Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद


माझ्या प्रिय देशवासियांनो.. आपणा सर्वांना नमस्कार, आज जगभरातील ख्रिस्ती बांधव ईस्टरचा सण साजरा करीत आहेत. मी सर्वांना इस्टरच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो.

माझ्या युवा मित्रांनो, आपण परीक्षेमध्ये व्यग्र असाल. काहींच्या परीक्षा झाल्या असतील. आणि काही जणांची दुहेरी परीक्षा असेल. कारण एकीकडे परीक्षा अभ्‍यास, आणि दुसरीकडे टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा. आज आपण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याची बहुधा प्रतिक्षा करत असाल. भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्याविरुध्द झालेले सामने जिंकले आहेत. आशादायक वातावरण तयार झाल्याचे दिसत आहे. आज ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सामना होईल. दोन्ही संघातील खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. आपल्या देशाची 65 टक्के लोकसंख्या तरुण आहे. क्रीडा जगतात आम्ही हरवून गेलो आहोत, हे काही मनाला पटत नाही. या क्रीडा जगतात नवीन क्रांती घडवण्याची वेळ आली आहे. आणि आपण बघतोय की भारतात क्रिकेट प्रमाणेच फुटबॉल, हॉकी, टेनिस, कबड्डी यासाठीही पोषक वातावरण तयार होत आहे.

माझ्या तरुण मित्रांना आज एक आनंदाची बातमी मी देणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून काही अपेक्षाही करणार आहे. तुम्हाला कदाचित हे कळले असेल की पुढील वर्षी 2017 मध्ये होणाऱ्या 17 वर्षाखालील एफआयएफए अर्थात फिफा म्हणजेच जागतिक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. जगभरातील 24 संघ भारतात खेळण्यासाठी येणार आहेत. 1951, आणि 1962 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते. आणि 1956 मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताला चौथे स्थान मिळाले. परंतु दुर्देवाने गेल्या काही दशकांमध्ये आपली कामगिरी घसरत गेली. आपण मागे पडलो, पिछाडीवर गेलो, मागेच राहिलो. आज फिफा मध्ये आपले स्थान कुठे आहे ? आपण कितव्या क्रमांकावर आहोत. हे सांगण्याचे धाडस मी करु शकत नाही. आणि त्याचवेळी दुसरीकडे मी बघतोय की युवा वर्गात फुटबॉलचे आकर्षण वाढत चालले आहे. ईपीएल असो, स्पॅनिश लिग असो, किंवा इंडियन सुपरलिगचे सामने असोत. या सामन्यांविषयी जाणून घेण्यासाठी, ते सामने दूरचित्रवाणीवर पाहण्यासाठी तरुण मित्र वेळ काढतात. सांगण्याचे तात्पर्य हे की फुटबॉलची आवड वाढत आहे. पण फुटबॉलचा हा महोत्सव आमच्या देशात होत असताना आम्ही केवळ यजमानपद भूषवून आपली जबाबदारी पार पाडावी का ? या पूर्ण वर्षभर सारे वातावरण फुटबॉलमय करु या. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, हिंदुस्थानच्या कोपऱ्या कोपऱ्यात आमचे युवक, शाळेतील बालके घामाने चिंब भिजले आहे आणि फुटबॉल खेळला जात आहे. सर्वत्र असे वातावरण निर्माण करुया. आणि असे केले तर यजमानपदाचा आनंद अधिक वाढेल आणि म्हणून फुटबॉल गावा-गावात, प्रत्येक गल्लीत कसा पोहचवता येईल ? यासाठी प्रयत्न करु या.

“2017 फिफा अन्डर 17” विश्वचषक ही यासाठी मला एक संधी आहे. या वर्षभरात सर्वत्र तरुणांमध्ये फुटबॉलविषयी नवा जोम, नवा जोश, नवा उत्साह आपण निर्मााण करुया. हे यजमानपद भारताकडे आल्याचा एक फायदा निश्चितच होणार आहे. आमच्या देशाला त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा तयार होतील. खेळासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींकडे लक्ष दिले जाईल. आपल्या देशातील प्रत्येक तरुण जेव्हा फुटबॉलशी जोडला जाईल तेव्हा मला याचा खरा आनंद होईल.

मित्रहो, आपल्याकडून मला एक अपेक्षा आहे. 2017 चे हे यजमानपद आपण कशा प्रकारे भूषवतो ? वर्षभर फुटबॉलचे वातावरण असावे यासाठी काय करता येईल ? फुटबॉलचा प्रचार कसा करावा ? सोयीसुविधांमध्ये सुधारणा कशा करता येईल ? या विश्वचषकामुळे, भारतातील तरुणांमध्ये खेळाविषयी आवड कशी वाढवता येईल ? शासन, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना यांच्यात खेळाशी स्वत:ला जोडून घेण्याची स्पर्धा कशी उभी राहिल ?

क्रिकेटच्या बाबतीत हे सर्व झाल्याचे आपण पाहतो. पण हेच वातावरण इतर खेळांच्या बाबतीतही आपल्याला तयार करायचे आहे. फुटबॉल एक संधी आहे. आपण मला आपल्‍या सूचना पाठवाल का ? तुमचे याबद्दलचे विचार पोहचवाल का ? जगभरात भारताचे Branding करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे असे मी मानतो. सामन्यात आपण काय कमावले ? काय गमावले ? अशा अर्थाने मला हे म्हणायचे नाही.

या स्पर्धेच्या आयोजकपदाच्या निमित्ताने आपण आपल्यातील शक्ती एकत्र आणू शकतो, त्या शक्तीचे प्रकटीकरण करु शकतो आणि भारताचे Branding ही करु शकतो.

याबद्दलचे तुमचे विचार, तुमचे प्रस्ताव आपण मला नरेंद्र मोदी ॲपवर पाठवाल का ? या स्पर्धेचे बोधचिन्ह कसे असावे ? घोषवाक्य काय असावे ? भारतात हे सर्व कशाप्रकारे पोहचवता येईल ? स्पर्धेचे गीत कोणते असावे ? स्मृतीचिन्‍हाविषयी आपल्या मनात कोणती कल्पना आहे ?

मित्रहो यावर विचार करा आणि माझी अशी इच्छा आहे की, माझ्या देशातील प्रत्येक तरुण या FIFA Under 17 विश्वचषक स्पर्धेचा सदिच्छादूत असेल. या आपणही यात सहभागी व्हा. भारताची ओळख करुन देण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, या सुट्टीच्या दिवसांमध्ये फिरायला जाण्याविषयी, पर्यटनाविषयी आपण ठरवले असेलच. परदेशी जाणारे फार कमी, त्यांच्या तुलनेत आपल्याच राज्यांमध्ये पाच दिवस, सात दिवस अशा कालावधीसाठी बरेच जण जातात. काही विद्यार्थी दुसऱ्या राज्यांमध्येही जातात.

आपण पर्यटनासाठी जिथे जाल तिथून छायाचित्र म्हणजेच Photo मला पाठवा, Upload करा असे मी आपल्याला मागच्यावेळी आवर्जुन सांगितले होते. आणि माझ्या लक्षात आले की, आपण जे काम आमच्या पर्यटन विभागाला जमले नाही, आमच्या सांस्कृतिक विभागाला शक्य झाले नाही, जे राज्य सरकारे करु शकली नाहीत आणि भारत सरकारलाही करता आले नाही, ते काम देशातील कोटयावधी पर्यटकांनी केले. त्यांनी अशा काही स्थळांची छायाचित्रे पाठवली, Photo Upload केले की ते बघताना खरोखर आनंद होतो.

हे कार्य आता आपल्याला पुढे न्यायाचे आहे. याहीवेळी अशी छायाचित्रे पाठवा. पण त्याचबरोबर काही लिहून पाठवा. केवळ छायाचित्र पाठवू नका, आपल्यातील सर्जनशीलतेच्या प्रकटीकरणाला वाव दया, नवनव्या ठिकाणांना भेटी दिल्यामुळे, वेगवेगळया ठिकाणी गेल्यामुळे खूप शिकायला मिळते. ज्या गोष्टी शाळेच्या वर्गात आपण शिकू शकत नाही, आपल्या कुटुंबात आपल्याला शिकायला मिळत नाहीत आणि ज्या गोष्टी आपल्या मित्र-मंडळींमध्ये सुध्दा शिकायची संधी आपल्याला मिळत नाही अशा गोष्टी बऱ्याचदा पर्यटनातून जाणून घेण्याची, शिकण्याची सुसंधी आपल्याला मिळते. नवनव्या ठिकाणांचा नवेपणा, अनुभवता येतो. लोक, भाषा, खाद्यपदार्थ, तिथल्या चालीरिती, अशा अनेक गोष्टी पहायला मिळतात. आणि कुणीसे म्हटलेच आहे ‘A traveller without observation. is a bird without wings’निरीक्षण, अवलोकन याचा अभाव असणारा पर्यटक म्हणजे जणू पंखहीन पक्षीच होय. “शौक-ए-दीदार है अगर, तो नजर पैदा कर” काही बघण्याची आस मनात असेल तर ते बघण्याची दृष्टी आधी निर्माण करुया. भारत विविधतेने भरला आहे. तो पाहण्यासाठी एकदा बाहेर पडा, आयुष्यभर बघत रहाल, पहात रहाल, मन कधी भरणारच नाही. आणि याबाबतीत मी सुदैवी आहे. अनेक ठिकाणी जाण्याची, फिरण्याची संधी मला मिळाली.

जेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, पंतप्रधान नव्हतो, तेव्हा आपल्याप्रमाणेच बालवयात मी खूप फिरलो. कदाचित हिंदुस्थानात असा एकही जिल्हा नसेल की जिथे मी गेलो नाही.

आयुष्य घडविण्यासाठी मोठे बळ मिळते. या प्रवासातून आणि आता भारतीय तरुणांमध्ये धाडसी पर्यटनाची आवड वाढू लागली आहे. नवे जाणून घेण्याची ओढ निर्माण होऊ लागली आहे. त्याच त्या, जुन्या मळलेल्या वाटा सोडून, काही नवीन करण्याची नवीन बघण्याची आकांक्षा त्यांच्या मनात आहे. हे चांगले लक्षण आहे असे मी मानतो. आमचे तरुण धाडसी वृत्तीचे असावेत. ज्याजागी यापूर्वी कुणीही गेले नाही, त्याजागी पोहचण्याची त्यांची इच्छा असावी.

कोल इंडियाचे मी विशेष अभिनंदन करतो. वेस्टर्न कोल फिल्डस्‌ लिमिटेड, नागपूरजवळचे सावनेर ठिकाण, येथे कोळशाच्या खाणी आहेत. या कोळशाच्या खाणींपासून दूरच रहावे असे आमचे एक सर्वसाधारण मत असते. खाणीत काम करणाऱ्यांची छायाचित्र बघितल्यावर मनात प्रश्न येतोच की तिथे कसे वातावरण असेल ? आणि “कोळशाने हात झाले काळे, जग दूर पळे” अशा अर्थाची एक म्हणसुध्दा आहे.

पण याच कोळशाला, कोळशाच्या खाणीला या मंडळींनी पर्यटन क्षेत्र बनवले आहे. नुकतीच सुरुवात झाली आहे. आणि जवळ जवळ दहा हजार नागरिकांनी नागपूरजवळच्या सावनेरच्या कोळसा खाणीला पर्यटक म्हणून भेट दिली आहे याचा मला आनंद होत वाटतो.

या सुट्टयांमध्ये आपण फिरायला जाल, प्रवासाला जाल, तेव्हा स्वच्छता मोहिमेत आपला वाटा उचलाल अशी मी आशा करतो. हल्ली एक गोष्ट लक्षात येते, प्रमाण कमी असेल, त्यावर टीका करायचली असेल तर संधी आहे पण स्वच्छतेच्या बाबतीत लोकांमध्ये जागरुकता निर्माण होत आहे. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता असेल यासाठी प्रयत्न होतांना दिसतात. पर्यटक आणि पर्यटनस्थळी राहणारे अशा दोघांकडूनही काही प्रयत्न होतांना दिसत आहेत. सगळेच प्रयत्न अगदी शास्त्रशुध्द पध्दतीचे नसतीलही पण होत मात्र आहेत. या नात्याने आपणही विशेष लक्ष दयाल का ? मला खात्री आहे, या कामात माझे तरुण मित्र मला नक्की मदत करतील. आणि हे खरे आहे पर्यटन क्षेत्र हे सर्वाधिक रोजगार मिळवून देणारे क्षेत्र आहे. गरीबातील गरीब व्यक्तीसुध्दा कमावू शकते. जेव्हा पर्यटनस्थळी लोक जातात तेव्हा ते काहीना काही खरेदी करतात, खर्च करतात. तो गरीब असेल तरीही काहीतरी घेईल, तो श्रीमंत असेल तर तो अधिक खर्च करेल. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून विपुल रोजगार निर्मिती शक्य आहे. पर्यटनाच्या बाबतीत जगाच्या तुलनेत भारत खूप मागे आहे. पण जर आपण सव्वाशे कोटी भारतीयांनी पर्यटन क्षेत्रावर जोर दयायचे ठरवले तर जगाला आपण भारताकडे आकर्षित करु शकतो. जगभराच्या पर्यटन क्षेत्रातील मोठा हिस्सा आपल्या देशाकडे आकर्षित करुन आमच्या देशातील कोटयावधी युवकांना रोजगार संधी निर्माण करुन देऊ शकतो. शासन असो, संस्था असोत, समाज असो वा नागरिक, आपण सगळयांनी मिळून हे काम करायचे आहे. या, हे करण्याच्या दिशेने प्रयत्न करुया.

माझ्या तरुण मित्रांनो, सुट्टया आल्या आणि अशाच गेल्या हे काही मला योग्य वाटत नाही. आपणही याबद्दल विचार करा. आपल्‍या सुट्टया आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष आणि त्यातला बहुमूल्य वेळ असाच जाऊ दयायचा का ? विचार करण्यासाठी एक मुद्दा मी आपल्यासमोर मांडतो. या सुट्टयांमध्ये एखादी नवी कला, एखाद्ये कौशल्य आपल्या व्यक्तिमत्वात एखाद्या नव्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी आपण संकल्‍प कराल का ? तुम्हाला पोहता येत नसेल तर या सुट्टयांमध्ये पोहायला शिकायचे तुम्ही ठरवा. सायकल चालवता येत नसेल तर या सुट्टयांमध्ये सायकल चालवता येत नसेल तर या सुट्टयांमध्ये सायकल शिका. आजही संगणकावर कंप्युटरवर टायपिंग करताना मी दोन बोटांनी करतो, मी सफाईदार टायपिंग करायला का शिकू नये ? आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक कौशल्याचा गोष्टी आहेत. त्या आपण का शिकू नयेत ? आपल्यातील त्रुटी का दूर करु नयेत ? आपले बळ का वाढवू नये ? जरा विचार करा.

आणि हे सगळे करण्यासाठी मोठमोठे प्रशिक्षण वर्ग हवेत, प्रशिक्षक हवेत, भरमसाठ शुल्क हवे, खर्चाची मोठी तयारी हवी अशातला भाग नाहीये. आपल्या आजूबाजूला, समजा आपण ठरवले की मी कचऱ्यातून कला निर्माण करीन, टाकाऊतून टिकाऊ बनवीन तर ते करायला सुरुवात करा. त्यातून आपल्याला आनंद मिळेल. संध्याकाळ होईपर्यंत बघा, त्या कचऱ्यातून तुम्ही काय निर्माण केले आहे ? तुम्हाला चित्र रंगवायला आवडते ? पण येत नाही ? अरे मग सुरुवात तर करु, येईलच.

व्यक्तिमत्व विकासासाठी, नवी कला शिकण्यासाठी, कौशल्य वाढण्यासाठी सुट्टीचा उपयोग अवश्य करा. अगणित क्षेत्र आहेत. मी सांगितलेल्या क्षेत्रांपेक्षाही अधिक संधी आहे. आपण जे क्षेत्र निवडाल, जे शिकाल त्‍यातून तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख होईल आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. इतका वाढेल की तुम्ही बघाल सुट्टीनंतर शाळा सुरु झाल्यानंतर, महाविद्यालय सुरु झाल्यावर तुम्ही परत तिथे जाल आणि तुमच्या मित्राला सांगेल की दोस्ता, या सुट्टीत मी हे शिकलो.

तो जर काहीच शिकला नसेल तर म्हणेल अरे. माझा वेळ वाया गेला. तू मात्र नवीन शिकून आलास. मित्रांमध्ये यावर आपसूक चर्चा होईल. तर या सुट्टयांमध्ये आपण काही नवीन कराल, नवीन शिकल आणि मला सांगाल असा मला भरवसा आहे. सांगाल ना ?

यावेळी मन की बातमध्ये mygov वर अनेक सूचना आल्या आहेत.

माझे नाव अभी चतुर्वेदी आहे.

नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. उन्हाळयाच्या मागच्या सुट्टीत आपण सांगितले होते की चिमण्यांनाही उन्हाळयाचा त्रास होतो त्यासाठी आपल्या बाल्कनीत किंवा गच्चीवर एका भांडयात पाणी भरुन चिमण्यांसाठी ठेवा. मी त्याप्रमाणे केले आणि मला सांगायला आनंद होतो की यामुळे चिमण्यांशी माझी मैत्रीच झाली. मन की बातमध्ये याबाबत तुम्ही पुन्हा एकदा सांगावे अशी माझी आपल्याला विनंती आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, अभि चतुर्वेदी या मुलाचे मी आभार मानतो. त्याने फोन करुन मला एका चांगल्‍या कामाची आठवण करुन दिली. गेल्या वेळी माझ्या लक्षात होते आणि मी सांगितले होते की, उन्हाळयाच्या काळात पक्षांसाठी आपल्या दाराबाहेर मातीच्या भांडयात पाणी भरुन ठेवा. अभिने मला सांगितले की संपूर्ण वर्षभर तो हे करतोय आणि अनेक चिमण्यांशी त्याची मैत्री झाली आहे. हिंदी साहित्य क्षेत्रातील महान कवियत्री महादेवी वर्मा, पक्ष्यांवर त्यांचे खूप प्रेम होते. त्यांनी आपल्या कवितेत लिहिले होते. “तुझको दूर न जाने देंगे, दानों से आंगन भर देंगे और होद में भर देंगे हम मीठा-मीठा ठंडा पानी.” या महादेवीजींनी सांगितलेली ही गोष्ट आपणही करुया. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्दल अभिचे मी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो.

म्हैसूरच्या शिल्पा कुके यांनी एक संवेदनशील मुद्दा आपल्या सर्वांसमोर मांडला आहे. त्या म्हणतात. दूध विकणारे, वर्तमानपत्र विकणारे, पोस्टमन, आपल्या घरापाशी येतात. भांडी विकणारे, कपडे विकणारे घरासमोरुन जातात. उन्हाळयाच्या दिवसात यांना आपण कधी पाणी देऊ केले आहे का ?शिल्पा, मी आपले खूप खूप आभार मानतो. एका संवेदनशील विषयाला फार सोप्या पध्दतीने तुम्ही मांडले आहे. तुमचे म्हणणे बरोबर आहे. तसे पहायला गेले तर ही किरकोळ गोष्ट आहे. पण या कडाक्याच्या उन्हात आपल्या घरी येणाऱ्या पोस्टमनला आपण पाणी दिले तर त्यांना किती बरे वाटेल. असो, भारतात तर ही सवयच आहे. पण शिल्पा ही गोष्ट बारकाईने बघितल्याबद्दल मी आपले आभार मानतो.

माझ्या प्रिय शेतकरी बंधु-भगिनींनो, डिजिटल इंडिया – डिजिटल इंडिया असे आपण खूप ऐकले असेल. काही जणांना वाटते की डिजिटल इंडिया म्हणजे केवळ शहरातल्या युवकांचे जग आहे. पण असे नाही. आपल्याला ऐकून आनंद वाटेल की एक किसान सुविधा ॲप आपल्या सेवेसाठी तयार करण्यात आले आहे. आपल्या मोबाईल फोनमध्ये किसान सुविधा ॲप डाऊनलोड करुन घेतले तर त्याच्या माध्यमातून शेती, हवामान याविषयी बरीच माहिती अगदी सहज आपल्या हाती येईल. बाजारात काय चालले आहे ? भाजी मंडईत काय घडते आहे ? या दिवसात चांगल्या पिकाबद्दल काय माहिती उपलब्ध आहे ? कोणती औषधे उपयोगी आहेत ? अनेक विषय या ॲपवर आहेत. एवढेच नाही तर या ॲपमध्ये एक बटण असे आहे की त्‍याच्या माध्यमातून कृषिशास्त्रज्ञ, कृषीतज्ञ, यांच्याशी तुम्ही थेट संपर्क साधू शकता. तुमचा एखादा प्रश्न त्यांना विचारलात तर ते त्याचे उत्तर देतात, आपल्याला समजावून सांगात. माझे किसान बंधुभगिनी हे किसान सुविधा ॲप त्यांच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन घेतील अशी मला आशा आहे. आणि एकदा वापरुन तर बघा. त्यात आपल्या उपयोगी पडणारे काय आहे? आणि तरीही काही उणिवा वाटल्या तर आपण माझ्याकडे त्याची तक्रार करा.

माझ्या शेतकरी बंधु भगिनींनो, इतरांसाठी उन्हाळा म्हणजे सुट्टीचा काळ. पण शेतकऱ्यांसाठी उन्हाळा म्हणजे घाम गाळण्याचा काळ. तो पावसाची प्रतिक्षा करतो. आणि प्रतिक्षेआधि जीव लावून शेताची मशागत करतो. जमीन तयार करतो जेणेकरुन पावसाचा एक थेंबही वाया जाणार नाही. शेतीचा प्रत्यक्ष हंगाम सुरु होण्यापूर्वीचा काळ शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा असतो. पण आम्हा देशवासियांनीही विचार केला पाहिजे की, पाण्यावाचून आपले काय होईल. तलाव, पाणी वाहून नेणारे नाले, तलावात पाणी येण्याचे मार्ग, जिथे काही कचरा साठला असेल, किंवा काही अतिक्रमण झाले असेल, तर पाणी येणे बंद आणि त्याचा परिणाम म्हणून जलसाठा हळूहळू कमी होत जातो. पाणी येण्याचे मार्ग, नाले, तलाव या काळात स्वच्छ करुन अधिक पाणी साठवण्यासाठी आपण प्रयत्न करुया का? जास्तीत जास्त पाणी वाचवू या. पहिल्याच पावसात पाणी वाचवले, तलाव भरले, नदी नाले भरले, तर नंतर जरी पाऊस पडला नाही, तर आपले कमी नुकसान होईल.

यावेळी आपण बघितले असेल, पाच लाख शेततळी तयार करण्याचा निर्धार केला आहे. मनरेगाच्या माध्यमातून पाणी साठवण्यासाठी जलसंपत्ती तयार करण्यासाठी जोर देण्यात आला आहे. गावा-गावात पाणी वाचवू या. येणाऱ्या पावसाळ्यात पाण्याचा थेंब न थेंब कसा वाचवता येईल? गावातले पाणी गावातच कसे राहील? ही योजना कशी कार्यान्वित होईल? यावर विचार करा. आपण योजना तयार करा, शासकीय योजनेशी त्याचा मेळ घाला, जेणेकरुन एक असे जनआंदोलन उभे राहील, ज्यातून पाण्याचे महत्व सर्वांना पटेल आणि पाणी वाचवण्याच्या प्रयत्नात सगळे सहभागी होतील. देशभरात अशी कितीतरी गावं असतील, कितीतरी प्रगतीशील शेतकरी असतील, कितीतरी जागरुक नागरिक असतील, ज्यांनी हे काम केले असेल. पण तरीही आज आणखी काम करण्याची गरज आहे.

माझ्या शेतकरी बंधु भगिनींनो, एक गोष्ट आज मी आपल्याला पुन्हा सांगणार आहे. भारत सरकारने नुकतेच एक शेतीविषयक भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. त्यात मी पाहिले की कसे आधुनिक तंत्रज्ञान शेतीत आले आहे. पण प्रत्यक्ष शेतापर्यंत ते पोचणे अजून बाकी आहे. खताचा वापर कमी करायला हवा, असे आता शेतकरीही म्हणून लागले आहेत. या विचाराचे मी स्वागत करतो. खतांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या भूमातेला आपण आजारी पाडले आहे. आपण या भूमातेचे पुत्र आहोत. ती आजारी पडणे आपण कसे बरे बघू शकू? उत्तम मसाल्यांचा वापर केला तर अन्नपदार्थ किती रुचकर होतो. पण उत्तमातले उत्तम मसाले बेसुमार वापरले तर तो अन्नपदार्थ खायची इच्छा होईल का? तेच जेवण आवडणार नाही. खतांचेही असेच आहे. ती खते कितीही उत्तम का असेना, गरजेपेक्षा अधिक वापरली तर ते विनाशाचे कारण ठरेल. प्रत्येक गोष्ट संतुलीत असायला हवी. त्यामुळे खर्चातही बचत होईल. आपले पैसे वाचतील आणि आमचे म्हणणे आहे कमी खर्च अधिक उत्पादन, कमी गुंतवणूक अधिक उत्पन्न. या मंत्राचे आचरण करायला हवे, शास्त्रीय पद्धतीचा वापर करुन आपले कृषी क्षेत्र पुढे न्यायला हवे. पाणी वाचविण्यासाठी पाणी साठवण्यासाठी जी आवश्यक कामे आहेत ती आपल्या हाती असणाऱ्या एक-दोन महिन्यात आपण निर्धाराने पूर्ण कराल अशी मला आशा आहे. जितके पाणी वाचेल, तितका शेतकऱ्याला अधिक फायदा होईल. जीवन तितके अधिक वाचेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे. मधुमेहावर विजय हे यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य आहे. मधुमेहावर नियंत्रण मिळवणे ही मध्यवर्ती संकल्पना आहे. मधुमेह हा एक असा यजमान आहे जो इतर रोगांचे स्वागत करण्यासाठी आतुर असतो. एकदा हा मधुमेह आपल्या शरीरात घुसला की त्या पाठोपाठ अनेक आजार व्याधी आपल्या शरीरात आल्याच म्हणून समजा.

असे सांगितले जाते की, 2014 मधे भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संस्था साडेसहा कोटी इतकी होती.

मृत्यूच्या कारणांमधे 3 टक्के मृत्यूचे कारण मधुमेह असल्याचे आढळले. मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. टाईप-1 आणि टाईप-2

टाईप-1 मधुमेह वंशपरंपरागत आहे. आई-वडिलांकडून तो मुलांकडे जातो.

टाईप-2 मधुमेहाची कारणे आहेत सवयी, वय, स्थूलपणा. या मधुमेहाला आपण जणू आमंत्रण देऊन बोलावतो. सारे जग मधुमेहामुळे चिंतीत आहे. म्हणूनच सात एप्रिल, जागतिक आरोग्य दिनानिमित्त मधुमेहावर विजय ही संकल्पना ठरवण्यात आली आहे. आपली जीवनशैली टाईप-2 मधुमेहाचे मुख्य कारण आहे हे आपण सारे जाणतो.

शारिरीक श्रम कमी होऊ लागले आहेत. घामाचा थेंबही नाही. चालणे फिरणे बंद. खेळ खेळले तरी ONLINE, खेळले जातात. OFFLINE काहीच होत नाही. 7 तारखेपासून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात मधुमेहाला पराभूत करण्यासाठी काही करु शकतो का? आपल्याला योगासने आवडत असतील, तर योगासने करा. नाही तर किमान चालणे, धावणे हा व्यायाम तरी करा. जर माझ्या देशातला प्रत्येक नागरिक निरोगी असेल, तर माझा भारतही निरोगी असेल.

आरोग्य विषयक तपासण्या करण्याचा आम्हाला कधी कधी संकोच वाटतो. आणि तब्येत फारच बिघडल्यावर लक्षात येते की, मधुमेहाने फार पूर्वीच आपल्या शरीरात शिरकाव केला आहे. तपासणी करायला काय जातय? किमान एवढे तरी करु. आता अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. तपासण्या सहज करता येतात. आपण त्याकडे लक्ष द्या.

24 मार्च रोजी जगभर क्षयरोग निवारण दिन पाळला गेला. मी लहान होतो, तेव्हा क्षयरोग या नुसत्या नावानेही भिती वाटायचे, असे वाटायचे की “आता मरण आलेच”. पण आता क्षयरोगाची भिती वाटत नाही. कारण सर्वांना माहित आहे की क्षयरोगावर उपचार होतात आणि सहज होतात. कोणे एकेकाळी क्षयरोग म्हणजेच मृत्यू हे समीकरण होते, त्याकाळी आम्हाला त्याची भिती वाटत असे. पण आज क्षयरोगाच्या बाबतीत आम्ही निष्काळजी झाली आहोत. जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारतात क्षयरोग्यांनी संख्या अधिक आहे. क्षयरोगापासून सुटका करुन घ्यायची असेल, तर अचूक उपचार आवश्यक आहेत आणि आवश्यक आहेत पूर्ण उपचार. योग्य उपचार आणि पूर्ण उपचार. उपचार अर्धवट सोडून दिले तर नव्या संकटाला निमंत्रण मिळते. बरं, एखाद्याला क्षयरोग झाला आहे हे त्याच्या शेजाऱ्यांनाही सहज कळू शकते. अरे भाऊ तपासणी करुन घे, क्षयरोग झाला असेल. सतत खोकला येत असेल. ताप येत असेल, वजन कमी होत असेल, तर शेजारच्या लोकांनाही कळते की हा क्षयरोग तर नसेल? याचा अर्थ असा की हा असा आजार आहे, ज्याची त्वरीत तपासणी करता येणे शक्य आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, याबद्दल आपल्याकडे खूप काम होत आहे. 13 हजार 500 पेक्षा अधिक मायक्रोस्कोपिक सेंटर्स कार्यरत आहेत. चार लाखापेक्षा अधिक DOT Provider आहेत. अनेक अत्याधुनिक प्रयोगशाळा, तपासणी केंद्र आहेत. तुम्ही एकदा तपासून तर घ्या. आणि या आजाराचे पूर्णपणे निर्मूलन करता येते.

बस योग्य उपचार आणि आजार नष्ट होईपर्यंत पूर्ण उपचार करणे आवश्यक आहे. क्षयरोग असो किंवा मधुमेह, त्याचे पूर्ण उच्चाटन आपण करुया असे मी आपल्याला आवर्जून सांगेन. भारताची या आजारांपासून सुटका करायची आहे. पण केवळ शासन, डॉक्टर आणि औषधे यातून हे साध्य होणार नाही. आपला सक्रीय सहभाग आवश्यक आहे. आणि म्हणून मधुमेहावर विजय मिळवण्यासाठी क्षयरोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी मी आपण सर्व देशवासियांना आग्रह करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, एप्रिल महिन्यात अनेक महत्वाचे दिन विशेष आहेत. विशेषत: 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यांची एकशेपंचवीसावी जयंती साऱ्या देशभर साजरी केली गेली. एक पंचतीर्थ- महू येथील त्यांचे जन्मस्थळ. लंडन-जिथे त्यांनी उच्चशिक्षण घेतले, नागपूर- जिथे त्यांनी दीक्षा घेतली. 26 अलीपूर मार्ग दिल्ली जिथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले आणि मुंबईत जिथे त्यांच्यावर प्रयत्न करत आहोत. यावर्षी 14 एप्रिल रोजी पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावर महू इथे जाण्याचे परमभाग्य मला मिळत आहे. एक उत्तम नागरिक होण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला खूप काही दिले आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे आचरण करुन, एक उत्तम नागरिक होऊन आपण त्यांना फार मोठी श्रद्धांजली अर्पण करु शकतो.

गेल्या काही दिवसात, विक्रम संवत्सराला सुरुवात होईल, नवीन विक्रम संवत्सर येईल. वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते वेगवेगळ्या पद्घतीने साजरे केले जाते. कुणी त्याला नव संवत्सर म्हणतात, कुणी गुढीपाडवा म्हणतात, कुणी वर्ष प्रतिपदा म्हणतात, तर कुणी उगादि म्हणतात. पण हिंदुस्तानातील जवळजवळ सर्वच प्रांतांमध्ये त्याचे महात्म्य आहे.

नववर्षानिमित्त सर्वांना माझ्या अनेक अनेक शुभेच्छा.

आपल्याला माहित आहे की, मागच्या वेळी मी आपल्याला “मन की बात” ऐकण्याविषयी कधीही ऐकण्याविषयी सांगितले होते. सुमारे 20 भाषांमधे आपण मन की बात ऐकू शकता. तुमच्या वेळेनुसार ऐकू शकता. आपल्या मोबाईल फोनवर ऐकू शकता. बस आपण फक्त एक मिस्ड कॉल द्यायचा आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की या सेवेचा लाभ, ती सुरु होऊन जेमतेम महिना झालाय, पण 35 लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. आपणही क्रमांक टिपून घ्या 81908-81908, मी पुन्हा सांगतो 81908-81908. आपण मिस्ड कॉल करा. तुमच्या सोयीनुसार करा.

मन की बात चा आधीचा कार्यक्रम आपल्याला ऐकायचा असेल, तर ते ही आपण ऐकू शकता. आपल्या भाषेत ऐकू शकता. या माध्यमातून आपल्याबरोबर रहायला मला आनंद वाटेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा. अनेक अनेक धन्यवाद.

B.Gokhale/M.Desai