‘मन की बात’ कार्यक्रमाने 2020 या वर्षातला अर्धा प्रवास आता पूर्ण केला आहे.या काळात आपण अनेक विषयांवर चर्चा केली.सध्या जो जागतिक साथीचा आजार पसरला आहे, मानवजातीवर जे संकट आलं आहे, त्यावर आपली चर्चा जरा जास्त झाली, आणि ते स्वाभाविकही आहे. मात्र, आजकाल मी एक बघतोय, लोकांच्या चर्चेमध्ये सारखा एकच विषय असतो,की हे वर्ष आता कधी संपणार? कोणी कोणाला फोन करत असेल, तर त्या फोनवर देखील, याच विषयाने बोलण्याची सुरुवात होते, की हे वर्ष लवकर संपत का नाहीये? कोणी काही लिहित असेल, मित्रांशी गप्पा मारत असेल, तर तेव्हाही लोक म्हणतात, हे वर्ष काही चांगलं नाही.कोणी म्हणतो, 2020 हे वर्ष शुभ नाही आहे. बस! लोकांना असंच वाटतय की काहीही करुन हे वर्ष लवकरात लवकर संपून जावं.
मित्रांनो,
कधी कधी मी विचार करतो, की असं काय होतंय, होऊ शकतं ज्यामुळे अशा प्रकारची चर्चा लोक करत आहेत, त्यामागे काय कारणं असतील? सहा-सात महिन्यांपूर्वी, आपल्याला तरी कुठे कल्पना होती, की कोरोनासारखं संकट येईल आणि त्या विरुद्धची लढाई इतकी दीर्घकाळ चालू राहील. हे संकट तर कायम आहेच, मात्र त्यासोबत देशात सतत नवनवी आव्हानं समोर येत आहेत. आता काही दिवसांपूर्वी देशाच्या पूर्व किनाऱ्यावर ‘अम्फान‘ चक्रीवादळ आले होते, तर पश्चिम किनाऱ्यावर ‘निसर्ग‘ चक्रीवादळ धडकले होते. कितीतीरी राज्यात आपले शेतकरी टोळधाडीच्या हल्ल्यामुळे हैराण झाले आहेत. हे कमी कि काय, म्हणून देशाच्या छोट्या-मोठ्या भागात सुरु असलेले भूकंप काही थांबण्याचं नाव घेत नाहीत.या सगळ्यामध्ये आपल्या शेजारी राष्ट्रांकडून ज्या काही कुरापती सुरु आहेत, त्या आव्हानांचाही देश सामना करतो आहे.
खरच! एकाच वेळी इतकी सगळी संकटं, या प्रकारची संकटं खूप कमी ऐकायला-बघायला मिळतात. सध्या तर अशी स्थिती आहे, कि एखादी छोटी-मोठी घटना घडली, तरीही, लोक त्याचा संदर्भ या आव्हानांशी जोडतात.
मित्रांनो,
अडचणी येतात, संकटे येतात, मात्र प्रश्न हा आहे, की आपत्तींमुळे आपण 2020 हे वर्षच वाईट आहे, असं म्हणणार का? आधीचे सहा महिने जसे जाताहेत, त्या कारणामुळे संपूर्ण वर्षच वाईट जाईल, असा विचार करणं योग्य आहे का?
नाही! माझ्या प्रिय देशबांधवांनो, बिलकूल नाही. एका वर्षात एक आव्हान येऊ द्या नाहीतर पन्नास आव्हानं येऊ द्या, केवळ संकटांच्या कमी-जास्त संख्येमुळे ते संपूर्ण वर्षच वाईट ठरत नाही. भारताचा इतिहासच आव्हानं आणि संकटातून तावून-सुलाखून अधिक झळाळून बाहेर पडण्याचा आहे. शेकडो वर्षे, अनेक आक्रमकांनी भारतावर आक्रमणं केलीत, भारताला संकटात लोटलं, लोकांना वाटलं होतं की भारताची संरचनाच तेव्हा नष्ट होईल, भारताची संस्कृतीच संपून जाईल. मात्र, या संकटांमधूनही भारत अधिकच भव्य आणि सक्षम होत बाहेर पडला.
मित्रांनो,
आपल्याकडे म्हटलं जातं- सृजन शाश्वत आहे, सृजन निरंतर प्रक्रिया आहे.
मला एका गीताच्या ओळी आठवतात —
यह कल-कल छल-छल बहती, क्या कहती गंगा धारा ?
युग-युग से बहता आता, यह पुण्य प्रवाह हमारा I
त्याच गाण्यात पुढच्या ओळी आहेत—
क्या उसको रोक सकेंगे, मिटनेवाले मिट जाएं,
कंकड़-पत्थर की हस्ती, क्या बाधा बनकर आए I
भारतातही, जिथे एका बाजूला मोठमोठी संकटे येत गेली, त्याचवेळी सर्व अडचणींना दूर करत अनेक गोष्टींची निर्मिती देखील झाली.
नवे साहित्य रचले गेले, नवे संशोधन झाले, नवे सिद्धांत मांडले गेले. म्हणजेच संकटाच्या काळातही, प्रत्येक क्षेत्रात सृजनाची प्रक्रिया सुरूच राहिली आणि आपली संस्कृती अधिकाधिक बहरत-फुलत राहिली, देश पुढे जात गेला. भारताने नेहमीच, संकटांचा उपयोग यशाची शिडी चढण्यासाठी केला आहे. याच भावनेनं आजही आपल्याला या संकटांमधून मार्ग काढत पुढे जायचे आहे. आपणही असाच विचार करुन पुढे आलात, 130 कोटी देशबांधवांनी पुढे पाउल टाकलं तर हेच वर्ष, देशासाठी नवनवे विक्रम रचणारे वर्ष सिध्द होईल. याच वर्षात, देश नवी उदिष्ट प्राप्त करेल, नवी भरारी घेईल, नव्या उंचीवर पोहोचेल. मला माझ्या 130 कोटी देशबांधवांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे, तुम्हा सर्वांवर विश्वास आहे, देशाच्या महान परंपरेवर विश्वास आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
संकट कितीही मोठे का असेना, भारताचे संस्कार, निस्वार्थ भावनेनं सेवा करण्याची प्रेरणा देतात. भारताने ज्या प्रकारे या कठीण काळातही जगाला मदत केली, त्यातून आज शांतता आणि विकासाची भारताची भूमिका अधिक दृढ आणि भक्कम झाली आहे. जगाने, या काळात भारताच्या विश्वबंधुत्वाच्या भावनेचीही अनुभूती घेतली आणि त्याचसोबत, आपले सार्वभौमत्व आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी भारताची ताकद आणि भारताची कटिबद्धता देखील आपण पहिली आहे. लद्दाख इथं, भारताच्या भूमीकडे,वाकड्या नजरेने, बघणाऱ्या लोकांना चोख उत्तर मिळाले आहे. भारताला मैत्री जपणे माहित आहे, तर डोळ्याला डोळा भिडवून बघणे आणि योग्य उत्तर देणे, हेही माहित आहे.
आपल्या वीर जवानांनी दाखवून दिले आहे की ते कधीही भारतमातेच्या सन्मानाला काहीही झळ पोहचू देणार नाहीत.
मित्रांनो,
लद्दाख इथं आपले जे वीर जवान हुतात्मा झाले, त्यांच्या शौर्यापुढे आज संपूर्ण देश नमन करतो आहे, श्रद्धांजली देतो आहे, संपूर्ण देश त्यांच्यासमोर कृतज्ञ आहे, नतमस्तक आहे. या वीरांच्या कुटुंबियांप्रमाणेच, प्रत्येक भारतीयाच्या मनात, त्यांना गमावल्याचे दुःख आहे.आपल्या वीर सुपुत्रांच्या बलिदानाबद्दल, त्यांच्या नातेवाईकांच्या मनात जी अभिमानाची भावना आहे, देशाप्रती जो सन्मान आहे—तीच तर देशाची खरी ताकद आहे.
आपण बघितलं असेल, ज्यांच्या मुलांना हे वीरमरण आलं त्यांचे माता-पिता, आपल्या दुसऱ्या मुलांनाही, घरातल्या इतर मुलांनाही, सैन्यात दाखल करण्याविषयी बोलत आहेत. बिहारला राहणारे, शहीद कुंदन कुमार यांचे शब्द तर माझ्या कानात आजही घुमताहेत. ते म्हणत होते, ते आपल्या नातवालाही देशाच्या रक्षणासाठी, सैन्यात पाठवतील. हीच हिंमत प्रत्येक शहीदाच्या कुटुंबात आहे. खरंच, या कुटुंबियांचा त्याग वंदनीय आहे. भारतमातेच्या रक्षणाच्या ज्या दृढसंकल्पातून आपल्या जवानांनी बलिदान दिले आहे, तोच दृढ संकल्प आपल्याला आपल्या जीवनाचे ध्येय बनवायचे आहे, प्रत्येक देशबांधवाचे हे उद्दिष्ट असायला हवे. आपला प्रत्येक प्रयत्न याच दिशेने व्हायला हवा, ज्यामुळे, सीमांच्या रक्षणासाठी देशाची ताकद वाढेल, देश अधिक सक्षम बनेल, देश आत्मनिर्भर बनेल—हीच आपल्या हुतात्म्यांना देखील खरी श्रद्धांजली ठरेल. आसामच्या रजनी यांनी मला पत्रात लिहिलं आहे की पूर्व लद्दाख मध्ये जे काही झाले, ते बघून त्यांनी एक शपथ घेतली आहे—शपथ ही, की त्या यापुढे नेहमी स्वदेशी वस्तूंचीच खरेदी करतील, इतकेच नाही तर त्याचा प्रसार-प्रचारही करतील. असे संदेश, मला देशाच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत, अनेक लोक, मला पत्र पाठवून सांगताहेत की त्यांनी या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. त्याचप्रकारे, तामिळनाडूच्या मदुराई इथल्या मोहन रामामूर्ती यांनी लिहिलं आहे, की त्यांना भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर झालेलं बघायचं आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्यपूर्व काळात आपला देश, संरक्षण क्षेत्रात, जगातल्या कित्येक देशांच्या पुढे होता. आपल्याकडे अनेक आयुध निर्माण कारखाने होते. त्याकाळी, जे आपल्या खूप मागे होते, ते आज आपल्या पुढे आहेत. स्वातंत्र्यानंतर, संरक्षण क्षेत्रासाठी आपण जे प्रयत्न करायला हवे होते, आपल्या पूर्व-अनुभवांचा जेवढा उपयोग करुन घ्यायला हवा होता,तेवढा आपण घेऊ शकलो नाही. आज मात्र, संरक्षण क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, भारत पुढे जाण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहे. भारत स्वयंपूर्णतेच्या दिशेने पावले टाकतो आहे.
मित्रांनो,
कोणतेही अभियान, जनसहभागाविना पूर्ण होऊ शकत नाही, यशस्वी होऊ शकत नाही. म्हणूनच, आत्मनिर्भर भारताच्या एका दिशेने, एक नागरिक म्हणून आपल्या सर्वांचा दृशनिश्चय, समर्पण आणि सहयोग अत्यंत आवश्यक आहे, अनिवार्य आहे. आपण स्थानिक म्हणजे लोकल गोष्टी विकत घ्याल, त्यासाठी व्होकल होत, त्यांचा प्रचार कराल, तर असं समजा, की देश मजबूत बनवण्यात आपणही आपली भूमिका पार पाडत आहात. ही देखील, एकप्रकारे देशसेवाच आहे. आपण कोणत्याही व्यवसायात असा,प्रत्येक ठिकाणी देशसेवा करण्यासाठी भरपूर मार्ग असतात. देशाची गरज समजून घेत, जी कामे आपण करतो, ती देशसेवाच असते.आपली, हीच सेवा, देशाला कुठे ना कुठे ताकद देत असते. आणि आपल्याला हे ही लक्षात ठेवायचं आहे- आपला देश जितका जास्त मजबूत बनेल, तितकीच जगात शांतता नांदण्याची शक्यता अधिक दृढ होईल. आपल्याकडे म्हंटले जाते–
विद्या विवादाय धनं मदाय, शक्ति: परेषां परिपीडनाय |
खलस्य साधो: विपरीतम् एतत्, ज्ञानाय दानाय च रक्षणाय ||
म्हणजेच, जर व्यक्तीचा स्वभाव वाईट असेल, तर विद्येचा उपयोग व्यक्ती वादविवाद करण्यात, धनाचा उपयोग गर्व करण्यात आणि शक्तीचा वापर, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी करते. मात्र, सज्जनांची विद्या, ज्ञानासाठी असते, धन इतरांना मदत करण्यासाठी आणि ताकद, लोकांचं रक्षण करण्यासाठी उपयोगात आणली जाते. भारताने आपली ताकद, नेहमी याच भावनेने वापरली आहे, भारताचा संकल्प आहे- भारताचा स्वाभिमान आणि सार्वभौमत्वाचे रक्षण. भारताचे लक्ष्य आहे—आत्मनिर्भर भारत. भारताची परंपरा आहे—विश्वास आणि मैत्री.भारताची भावना आहे- बंधुत्व. आपण याच आदर्शांसहित पुढे वाटचाल करत राहू.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
कोरोनाच्या या संकटकाळात देश लॉकडाऊन मधून बाहरे पडला आहे. आता आपण ‘अनलॉक’ च्या काळात आहोत.अनलॉकच्या या काळात, आपल्याला दोन गोष्टींवर भर द्यायचा आहे- कोरोनाला हरवायचे आहे आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत बनवायचे आहे, तिला ताकद द्यायची आहे. मित्रांनो, लॉकडाऊनपेक्षा जास्त सतर्कता आपल्याला अनलॉकच्या काळात घ्यायची आहे.आपली सतर्कताच कोरोनापासून आपला बचाव करणार आहे. हे कायम लक्षात ठेवा, की जर तुम्ही मास्क वापरत नसाल, दोन मीटरचे अंतर ठेवत नसाल, किंवा मग इतर आवश्यक काळजी घेत नसाल, तर तुम्ही स्वतःसोबत इतरांच्या आयुष्याला, विशेषतः, घरातली मुले आणि ज्येष्ठांना संकटात टाकत आहात, म्हणूनच, सर्व देशबांधवांना माझे निवेदन आहे, आणि हे निवेदन मी वारंवार करतो, माझी विनंती आहे की तुम्ही निष्काळजीपणा करु नका. आपलीही काळजी घ्या आणि इतरांचीही!
मित्रांनो,
अनलॉकच्या काळात अशा गोष्टी देखील बंधमुक्त केल्या जात आहेत, ज्यात भारत गेल्या कित्येक दशकांपासून बांधला गेला होता. कित्येक वर्षे आपले खाणक्षेत्र लॉकडाऊनमध्येच होते. व्यवसायिक लिलावांसाठी परवानगी देण्याच्या एका निर्णयाने परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. काही दिवसांपूर्वीच अवकाश क्षेत्रात, ऐतिहासिक सुधारणा केल्या गेल्या. या सुधारणांमुळे, गेली कित्येक वर्षे बंधनात अडकलेले हे क्षेत्र आता मुक्त झाले आहे. या निर्णयांमुळे केवळ आत्मनिर्भर भारताला गती मिळणार नाही, तर देश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही अद्ययावत बनेल.आपल्या कृषीक्षेत्राकडे बघितले, तर या क्षेत्रातल्या अनेक गोष्टी देखील लॉकडाऊन मध्ये अडकल्या होत्या. या क्षेत्रालाही आता ‘अनलॉक’ केलं आहे. यामुळे, जिथे एकीकडे, शेतकऱ्यांना, आपला शेतमाल कुठेही, कोणालाही विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे,तेव्हाच, दुसरीकडे, त्यांना अधिक कर्ज मिळण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अशी अनेक क्षेत्र आहेत, जिथे आपला देश आता या संकटकाळात, आपला देश ऐतिहासिक निर्णय घेत विकासाच्या नव्या वाटा उघडत आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
प्रत्येक महिन्यात आपण अशा बातम्या वाचतो आणि बघतो आहोत, ज्या आपल्याला भावूक बनवतील. आपल्याला या काळात बघायला मिळालं, की प्रत्येक भारतीय, एकमेकांची मदत करण्यासाठी कसे तत्पर असतात, जे जे शक्य असले, ते करण्यासाठी धडपड करत असतात.
अरुणाचल प्रदेशातील अशीच एक प्रेरक कथा, मला प्रसारमाध्यमांमध्ये वाचायला मिळाली. तिथे, सियांग जिल्ह्यातल्या मिरेम गावाने असे कौतुकास्पद काम केले, जे संपूर्ण भारतासाठी एक आदर्श ठरू शकेल. या गावातले अनेक लोक बाहेर राहून नोकरी करतात. कोरोना संकटाच्या काळात मात्र, हे सगळे लोक गावाकडे परत येत आहेत, हे गावकऱ्यांनी पाहिलं. अशा स्थितीत,
गावातल्या लोकांनी आधीच या लोकांसाठी गावाबाहेर विलगीकरण करण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एकत्र येऊन, गावापासून थोडे दूर, 14 तात्पुरत्या झोपड्या बनवल्या, आणि हे ठरवलं की जेव्हा बाहेरचे लोक गावी परत येतील, तर याच झोपड्यांमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाईल. या झोपड्यांमध्येच, शौचालये, वीज-पाणी आणि दैनंदिन उपयोगाच्या सर्व सुविधा आणि वस्तू उपलब्ध केल्या गेल्या. स्वाभाविकच, मिरेम गावाच्या या सामूहिक प्रयत्न आणि जागरुकते मुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मित्रांनो, आपल्याकडे असे बोललं जातं–
स्वभावं न जहाति एव, साधु: आपद्रतोपी सन |
कर्पूर: पावक स्पृष्ट: सौरभं लभतेतराम ||
म्हणजेच, जसा कापूर, आगीत भस्मसात होऊनही आपला सुगंध सोडत नाही.तसेच, चांगली माणसं आपत्तीच्या काळात देखील आपले गुण, आपले स्वभाव सोडत नाहीत. आज आपल्या देशातील जी श्रमशक्ती आहे, जे श्रमिक सहकारी आहेत ते देखील याचे जिवंत उदाहरण आहे. तुम्ही बघितलं असेल, या काळात आमच्या स्थलांतरीत मजुरांच्या अशा अनेक कथा समोर आल्या आहेत, ज्या संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरल्या आहेत. उत्तरप्रदेशातल्या बाराबंकी गावात परत गेलेल्या मजुरांनी कल्याणी नदीचे नैसर्गिक रूप तिला परत मिळवून देण्यासाठी काम सुरु केले आहे. नदीचा उद्धार होतांना बघतांना आजूबाजूला असलेले शेतकरी, सर्वसामान्य माणसेही उत्साहात आहेत.
गावात आल्यावर विलगीकरणात असतांना, अलगीकरणात असतांना, आपल्या मजूर बांधवांनी ज्याप्रकारे आपल्या कौशल्याचा वापर करत, आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलली आहे, ती अद्भुत आहे. मात्र, मित्रांनो, असे कित्येक किस्से देशाच्या लाखो गावात घडत असतील,जे आपल्यापर्यंत पोहचत नाही.
आपल्या देशाचा जसा स्वभाव आहे, त्यावरुन मला विश्वास वाटतो मित्रांनो, की आपल्या गावात देखील, आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतील. जर, असे किस्से-घटना तुमच्या लक्षात आल्या तर, आपण अशा प्रेरक घटना मला जरुर कळवा. संकटाच्या या काळात, अशा सकारात्मक घटना, या कथा, इतरांना आणखीनच प्रेरणादायी ठरतील.
माझ्या प्रिय देशबांधवानो,
कोरोना विषाणूने आपल्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीत निश्चितच बदल केला आहे. मी लंडन इथून प्रकाशित होणाऱ्या फायनान्शियल टाईम्समध्ये आलेला एक अत्यंत रोचक लेख वाचला. त्यात लिहिलं होतं की कोरोनाच्या काळा दरम्यान, आले, हळदी आणि इतर मसाल्यांची मागणी केवळ आशियातच नाही, तर अमेरिकेत देखील वाढली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष सध्या आपल्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकडे आली. प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या या गोष्टींचा संबंध आपल्या देशाशी आहे. आपल्याला त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे गुण जगातील लोकांपर्यंत साध्या सहज भाषेत सांगायला हवेत, जे त्यांना सहजपणे समजू शकेल. आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, एक सुदृढ वसुंधरा बनवण्यासाठी आपले योगदान देऊ शकू.
माझ्या प्रिय देशबांधवानो,
कोरोनासारखे संकट आले नसते, तर आयुष्य काय आहे, आयुष्य असे का आहे, जीवनाचा हेतू काय असे प्रश्न कदाचित आपल्याला पडले नसते.अनेक लोक केवळ याच कारणाने तणावात जगत असतात. तर दुसरीकडे, लोकांनी मला हेही लिहून पाठवलं आहे की कसे लॉकडाऊनच्या काळात, आनंदाचे छोटे छोटे प्रसंग-पैलू देखील त्यांनी आयुष्यात पुन्हा अनुभवले आहे. अनेकांनी मला घरातले पारंपारिक खेळ खेळणे आणि संपूर्ण कुटुंबासह त्याचा आनंद घेतल्याचे अनुभव देखील पाठवले आहेत.
मित्रांनो,
आपल्या देशात, पारंपरिक खेळांचा अत्यंत समृद्ध वारसा आहे. जसे की तुम्ही कदचित एका खेळाचे नाव ऐकलं असेल-पचीसी. हा खेळ, तामिळनाडूत ‘पल्लान्गुली’, कर्नाटकात, “अलि गुलि मणे’ आणि आंध्रप्रदेशात “वामन गुंतलू” अशा नावानं ओळखला आणि खेळला जातो. हा एकप्रकारचा स्ट्रेटेजी गेम आहे, जो बोर्डवर खेळला जातो. यात अनेक खाचा असतात, ज्यात असलेली गोटी किंवा बीज खेळणाऱ्याला, पकडावे लागतात. असं म्हणतात, की हा खेळ, दक्षिण भारतातून, दक्षिण पूर्व आशिया आणि तिथून संपूर्ण जगात पसरला.
मित्रांनो,
आज प्रत्येक मुलाला साप-शिडी हा खेळ माहित आहे. पण आपल्याला माहित आहे का?की हा ही एका पारंपारिक खेळाचेच रूप आहे, ज्याला मोक्ष-पाटम किंवा परमपदम असे म्हंटले जाते. आमच्याकडे आणखी एक पारंपरिक खेळ होता—गोट्या. मोठे लोक पण गोट्या खेळत आणि मुलं पण—फक्त एकाच आकाराच्या चार छोटया गोटया उचला. आपण गोटया खेळायला तयार! एक गोटी हवेत भिरकावली आणि ती हवेत असतांनाच आपल्याला जमिनीवर असलेल्या इतर गोटया उचलाव्या लागतात. साधारणपणे आपल्याकडे, घरात खेळायच्या खेळांसाठी काही मोठ्या साधनांची आवश्यकता नसते. कोणी एक खडू घेऊन येतो, त्याने जमिनीवर काही रेघोट्या ओढल्या की झाला खेळ सुरु !जे खेळ खेळण्यासाठी डाईस म्हणजे, दानाची गरज पडते, तिथे कवड्या आणि चिंचोकेही चालतात.
मित्रांनो,
मला माहिती आहे, की आज जेव्हा मी हे सगळं बोलतो आहे, तेव्हा कित्येक लोक आपल्या बालपणात रमले असतील, कित्येकांना आपल्या बालपणीच्या गोष्टी आठवल्या असतील. मग मी तुम्हाला असंच म्हणेन की ते दिवस तुम्ही विसरलेच कसे? ते खेळ आपण का विसरलात? घरातल्या आजी-आजोबांना, ज्येष्ठांना माझा आग्रह आहे की नव्या पिढीला जर आपण हे खेळ शिकवणार नाही, तर कोण शिकवणार? आज जेव्हा ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे, तेव्हा समतोल साधण्यासाठी आपल्याला ऑनलाईन खेळातून मुक्त व्हावे लागेल, आणि त्यासाठी घरातले खेळ शिकवावे लागतील. आपल्या युवा पिढीसाठी, आपल्या स्टार्ट-अप कंपन्यांसाठी देखील इथे एक संधी आहे आणि अगदी भक्कम संधी आहे. आपण भारतातले पारंपरिक घरगुती खेळ आणखी आकर्षक रुपात प्रस्तुत करावेत. त्याच्याशी संबधित वस्तू एकत्र करणारे, त्यांचा पुरवठा करणारे स्टार्ट-अप देखील खूप लोकप्रिय होतील, आणि आपल्याला हे देखील लक्षात ठेवायचं आहे, की आपले भारतीय खेळ सुद्धा लोकल म्हणजे स्थानिकच आहेत, आणि लोकलसाठी व्होकल होण्याची शपथ तर आपण घेतलीच आहे. आणि माझे बालमित्र, सर्व घरातली छोटी-छोटी मुले, माझ्या या लहानग्या मित्रांना पण मी एक विशेष आग्रह करतो आहे. मुलांनो, तुम्ही माझा आग्रह ऐकाल ना? बघा, माझा आग्रह आहे की मी जे सांगतो आहे, ते तुम्ही नक्की करा. एक काम करा—जेव्हा थोडा वेळ मिळेल तेव्हा, आपल्या आई-बाबांना विचारुन मोबाईल हातात घ्या आणि आजी-आजोबा किंवा घरात इतर कोणी ज्येष्ठ व्यक्ती असतील, त्यांची मुलाखत रेकॉर्ड करा, आपल्या मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड करा. तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल ना, पत्रकार मंडळी कशा मुलाखती घेतात, बस, तशीच मुलाखत तुम्हीही घ्यायची आहे आणि, तुम्ही त्यांना काय प्रश्न विचाराल? मी जरा तुम्हाला सल्ला देतो. तुम्ही,त्यांना नक्की विचारा की लहानपणी त्यांचे राहणीमान कसे होते? ते कुठले खेळ खेळत असत, कधी नाटक, सिनेमा बघायला जात असत का?, कधी सुट्टीत मामाकडे जात असत, तर कधी शेतात जात असत… सणवार कसे साजरे करत? अशा खूपशा गोष्टी, तुम्ही त्यांना विचारू शकता.
त्यांनाही, 40-50 वर्षे, 60 वर्षे मागे भूतकाळात आपल्या आयुष्यात जाणे खूप आनंददायी ठरेल आणि तुम्हाला, 40-50 वर्षापूर्वीचा भारत कसा होता, तुम्ही आज जिथे राहताय, तो भाग आधी कसा होता, तिथे काय काय होते, लोकांच्या सवयी, पद्धती कशा होत्या.. या सगळ्या गोष्टी, अत्यंत सहज तुम्हाला शिकायला मिळतील, जाणून घेता येतील आणि, तुम्ही बघा, तुम्हाला खूप मजा येईल आणि कुटुंबांसाठी देखील एक खूप मस्त अमूल्य खजाना, एक छानसा व्हिडीओ अल्बम तयार होईल.
मित्रांनो,
हे खरं आहे की आत्मकथा किंवा जीवनचरित्र, म्हणजेच autobiography किंवा biography, इतिहासातल्या सत्याच्या जवळ जाण्यासाठी अत्यंत उपयुक्त माध्यम आहे. तुम्ही देखील तुमच्या घरातल्या ज्येष्ठांशी संवाद साधाल, तेव्हा, त्यांच्या काळातल्या गोष्टी, त्याचं बालपण, त्यांच्या तारुण्यातील गोष्टी आणखी सहजपणे समजू शकाल. ही एक उत्तम संधी आहे, जेव्हा वृध्द व्यक्तींनाही, आपल्या बालपणाविषयी, त्या काळाविषयीच्या गोष्टी, आपल्या घरातल्या मुलांना सांगता येतील.
मित्रांनो,
देशाच्या मोठ्या भागात, आता मोसमी पाऊस पोहोचला आहे. यावेळी पावसाबद्दल हवामान शास्त्रज्ञ देखील अत्यंत उत्साहात आहेत, त्यांना खूप अपेक्षा आहेत. पाऊस चांगला पडेल, तर आपल्या शेतकऱ्याचे पिकही उत्तम येईल, वातावरण देखील हिरवेगार होईल. पावसाळ्यात जणू निसर्ग स्वतःला पुनरुज्जीवित करत असतो. मानव, नैसर्गिक स्त्रोतांचा जेवढा वापर करतो, त्याची एक प्रकारे भरपाईच निसर्ग पावसाळ्यात करत असतो. मात्र, ही भरपाई देखील तेव्हाच होऊ शकेल, जेव्हा आपण आपल्या धरणी मातेला साथ देऊ, आपली जबाबदारी पार पाडू. आपल्याकडून केले गेलेले थोडेसे प्रयत्नही, निसर्गाला, पर्यावरणाला खूप मदत करतात. आपले अनके देशबांधव तर या क्षेत्रात खूप मोठे काम करत आहेत.
कर्नाटकच्या मंडावली भागात, एक 80-85 वर्षांचे वृद्ध आहेत, कामेगौडा. कामेगौडाजी एक सामान्य शेतकरी आहेत, मात्र त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत असामान्य आहे. त्यांनी एक असे काम केलं आहे, जे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. 80-85 वर्षांचे कामेगौडा आपल्या जनावरांना चरायला घेऊन जातात, मात्र, त्यासोबतच त्यांनी आपल्या क्षेत्रात, नवे तलाव बांधण्याचा निश्चय केला आहे. त्यांना त्यांच्या भागातली पाण्याची समस्या दूर करायची आहे, त्यासाठी जल-संधारणाच्या कामात, ते छोटे-छोटे तलाव बांधण्याचे काम करत आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, 80-85 वर्षांच्या कामेगौडा यांनी आतापर्यंत 16 तलाव बांधले आहेत, आपल्या मेहनतीतून, आपल्या परिश्रमातून. शक्य आहे, की त्यांनी बांधलेले हे तलाव खूप मोठे मोठे नसतील, पण त्यांचा हा प्रयत्न मात्र खूप मोठा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज त्या संपूर्ण भागाला नवसंजीवनी मिळाली आहे.
मित्रांनो,
गुजरातच्या वडोदऱ्याचे एक उदाहरण देखील खूप प्रेरक आहे. इथे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोकांनी मिळून एक अत्यंत रोचक मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेमुळे आज वडोदऱ्यातल्या एक हजार शाळांमध्ये रेन वाटर हार्वेस्टिंग सूरू झाले आहे. असा अंदाज आहे, की यामुळे दरवर्षी सुमारे 10 कोटी लिटर वाहून जाणारे पाणी वाचवता आणि साठवता येणार आहे.
मित्रांनो,
या पावसाळ्यात, निसर्गाच्या रक्षणासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्यालाही अशाप्रकारचा काही विचार करण्याची, काही करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. जसे, अनेक ठिकाणी गणेश चतुर्थीची तयारी करणे सुरु झाले असेल. मग यावर्षी आपण असा प्रयत्न करुया का, की आपण गणेशाच्या पर्यावरण स्नेही मूर्ती तयार करु आणि त्यांचेच पूजन करु. अशा मूर्ती, ज्यांचे नदी-तलावात विसर्जन केल्यावर, त्या पाण्यासाठी, पाण्यात राहणाऱ्या जीवजंतूंसाठी संकट बनू शकतात, अशा मूर्ती बनवणे आणि त्यांचे पूजन करणे आपण टाळू शकतो का? मला विश्वास आहे, की आपण असे नक्की कराल. आणि या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला हे ही लक्षात ठेवायचे आहे की पावसाळ्यात इतर अनेक आजार येतात, कोरोनाच्या काळात आपल्याला या आजारांपासून स्वतःचा बचाव करायचा आहे. आयुर्वेदिक औषधे, काढा, गरम पाणी या सगळ्याचा वापर करत रहा, निरोगी रहा.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आज 28 जून रोजी भारत आपल्या एका माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहतो आहे, ज्यांनी देश अत्यंत नाजूक स्थितीत असतांना देशाचे नेतृत्व केले. आपले हे माजी पंतप्रधान, श्री पी व्ही नरसिंहरावजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज पहिला दिवस आहे. जेव्हा आपण पी व्ही नरसिंह राव यांच्याविषयी जेव्हा बोलतो, तेव्हा स्वाभाविकपणे एक राजनेता म्हणून त्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. मात्र हे पण एक सत्य आहे की त्यांना अनेक भाषा येत असत, ते भारतीय आणि परदेशी भाषाही सहजपणे बोलत. एकीकडे, त्यांची जडणघडण भारतीय मुल्यांसोबत झाली होती, तर दुसरीकडे, त्यांना पाश्चात्य साहित्य आणि विज्ञानाचेही ज्ञान होते. ते भारतातील, सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक होते. त्यांचा आयुष्याचा आणखी एक महत्वाचा पैलू होता, आणि तो उल्लेखनीय आहे, तो ही आपल्याला माहिती असायला हवा. मित्रांनो, नरसिंह राव जी आपल्या तरुण वयात स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते, जेव्हा हैदराबादच्या निजामाने, वंदे मातरम् गाण्यास परवानगी दिली नाही, तेव्हा त्याविरुध्च्या आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता, त्यावेळी त्यांचे वय फक्त १७ वर्षे होते. लहान वयातच, श्री नरसिंह राव, अन्यायाविरोधात आवाज उठवण्यात आघाडीवर होते. आपला आवाज बुलंद करण्यात त्यांनी कधीही काही कसूर बाकी ठेवली नाही. नरसिंह राव यांना इतिहासाची देखील चांगली जाण होती. अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून येऊन पुढे येणे, शिक्षणावर भर देणे, शिकण्याची प्रवृत्ती आणि त्यांची नेतृत्वक्षमता, सगळे काही संस्मरणीय आहे. माझा तुम्हाला आग्रह आहे, की नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दी वर्षात, तुम्ही त्यांचे जीवनकार्य आणि विचार याबाबत अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. मी पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली वाहतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
यावेळी “मन की बात’ मध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू, तेव्हा इतर काही नव्या विषयांवर बोलूया. तुम्ही तुमचे संदेश, तुमच्या नवनव्या कल्पना मला नक्की पाठवत रहा. आपण सर्व एकत्र पुढे जाऊ, आणि येणारे दिवस आणखी सकारात्मक होतील. जसे मी आज सुरुवातीला म्हणालो, की आपण याच वर्षी म्हणजे 2020 मध्येच, काहीतरी चांगले घडवूया, पुढे जाऊया आणि देशाला नव्या उंचीवर पोहचवू या.
मला विश्वास आहे, की २०२० हे वर्ष भारताला, या दशकात एक नवी दिशा देणारे वर्ष म्हणून सिध्द होईल. हाच विश्वास मनात बाळगत, तुम्ही सर्व लोक सुद्धा पुढे जा, निरोगी रहा, सकारात्मक रहा. याच शुभेच्छांसह, तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद !
नमस्कार !
*****
B.Gokhale/AIR/P.Kor
Sharing this month’s #MannKiBaat. https://t.co/kRYCabENd5
— Narendra Modi (@narendramodi) June 28, 2020
Half the year is over. On #MannKiBaat we have been discussing a wide range of topics.
— PMO India (@PMOIndia) June 28, 2020
These days, people are commonly talking about one thing- when will 2020 end. They feel it has been a year of many challenges. pic.twitter.com/WJqgDM8MVb
There could be any number of challenges but our history shows that we have always overcome them.
— PMO India (@PMOIndia) June 28, 2020
We have emerged stronger after challenges. #MannKiBaat pic.twitter.com/ZFEqaZAFcd
Guided by our strong cultural ethos, India has turned challenges into successes.
— PMO India (@PMOIndia) June 28, 2020
We will do so again this time as well. #MannKiBaat pic.twitter.com/r16brAhvER
The world has seen India's strength and our commitment to peace. pic.twitter.com/TlM9F0D0lJ
— PMO India (@PMOIndia) June 28, 2020
India bows to our brave martyrs.
— PMO India (@PMOIndia) June 28, 2020
They have always kept India safe.
Their valour will always be remembered. #MannKiBaat pic.twitter.com/tVCRpssMdJ
People from all over India are writing, reiterating their support to the movement to make India self-reliant.
— PMO India (@PMOIndia) June 28, 2020
Being vocal about local is a great service to the nation. #MannKiBaat pic.twitter.com/a1xr7BSJYl
We are in the time of unlock.
— PMO India (@PMOIndia) June 28, 2020
But, we have to be even more careful. #MannKiBaat pic.twitter.com/hk8tGZO3Y7
India is unlocking, be it in sectors like coal, space, agriculture and more...
— PMO India (@PMOIndia) June 28, 2020
Time to work together to make India self-reliant and technologically advanced. #MannKiBaat pic.twitter.com/cs8y3xWtPN
Stories that inspire, from Arunachal Pradesh to Uttar Pradesh. #MannKiBaat pic.twitter.com/1SRzwLrQRe
— PMO India (@PMOIndia) June 28, 2020
I have been seeing that people are writing to me, especially youngsters, about how they are playing traditional indoor games. #MannKiBaat pic.twitter.com/c7z9zPPvsp
— PMO India (@PMOIndia) June 28, 2020
I have an appeal to my young friends and start-ups- can we make traditional indoor games popular? #MannKiBaat pic.twitter.com/KQICvSCE9i
— PMO India (@PMOIndia) June 28, 2020
PM @narendramodi has a request for youngsters.... #MannKiBaat pic.twitter.com/mXzAS2bxAI
— PMO India (@PMOIndia) June 28, 2020
Our small efforts can help Mother Nature. They can also help many fellow citizens. #MannKiBaat pic.twitter.com/hHRhHAo4BL
— PMO India (@PMOIndia) June 28, 2020
Today, we remember a great son of India, our former PM Shri Narasimha Rao Ji.
— PMO India (@PMOIndia) June 28, 2020
He led India at a very crucial time in our history.
He was a great political leader and was a scholar. #MannKiBaat pic.twitter.com/F6DLHWkdoG
Shri Narasimha Rao JI belonged to a humble background.
— PMO India (@PMOIndia) June 28, 2020
He fought injustice from a very young age.
I hope many more Indians will read more about our former Prime Minister, PV Narasimha Rao Ji. #MannKiBaat pic.twitter.com/FCQfDLH9Od
PV Narasimha Rao Ji....
— PMO India (@PMOIndia) June 28, 2020
Connected with India ethos and well-versed with western thoughts.
Interested in history, literature and science.
One of India's most experienced leaders. #MannKiBaat pic.twitter.com/LCeklYpKa9