माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार.
आज 26 जुलै आहे आणि आजचा दिवस अगदी विशेष आहे. आज कारगिल विजय दिवस आहे. 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कारगिल युद्धात आपल्या सैन्याने भारताच्या विजयाचा ध्वज फडकावला होता. मित्रहो, कारगीलचे युद्ध ज्या परिस्थितीत झाले, ती परिस्थिती भारताला कधीच विसरता येणार नाही. पाकिस्तानने मोठ-मोठे बेत रचून भारताची भूमी हिसकावून घेण्याचे आणि आपल्या अंतर्गत कलहापासून इतरांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नको ते दुस्साहस केले होते. पाकिस्तान सोबत चांगले संबंध ठेवावे यासाठी तेव्हा भारत प्रयत्नशील होता. पण म्हणतात ना..
“बयरू अकारण सब काहू सों | जो कर हित अनहित ताहू सों ||
अर्थात कारणाशिवाय एखाद्याशी वैर करणे, हा दुष्टांचा स्वभावच असतो. अशा स्वभावाचे लोक, आपले भले करणाऱ्याचे सुद्धा नुकसान व्हावे, अशी इच्छा बाळगतात. म्हणूनच भारताने मैत्रीचा हात पुढे केला असतानाही पाकिस्तानने पाठीत सुरा खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर भारताच्या शूर सैन्याने जो पराक्रम गाजवला, भारताने आपले जे सामर्थ्य दाखवले, ते संपूर्ण जगाने पाहिले. तुम्ही कल्पना करू शकता, उंच डोंगरांवर बसलेला शत्रू आणि खालून लढा देणारे आपले सैन्य. मात्र उंचावर बसलेल्या शत्रुचा विजय झाला नाही, विजय झाला तो भारतीय सैन्याच्या ठाम निर्धाराचा आणि खऱ्या शौर्याचा. मित्रहो, त्यावेळी मला सुद्धा कारगिलला जाण्याचे आणि आपल्या जवानांचे शौर्य पाहण्याचे भाग्य लाभले. तो दिवस माझ्या आयुष्यातल्या सर्वात अनमोल क्षणांपैकी एक आहे. मी बघतो आहे की आज देशभरातले लोक कारगिल विजयाची आठवण काढत आहेत. समाज माध्यमांवर #courageinkargil या हॅशटॅगसह लोक आपल्या वीर जवानांना वंदन करत आहेत, जे हुतात्मा झाले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
मी आज सर्व देशवासियांतर्फे आपल्या या शूर जवानांबरोबरच त्यांच्या वीर मातांना सुद्धा वंदन करतो, ज्यांनी भारतमातेच्या या सुपुत्रांना जन्म दिला. देशातील तरुणांना मी आग्रह करतो की त्यांनी आज दिवसभर कारगिल विजयाशी संबंधित आपल्या शूरवीरांच्या कथा तसेच वीरमातांचा त्याग याबद्दल त्यांनी परस्परांना माहिती द्यावी. मित्रहो, आज मी तुम्हा सगळ्यांना एक विनंती करतो की तुम्ही www.gallantryawards.gov.inया संकेतस्थळाला भेट द्या. या संकेतस्थळावर आपल्याला आपल्या पराक्रमी योद्ध्यांबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल सविस्तर माहिती मिळेल. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत त्याबाबत चर्चा कराल, तेव्हा तुम्हाला त्यातून प्रेरणा मिळेल. तुम्ही नक्कीच या संकेतस्थळाला भेट द्या आणि मी तर म्हणेन की तुम्ही पुन्हा पुन्हा या संकेतस्थळाला भेट द्या.
मित्रहो, कारगिल युद्धाच्यावेळी अटलजींनी लाल किल्ल्यावरून जे सांगितले होते, ते आज सुद्धा आपणा सर्वांसाठी समयोचित आहे. तेव्हा अटलजींनी गांधीजींच्या एका मंत्राची आठवण करून दिली होती. महात्मा गांधीजींचा मंत्र होता की एखाद्याला आपण काय करावे, काय करू नये, हे कळत नसेल, मनस्थिती द्विधा होईल, तेव्हा त्या व्यक्तीने भारतातल्या सर्वात गरीब आणि असहाय व्यक्तीचा विचार केला पाहिजे. आपण जे काही करणार आहोत, त्यामुळे त्या व्यक्तीचे भले होणार का, हा विचार केला पाहिजे. गांधीजींच्या या विचाराच्या पुढे जात अटलजी म्हणाले होते की कारगिल युद्धाने आम्हाला आणखी एक मंत्र दिला आहे. तो म्हणजे, कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी आपण विचार केला पाहिजे की आपण जो निर्णय घेणार आहोत, तो, दुर्गम डोंगरांमध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकाच्या सन्मानाचा आदर करणारा आहे का.. या, अटलजींच्या आवाजात त्यांची ही भावना आपण ऐकूया, समजून घेऊया आणि काळाची मागणी आहे की आपण त्या भावनेचा स्वीकार करूया.
अटलजींचे भाषण आपणा सर्वांच्या लक्षात आहे की गांधीजींनी आपल्याला एक मंत्र दिला होता. ते म्हणाले होते की जेव्हा तुम्हाला काय करावे हे कळणार नाही, मनस्थिती द्विधा होईल, तेव्हा तुम्ही भारतातल्या सर्वात असहाय्य व्यक्तीचा विचार करा आणि स्वतःला विचारा की आपण जे करणार आहोत, त्यामुळे त्या व्यक्तीचे भले होईल का? कारगीलने आम्हाला दुसरा मंत्र दिला आहे , कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी आपण विचार केला पाहिजे की आपण जे करणार आहोत, त्यामुळे दुर्गम डोंगरांमध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकाचा आदर जपला जाणार आहे का?
मित्रहो, युद्ध सुरू असताना आपण जे काही बोलतो, जे काही करतो, त्याचा प्रभाव सीमेवर तैनात सैनिकाच्या मनोबलावर, त्याच्या कुटुंबाच्या मनोबलावर होत असतो. हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच आपले आचरण आपली वागणूक, आपली वाणी, आपले वक्तव्य, आपली मर्यादा आपली उद्दिष्टे आणि आपण जे काही करत आहोत, जे काही बोलत आहोत, त्यामुळे सैनिकांचे मनोबल दृढ होईल, त्यांचा सन्मान वाढेल हा विचार आपण कायम मनात बाळगला पाहिजे. राष्ट्र सर्वोपरी हा मंत्र घेऊन, एकतेच्या सूत्रात बांधलेले देशवासी आपल्या सैनिकांचे मनोगत हजार पटीने वाढवतात. आपल्याकडे म्हटले आहे, ‘संघे शक्ति कलौ युगे’
हे लक्षात न घेता आपण अनेकदा समाज माध्यमांवर अशा काही गोष्टींना प्रोत्साहन देतो, ज्या आपल्या देशाचे मोठे नुकसान करतात. अनेकदा उत्सुकतेपोटी आपण अनेक गोष्टी फॉरवर्ड करतो. असे करणे चुकीचे, आहे हे माहिती असते, तरीही ते करत राहतो. हल्ली युद्ध केवळ देशाच्या सीमेवर लढले जात नाही, देशात सुद्धा अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढले जाते आणि प्रत्येक नागरिकाला, त्या युद्धात आपली भूमिका ठरवावी लागते. आपल्याला सुद्धा देशाच्या सीमेवर दुर्गम परिस्थितीत लढणाऱ्या सैनिकांचे स्मरण ठेवत आपली भूमिका निश्चित करावी लागेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशाने एक होऊन ज्या पद्धतीने कोरोनाशी दोन हात केले आहेत, त्यामुळे अनेकांनी उपस्थित केलेल्या शंका चुकीच्या ठरल्या आहेत. आज आपल्या देशात या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्युंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू झाले आहेत. एका व्यक्तीचा मृत्यू होणे सुद्धा दुःखद असते, हे खरे आहे. मात्र भारत, आपल्या लाखो नागरिकांचे प्राण वाचवण्यात यशस्वी ठरला आहे. मित्रहो, कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. अनेक ठिकाणी तो वेगाने पसरत आहे. आपण खूप जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. सुरुवातीला कोरोना विषाणूचा संसर्ग जितका घातक होता, तितकाच तो आजही घातक आहे. म्हणूनच आपण पुरेपूर खबरदारी घेतली पाहिजे. चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे किंवा रुमालाने चेहरा झाकून घेणे, एकमेकांपासून किमान सहा फुटाचे अंतर राखणे, सतत हात स्वच्छ करणे, कोठेही न थुंकणे आणि आणि स्वच्छता राखणे ही हत्यारेच कोरोनापासून आपले रक्षण करू शकतील. अनेकदा आपल्याला मास्क लावल्यामुळे त्रास होऊ लागतो. खूपदा वाटते की चेहऱ्यावरून मास्क काढून टाकावा. आपण बोलू लागतो. जेव्हा मास्क वापरणे सगळ्यात जास्त गरजेचे असते, तेव्हाच आपण मास्क काढून टाकतो. अशावेळी मी तुम्हाला विनंती करतो की जेव्हा तुम्हाला मास्कचा त्रास वाटू लागेल, तो काढून ठेवावा, असे वाटेल, तेव्हा अगदी क्षणभर त्या डॉक्टरांना आठवून बघा, त्या परिचारिकांना आठवून बघा, आपल्या सर्व कोरोना योद्ध्यांना आठवून बघा. आपले सर्वांचे आयुष्य वाचवण्यासाठी ही सर्व मंडळी कित्येक तास मास्क लावून काम करत आहेत. आठ-दहा तास मास्क वापरत आहेत. त्यांना त्रास होत नसेल का? जरा त्यांना आठवून बघा. तुम्हालाही वाटेल की एक नागरिक म्हणून आपण या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नये आणि इतर कोणालाही करू देऊ नये. एकीकडे आपल्याला कोरोना विरुद्धचे युद्ध सजग राहून आणि सतर्कतेने लढायचे आहे, त्याच वेळी कठोर मेहनत करत उद्योग, नोकरी, शिक्षण, जे काही आपले कर्तव्य आहे, ते पूर्ण करायचे आहे, त्यातही यशाची नवी शिखरे गाठायची आहेत. मित्रहो, कोरोनाच्या काळात आपल्या ग्रामीण क्षेत्राने संपूर्ण देशाला एक नवी दिशा दाखवली आहे. गावातल्या स्थानिक नागरिकांचे, ग्रामपंचायतींचे अनेक चांगले प्रयत्न सातत्याने समोर येत आहेत. जम्मूमध्ये त्रेवा नावाची एक ग्रामपंचायत आहे. बलबीर कौर जी तिथल्या सरपंच आहेत. मला सांगण्यात आले की बलबीर कौरजी यांनी आपल्या पंचायतीमध्ये 30 खाटांचे एक क्वारंटाईन केंद्र तयार केले आहे. पंचायतीत येण्याच्या रस्त्यावर पाण्याची सोय केली आहे. लोकांना सहजपणे हात धुता यावेत, याची सोय केली आहे. इतकेच नाही तर बलबीर कौरजी स्वतः आपल्या खांद्यावर स्प्रे पंप घेऊन, स्वयंसेवकांसोबत संपूर्ण पंचायतीमध्ये जवळपासच्या क्षेत्रात सॅनिटायझेशचे काम सुद्धा करतात. अशाच आणखी एक कश्मीरी महिला सरपंच आहेत गान्दरबलच्या चौंटलीवार येथील जैतुना बेगम. जैतुना बेगम यांनी निर्धार केला की त्यांची ग्रामपंचायत कोरोविरुद्ध लढा देईल आणि उपजीविकेच्या संधी सुद्धा निर्माण करेल. त्यांनी आपल्या संपूर्ण क्षेत्रात मोफत मास्क वाटले, मोफत रेशन वाटले. त्याचबरोबर त्यांनी लोकांना धान्याचे बियाणे सुद्धा वाटले, सफरचंदाची रोपे वाटली, जेणेकरून लोकांना शेती किंवा बागायती करण्यात अडचणी येऊ नये. मित्रहो, कश्मीर मधली आणखी एक प्रेरक घटना सांगतो. इथे अनंतनागमध्ये नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत श्री मोहम्मद इक्बाल. त्यांना आपल्या क्षेत्रामध्ये सॅनिटायझेशनसाठी स्प्रेयरची आवश्यकता होती. त्यांनी माहिती गोळा केली तेव्हा समजले की आवश्यक यंत्र दुसऱ्या शहरातून आणावे लागेल आणि त्यासाठी सहा लाख रुपये मोजावे लागतील. श्री इक्बाल यांनी स्वतः प्रयत्न करून स्प्रेयर यंत्र तयार केले आणि ते सुद्धा अवघ्या पन्नास हजार रुपयांमध्ये. अशी अनेक उदाहरणे आहेत. संपूर्ण देशभरातून, कानाकोपऱ्यातून अशा अनेक प्रेरक घटना रोज समोर येतात. हे सर्व जण अभिनंदनास पात्र आहेत. आव्हान समोर आले, मात्र लोकांनी तितक्यात ताकदीने त्याचा मुकाबला केला.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, योग्य आणि सकारात्मक दृष्टिकोन असला तर संकटाच्या काळातही संकटाचे संधीत रूपांतर करणे शक्य होते. आता आपण कोरोनाच्या काळात सुद्धा पाहतो आहोत की आपल्या देशातील युवकांनी, महिलांनी, आपली बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या बळावर काही नवे प्रयोग सुरू केले आहेत. बिहारमध्ये महिलांच्या अनेक स्वयंसहाय्यता गटांनी मधुबनी चित्रकला असणारे मास्क तयार करायला सुरुवात केली. बघता बघता ते प्रसिद्ध झाले आहेत. हे मधुबनी मास्क आपल्या परंपरेचा प्रचार करत आहेत, त्याचबरोबर लोकांच्या आरोग्याची काळजी घेतानाच रोजगार सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. ईशान्येकडच्या क्षेत्रात बांबू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, हे आपल्याला माहिती आहे. आता याच बांबूचा वापर करून त्रिपुरा, मणिपूर आणि आसाममधल्या कारागीरांनी उच्च दर्जाच्या पाण्याच्या बाटल्या आणि डबे तयार करायला सुरुवात केली आहे. बांबूपासून तयार झालेल्या या वस्तूंचा दर्जा आपण बघाल तर बांबूपासून इतक्या सुंदर बाटल्या तयार करता येऊ शकतात, यावर सहजासहजी विश्वास ठेवता येणार नाही. या बाटल्या पर्यावरण स्नेही सुद्धा आहे. जेव्हा त्या तयार केल्या जातात, तेव्हा सर्वप्रथम कडूनिंब आणि इतर औषधी वनस्पतींसोबत बांबू उकळला जातो, त्यामुळे त्यात औषधी गुणधर्म सुद्धा उतरतात. लहान लहान स्थानिक उत्पादनांना मोठे यश कसे मिळते, याचे एक उदाहरण झारखंडमध्ये सुद्धा बघायला मिळाले. झारखंड मधील बिशनपुर येथे हल्ली 30 पेक्षा जास्त समूह एकत्र येऊन लेमन ग्रास अर्थात गवती चहाची शेती करत आहेत. लेमन ग्रास चार महिन्यात तयार होते आणि त्याच्या तेलाला बाजारात चांगली किंमत मिळते. सध्या त्याला बाजारपेठेत चांगली मागणी सुद्धा आहे.
देशातल्या आणखीन दोन भागाबद्दल मी सांगू इच्छितो. हे भाग परस्परांपासून शेकडो किलोमीटर दूर आहेत, पण ते आपापल्या परीने भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी जरा वेगळ्या प्रकारचे काम करत आहेत. एक भाग आहे लडाख आणि दुसरा आहे कच्छ. लेह आणि लडाखचे नाव घेतले तर सुंदर दऱ्या आणि उंच डोंगर असे निसर्गरम्य दृश्य आपल्या नजरेसमोर येते. ताज्या हवेची झुळूक जाणवू लागते. त्याच वेळी कच्छचे नाव घेतले तर नजरेसमोर येते दूरवर पसरलेले वाळवंट, जिथे एकही झाड दिसत नाही. लडाखमध्ये एक विशिष्ट फळ येते, ज्याचे स्थानिक नाव आहे चुली. आपण या फळाला जर्दाळू या नावाने ओळखतो. हे फळ या क्षेत्रातील अर्थव्यवस्था बदलण्यास सक्षम आहे, मात्र या फळपिकाला पुरवठा साखळी, हवामानातले बदल अशा अनेक आव्हानांचा मुकाबला करावा लागतो. या फळाचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी एका नाविन्यपूर्ण यंत्रणेचा वापर सुरू झाला आहे. ही एक दुहेरी यंत्रणा आहे, जिचे नाव आहे solar apricot dryer and space heater. या यंत्रणेचा वापर करून जर्दाळू तसेच इतर फळे आणि भाज्यांना आवश्यकतेनुसार सुकवता येते आणि त्यासाठी स्वच्छ, आरोग्यदायी पद्धत वापरली जाते. पूर्वीच्या काळी जेव्हा जर्दाळूची फळे शेताच्या जवळपास सुकवली जात, तेव्हा त्यातली अनेक फळे वाया जात असत, त्याचबरोबर धूळ आणि पावसाच्या पाण्यामुळे फळांचा दर्जा सुद्धा चांगला राहत नसे. आता वळू या कच्छकडे. कच्छमधले शेतकरी हल्ली ड्रॅगन फ्रुटची शेती करण्यासाठी कौतुकास्पद प्रयत्न करत आहेत. अनेक लोक हे ऐकल्यानंतर आश्चर्य व्यक्त करतात, कच्छ आणि ड्रॅगन फ्रुट? मात्र तिथले अनेक शेतकरी सध्या हेच काम करत आहेत. फळाची गुणवत्ता टिकवून कमी जमिनीत जास्त उत्पादन घेण्यासंदर्भात अनेक नवीन प्रयोग केले जात आहेत. मला सांगण्यात आले आहे की ड्रॅगन फ्रुटची लोकप्रियता सातत्याने वाढते आहे. विशेषतः न्याहारीसाठी हे फळ वापरले जाते आहे. देशाला ड्रॅगन फ्रुटची आयात करावी लागू नये, असा संकल्प कच्छच्या शेतकऱ्यांनी केला आहे. हीच खरी आत्मनिर्भरता आहे.
मित्रहो, जेव्हा आपण काही नवीन करण्याचा विचार करतो, नावीन्यपूर्ण विचार करतो, तेव्हाच अशी कामे शक्य होतात, ज्यांची एरवी कोणी कल्पनाही केली नसेल. आता बिहारमधले काही युवकच बघा ना. आधी ते सगळेच नोकरी करत होते. एके दिवशी त्यांनी ठरवले की मोत्यांची शेती करायची. त्यांच्या भागात लोकांना याबाबत फारशी माहिती नव्हती. पण या लोकांनी आधी सगळी माहिती जमवली. जयपूर आणि भुवनेश्वर येथे जाऊन प्रशिक्षण घेतले आणि आपल्याच गावात मोत्यांची शेती सुरू केली. आज ते स्वतः यातून चांगली कमाई करत आहेत, त्याचबरोबर त्यांनी मुजफ्फरपुर, बेगूसराय आणि पाटणा येथे इतर राज्यांतून परतलेल्या प्रवासी मजुरांना याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे अनेक लोकांसाठी आत्मनिर्भरतेची द्वारे खुली झाली आहेत.
मित्रहो, येत्या लवकरच रक्षाबंधनचा सण येतो आहे. अलिकडे मी बघतो आहे की अनेक लोक आणि संस्था या वर्षी रक्षाबंधन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची मोहीम राबवत आहेत. अनेक लोक या सणाला vocal for local सोबत जोडत आहेत आणि हे योग्य सुद्धा आहे. आमचे सण आमच्या समाजाच्या, आपल्या घराच्या जवळपासच्या एखाद्या व्यक्तीचा उद्योग विस्तारणारे असतील, त्यांचाही सण आनंदात साजरा होईल, अशावेळी त्या सणाचा आनंद आणखी वाढतो. सर्व देशवासियांना रक्षाबंधनाच्या अनेक शुभेच्छा.
मित्रहो, 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिवस आहे. भारताचा हातमाग, आपली स्वतःची हस्तकला. या कलेत शेकडो वर्षांचा गौरवशाली इतिहास सामावलेला आहे. आपण सर्व भारतीयांनी हातमाग आणि हस्तकलांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना त्याबद्दल माहिती दिली पाहिजे. भारताचा हातमाग आणि हस्तकला किती समृद्ध आहे, त्यात किती वैविध्य आहे, हे जगातील जितक्या जास्त लोकांना कळेल, तितकाच त्याचा लाभ आमच्या स्थानिक कारागिरांना आणि विणकरांना मिळेल.
मित्रहो, विशेषतः माझ्या युवा सहकाऱ्यांनो, आपला देश बदलतो आहे. कसा बदलतो आहे? किती वेगाने बदलतो आहे? कोणत्या कोणत्या क्षेत्रात बदलतो आहे? सकारात्मक दृष्टीकोनासह एक नजर फिरवली तर आपण स्वतःच आश्चर्यचकित होऊ. एक काळ असा होता जेव्हा खेळापासून इतर सर्वच क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त लोक मोठ्या शहरांतले असत किंवा प्रतिष्ठित कुटुंबातले असत किंवा प्रसिद्ध शाळा – महाविद्यालयातले असत. आता देश बदलतो आहे. गावांमधून, लहान शहरांमधून सर्वसामान्य कुटुंबात मधून आमचा युवा वर्ग पुढे येत आहेत. यशाची नवी शिखरे कवेत घेत आहे. ही सर्व मंडळी संकटांचा सामना करत, नवीन स्वप्ने घेऊन आगेकूच करत आहेत.
अलीकडेच परीक्षांचे निकाल लागले, त्यात सुद्धा हे दिसून आले. आज मन की बात कार्यक्रमात आपण अशाच काही प्रतिभावंत मुला-मुलींसोबत संवाद साधूया. अशीच एक प्रतिभावंत मुलगी आहे, कृतिका नांदल. कृतिकाजी हरियाणा मधील पानिपत येथील रहिवासी आहेत.
मोदी जी – हॅलो, कृतिका जी नमस्ते.
कृतिका – नमस्ते सर.
मोदी जी – खूप चांगले गुण मिळाले आहेत तुम्हाला, तुमचे मनापासून अभिनंदन.
कृतिका – धन्यवाद सर.
मोदी जी – तुम्ही आता लोकांशी फोनवर बोलून सुद्धा थकून जात असणार, किती तरी लोकांचे फोन येत असतील.
कृतिका – हो सर.
मोदी जी – आणि शुभेच्छा देणाऱ्या लोकांनाही, ते तुम्हाला ओळखतात, याचा अभिमान वाटत असणार. तुम्हाला कसे वाटते आहे?
कृतिका – सर, खूप छान वाटते आहे. आई-वडीलांना अभिमान वाटतो, याचा मलाही अभिमान वाटतो आहे.
मोदी जी – बरं, मला सांगा, तुम्हाला कोणापासून प्रेरणा मिळते?
कृतिका – सर, माझी आईच माझी प्रेरणा आहे.
मोदी जी – अरे वा, तुम्ही तुमच्या आईकडून काय शिकता..
कृतिका – सर, तिने तिच्या आयुष्यात अनेक हाल अपेष्टा सोसल्या पण ती खूप ठाम आणि सक्षम आहे. तिला पाहून मला प्रेरणा मिळते की आपणही तिच्यासारखे झाले पाहिजे.
मोदी जी – आईचे शिक्षण किती झाले आहे..
कृतिका – सर, BA पर्यंत शिक्षण झाले आहे.
मोदी जी – BA केले आहे
कृतिका – हो सर
मोदी जी – छान, मग आई तुम्हाला शिकवत सुद्धा असेल.
कृतिका – हो सर. सगळ्या चालीरितीसुद्धा तीच शिकवते.
मोदी जी – मग तर रागावत सुद्धा असेल.
कृतिका – हो सर, ती रागावते सुद्धा.
मोदी जी – मला सांग बाळा, तुला पुढे काय करायची इच्छा आहे ?
कृतिका – सर मला डॉक्टर व्हायचे आहे.
मोदी जी – अरे वा !
कृतिका – MBBS
मोदी जी – बघ बाळा, डॉक्टर व्हायचे म्हणजे सोपे काम नाही.
कृतिका – हो सर.
मोदी जी – Degree तर तू मिळवशील कारण तू हुशार मुलगी आहेस. पण डॉक्टरचे आयुष्य समाजासाठी समर्पित असते.
कृतिका – हो सर.
मोदी जी – डॉक्टरला रात्री कधीच शांतपणे झोपता येत नाही. कधी रूग्णांचा फोन येतो तर कधी हॉस्पीटलमधून फोन येतो, मग धावपळ करावी लागते. म्हणजे अगदी बारा महिने, चोवीस तास डॉक्टर लोकांची सेवा करत असतात.
कृतिका – हो सर.
मोदी जी – आणि धोका सुद्धा आहे त्यात. हल्ली वेगवेगळे आजार समोर येत आहेत. डॉक्टर साठी तर धोका जास्त वाढतो.
कृतिका – हो सर
मोदी जी – अच्छा कृतिका, तुमचे हरयाणा तर अवघ्या भारताला क्रीडा प्रकारांमध्ये प्रेरणा देणारे, प्रोत्साहन देणारे राज्य आहे.
कृतिका – हो सर.
मोदी जी – मग तुम्ही खेळ खेळता की नाही? खेळ आवडतात की नाही.
कृतिका – सर, शाळेत असताना मी बास्केटबाल खेळत असे.
मोदी जी – बरं, किती उंच आहात तुम्ही, खूप उंच आहात का..
कृतिका – नाही सर. पाच फूट दोन इंच आहे उंची…
मोदी जी – अच्छा, तरीही तुम्हाला खेळांची आवड आहे ?
कृतिका – सर, ती तर फक्त आवड आहे. खेळते आवडीने, इतकंच..
मोदी जी – छान छान, चला कृतिकाजी, तुमच्या आईला माझा नमस्कार सांगा. त्यांनी तुम्हाला योग्य प्रकारे वाढवलं आहे. आपलं जीवन योग्य प्रकारे घडवलं आहे. आपल्या आईला नमस्कार आणि तुमचे मनापासून अभिनंदन, अनेकानेक शुभेच्छा.
कृतिका – धन्यवाद सर.
चला, आता जाऊया केरळमध्ये एर्नाकुलम मध्ये. आता आपण केरळच्या युवकासोबत गप्पा करूया.
मोदी जी – हॅलो
विनायक – हॅलो सर नमस्कार.
मोदी जी – विनायक, अभिनंदन.
विनायक – हो. धन्यवाद सर.
मोदी जी – शाबाश विनायक, शाबाश
विनायक – हो. धन्यवाद सर.
मोदी जी – How is the जोश
विनायक – High sir
मोदी जी – तुम्ही खेळ खेळता का?
विनायक – बॅडमिंटन.
मोदी जी – बॅडमिंटन
विनायक – हो सर.
मोदी जी – शाळेत की तुम्हाला प्रशिक्षण घेण्याची संधीही मिळाली?
विनायक – नाही सर, शाळेतच थोडेफार प्रशिक्षण मिळाले.
मोदी जी – हम्म
विनायक – आमच्या शिक्षकांकडून.
मोदी जी – हम्म
विनायक – तिथून आम्हाला बाहेर खेळायचीही संधी मिळाली.
मोदी जी – अरे व्वा..
विनायक – शाळेकडूनच
मोदी जी – तुम्ही आजवर किती राज्ये पाहिली आहेत ?
विनायक – मी फक्त केरळ आणि तामीळनाडू ही दोनच राज्ये पाहिली आहेत.
मोदी जी – फक्त केरळ आणि तामीळनाडू
विनायक – हो सर
मोदी जी – तुम्हाला दिल्ली पाहायची आहे का ?
विनायक – हो सर, पुढच्या उच्च शिक्षणासाठी मी दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
मोदी जी – वाह्, तर तुम्ही दिल्लीत येत आहात.
विनायक – हो सर.
मोदी जी – मला सांगा, ज्या विद्यार्थ्यांनी भविष्यात चांगले गुण मिळवायचे आहेत त्यांना तुम्ही काही संदेश देऊ इच्छितो का..
विनायक – कठोर मेहनत आणि वेळेचे व्यवस्थापन
मोदी जी – तर वेळेचे चांगले व्यवस्थापन
विनायक – हो सर..
मोदी जी – विनायक तुमचे छंद काय आहेत..
विनायक – बॅडमिंटन आणि नौकानयन
मोदी जी – आणि तुम्ही समाज माध्यमांवर सुद्धा सक्रिय आहात …
विनायक – नाही सर आम्हाला शाळेत इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा गॅजेट्स वापरण्याची परवानगी नाही.
मोदी जी – अरे वा, तुम्ही सुदैवी आहात.
विनायक – हो सर.
मोदी जी – छान विनायक, पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुम्हाला अनेक शुभेच्छा.
विनायक – धन्यवाद सर.
चला तर मंडळी, आता जाऊ या उत्तर प्रदेशात. उत्तर प्रदेशात अमरोहा इथल्या श्री उस्मान सैफी यांच्यासोबत गप्पा मारूया.
मोदी जी – हॅलो उस्मान, तुमचं मनापासून अभिनंदन.
उस्मान – धन्यवाद सर.
मोदी जी – अच्छा उस्मान मला सांगा, तुम्हाला या परीक्षेत अपेक्षेप्रमाणेच गुण मिळाले की कमी गुण मिळाले.
उस्मान – नाही सर, अपेक्षेप्रमाणेच गुण मिळाले. माझे आई-वडीलसुद्धा खुश आहेत.
मोदी जी – अरे वा. मला सांगा, तुमच्या कुटुंबात तुम्हीच इतके हुषार आहात की तुमचे भाऊसुद्धा हुषार आहेत.
उस्मान – नाही सर, मीच आहे. माझा भाऊ जरा मस्तीखोर आहे.
मोदी जी – अच्छा
उस्मान – पण माझ्यासाठी तो खुश असतो.
मोदी जी – छान, छान. अच्छा, तुम्ही अभ्यास करत होता, तेव्हा तुमचा आवडता विषय कोणता होता?
उस्मान – गणित
मोदी जी – अरे वा ! तर गणिताची आवड होती, कोणत्या शिक्षकांनी तुम्हाला प्रेरित केले?
उस्मान – सर, आमचे गणित विषयाचे एक शिक्षक आहेत, रजत सर. त्यांनी मला प्रेरणा दिली. ते खूप छान शिकवतात. माझा गणित विषय आधीपासून चांगला होता आणि तो खूप छान विषय आहे.
मोदी जी – हम्म
उस्मान – गणिते करत राहू, तशी आवड वाढत जाते. म्हणून तो माझा आवडता विषय आहे.
मोदी जी – हो, हो. तुम्हाला माहिती आहे का, वेदिक गणिताचे ऑनलाईन क्लास चालवले जातात…
उस्मान – हो सर.
मोदी जी – तुम्ही शिकायचा प्रयत्न केला आहे का?
उस्मान – नाही सर, अजून तरी नाही
मोदी जी – नक्की बघा. तुमच्या अनेक मित्रांना वाटेल की तुम्ही जादूगार आहात. कारण संगणकाच्या वेगाने तुम्हाला आकडेमोड करता येईल. वेदिक गणिताची तंत्रे खूपच सोपी आहेत आणि सध्या हे वर्ग ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहेत.
उस्मान – हो सर
मोदी जी – तुम्हाला गणिताची आवड आहे, तर तुम्ही नवनव्या गोष्टी तुम्हाला शिकता येतील.
उस्मान – हो सर
मोदी जी – अच्छा उस्मान, तुम्ही मोकळ्या वेळात काय करता ?
उस्मान – मोकळ्या वेळात मी थोडंफार लेखन करतो सर. मला लिखाणाची आवड आहे…
मोदी जी – अरे वा ! म्हणजे तुम्हाला गणिताबरोबर साहित्याची सुद्धा आवड आहे.
उस्मान – हो सर
मोदी जी – काय लिहिता तुम्ही? कविता लिहिता, शायरी करता…
उस्मान – रोजच्या घडामोडींवर आधारित कोणत्याही विषयावर लिहित असतो.
मोदी जी – हो हो
उस्मान – नवनवी माहिती मिळत असते, GST, नोटबंदी असे बरेच काही..
मोदी जी – अरे वा ! आता कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याबद्दल काय विचार आहे?
उस्मान – कॉलेजबद्दल सांगायचं तर सर मी JEE मुख्य परीक्षेचा first attempt clear केला आहे आणि आता सप्टेंबर महिन्यात second attempt देणार आहे. आधी आयआयटीमधून Bachelor पदवी घ्यायची आणि नंतर नागरी सेवेतून भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हावे, असा माझा विचार आहे.
मोदी जी – अरे वा ! मला सांगा, तुम्हाला तंत्रज्ञानाचीही आवड आहे का?
उस्मान – हो सर. म्हणून मी माहिती तंत्रज्ञान हा विषय निवडला आहे, first time best IIT साठी .
मोदी जी – छान. चला उस्मान, माझ्यातर्फे तुम्हाला अनेक शुभकामना. तुमचा भाऊ मस्तीखोर आहे, म्हणजे तुमचा वेळ छान जात असणार. तुमच्या आई-बाबांनाही माझा नमस्कार सांगा. त्यांनी तुम्हाला ही संधी दिली आहे, तुमच्या स्वप्नांना बळ दिलं आहे. अभ्यासाबरोबरच तुम्ही ताज्या घडामोडींचाही अभ्यास करता, लिखाणही करता याचा मला आनंद वाटला. लक्षात घ्या, लेखन केल्याचा फायदा असा होतो की तुमच्या विचारांना धार येते. लिखाण केल्याचे खूप फायदे आहेत. तुम्हाला माझ्यातर्फे अनेकानेक शुभेच्छा.
उस्मान – धन्यवाद सर
चला मंडळी, पुन्हा एकदा खाली दक्षिणेकडे वळू या. तमिळनाडू, नामाक्कलमधल्या कणिकासोबत गप्पा मारू या. कणिकासोबत गप्पा मारणे अगदी प्रेरक आहे.
मोदी जी : कणिका जी, वणक्कम
कणिका : वणक्कम सर
मोदी जी : कशा आहात तुम्ही
कणिका : छान सर
मोदी जी : सर्वात आधी तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो.
कणिका : धन्यवाद सर
मोदी जी : जेव्हा मी नामाक्कलबद्दल ऐकतो तेव्हा मला तिथल्या अंजनेयार मंदिराची आठवण येते.
कणिका : हो सर.
मोदी जी : आता मला तुमच्याशी मारलेल्या गप्पाही आठवत आहेत.
कणिका : हो सर.
मोदी जी : तर तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन.
कणिका : धन्यवाद सर.
मोदी जी : या परीक्षेसाठी तुम्ही नक्कीच भरपूर अभ्यास केला असणार. तुमचा परीक्षेसाठी तयारीचा अनुभव कसा होता..
कणिका : सर, मी अगदी सुरूवातीपासून भरपूर मेहनत केली. या निकालाची मी अपेक्षा केली नव्हती पण मी चांगल्या प्रकारे पेपर सोडवले आणि माझा निकाल चांगला लागला.
मोदी जी : तुम्हाला किती गुणांची अपेक्षा होती ?
कणिका : मला वाटले होते 485 किंवा 486 मिळतील…
मोदी जी : आणि आता
कणिका : 490
मोदी जी : मग, तुमच्या कुटुंबियांची आणि शिक्षकांनी भावना काय होती?
कणिका : सर, त्यांना खूप आनंद झाला आणि खूप अभिमान वाटला.
मोदी जी : तुमचा आवडता विषय कोणता आहे.
कणिका : गणित
मोदी जी : ओह्! आणि भविष्यात तुम्ही काय करायचे ठरवले आहे?
कणिका : सर, शक्य झाले तर मला AFMC मध्ये डॉक्टर व्हायचे आहे.
मोदी जी : आणि तुमच्या घरातले कोणी वैद्यकीय क्षेत्रात आहेत का?
कणिका : नाही सर, माझे वडील वाहनचालक आहेत पण माझी बहीण MBBS करते आहे.
मोदी जी : अरे वा ! सर्वात आधी मी तुमच्या वडीलांना अभिवादन करतो, जे तुमची आणि तुमच्या बहिणीची उत्तम प्रकारे काळजी घेत आहेत. ते खूपच चांगले काम करत आहेत.
कणिका : हो सर
मोदी जी : आणि ते सर्वांसाठी प्रेरक आहेत.
कणिका : हो सर
मोदी जी : तुमचे वडील तुमची बहीण आणि तुमच्या कुटुंबियांचे मनापासून अभिनंदन.
कणिका : धन्यवाद सर.
मित्रहो, असे आणखी अनेक युवा मित्र आहेत, ज्यांच्या हिंमतीच्या आणि यशाच्या कथा आम्हाला सतत प्रेरणा देतात. माझी इच्छा होती की जास्तीत जास्त युवकांशी गप्पा मारण्याची संधी मिळावी. मात्र वेळेची मर्यादा लक्षात घ्यावी लागते. मी सर्व युवा सहकाऱ्यांना आग्रह करतो की अवघ्या देशाला प्रेरित करणारी त्यांची कहाणी त्यांनी स्वतः सर्वांना सांगावी.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, साता समुद्रा पलीकडे, भारतापासून हजारो मैल दूर एक लहानसा देश आहे, सुरिनाम. भारत आणि सुरिनाम यांच्यात निकटचे संबंध आहेत. शंभर वर्षांपेक्षा जास्त काळापूर्वी भारतातील लोक तिथे गेले होते आणि ते तिथेच स्थायिक झाले. त्यांची चौथी- पाचवी पिढी सध्या तिथे आहे. आज सुरिनाम मधील एक चतुर्थांश पेक्षा जास्त लोक भारतीय वंशाचे आहे. तुम्हाला माहिती आहे का की तिथे सर्रास बोलली जाणारी ही सरनामी ही भोजपुरीचीच एक बोली भाषा आहे. या सांस्कृतिक संबंधांबाबत आम्हा भारतीयांना अभिमान वाटतो.
अलीकडेच श्री चन्द्रिका प्रसाद संतोखी सुरिनामचे नवे राष्ट्रपती झाले आहेत. ते भारताचे मित्र आहेत. 2018 साली आयोजित Person of Indian origin – Parliamentary conference या परिषदेत ते सहभागी झाले होते. श्री चन्द्रिका प्रसाद संतोखी जी यांनी शपथ घेताना सुरुवातीला वेदमंत्रांचा उच्चार केला होता, जे संस्कृत भाषेत होते. त्यांनी वेदांचा उल्लेख केला आणि ओम शांती शांती असे म्हणत आपली शपथ पूर्ण केली. आपल्या हातात वेद घेऊन ते म्हणाले की, मी चन्द्रिका प्रसाद संतोखी, आणि पुढे.. शपथ घेताना ते पुढे काय म्हणाले.. त्यांनी वेदातील एका मंत्राचा उच्चार केला. ते म्हणाले,
ॐ अग्ने व्रतपते व्रतं चरिष्यामि तच्छकेयम तन्मे राध्यताम |
इदमहमनृतात सत्यमुपैमि ||
अर्थात, हे अग्नी, संकल्पाच्या देवते, मी एक प्रतिज्ञा करत आहे. मला त्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य प्रदान कर. मला असत्यापासून दूर राहण्याचा आणि सत्याच्या दिशेने जाण्याचा आशीर्वाद प्रदान कर. खरोखरच ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे.
मी श्री चंद्रिका प्रसाद संतोखी यांचे अभिनंदन करतो आणि आपल्या देशाची सेवा करण्यासाठी 130 कोटी भारतीयांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या पावसाळा सुरू आहे. मागच्या वेळी सुद्धा मी आपल्याला सांगितले होते की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अस्वच्छता आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. रुग्णालयांमध्ये गर्दी वाढते, त्यामुळे आपण सर्वांनी स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे, आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करत रहावे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपण इतर आजारांपासून दूर राहिले पाहिजे. रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे.
मित्रहो, पावसाळ्याच्या ऋतूमध्ये देशाचा एक फार मोठा भाग पुराच्या संकटाचा सामना करत आहे. बिहार, आसाम सारख्या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पुरामुळे खूप समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणजे एकीकडे कोरोना आहे तर दुसरीकडे हे आणखी एक आव्हान आहे. अशा वेळी सर्व सरकारे, एन डी आर एफ ची पथके, राज्यांची आपत्ती नियंत्रण पथके, स्वयंसेवी संस्था सर्वच एकत्र आले आहेत. सगळेजण एकत्र येऊन हरप्रकारे मदत आणि बचावाचे काम करत आहेत. या संकटाचा तडाखा बसलेल्या लोकांसोबत संपूर्ण देश उभा आहे.
मित्रहो, पुढच्या वेळी जेव्हा आपण मन की बात मध्ये भेटू, त्याआधीच 15 ऑगस्ट येत आहे. या वर्षी 15 ऑगस्ट सुद्धा वेगळ्या परिस्थितीत साजरा केला जाईल, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या या साथीच्या काळात साजरा केला जाईल.
माझ्या युवा सहकाऱ्यांना, देशवासीयांना मी विनंती करतो की स्वातंत्र्यदिनी आपण या साथीच्या रोगापासून मुक्त होण्याचा संकल्प करू, आत्मनिर्भर भारताचा संकल्प करू, काही नवीन शिकण्याचा आणि शिकविण्याचा संकल्प करू, आपल्या कर्तव्यांचे पालन करण्याचा संकल्प करू. राष्ट्र निर्माणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या अनेक महान विभूतींच्या तपस्येमुळे आज आपला देश या उंचीपर्यंत पोहोचला आहे. अशा महान विभूतिंपैकी एक आहेत, लोकमान्य टिळक. येत्या 1 ऑगस्ट 2020 रोजी लोकमान्य टिळकांची शंभरावी पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळकांचे अवघे आयुष्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक आहे. आपल्या सर्वांना त्यांच्याकडून बरेच काही शिकता येईल.
पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू, तेव्हा खूप गप्पा मारू यां, एकत्र मिळून काही नव्या गोष्टी शिकू या आणि त्या सर्वांना सांगू या. आपण सर्वांनी आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि निरोगी रहा. सर्व देशवासियांना येणाऱ्या सर्व सणानिमित्त अनेकानेक शुभेच्छा. अनेकानेक धन्यवाद..
M.C/AIR/P.M
Today, 26th July is a very special day for every Indian. #CourageInKargil pic.twitter.com/pSXmuddxjt
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
Thanks to the courage of our armed forces, India showed great strength in Kargil. #CourageInKargil pic.twitter.com/O0IWO7BThL
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
PM @narendramodi recalls his own visit to Kargil.
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
He also highlights how people have been talking about the courage of the Indian forces. #CourageInKargil #MannKiBaat pic.twitter.com/sS3SJ1iUe5
An appeal to every Indian... #CourageInKargil #MannKiBaat pic.twitter.com/SiLzgVEAw9
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
Recalling the noble thoughts of Bapu and the words of beloved Atal Ji during his Red Fort address in 1999. #MannKiBaat pic.twitter.com/7pZIvvDLcX
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
Let us do everything to further national unity. #MannKiBaat pic.twitter.com/dNFkvyoQp1
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
We have to keep fighting the COVID-19 global pandemic. #MannKiBaat pic.twitter.com/U7fIV45yk7
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
Social distancing.
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
Wearing masks.
The focus on these must continue. #MannKiBaat pic.twitter.com/vhzJOjGtCs
Sometimes, do you feel tired of wearing a mask?
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
When you do, think of our COVID warriors and their exemplary efforts. #MannKiBaat pic.twitter.com/u4oFgwfiGe
We are seeing how Madhubani masks are becoming increasingly popular across India. #MannKiBaat pic.twitter.com/iyXvJ3GQd4
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
Inspiring efforts in the Northeast. #MannKiBaat pic.twitter.com/9hTinMyZPp
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
Ladakh and Kutch are making commendable efforts towards building an Aatmanirbhar Bharat. #MannKiBaat pic.twitter.com/aC5HZj5cAg
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
Being vocal for local. #MannKiBaat pic.twitter.com/Auxy4GxZTK
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
India is changing.
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
There was a time, when whether in sports or other sectors, most people were either from big cities or from famous families or from well-known schools or colleges.
Now, it is very different: PM @narendramodi #MannKiBaat
Our youth are coming forward from villages, from small towns and from ordinary families. New heights of success are being scaled. These people are moving forward in the midst of crises, fostering new dreams. We see this in the results of the board exams too: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
Here is something interesting from Suriname... #MannKiBaat pic.twitter.com/NVcQJtiq4r
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
Our solidarity with all those affected by floods and heavy rainfall across India.
— PMO India (@PMOIndia) July 26, 2020
Centre, State Governments, local administrations, NDRF and social organisations are working to provide all possible assistance to those affected. #MannKiBaat pic.twitter.com/zwtXIpIfoi