठी मंदिरांतील हे तलाव एक उत्कृष्ट स्थान बनू शकतात.

माझ्या प्रिय देशवासियांनो, काही लोकांना असे वाटते की नवनिर्मितीसाठी वैज्ञानिक असणे आवश्यक आहे, तर काहींना असे वाटते की इतरांना काहीतरी शिकवण्यासाठी शिक्षक असणे गरजेचे आहे. ज्यांना या विचाराला आव्हान देणारी लोकं नेहमीचे कौतुकास पात्र असतात. आता हेच बघा, एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला सैनिक बनण्याचे प्रशिक्षण देत असेल तर त्याचे स्वतःचे सैनिक असणे आवश्यक आहे का?  तुम्ही विचार करत असाल, हो आवश्यक आहे. पण इथेच थोडीसी कलाटणी आहे.

कमलाकांत यांनी MyGov वर एक मीडिया रिपोर्ट सामायिक केला आहे ज्यामध्ये काहीतरी वेगळेच म्हटले आहे. ओडिशाच्या अरखुडा मध्ये एक गृहस्थ आहेत – नायक सर | त्याचे खरे नाव आहे सिलू नायक पण सर्वजण त्यांना नायक सर म्हणतात. वास्तविक ते मॅन ऑन अ मिशन आहेत. सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना ते मोफत प्रशिक्षण देतात. नायक सरांच्या संघटनेचे नाव महागुरु बटालियन असे आहे. इथे शारीरिक स्वास्थ्यापासून ते मुलाखती पर्यंत आणि लेखनापासून ते प्रशिक्षणा पर्यंत सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी ज्या लोकांना प्रशिक्षण दिले आहे त्यांनी सैन्य, नौदल, हवाई दल, सीआरपीएफ, बीएसएफ सारख्या दलांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सिल्लू नायक यांनी स्वतः ओडिशा पोलिस दलात भरती होण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना यश मिळाले नाही, असे असूनही, त्यांनी त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आधारे अनेक तरुणांना देश सेवेसाठी पात्र केले आहे हे ऐकून देखील तुम्हाला आश्चर्य वाटेल. चला, आपण सर्वजण नायक सरांना आपल्या देशासाठी आणखी नायक तयार करण्यासाठी शुभेच्छा देऊया.

मित्रांनो, कधीकधी अगदी छोटे आणि साधे प्रश्न देखील आपले मन विचलित करतात. हे प्रश्न फार खूप मोठे नसतात, अगदी सोपे असतात तरीदेखील ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात. काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या अपर्णा रेड्डी यांनी मला असाच एक प्रश्न विचारला. तुम्ही इतकी वर्षे पंतप्रधान आहात आहेत, इतकी वर्षे मुख्यमंत्री होता, तुम्हाला असे कधी वाटले का की काहीतरी उणीव राहिली आहे? असा प्रश्न त्यांनी मला विचारला. अपर्णा जी यांचा प्रश्न अगदी सोपा पण तितकाच कठीण आहे. या प्रश्नावर मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आले की, एक उणीव नक्की राहिली आहे, जगातील सर्वात जुनी भाषा तामिळ शिकण्यासाठी मी जास्त प्रयत्न केले नाहीत मी तामिळ शिकलो नाही. जगभरात लोकप्रिय असलेली ही एक सुंदर भाषा आहे. अनेकांनी मला तामिळ साहित्याचा दर्जा आणि त्यातील कवितांच्या सखोल भावार्थाबद्द्ल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आपली संस्कृती आणि अभिमानाचे प्रतिक असणाऱ्या अशा अनेक भाषा भारतात आहेत. भाषेबद्दल बोलत असताना , मला तुम्हाला एक छोटीशी मनोरंजक क्लिप ऐकवायची आहे.

आता तुम्ही जे ऐकले ते सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा, स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल एक गाईड लोकांना संस्कृत भाषेतून माहिती देत आहे. केवडियामध्ये 15 हून अधिक गाईड आहेत जे अस्खलित संस्कृत भाषेतून लोकांना माहिती देतात. आता मी तुम्हाला आणखी एक आवाज ऐकवतो-

हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल! हे संस्कृत मधून केलेले क्रिकेटचे धावते समालोचन आहे.  वाराणसीमध्ये संस्कृत महाविद्यालयांमध्ये क्रिकेटचे सामने होतात.  ही महाविद्यालये आहेत – शास्त्रार्थ महाविद्यालय, स्वामी वेदांती वेद विद्यापीठ, श्री ब्रह्म वेद विद्यालय आणि आंतरराष्ट्रीय चंद्रमौली चैरिटेबल ट्रस्ट . या सामन्यांच्या वेळी संस्कृत भाषेतून देखील धावते समालोचन केले जाते. त्या धावत्या सामालोचनातील एक छोटासा भाग आता मी तुम्हाला ऐकवला. इतकेच नाही तर या स्पर्धेतील खेळाडू आणि समालोचक पारंपारिक वेषभूषा करतात. जर तुम्हाला उर्जा, जोश, थरार या सगळ्या गोष्टी एकाचवेळी अनुभवायच्या असतील तर तुम्हाला या सामन्यांचे समालोचन ऐकले पाहिजे. टीव्ही. येण्यापूर्वी समालोचनाच्या माध्यमातूनच  देशातील लोकांना क्रिकेट आणि हॉकीसारख्या खेळाचा थरार अनुभवायला मिळायचा. टेनिस व फुटबॉलच्या सामन्यांचे समालोचन देखील उत्तम प्रकारे सादर केले जाते. ज्या खेळांचे समालोचन उत्तम प्रकारे केले जाते त्या खेळांचा प्रचार खूप वेगाने होते हे आपण पाहिले आहे. आपल्याकडे अनेक भारतीय खेळ आहेत ज्यांच्यासाठी समालोचन केले जात नाही यामुळे हे खेळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वेगवेगळे खेळ आणि विशेषत: भारतीय क्रीडा प्रकारांचे समालोचन जास्तीत जास्त भाषांमध्ये व्हावे यासाठी आपण प्रोत्साहन दिले पाहिजे असा विचार माझ्या मनात आला.  क्रीडा मंत्रालय आणि खासगी संस्थेच्या सहकार्यांना याबद्दल विचार करण्याचे मी आवाहन करतो.

माझ्या प्रिय मित्रांनो, आगामी काही महिने तुमच्या आयुष्यातील महत्वाचे महिने आहेत.  अनेकांच्या परीक्षा असतील. तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे ना तुम्हाला योद्धा बनायचे आहे, चिंता करणारे नाही, आपल्याला हसत हसत परीक्षेला जायचे आहे आणि हसत परत यायचे आहे.  आपल्याला दुसऱ्या कोणाबरोबर नाही तर स्वतःशीच स्पर्धा करायची आहे. तसेच पुरेशी झोप घ्यायची आहे  आणि वेळेचे योग्य नियोजन देखील कार्याचे आहे.  खेळणे देखील थांबवायचे नाही कारण जे खेळतात तेच समृद्ध होतात. उजळणीच्या सुधारित आणि स्मार्ट पद्धती अवलंबल्या पाहिजेत, म्हणजे  एकूणच काय तर या परीक्षांमध्ये तुम्हाला तुमची सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. या सगळ्याबाबत तुम्ही नक्कीच विचार करत असाल. आपण सगळ्यांनी एकत्र मिळून यावर विचार करूया. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण ‘परीक्षा पे चर्चा’ करणार आहोत. मार्च महिन्यात होणाऱ्या या ‘परीक्षा पे चर्चा’ आधी तुम्हा सर्व परीक्षा योद्धा, पालक आणि शिक्षक यांना मी विनंती करतो की तुम्ही तुमचे अनुभव आणि सूचना मला कळवा. आपण MyGov वर हे सामायिक करू शकता. तुम्ही NarendraModi App वर सामायिक करू शकता. यावेळी, तरुण विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांना देखील यावेळच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. सहभाग कसा घ्यायचा, बक्षीस कसे जिंकता येईल, माझ्याशी चर्चा करण्याची संधी कशी मिळवायची यासंबंधी सर्व माहिती आपल्याला MyGov वर मिळेल. आतापर्यंत एक लाखाहून अधिक विद्यार्थी, सुमारे 40 हजार पालक आणि सुमारे 10 हजार शिक्षक सहभागी झाले आहेत. तुम्हीही आजच सहभागी व्हा. या कोरोनाच्या काळात, मी थोडा वेळ काढून, exam warrior पुस्तकात काही मंत्र जोडले आहेत, आता पालकांसाठीही यात काही मंत्र जोडले आहेत. या मंत्रांशी संबंधित बरेच मनोरंजक उपक्रम NarendraModi App वर उपलब्ध आहेत. जे तुम्हाला तुमच्यातील परीक्षा योद्धाला उत्तेजित करतील. तुम्ही नक्की हे करून पहा. सर्व तरुणांना आगामी परीक्षांसाठी अनेक शुभेच्छा.

माझ्या प्रिय देशवासियांनो, मार्च महिना हा आपल्या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना देखील आहे, म्हणूनच, तुमच्यातील अनेक जण खूप व्यस्त देखील असतील. आता आपल्या देशातील आर्थिक उपक्रमांना वेग आला आहे त्यामुळे आपले व्यापारी आणि उद्योजक देखील खूपच व्यस्त असतील. या सर्व कामांमध्ये आपण कोरोना प्रतिबंधक सावधगिरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही सर्व निरोगी असाल, आनंदी असाल, कर्तव्याच्या मार्गावर ठाम राहाल तेव्हाच देश वेगाने पुढे मार्गक्रमण करत राहील.

तुम्हाला सर्व सण-उत्सवाच्या शुभेच्छा, कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका.  खूप खूप धन्यवाद.

 

* * *

(AIR Mumbai)/M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com