प्रिय देशबांधवांनो,
नमस्कार,
दिवाळीच्या सुट्टया तुम्ही खूप छान पध्दतीने घालवल्या असतील कुठे बाहेर गावीही गेला असाल नव्या उत्साहात व्यापार आणि रोजगार सुरू झाले असतील. दुसरीकडे नाताळची तयारी देखील सुरू झाली असेल. समाजात उत्सवांचे स्वत:चे एक महत्त्व आहे. कधी हे उत्सव दु:खावर फुंकर घालतात तर कधी नवीन उभारी देतात. परंतु कधी कधी या उत्सवांदरम्यान जर एखादे संकट आले तर ते खूपच वेदनादायक असते. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून सतत नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या येत आहेत. आपण कधी ऐकले नसेल किंवा विचार केला नसेल अशा नैसर्गिक संकटांच्या बातम्या येत आहेत. हवामान बदलाचा प्रभाव किती वेगाने होत आहे याचा अनुभव आता आपण घेत आहोत. आपल्याच देशात मागील काही दिवसांमध्ये ज्याप्रकारे अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस होत आहे आणि तामिळनाडूमध्ये ज्याप्रकारे नुकसान झाले आहे आणि इतर राज्यांवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. अनेक लोकांचा मृत्यू झाला. मी या संकटाच्या घडीला त्या सर्व परिवारांच्या दु:खात सहभागी आहे. राज्य सरकारे संपूर्ण ताकदीसह मदत आणि बचाव कार्य करतात. केंद्र सरकार देखील नेहमी खांद्याला खांदा लावून काम करते. सध्या भारत सरकारचे एक दल तामिळनाडूमध्ये गेले आहे. मला विश्वास आहे की, तामिळनाडूवर कोसळलेल्या या संकटानंतरही तो पुन्हा एकदा विश्वासाने पुढे मार्गक्रमण करायला सुरुवात करेल आणि देशाच्या विकासात त्याची जी भूमिका आहे तो ती पार पडेल.
परंतु जेव्हा आपण चहुबाजूंनी संकट बघतो तेव्हा यामध्ये अनेक बदल करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. 15 वर्षांपूर्वी नैसर्गिक आपत्ती हा कृषी विभागाचा भाग होता कारण त्यावेळी नैसर्गिक आपत्ती म्हणजे दुष्काळ येथपर्यंतच मर्यादित होते. आज तर याचे रुपच बदलते आहे. प्रत्येक पातळीवर आपल्याला आपली क्षमता वृध्दींगत करणे अनिवार्य झाले आहे. त्यासाठी सरकार, समाज, नागरिक, सर्व छोट्या-मोठ्या संस्था यांना विज्ञानाच्या दृष्टीकोनातून काम करावे लागेल. नेपाळच्या भूकंपानंतर मी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना एक सुचवले की आपण सार्क देशांनी एकत्र येऊन आपत्तीचा सामना करण्याच्या तयारीसाठी एक संयुक्त अभ्यास करायला हवा. मला आनंद आहे की सार्कच्या देशांची चर्चासत्र आणि उत्तम उपाययोजनांसंदर्भातील कार्यशाळा दिल्लीत झाली. एक चांगली सुरुवात झाली आहे.
मला आज पंजाबच्या जालंधर येथून लखविंदर सिंह यांनी दूरध्वनी केला. ‘मी लखविंदर सिंह, पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातून बोलत आहे. आम्ही येथे सेंद्रिय शेती करतो आणि अनेकांना या शेतीबाबत मार्गदर्शन पण करतो. माझा एक प्रश्न आहे की जे लोक शेतात पेंढ्याला किंवा गव्हाच्या रोपांना आग लावतात त्यांना हे लक्षात येत नाही की यामुळे भूमीतील सूक्ष्म जीवाणू मरतात, याबाबत त्यांना कसे मार्गदर्शन करता येईल आणि दिल्ली, हरियाणा, पंजाबमध्ये होणाऱ्या प्रदूषणापासून कशी सुटका होईल? लखविंदर सिंह तुमचा प्रश्न ऐकून मला खूप आनंद झाला. आनंद व्हायचं पहिलं कारण म्हणजे तुम्ही सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहात आणि तुम्ही स्वत: केवळ सेंद्रिय शेतीच करत नाहीत तर शेतकऱ्यांच्या समस्या देखील तुम्ही उत्तम प्रकारे जाणता. तुमची चिंता रास्त आहे परंतु हे फक्त पंजाब, हरियाणामध्येच घडत आहे असे नाही. संपूर्ण भारतातल्या लोकांची ही सवय आहे आणि पारंपरिक पध्दतीने आपण अशाच प्रकारे पिकांचे उरलेले अवशेष जाळतो. एक तर सर्वात आधी यामुळे होणाऱ्या नुकसानाचा कोणाला अंदाज नव्हता. सगळे करतात म्हणून आम्ही करायचे ही सवय झाली होती. दुसरा काही पर्याय आहे का याबद्दल काही माहिती नव्हती आणि त्यामुळेच हे पूर्वापार पध्दतीने सुरूच राहिले आणि जे हवामान बदलाचे संकट आहे त्यामध्ये ते अंतर्भूत झाले आणि जेव्हा या संकटाचा परिणाम शहरांवर दिसू लागला तेव्हा कुठे हळूहळू यावर चर्चा होऊ लागली. परंतु तुम्ही जी वेदना व्यक्त केली आहे ती योग्यच आहे. यावर सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला आपल्या शेतकरी बंधु-भगिनींना यासंदर्भात प्रशिक्षित करून त्यांना सत्यपरिस्थिती समजावून सांगायला हवी की पिकांचे उरलेले अवशेष जाळले तर वेळ, मेहनत वाचत असेल पुढील पिकांसाठी शेत तयार होत असेल. मात्र हे सत्य नाही. पिकांचे उर्वरित अवशेष देखील मौल्यवान असतात. हे अवशेष स्वत:मध्येच एक सेंद्रिय खत आहे. आपण ते नष्ट करतो मात्र जर या अवशेषांचे आपण छोटे छोटे तुकडे केले तर प्राण्यांसाठी हा सुका चारा होईल. दुसरे म्हणजे हे जाळल्यानंतर जमिनीच्या वरील स्तर जळतो.
माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो, थोड्या वेळासाठी जरा हा विचार करा की आपली हाडे मजबूत असावी, आपले हृदय मजबूत असावे, मूत्रपिंड चांगले असावे. सर्वकाही व्यवस्थित असावे पण शरीरावरील त्वचाच जर जळाली तर काय होईल? आपण जिवंत राहू का? हृदय व्यवस्थित असेल तरीही आपण जिवंत राहू शकत नाही. ज्याप्रकारे आपल्या शरीराची त्वचा जळाली तर आपण जिवंत राहणे कठीण आहे त्याचप्रकारे पिकांचे खूंट जाळल्यावर फक्त खुंटच जळत नाही तर धरणी मातेची त्वचा देखील जळते. आपल्या जमिनीच्यावरील स्तर जळतो आहे आणि आपली भूमी विनाशाच्या दिशेने जात आहे आणि म्हणूनच याकरिता सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत या खुंटांना जर पुन्हा जमिनीत गाडलं तर त्याचे खत बनेल किंवा एखादा खड्डा करून त्यामध्ये गांडूळं सोडून थोडे पाणी टाकले तर त्यापासून उत्तम सेंद्रिय खत तयार होईल. प्राण्यांना चारा म्हणून उपयोगात तर येईलच, आपली जमीन वाचते इतकेच नाही तर त्या जमिनीत तयार झालेले खत त्याच जमिनीत टाकले तर दुहेरी फायदा होतो.
मला एकदा केळीची शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांसोबत संवाद साधायची संधी मिळाली होती आणि त्यांनी मला खूप चांगला अनुभव सांगितला होता. पूर्वी जेव्हा ते केळ्याची शेती करायचे आणि केळीचे पिक घेऊन झाल्यानंतर जे खूंट रहायचे ते साफ करण्यासाठी त्यांना प्रति हेक्टर कधी 5 हजार, 10 हजार, 15 हजार इतका खर्च यायचा आणि जोपर्यंत ते सर्व वाहून नेणारे लोक ट्रॅक्टर किंवा इतर वाहन घेऊन यायचे नाहीत तोपर्यंत ते सर्व असेच उभे असायचे. परंतु काही शेतकऱ्यांनी हे सिध्द केले की या खुंटाचे जर 6-6 किंवा 8-8 इंचाचे तुकडे करून जमिनीत पुरले तर ज्या ठिकाणी हे खुंट पुरले आहेत तिथे जर एखादे झाड, एखादे पिक असेल तर या खुंटांमधील पाण्यामुळे त्यांना तीन महिन्यांपर्यंत बाहेरून पाणी देण्याची गरज भासत नाही असा अनुभव आला आहे. त्या खुंटांमधील पाणीच त्या पिकासाठी पुरेसे असते आणि आज तर त्यांच्या खुंटांना देखील मोल प्राप्त झाले आहे. या खुंटांपासून देखील त्यांना आता उत्पन्न मिळू लागले आहे. पूर्वी ज्या खुंटांच्या स्वच्छतेसाठी खर्च करावा लागत होता आज ते खुंट देखील उत्पन्नाचे साधन झाले असून त्याची मागणी वाढत आहे. एक छोटासा प्रयोग देखील किती फायदेशीर ठरू शकतो. आपले शेतकरी मित्र देखील कोणत्या वैज्ञानिकापेक्षा कमी नाहीत.
प्रिय देशबांधवांनो, आगामी 3 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय विकलांग दिन’ म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जाणार आहे. मागील मन की बात कार्यक्रमात मी अवयव दानावर चर्चा केली होती. अवयव दानासाठी मी नोटोच्या हेल्पलाईन बद्दलही बोललो होतो आणि मला नंतर सांगितले गेले की मन की बातच्या त्या कार्यक्रमानंतर दूरध्वनींमध्ये अंदाजे 7 पटीने वाढ झाली आहे आणि संकेत स्थळाला भेट देणाऱ्यांमध्ये अडीच पटीने वाढ झाली आहे. 27 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय अवयव दान दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. समाजातील अनेक प्रसिध्द व्यक्ती यात सहभागी झाल्या. चित्रपट अभिनेत्री रविना टंडनसह अनेक प्रसिध्द व्यक्ती यात सहभागी झाल्या. अवयव दानामुळे अनेक मौल्यवान आयुष्य वाचू शकतात. अवयवदान हे एक प्रकारे अमरत्व प्रदान करते. एका शरीरातून एखादा अवयव जेव्हा दुसऱ्या शरीरात जातो तेव्हा त्या अवयवाला तर नवीन जीवन मिळतेच परंतु त्या व्यक्तीलाही नवीन आयुष्य मिळते. याहून श्रेष्ठदान काय असू शकते? प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांनो, अवयव दात्यांनो, अवयव प्रत्यारोपणासंदर्भातील एक राष्ट्रीय नोंदणी 27 नोव्हेंबरला सुरू करण्यात आली आहे. नोटो चे बोधचिन्ह, दाता कार्ड आणि घोषवाक्याची रुपरेखा तयार करण्यासाठी mygov.in च्या माध्यमातून एका राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मला आश्चर्य वाटले. सर्वांनी नाविन्यपूर्ण मार्गाने आणि संवेदनापूर्वक गोष्टी सांगितल्या. मला विश्वास आहे की, या क्षेत्रात देखील व्यापक रुपात जागरुकता होईल आणि खऱ्या अर्थाने गरजवंताला सर्वोत्तम मदत मिळेल कारण ही मदत जोपर्यंत कोणी अवयव दान करत नाही तोपर्यंत मिळू शकत नाही.
जसे मी आधी सांगितले, 3 डिसेंबर हा दिवस ‘विकलांग दिन’ म्हणून साजरा केला जातो. शारीरिक आणि मानसिक रुपाने अपंग व्यक्ती देखील साहसी आणि सामर्थ्यवान असतात. जेव्हा अशा व्यक्तींची अवहेलना केली जाते तेव्हा यातना होतात. कधी कधी त्यांच्यावर दया दाखविली जाते. परंतु जर आपण त्यांच्याकडेच पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला तर आपल्याला कळेल की हे लोक आपल्याला आयुष्य जगण्याची प्रेरणा देऊ शकतात. काहीतरी करण्याची प्रेरणा देऊ शकतात. आपल्यावर एखादे छोटेसे संकट आले तर आपण रडत बसतो. तेव्हा आपल्या लक्षात येते की, माझ्यावरचे संकट तर खूप छोटे आहे. हे आपले आयुष्य कसे जगत असतील? कामे कशी करतात? आणि म्हणूनच हे सर्व आपल्यासाठी प्रेरणास्थाने आहेत. त्यांची संकल्प शक्ती, आयुष्य जगण्याची त्यांची पध्दत आणि संकटाला देखील सामर्थ्याने पलटवून लावण्याची ताकद ही दाद देण्याजोगीच आहे.
जावेद अहमद, मी आज त्यांची गोष्ट सांगू इच्छितो, 40-42 वर्षांचे आहे ते. 1996 मध्ये जावेद अहमद यांना दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये गोळी घातली होती. ते दहशतवाद्यांची शिकार झाले होते पण वाचले. मात्र दहशतवाद्यांच्या गोळ्यांमुळे त्यांचे मूत्रपिंड निकामी झाले. जठर आणि आतड्याचा एक हिस्साही गमावला. मणक्याला गंभीर स्वरुपाची इजाही झाली. आपल्या पायांवर उभे राहण्याची शक्ती त्यांनी कायमची गमावली. मात्र जावेद अहमद यांनी हार मानली नाही. दहशतवादाची जखम त्यांना चितपट करू शकली नाही. पण सर्वात मोठी गोष्ट ही आहे की एका निर्दोष व्यक्तीला विनाकारण मोठं संकट झेलावं लागलं. तारुण्य धोक्याच्या सावटाखाली गेलं. मात्र कोणताही आक्रोश नाही, ना कोणतीही तक्रार नाही. जावेद अहमद यांनी या संकटालाही संवेदनशीलतेत बदलले. त्यांनी आपले जीवन समाजसेवेला समर्पित केले. शरीर साथ देत नसले तरी गेली 20 वर्ष त्यांनी स्वत:ला मुलांच्या शिक्षणासाठी वाहून घेतले आहे. शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींसाठी पायाभूत सोयीसुविधांमध्ये सुधारणा कशा करता येतील? सार्वजनिक ठिकाणी, सरकारी कार्यालयात विकलांगांसाठी सुविधा कशा विकसित करता येतील? या बाबींवर ते काम करत आहेत. त्यांनी याच दिशेने आपला अभ्यास सुरू केला आहे. त्यांनी समाज सेवेत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे आणि एका समाजसेवकाच्या रुपात एक जागरुक नागरिक म्हणून विकलांगांचे देवदूत बनून ते आज नि:शब्द क्रांती करत आहेत. जावेद यांचे जीवन देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रेरणादायी ठरण्यासाठी पुरेसे नाही का? मी जावेद अहमद यांच्या जीवन कार्याचं, त्यांच्या तपस्येचं आणि त्यांच्या समर्पणाचं 3 डिसेंबर रोजी विशेष स्मरण करतो. वेळ कमी असल्यानं मी केवळ जावेद यांचाच उल्लेख करत असलो तरी देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात असे अनेक प्रेरणा दीप तेवत आहेत. जीवन जगण्याचा नव प्रकाश देत आहेत, नवीन मार्ग दाखवत आहेत. 3 डिसेंबर ही अशा प्रत्येकाचे स्मरण करण्याची आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याची संधी आहे.
आमचा देश इतका विशाल आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबाबत आपण सरकारवर अवलंबून असतो. मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय, गरीब, दलित, पिडीत, शोषित वंचित व्यक्ती असो त्यांचा सरकार आणि सरकारी व्यवस्थेसोबत सातत्याने संबंध येत असतो आणि एक नागरिक या नात्यानं कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या तरी सरकारी कर्मचाऱ्यांचा वाईट अनुभव आलेला असतो आणि तो एखादाच वाईट अनुभव संपूर्ण जीवनभर सरकारी व्यवस्थेकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनच बदलून टाकतो. यात तथ्य देखील आहे पण याच सरकारमधील लाखो लोक सेवा आणि समर्पित वृत्तीने असे उत्तम काम करतात जे कधी आपल्या नजरेसही पडत नाही. कधी आम्हाला हे माहितही नसते का कुठली सरकारी व्यवस्था, कुठला सरकारी नोकर इतक्या सहजतेने असे काम करत असतो.
आपल्या संपूर्ण देशात `आशा’ कार्यकर्त्यांचे जाळे आहे आम्हा भारतीयांच्यात कधी आशा कार्यकर्त्यांबाबतची चर्चा ना मी ऐकली आहे ना तुम्ही. गेल्यावर्षी बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स या दोघांना आम्ही संयुक्त पद्मविभूषण प्रदान केले होते. ते भारतात खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करतात. त्यांनी आपला निवृत्तीनंतरचा वेळ आणि आयुष्याभर जे काही कमावले आहे ते गरिबांसाठी कार्य करण्यात खर्च करत आहेत. ते जेव्हा जेव्हा भारतात येतात तेव्हा त्यांना ज्या आशा कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे त्यांची एवढी प्रशंसा करतात आणि सांगतात की या आशा कार्यकर्त्या किती समर्पित आहेत आणि कष्ट करतात.
नवनवीन शिकण्यासाठी त्यांच्यात किती उत्साह असतो, या सर्व गोष्टी ते सांगतात. काही दिवसांपूर्वी ओदिशा सरकारने एका आशा कार्यकर्तीचा स्वातंत्र्य दिनी विशेष सन्मान केला. ओदिशामधल्या बालासोर जिल्ह्यातील तेदागांव या छोट्याशा गावातील एक आशा कार्यकर्ती आणि तिथली सर्व लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे. अनुसूचित जाती-जमातीतील लोक आहेत तिथे, गरीबी आहे आणि मलेरिया प्रभावित क्षेत्र आहे. आणि या गावातील एक आशा कार्यकर्ती ‘जमुना मणिसिंह’ यांनी निश्चय केला, की मी आता तेदागाव मधल्या कोणाचाही मलेरियामुळे मृत्यू होऊ देणार नाही. त्यांचे प्रत्येक घराघरात जाणे, थोडासा ताप आल्याचे कळले तरी तिथे पोहोचणे. त्यांना जे प्रथमोपचार शिकवले गेलेत त्यांच्या आधारावर उपचार करायला सुरुवात करणे, प्रत्येक घरात किटकनाशके, मच्छरदाणीच्या उपयोगावर भर देणे, जसे काही आपले मूल नीट झोपतेय ना आणि जेवढी काळजी घ्यायला पाहिजे, तशीच आशा कार्यकर्ती जमुना मणिसिंह, पूर्ण गांव डासांपासून सुरक्षित रहावे म्हणून समर्पित भावनेने काम करत राहिली आहे आणि तिने मलेरियाशी झुंज दिली आणि संपूर्ण गावाला झुंज द्यायला तयार केले. अशा आणखी कितीतरी ‘जमुना मणी’ असतील. लाखो लोक असतील, जे आमच्या आजूबाजूला असतील. आपण त्यांच्याकडे थोड्या आदर भावनेने पाहुया. असे लोक आपल्या देशाची किती मोठी ताकद बनतात. समाजाच्या सुख-दु:खाचे कसे मोठे भागीदार बनतात. मी अशा सर्व आशा कार्यकर्त्यांचे ‘जमुना मणी’च्या माध्यमातून गौरवगान करतो.
माझ्या प्रिय नवयुवक मित्रांनो, मी खास करून तरुण पिढीसाठी जे इंटरनेट आणि सोशल मिडियावर सक्रीय आहेत. मायजीओव्हीवर मी 3 ई-बुक ठेवली आहेत. एक ई-बुक ‘स्वच्छ भारत’च्या प्रेरक घटनांबद्दल आहे, एक खासदारांच्या ‘आदर्श गाव’ संबंधी आणि एक आरोग्य क्षेत्रासंबंधी आहे, मी आपल्याला आग्रह करतो, की आपण ते पहा. केवळ एवढेच नाही, ते इतरांनाही दाखवा, ते वाचा आणि असे होऊ शकते की, यात कोणतीतरी गोष्ट जोडण्याचे आपल्या मनात येईल. मग आपण जरुर ती mygov.inला पाठवा. काही गोष्टी अशा असतात की, ज्या खूप लवकर आपल्या ध्यानात येत नाहीत, पण समाजाची ती खरी-खुरी ताकद असते. सकारात्मक शक्ती ही सर्वात मोठी ऊर्जा असते. तुम्ही पण चांगल्या घटना इतरांना सांगा. या ई-बुक्सबद्दलही इतरांना सांगा. ई-बुक्सवर चर्चा करा आणि जर कोणी उत्साही नवयुवक याच ‘ई-बुक्स’ना बरोबर घेऊन, आजूबाजूच्या शाळांमध्ये जाऊन आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना सांगेल की, पहा इथे असे झालेय, तिथे तसे झालेय, तर आपण खऱ्या अर्थाने एक समाज शिक्षक बनू शकता. या राष्ट्र निर्माणात आपण पण सहभागी व्हा, असे निमंत्रण मी आपल्याला देतो.
माझ्या, प्रिय देशबांधवांनो, पूर्ण जग हवामान बदलामुळे चिंतीत आहे. हवामान बदल, जागतिक तापमान वाढ यांची जागो-जागी चर्चा पण होते आहे, काळजी पण आहे आणि प्रत्येक काम आता करण्यापूर्वी एका मानकाच्या रुपात, त्याला स्वीकृती मिळू लागली आहे. पृथ्वीचे तापमान आता आणखी वाढता कामा नये. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि काळजी पण आहे. आणि तापमानवाढीपासून वाचण्यासाठी सर्वात पहिला मार्ग आहे ऊर्जा बचतीचा. 14 डिसेंबर ‘राष्ट्रीय ऊर्जा बचत दिन’ आहे. सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जात आहेत. एलईडी बल्बची योजना सुरू आहे. मी एकदा म्हटले होते, की पौर्णिमेच्या रात्री, रस्त्यावरील दिवे बंद करून अंधार करून तास भर पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात राहिले पाहिजे. त्या चंद्राच्या प्रकाशाचा अनुभव घेतला पाहिजे. कोण्या एका मित्राने मला एक लिंक बघायला पाठवली होती आणि मला ती पाहण्याची संधी मिळाली, तेव्हा मला वाटले की आपल्यालाही ही गोष्ट सांगावी. तसे पाहिले तर याचे श्रेय ‘झी न्यूज’ ला जाते. कारण ती लिंक झी न्यूजची होती. कानपूरमध्ये नूरजहाँ नावाच्या महिलेला टीव्ही वर पाहिल्यावर असे वाटत होते की तिला खूप शिक्षण घेण्याची संधी मिळालेली नाही. पण ती असे काम करत आहे, की ज्या बद्दल कदाचित कोणी विचारही केला नसेल. ती सौर ऊर्जेचा वापर करून गरीबांचे आयुष्य उजळवून टाकत आहे. ती अंधाराशी लढाई लढत आहे आणि आपले नांव ऊजळवून टाकत आहे. तिने महिलांची एक समिती तयार केली आहे आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कंदीलांचा एक कारखाना सुरू केलाय आणि ती महिन्याला 100 रुपये भाड्याने कंदील देते. लोक संध्याकाळी कंदिल घेऊन जातात आणि सकाळी येऊन चार्जिंग करण्यासाठी देऊन जातात आणि हे खूप मोठ्या प्रमाणावर होते, मी ऐकलंय की, 500 घरातले लोक कंदिल घेऊन जाण्यासाठी येतात. रोजचा साधारण 3 ते 4 रुपये खर्च होतो, पण संपूर्ण घर ऊजळून निघते आणि नूरजहाँ त्या कारखान्यात सौर-ऊर्जेतून हे कंदिल रिचार्ज करण्याचे काम दिवसभर करत राहते. आता पहा, की हवामान बदलाबाबत जगातील थोरथोर लोक काय करत असतील पण एक नूरजहाँ कदाचित कोणाला प्रेरणादायी ठरेल, असे काम करत आहे आणि तसेही नूरजहाँचा अर्थ आहे जगाला ऊजळवून टाकणे. या कामातून सगळीकडे उजेड फैलावतोय. मी नूरजहाँचे अभिनंदन करतो आणि झी टीव्हीचंही अभिनंदन करतो, कारण त्यांनी कानपूरच्या एका छोट्या कोपऱ्यात चाललेले हे काम देश आणि जगासमोर आणले. खूप-खूप अभिनंदन.
मला उत्तर प्रदेशातल्या अभिषेक कुमार पांडे यांनी दूरध्वनी केला. नमस्कार, मी अभिषेक कुमार पांडे बोलतोय गोरखपूर वरून, मी इथे उद्योजक म्हणून काम करतो आहे, मी पंतप्रधानांचे अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी एक कार्यक्रम सुरू केलाय. ‘मुद्रा बँक.’ आम्हाला पंतप्रधानांकडून जाणून घ्यायला आवडेल की, जे कोणी ही मुद्रा बँक चालवत आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या उद्योजकांना कशा प्रकारचे सहाय्य केले जात आहे? अभिषेकजी धन्यवाद. आपण गोरखपूरवरून माझ्याशी जो संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद. प्रधानमंत्री मुद्रा योजना-ज्यांना निधी मिळत नाही, त्यांना निधी उपलब्ध होऊ द्या आणि याचा उद्देश आहे जो मी सरळभाषेत समजावून सांगितला तर तो 3 ‘ई’ आहे. उद्योग, कमाई, समक्षमीकरण. मुद्रा, उद्योगांना प्रोत्साहन देत आहे, मुद्रा रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे आणि मुद्रा खऱ्याखुऱ्या अर्थाने सक्षम करत आहे. छोट्या छोट्या उद्योजकांना मदत करण्यासाठी ही मुद्रा योजना चालविली जात आहे. खरंतर मला ज्या गतीने जायचे आहे, ती गती येणे अद्याप बाकी आहे. पण सुरुवात तर चांगली झाली आहे. इतक्या थोड्या कालावधीत जवळजवळ 66 लाख लोकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 42 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. वृत्तपत्र विक्रेता असो वा दूध विक्रेता वा इतर. छोटे छोटे उद्योग करणारे लोक आणि मला तर या गोष्टीचा आनंद झाला आहे की 66 लाखांपैकी 24 लाख महिला आहेत आणि मदत मिळालेल्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय लोक आहेत, जे स्वत: आपल्या पायांवर उभे राहून कष्ट करून सन्मानाने आपल्या कुटूंबांचा उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अभिषेकने तर स्वत:च आपल्या उत्साहाची गोष्ट सांगितली आहे. माझ्याकडे पण अनेक बातम्या येत असतात. मला आत्ताच कुणीतरी सांगितले की मुंबईत कोणी शैलेश भोसले म्हणून आहे. मुद्रा योजनेअंतर्गत त्यांना बँकेकडून साडेआठ लाख रुपयांचे कर्ज मिळाले. त्यांनी सफाई कामगारांसाठी कपडे आणि स्वच्छता उद्योग सुरू केला. मी माझ्या स्वच्छता मोहिमेच्यावेळी सांगितले होते की स्वच्छता मोहीम अशी आहे की ज्यातून नवे उद्योजक निर्माण होतील आणि शैलेश भोसलेने ते करून दाखवले. त्यांनी एक टँकर आणलाय, आणि ते हे काम करत आहेत. आणि मला सांगण्यात आलंय की एवढ्या थोड्या काळात त्यांनी बँकेला दोन लाख रुपये परतही केले आहेत. शेवटी मुद्रा योजनेअंतर्गत आमचे हेच तर उद्दिष्ट आहे. मला भोपाळमधल्या ममता शर्मा बद्दलही कुणीतरी सांगितलं की तिला या प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत बँकेकडून 40 हजार रुपये मिळाले. ती बटवे तयार करण्याचे काम करत आहे. बटवे तयार करते, पण यापूर्वी ती जास्त व्याजाने पैसे घेत असे आणि मोठ्या मुश्कीलीने तिचा व्यवसाय चालवत असे. आता एकाच वेळी मोठ्या प्रमाणात रुपये हातात आल्याने ती आपले काम अधिक चांगल्या प्रकारे करत आहे. आणि पहिल्यांदा अतिरिक्त व्याजामुळे तिचा जो अधिक खर्च व्हायचा, त्याऐवजी हे पैसे तिच्या हातात आल्याने तिची दर महिन्याला जवळजवळ एक हजार रुपयांहून अधिक बचत होऊ लागली आहे आणि तिच्या कुटुंबालाही एक चांगला व्यवसाय मिळाला आहे. पण या योजनेचा आणखी प्रसार व्हायला हवा, असे मला वाटते. आपल्या सर्व बँका अधिक संवेदनशील व्हाव्यात आणि त्यांनी गरीबांना जास्तीत जास्त मदत करावी. खरोखरच देशाची अर्थव्यवस्था हेच लोक चालवतात. छोटे-छोटे उद्योग करणारे लोकच देशाच्या अर्थव्यवस्थेची आर्थिक शक्ती असतात. आम्हाला त्यालाच आणखी बळ द्यायचे आहे. चांगलं झालंय, पण आणखी चांगले करायचे आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, 31 ऑक्टोबर या सरदार पटेल यांच्या जयंती दिनी मी ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ ची चर्चा केली होती. या अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे सामाजिक जीवनात निरंतर जागरुकता कायम राहिली पाहिजे. ‘राष्ट्रयाम जाग्रयाम व्यम-अंतर्गत दक्षता हा स्वातंत्र्याचा पुरस्कार आहे. देशाच्या एकात्मतेची, ही संस्कारसरिता कायम वाहती राहिली पाहिजे.’ एक भारत-श्रेष्ठ भारत’ याला मी एका योजनेचे स्वरुप देऊ इच्छितो. Mygov.in वर मी याबाबत सूचना मागवल्या होत्या. कार्यक्रमाचा आराखडा कसा असावा? बोधचिन्ह काय असावं? लोक सहभाग कसा वाढावा? अशा सूचना पाठवण्याबद्दल मी सांगितले होते. मला सांगण्यात आले, की खूप सूचना आल्या. पण मला अधिक सूचना अपेक्षित आहेत. मी खूप विशिष्ट योजनेची अपेक्षा करतो. आणि मला सांगण्यात आलंय की यात सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. अनेक मोठी-मोठी बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहेत. आपण पण आपल्या कल्पना वापरा. एकता आणि अखंडतेच्या या मंत्राला ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ मंत्राला आपण प्रत्येक भारतीयाला जोडणारा मंत्र कसा बनवू शकतो. कशी योजना असावी, कसा कार्यक्रम असावा जो सर्वोत्तम असावा, चैतन्यदायी असावा आणि प्रत्येकाला जोडून घेईल, एवढा सोपा असावा, सरकार काय करणार? समाज काय करणार? अशा खूप गोष्टी होऊ शकतात. मला विश्वास आहे की, आपल्या सूचना नक्कीच उपयोगी पडतील.
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, थंडीचा ऋतू सुरू होत आहे, आणि या ऋतूत खाणे खाण्याची मजा तर येतेच येते. कपडे घालण्याचीही मजा असते. पण आपण व्यायाम करावा, असा माझा आग्रह राहील. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी या उत्तम ऋतूच्या काही वेळेचा उपयोग व्यायाम-योग यासाठी जरुर करा. आणि कुटूंबातही असे वातावरण तयार करा, हा कुटूंबाचा एक असा उत्सव असला पाहिजे, की एक तास सर्वांनी मिळून व्यायाम करायचा आहे. कसे चैतन्य येते ते तुम्हीच पहाल आणि पूर्ण दिवसभर शरीर तुमची कशी साथ देते तेही अनुभवाल. तर मग छान ऋतू आहे, तर छान सवयीही अंगी बाणवूया. माझ्या देशवासियांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.
जयहिंद..!
S.Mhatre/J.Patankar/S.Tupe/N.Sapre