नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2021
नमस्कार!!
गुलमर्गच्या पर्वतराजींमध्ये अजून भलेही थंड हवा असूदे, मात्र तुम्हा सर्वांमध्ये असलेला सळसळता उत्साह, तुमच्यामध्ये निर्माण झालेली ऊर्जा, प्रत्येक भारतीयाला जाणवत आहे आणि हा उत्साह सगळेजण पहातही आहेत. आज व्दितीय ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय शीतकालीन क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होत आहे. या स्पर्धा म्हणजे आंतरराष्ट्रीय शीतकालीन स्पर्धांमध्ये भारताच्या प्रभावी उपस्थितीबरोबरच जम्मू आणि काश्मीरला त्याचे एक प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्वपूर्ण आणि मोठे पाऊल ठरणार आहे. जम्मू -काश्मीरला आणि देशभरातून आलेल्या सर्व खेळाडूंना मी खूप-खूप शुभेच्छा देतो.
देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून आलेले तुम्ही सर्व खेळाडू, ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ ही भावनाही मनामध्ये रूजवून, मजबूत करीत आहात. यंदाच्या शीतकालीन क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या दुप्पटीपेक्षाही जास्त झाली आहे, असे मला सांगण्यात आले आहे. यावरून शीतकालीन क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याविषयी देशभरात कल वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंच्या चमूने खूप चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले होते. यंदाच्या वर्षी इतर चमूंकडून जम्मू-काश्मीरच्या प्रतिभावान खेळाडूंना तोडीस तोड आव्हान उभे केले जाईल असा मला विश्वास आहे. त्याचबरोबर देशभरातून आलेले खेळाडू, जम्मू काश्मीरमधल्या खेळाडूंकडे असलेले कौशल्य, त्यांचे सामर्थ्य पाहू शकतील आणि त्यातून नक्कीच काहीतरी शिकूही शकतील. शीतकालीन ऑलिंपिकच्या ‘पोडियम’वर- व्यासपीठावर भारताचा गौरव वाढविण्यासाठी खेलो इंडिया शीतकालीन क्रीडा स्पर्धा खूप उपयोगी ठरतील असा, मला विश्वास आहे.
गुलमर्गमध्ये होत असलेल्या या क्रीडा स्पर्धांमुळे जम्मू-काश्मीर आता शांतता आणि विकासाच्या नवीन शिखरांना सर करण्यासाठी किती तत्पर आहे, हे दिसून येत आहे. या शीतकालीन क्रीडा स्पर्धांमुळे जम्मू काश्मीरमध्ये एक नवीन क्रीडा परिसंस्था विकसित करण्यासाठी मदत मिळणार आहे. जम्मू आणि श्रीनगरमध्ये दोन खेलो इंडिया उत्कृष्टता केंद्रे आणि 20 जिल्ह्यांमध्ये खेलो इंडियाची केंद्रे आहेत, त्यामुळे युवावर्गातल्या खेळाडूंना खूप मोठी सुविधा निर्माण झाली आहे. अशा प्रकारची केंद्रे देशभरातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येत आहेत. इतकेच नाही तर, या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामुळे जम्मू- काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रामध्येही नवीन ऊर्जा, नवीन उत्साह निर्माण होणार आहे. कोरोनाकाळामुळे ज्या काही समस्या आल्या होत्या, त्या आता हळू-हळू कमी होत असल्याचे आपण सगळेजण अनुभवत आहोत.
मित्रांनो,
क्रीडा-खेळ म्हणजे काही फक्त छंद किंवा टाइमपास- वेळ घालविण्यासाठी करण्याची गोष्ट नाही. खेळताना आपल्याला मनात एक समूह भावना, चैतन्य निर्माण होते, पराभवामधूनही नवीन मार्ग शोधला जातो, जिंकल्याचा जो आनंद असतो तोच पुन्हा एकदा मिळावा, असे मनाला वाटते, त्यासाठी संकल्पही केला जातो. खेळ प्रत्येक व्यक्तीचे जीवन विणत असतो, निर्माण करीत असतो; त्याची जीवनशैली तयार करत असतो. खेळामुळे आत्मविश्वास वाढतो, आत्मनिर्भर होण्यासाठी असा आत्मविश्वास तितकाच आवश्यक असतो.
मित्रांनो,
जगामध्ये कोणताही देश केवळ आर्थिक आणि सामरिक शक्तीनेच मोठा बनतो, असे नाही. त्याला इतर अनेक पैलूही असतात. एक संशोधक आपल्या लहानशा संशोधनाने-नवसंकल्पनेने संपूर्ण जगात आपल्या देशाचे नाव चमकवतो, अशी अनेक क्षेत्रे आहेत. परंतु अतिशय सुसंघटित मार्गाने, रचनात्मक मार्गाने, आज क्रीडा क्षेत्र एखाद्या देशाची जगात एक वेगळी प्रतिमा तयार करते. देशाच्या शक्तीचाही परिचय खेळाच्या माध्यमातून होऊ शकते. जगामधल्या अनेक लहान-लहान देशांनी, क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून संपूर्ण विश्वामध्ये आपल्या देशाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या विशिष्ट क्रीडा प्रकारामध्ये त्यांनी मिळवलेल्या विजयामुळे, संपूर्ण देशाला प्रेरणा आणि शक्ती मिळते आणि म्हणूनच खेळाला फक्त जय-पराजय यासाठी घेतलेली स्पर्धा असे म्हणता येऊ शकत नाही. कोणताही खेळ, फक्त पदक आणि तुम्ही दाखवलेले कौशल्य यांच्यापर्यंतच सीमित राहू शकत नाही. खेळ हे एक वैश्विक रूप आहे. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तर भारतामध्ये ही गोष्ट आपल्याला नक्कीच जाणवते. मात्र हीच गोष्ट सर्व आंतरराष्ट्रीय खेळांनाही लागू होत असते. अशी दूरदृष्टी ठेवून गेल्या वर्षांमध्ये देशाच्या क्रीडा परिसंस्थेशी जोडलेल्या सर्व घटकांमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत.
खेलो इंडिया अभियानापासून ते ऑलिंपिक व्यासपीठाच्या योजनेपर्यंत एक सर्वंकष दृष्टिकोन तयार करून आम्ही पुढची वाटचाल करीत आहोत. अगदी खालच्या स्तरामध्ये असलेली क्रीडा प्रतिभा शोधून त्या खेळाडूंना सर्वात मोठ्या मंचापर्यंत पोहोचविण्यासाठी सरकार क्रीडा व्यावसायिकांबरोबर सहकार्यही करीत आहे. प्रतिभा ओळखण्यापासून ते संघनिवडीपर्यंत पारदर्शक व्यवहार व्हावा, याला सरकारने प्राधान्य दिले आहे. ज्या क्रीडापटूंनी जीवनभर देशाचा मान-सन्मान वाढवला, त्यांचाही मान-सन्मान राखून तो वाढवला पाहिजे, त्यांच्या अनुभवांचा लाभ नवीन खेळाडूंना मिळावा, हेही सुनिश्चित करण्यात येत आहे.
मित्रांनो,
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्येही क्रीडा या विषयाला खूप जास्त महत्व देण्यात आले आहे. आधी खेळ हा विषय अवांतर उपक्रम मानला जात होता, आता खेळ हा अभ्यासक्रमाचा भाग बनणार आहे. खेळ या विषयाचेही गुण आता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांमध्ये धरले जाणार आहेत. ही गोष्ट क्रीडा क्षेत्रासाठी आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सुधारणा आहे. मित्रांनो, देशामध्ये आज क्रीडा विषयक उच्च शिक्षण संस्था आणि क्रीडा विद्यापीठांची स्थापना करण्यात येत आहे. इतकेच नाही तर आता क्रीडा विज्ञान आणि क्रीडा व्यवस्थापन या विषयांना आपण शालेय स्तरापर्यंत कसे आणायचे, या दिशेने विचार करण्याची वेळ आली आहे. या गोष्टींमुळे आपल्या युवकांना चांगले करिअर निर्माण करण्यासाठी संधी उपलब्ध होऊ शकणार आहे. त्याचबरोबर क्रीडा अर्थशास्त्रामध्येही भारताची भागीदारी वाढण्यास मदत मिळणार आहे.
माझ्या युवा मित्रांनो,
ज्यावेळी तुम्ही खेलो इंडिया शीतकालीन क्रीडा स्पर्धांमध्ये आपली प्रतिभा दाखविणार आहात, त्यावेळी एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा, ती म्हणजे- तुम्ही काही केवळ एका खेळाचाच एक भाग नाही तर तुम्ही आत्मनिर्भर भारताचे सदिच्छादूतही आहात. तुम्ही मैदानावर जी कमाल करता, त्यामुळे जगात भारताला वेगळी ओळख मिळते. म्हणूनच ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये उतरणार आहे, त्यावेळी आपले मन आणि आत्मा यांच्यामध्ये भारतभूमीला नेहमी स्थान द्यावे. त्यामुळे तुमचा खेळच नाही तर तुमच्या व्यक्तित्वामध्येही एक प्रकारे तेजस्वीपणा येईल. ज्यावेळी तुम्ही खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरणार आहात, त्यावेळी मनात विश्वास बाळगा की, तुम्ही एकटे नाहीत. 130 कोटी देशवासी तुमच्याबरोबर आहेत.
इथल्या अतिशय आनंददायी वातावरणामध्ये सुरू होत असलेल्या या क्रीडा महोत्सवाचा तुम्ही खूप चांगला आनंद घ्यावा आणि आपल्याकडच्या प्रतिभेचे उत्तम प्रदर्शन करावे. यासाठी पुन्हा एकदा, आपल्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा! मनोज सिन्हा जी, किरण रिजीजू जी, क्रीडा स्पर्धांचे इतर आयोजक आणि जम्मू काश्मीरच्या जनतेचे या सुंदर आयोजनाबद्दल खूप-खूप अभिनंदन करतो.
धन्यवाद!!
Jaydevi PS/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
Watch Live: PM @narendramodi e-inaugurates Khelo India Winter Games at Gulmarg https://t.co/KMNwbgjm7i
— PMO India (@PMOIndia) February 26, 2021
आज से खेलो इंडिया- Winter Games का दूसरा संस्करण शुरु हो रहा है।
— PMO India (@PMOIndia) February 26, 2021
ये Winter Games में भारत की प्रभावी उपस्थिति के साथ ही जम्मू कश्मीर को इसका एक बड़ा हब बनाने की तरफ बड़ा कदम है।
मैं जम्मू कश्मीर को और देशभर से आए सभी खिलाड़ियों को बहुत-बहुत शुभकामनाएं देता हूं: PM @narendramodi
नई राष्ट्रीय शिक्षा नीति है, उसमें भी स्पोर्ट्स को बहुत ज्यादा महत्व दिया गया है।
— PMO India (@PMOIndia) February 26, 2021
पहले स्पोर्ट्स को सिर्फ Extra Curricular एक्टिविटी माना जाता था, अब स्पोर्ट्स Curriculum का हिस्सा होगा।
Sports की grading भी बच्चों की शिक्षा में काउंट होगी: PM @narendramodi
युवा साथियों,
— PMO India (@PMOIndia) February 26, 2021
जब आप खेलो इंडिया- Winter Games में अपनी प्रतिभा दिखाएं, तो ये भी याद रखिएगा कि आप सिर्फ एक खेल का ही हिस्सा नहीं हैं, बल्कि आप आत्मनिर्भर भारत के ब्रांड एंबेसेडर भी हैं।
आप जो मैदान में कमाल करते हैं, उससे दुनिया भारत का मूल्यांकन करती है: PM @narendramodi