Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा 3.0’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधला संवाद


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा 3.0’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. 50 दिव्यांग विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सुमारे दीड तास चाललेल्या या संवादात्मक कार्यक्रमात अनेक महत्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांकडून मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन घेतले. यावर्षीही देशभरातल्या विद्यार्थ्यांबरोबरच परदेशात राहणारे भारतीय विद्यार्थीही कार्यक्रमात सहभागी झाले.

पंतप्रधानांनी सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्ष आणि नव दशक भरभराटीचे राहो अशा शुभेच्छा दिल्या. या दशकाचे महत्व विषद करताना  शाळेच्या शेवटच्या वर्षात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर या दशकाच्या आशा-आकांक्षा अवलंबून असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

या दशकातली देशाची कामगिरी घडवण्यात दहावी, अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी महत्वाची भूमिका बजावायला हवी. देशाने प्रगतीचे नवे शिखर गाठण्यासाठी नव्या आशा-आकांक्षा साध्य करण्यासाठी नव्या पिढीवर आशा केंद्रीत झाल्याचे ते म्हणाले.

आपण विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतो मात्र ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाला आपल्या मनात विशेष स्थान असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान या नात्याने आपण अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहतो. अशा संवादातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. प्रत्येक वेळी नव्या गोष्टी अनुभवायला मिळतात. मात्र या सर्व कार्यक्रमातून सर्वात जिव्हाळ्याचा कार्यक्रम कोणताअसे विचारले तर त्याचे उत्तर ‘परीक्षा पे चर्चा’ हे असेल. हॅकेथॉनला उपस्थिती लावायलाही आपल्याला आवडते. हे कार्यक्रम भारताच्या युवकांचे सामर्थ्य आणि कौशल्य दर्शवतात असे पंतप्रधान म्हणाले.

निराशा आणि मानसिक चढ-उतार हाताळताना:-

अभ्यास करताना रुची कमी होणे या विषयी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला असता अनेकदा अभ्यास करताना अनेक बाबींमुळे विद्यार्थ्यांचे मन भरकटते तसेच स्वत:च्याच अपेक्षांना फार महत्व दिल्यामुळे निराशा येऊ शकते असे पंतप्रधानांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी निराशेचे कारण शोधून काढावे आणि त्यावर मात करण्याचा मार्गही शोधावा असे सांगून चांद्रयान आणि त्या संदर्भात इस्रोला दिलेली भेट याचे उदाहरण त्यांनी दिले. आशा-निराशा ही नित्याची बाब आहे. प्रत्येक जण या भावनेतून जात असतो असे सांगून चांद्रयान मोहिमेच्या वेळी इस्रोला दिलेली भेट कठोर परिश्रम करणाऱ्या वैज्ञानिकांसमवेत घालवलेले क्षण आपल्या सदैव स्मरणात राहतील असे ते म्हणाले.

अपयशाला आपण अडथळा म्हणून पाहता कामा नये. तात्पुरता आलेला अडथळा म्हणजे आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकणार नाही असा त्याचा अर्थ नव्हे उलट असा अडथळा वा धक्का म्हणजे यातून काहीतरी उत्तम घडणार आहे असा त्याचा अर्थ आहे. निराशेच्या परिस्थितीचे आपण उज्ज्वल भविष्यासाठीच्या एका महत्वाच्या टप्प्यात परिवर्तन करायला हवे असा सल्ला त्यांनी दिला.

2001 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात क्रिकेटपटू राहूल द्रविड आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांनी कठीण परिस्थितीत फलंदाजी करुन भारताला पराभवाच्या छायेतून बाहेर काढून विजयी केल्याचे उदाहरण त्यांनी दिले.

भारतीय गोलंदाज अनिल कुंबळे यांचे उदाहरण त्यांनी दिले.

ही सकारात्मकतेची ताकद असल्याचे ते म्हणाले.

अभ्यास आणि पाठ्यक्रमबाह्य कला यांच्यातला समतोल साधताना :-  

अभ्यास आणि अभ्यासाव्यतिरिक्तचे कलागुण यांच्यातला समतोल कसा साधावा याविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना विद्यार्थ्यांच्या आयुष्यातले अभ्यासाव्यतिरिक्तच्या कलागुणांचे महत्व कमी लेखून चालणार नाही असे ते म्हणाले.

अभ्यासाव्यतिरिक्त इतर कलागुणांकडे र्दुलक्ष केल्यास विद्यार्थी रोबोप्रमाणे बनतील असे ते म्हणाले.

मात्र, या दोन्हींमधला समतोल साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचे उत्तम व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

आजच्या काळात अनेक संधी उपलब्ध आहेत. युवकांनी त्याचा उपयोग करावा आणि आपल्या आवडीचा छंद जोपासावा.

मात्र, पालकांनी त्याला फॅशनचे रुप देऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला.  मुलांना त्यांच्या आवडीचा छंद जोपासू द्या असेही त्यांनी सांगितले.

मार्कांचे महत्व:-

परिक्षेत गुण कसे मिळवावेत आणि गुण हाच महत्वाचा घटक आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर परिक्षेत उत्तम गुण मिळवण्यावर विद्यार्थी आणि पालक लक्ष केंद्रित करतात मात्र  विविध परिक्षांमधल्या आपल्या कामगिरीवर आपले यश ठरवणारी आपली शिक्षण पद्धती आहे.

सध्याच्या काळात अनेक संधी उपलब्ध आहेत असे सांगून परिक्षेतले यश किंवा अपयश म्हणजेच सर्वस्व आहे या भावनेतून विद्यार्थ्यांनी बाहेर यावे असे ते म्हणाले.

परिक्षेतले गुण म्हणजे आयुष्य नव्हे. परीक्षा म्हणजे आपल्या संपूर्ण आयुष्यातला निर्णायक घटक नव्हे . आपल्या आयुष्यातला हा एक महत्वाचा टप्पा आहे. परीक्षा म्हणजेच सर्वस्व असे पालकांनीही मुलांच्या मनावर बिंबवू नये असे आवाहन पंतप्रधानांनी केले. यातले अपयश म्हणजे सर्वस्व गमावल्याप्रमाणे वर्तवणूक नसावी. तुम्हाला दुसरे क्षेत्र आणि इतरही अमाप संधी मिळू शकतात.

परीक्षा महत्वाची आहे मात्र परीक्षा म्हणजे आयुष्य नव्हे असे सांगून परीक्षा म्हणजेच सर्व आयुष्य या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शिक्षणातले तंत्रज्ञानाचे महत्व:-

            विद्यार्थ्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाविषयी माहिती ठेवावी. त्याचवेळी त्याच्या दुरुपयोगापासूनही सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले. तंत्रज्ञानाविषयीची भीती चांगली नाही. तंत्रज्ञान मित्राप्रमाणे आहे. तंत्रज्ञानाविषयी केवळ माहिती असणे पुरेसे नाही तर त्याचा उपयोग महत्वाचा आहे. तंत्रज्ञान हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. मात्र त्याचा दुरुपयोग झाल्यास त्याचा परिणाम वेळ आणि संसाधन यांच्यावर होतो असे पंतप्रधान म्हणाले.

हक्क आणि कर्तव्य:-

व्यक्तीच्या अधिकारातच त्याची कर्तव्यही सामावलेली असतात असे पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचे हक्क आणि नागरिकांना त्यांच्या कर्तव्याविषयी कसे जागृत करावे याविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

या संदर्भात शिक्षकांचे उदाहरण देत शिक्षकाने आपले कर्तव्य बजावले म्हणजेच विद्यार्थ्यांच्या अधिकाराची पूर्तता झाली असे ते म्हणतात.

मूलभूत हक्क नव्हे तर मूलभूत कर्तव्य असतात असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हटले आहे. याचा संदर्भही पंतप्रधानांनी दिला.

भारतीय स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षी म्हणजेच 2047 मध्ये भारताच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थ्यांशी आपण आज संवाद साधत आहोत असे ते म्हणाले. आपल्या संविधानातल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन ही पिढी करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

पालक आणि शिक्षकांच्या अपेक्षा हाताळताना:-

विद्यार्थ्यांवर आशा-अपेक्षांचा दबाव टाकू नये असे आवाहन त्यांनी पालक आणि शिक्षकांना केले. विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांची जोपासना व्हावी यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे असेही त्यांनी सांगितले.

अभ्यासासाठीची कोणती वेळ योग्य या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, अभ्यासाइतकीच पुरेशी विश्रांतीही महत्वाची असते. सकाळच्या वेळी मन प्रफुल्लित असते असे सांगून प्रत्येकाने योग्य तो नित्यक्रम अनुसरावा असे ते म्हणाले. परिक्षेच्या वेळी अचानक काहीही न आठवण्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना विद्यार्थ्यांनी तयारी परिपूर्ण करावी असे ते म्हणाले.

आपल्या तयारीबाबत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगावा असे आवाहनही त्यांनी केले. कोणतेही दडपण न बाळगता विद्यार्थ्यांनी परीक्षागृहात प्रवेश करावा. इतर विद्यार्थी काय करतात याबाबत चिंता करु नका. आत्मविश्वास बाळगा आणि आपण केलेल्या तयारीवर लक्षकेंद्रीत करा असे मार्गदर्शन त्यांनी केले.  

करियरविषयीचे पर्याय:-

करियर अतिशय महत्वाचे आहे. प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला हवी. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपण देशाप्रतिही योगदान सदैव देऊ शकतो असे पंतप्रधान म्हणाले.

शालेय विद्यार्थ्यांसमवेत ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यक्रमासाठी नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लघु निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 2 डिसेंबर 2019 ते 23 डिसेंबर 2019 दरम्यान  www.mygov.in या संकेतस्थळाद्वारे या स्पर्धेसाठी ऑनलाइन प्रवेशिका मागविण्यात आल्या. तीन लाखापेक्षा जास्त मुलांनी नोंदणी केली. त्यापैकी सुमारे 2.6 लाख विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. यातल्या निवडक विजेत्यांना परीक्षा पे चर्चा 2020 कार्यक्रमाला उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

सीबीएसई आणि केव्हीएस शालेय विद्यार्थ्यांसाठी परीक्षेशी संबंधित बाबींवरची चित्रकला आणि पोस्टर स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात आली होती. 750 पोस्टर्स आणि चित्रे प्राप्त झाली. त्यापैकी सर्वोत्तम 50 चित्रे/ पोस्टर्सची निवड करण्यात आली. ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी या चित्रांच्या प्रदर्शनाला भेट दिली.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar