माझ्या प्रिय देशवासीयांनो, ‘मन की बात’ मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज ‘मन की बात’ ची सुरुवात युवा देशाच्या युवकांपासून.. तो उत्साह, ती देशभक्ती, सेवेच्या रंगात रंगलेले ते नौजवान. तुम्हाला माहिती आहे ना? नोव्हेंबर महिन्याचा चौथा रविवार दरवर्षी एनसीसी डे म्हणजेच राष्ट्रीय छात्रसेना दिवसाच्या रूपात साजरा केला जातो. साधारणपणे आमच्या तरुण पिढीला फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्री दिन अगदी नक्की लक्षात राहतो पण खूप लोक असेही आहेत की ज्यांना राष्ट्रीय छात्र सेना दिवस पण तेवढाच लक्षात राहतो. तर चला, आज एनसीसीच्या विषयी काही बोलू या. मला पण काही आठवणी ताज्या करण्याची संधी मिळेल. सर्वात आधी तर, राष्ट्रीय छात्र सेनेच्या सर्व माजी व आजी छात्रसैनिकांना राष्ट्रीय छात्र सेना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी पण आपल्यासारखाच एक छात्र सैनिक राहिलेलो आहे आणि मनाने आजदेखील स्वत:ला छात्र सैनिक मानतो. हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, एनसीसी, नॅशनल कॅडेट कोर म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना. भारतातील राष्ट्रीय छात्र सेना हि जगभरातल्या सर्वात मोठ्या गणवेशधारी युवा संघटनांपैकी एक आहे. हि एक त्रिदलीय सेवा संघटना आहे, ज्यात सेना, नौ सेना आणि वायुसेना तीनही सामील आहेत. नेतृत्व, देशभक्ती, निस्वार्थ सेवा, शिस्त, परिश्रम हे सर्व गुण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनवण्याचा, आपली सवय बनवण्याचा एक रोमांचक प्रवास म्हणजे राष्ट्रीय छात्र सेना. या प्रवासाविषयी आणखी काही बोलण्यासाठी फोनवरून भेटूयात काही नौजवानांना, ज्यांनी एनसीसी मध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. चला तर, या, त्यांच्याशी गप्पा मारुया !
पंतप्रधान: मित्रांनो, आपण सगळे कसे आहात?
तरन्नुम खान: जय हिंद, प्रधानमंत्रीजी !
पंतप्रधान: जय हिंद!
तरन्नुम खान: सर, माझं नाव ज्युनिअर अंडर ऑफिसर तरन्नुम खान आहे.
पंतप्रधान: तरन्नुम, आपले गाव कोणते आहे?
तरन्नुम खान: मी दिल्लीला राहते, सर.
पंतप्रधान: अच्छा! तर मग एनसीसीचा किती वर्षांचा अनुभव आहे आपल्याला?
तरन्नुम खान: सर, मी एनसीसी मध्ये 2017 मध्ये भरती झाले आणि ही तीन वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली तीन वर्ष आहेत.
पंतप्रधान: ऐकून खूप आनंद झाला.
तरन्नुम खान: सर, मला तुम्हाला सांगायला आवडेल की
‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ कॅम्प सर्वात चांगला अनुभव होता. हा कॅम्प ऑगस्टमध्ये झाला होता आणि त्याला नॉर्थ इस्ट रिजन म्हणजेच ईशान्य प्रदेशातील छात्रपण आले होते. त्या छात्रसैनिकांबरोबर आम्ही दहा दिवस राहिलो. आम्ही त्यांच्या जीवनशैली विषयी जाणून घेतले.. आम्ही पाहिलं की त्यांची भाषा कशी आहे, त्यांची परंपरा कशी आहे, त्यांची संस्कृती कशी आहे.. अशा अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या जसं, त्या भाषेत नमस्कार ला काय म्हणतात? तसेच आमचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता तेव्हा त्यांनी आम्हाला आपले नृत्य शिकवले. तेहरा म्हणतात त्या नृत्याला आणि त्यांनी मला मेखला नेसायला पण शिकवलं. खरं सांगते, मेखला नेसून आम्ही सगळे दिल्ली वाले तसेच आमच्या नागालँडच्या मैत्रिणी पण खूप सुंदर दिसत होतो. आम्ही त्यांना दिल्ली दर्शन ला घेऊन गेलो. त्यांना नॅशनल वॉर मेमोरियल आणि इंडिया गेट दाखवलं. तिथे मी त्यांना दिल्लीची चाट पण खायला घातली. भेळपुरी पण दिली पण त्यांना ती थोडी तिखट लागली. त्यांनी आम्हाला सांगितलं की जास्तकरून ते सूप पिणं पसंत करतात. थोड्या उकडलेल्या भाज्या खातात. म्हणून त्यांना इथले खाणे एवढं आवडलं नाही. याशिवाय आम्ही त्यांच्याबरोबर खूप फोटो काढून घेतले. एकमेकांचे अनुभव जाणून घेतले.
पंतप्रधान: अजूनही आपण त्यांच्या संपर्कात आहात का?
तरन्नुम खान: हो सर, आम्ही अजूनही संपर्कात आहोत.
पंतप्रधान: चला, हे छान केलं तुम्ही.
तरन्नुम खान: हो सर
पंतप्रधान: अजून कोण कोण साथी आहेत आपल्यासोबत?
श्री हरी जी वी: जय हिंद सर
पंतप्रधान: जय हिंद!
श्री हरी जी. वी.: मी सिनिअर अंडर ऑफिसर श्री हरी जी वी बोलतोय मी बंगळुरु, कर्नाटकचा राहणारा आहे.
पंतप्रधान: कुठे शिकता तुम्ही?
श्री हरी जी वी.: सर, बंगळुरु मधल्या क्रिस्तू जयंती कॉलेजमध्ये.
पंतप्रधान : अच्छा, बंगळुरूमध्येच आहे.
श्री हरी जी वी : हो सर
पंतप्रधान: बोला
श्री हरी जी वी : सर, मी कालच युथ एक्सचेंज प्रोग्राममधून , सिंगापूरहून परत आलो
पंतप्रधान: अरे वा!
श्री हरी जी वी : हो सर
पंतप्रधान: तुम्हाला संधी मिळाली तर तिथे जाण्याची !
श्री हरी जी वी: हो सर
पंतप्रधान: कसा होता सिंगापूरचा अनुभव?
श्री हरी जी वी: तिथे युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका, सिंगापूर, ब्रूनेई, हाँगकाँग आणि नेपाळ असे सहा देश आले होते. तिथे आम्ही ही कॉम्बॅट लेसन्स आणि इंटरनॅशनल मिलिटरी एक्सरसाइज मधील एक एक्सचेंज शिकलो. इथे आमची कामगिरी काही वेगळीच होती, सर. आम्हाला ह्यातील वॉटर स्पोर्ट्स आणि एडवेंचर ऍक्टिव्हिटीज शिकवली होती आणि वॉटर पोलो टूर्नामेंटमध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला सर. आणि सांस्कृतिक कार्यक्रमात आम्ही सादरीकरण केले सर. आमची कवायत आणि 95 ऑफ कमांड त्यांना खूप चांगली वाटली सर.
पंतप्रधान: तुम्ही किती जण होतात?
श्री हरी जी वी: आम्ही वीसजण होतो सर. आम्ही दहा मुलं आणि दहा मुली होत्या सर
पंतप्रधान: भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून होत्या का ?
श्री हरी जी वी: हो सर
पंतप्रधान: चला, तुमचे सगळे मित्र तुमचे अनुभव ऐकण्यासाठी आतुर झालेले असतील. मला पण छान वाटले. अजून कोण आहे आपल्या बरोबर?
विनोले किसो: जय हिंद सर
पंतप्रधान: जय हिंद!
विनोले किसो: माझं नाव सिनिअर अंडर ऑफिसर विनोले किसो. मी ईशान्य भाग -नागालँड राज्यातून आलो आहे सर.
पंतप्रधान: हं, विनोले किसो, तुमचा अनुभव काय आहे?
विनोले किसो: सर, मी सेंट जोसेफ कॉलेज जकहामा ( स्वायत्त) मध्ये शिकतो. बी. ए इतिहास (ऑनर्स) शिकतो आहे. मी 2017 ह्या वर्षी एनसीसीत सहभागी झालो आणि हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि चांगला निर्णय होता सर.
पंतप्रधान: एनसीसी मुळे हिंदुस्थानात कुठे कुठे फिरण्याची संधी मिळाली?
विनोले किसो: सर, एनसीसीमध्ये सहभागी झालो आणि खूप शिकायला मिळालं. खूप संधीही मिळाल्या. माझा एक अनुभव आहे सर, जो मी आपल्याला सांगू इच्छितो. याच वर्षी म्हणजे 2019 च्या जून महिन्यात मी एका शिबिरात सहभागी झालो होतो. तो होता कंबाइंड ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प आणि तो सॅझोली कॉलेज कोहिमा येथे घेण्यात आला. या कॅम्प मध्ये चारशे छात्र सहभागी झाले होते.
पंतप्रधान: तर मग नागालँड मधले सगळे मित्र तुम्ही हिंदुस्थानात कुठे गेलात, काय पाहिलं, हे ऐकायला उत्सुक असतील. तुम्ही आपले अनुभव सांगता का सगळ्यांना?
विनोले किसो: हो सर
पंतप्रधान: अजून कोण आहे आपल्या बरोबर?
अखिल: जय हिंद सर! माझं नाव ज्युनिअर अंडर ऑफिसर अखिल आहे.
पंतप्रधान: हं, अखिल बोला.
अखिल: मी रोहतक हरियाणा चा राहणारा आहे सर
पंतप्रधान: हं
अखिल : दयाल सिंह कॉलेज दिल्ली विश्व विद्यापीठात भौतिक शास्त्र (ऑनर्स) करत आहे सर.
पंतप्रधान: हं हं……
अखिल: सर, मला एनसीसी मधली शिस्त सगळ्यात जास्त आवडते सर.
पंतप्रधान: व्वा!
अखिल: त्यामुळे मी जास्त जबाबदार नागरिक बनलो आहे सर. राष्ट्रीय छात्र सेनेतील सैनिकांची कवायत आणि गणवेश मला खूप आवडतो.
पंतप्रधान: किती शिबिरांना जाण्याची संधी मिळाली? कुठे कुठे जाण्याची संधी मिळाली?
अखिल: सर, मी तीन शिबिरांना गेलो आहे सर. नुकताच मी डेहराडून येथील भारतीय सैन्य अकॅदमी अटॅचमेंट कॅम्पला जाऊन आलो.
पंतप्रधान: किती कालावधीचे होतं हे शिबिर?
अखिल: सर, हे शिबिर 13 दिवसांचं होतं.
पंतप्रधान: अच्छा!
अखिल: सर, भारतीय सेनेतील अधिकारी कसे तयार होतात हे तिथे मला अगदी जवळून बघायला मिळालं आणि त्यानंतर भारतीय सेनेतील अधिकारी बनण्याचा माझा संकल्प अधिकच दृढ झाला सर.
पंतप्रधान: व्वा!
अखिल: आणि सर मी भारतीय गणतंत्र दिवसाच्या परेडमध्ये पण भाग घेतला होता आणि ती माझ्यासाठी तसेच माझ्या परिवारासाठी खूपच अभिमानाची गोष्ट होती.
पंतप्रधान: शाब्बास!
अखिल: माझ्यापेक्षा माझी आई जास्त खुश होती सर! जेव्हा आम्ही पहाटे दोन वाजता उठून राजपथावर सरावाला जायचो तेव्हा आमचा उत्साह बघण्याजोगा असायचा. इतर सैन्यदलातले लोक तर आम्हाला इतकं प्रोत्साहन द्यायचे. राजपथावर संचलन करताना आमच्या अंगावर रोमांच उभे राहायचे सर.
पंतप्रधान: चला तुम्हा चौघांशी गप्पा मारायची संधी मिळाली आणि ती पण राष्ट्रीय छात्रसेना दिवस असताना. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी भाग्यवान होतो कारण मला लहानपणी आमच्या गावच्या शाळेत राष्ट्रीय छात्र सेनेचा छात्रसैनिक होता आले. म्हणून मला माहिती आहे ही शिस्त, हा गणवेश आणि त्यामुळे वाढणारा आत्मविश्वास. या सगळ्या गोष्टी लहानपणी मला राष्ट्रीय छात्र सेना कॅडेटच्या रूपात अनुभवण्याची संधी मिळाली होती.
विनोले किसो: प्रधानमंत्री जी माझा एक प्रश्न आहे.
पंतप्रधान: हं, विचारा.
तरन्नुम खान: तुम्ही पण एनसीसीत सहभागी झाला होतात..
पंतप्रधान: कोण विनोले बोलत आहे का?
विनोले किसो: हो सर.. हो सर
पंतप्रधान: हं.. बोला विनोले
विनोले: तुम्हाला कधी शिक्षा झाली होती का?
पंतप्रधान: ( हसून) याचा अर्थ तुम्हा लोकांना शिक्षा मिळते तर!
विनोले: हो सर
पंतप्रधान: नाही, मला कधी मिळाली नाही. कारण मी खूपच शिस्त पाळणारा छात्र होतो. पण एका वेळी गैरसमज मात्र नक्की झाला होता. एकदा आम्ही शिबिरात होतो तेव्हा मी एका झाडावर चढलो होतो. तर सुरुवातीला असंच वाटलं कि मी काही नियम तोडलेला आहे. पण नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं कि तिथे पतंगाच्या दोरात एक पक्षी अडकला होता. त्याला वाचवण्यासाठी मी झाडावर चढलो होतो. तर, सुरुवातीला तर वाटलं होतं कि माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल पण नंतर मात्र माझे खूप कौतुक झाले. अशाप्रकारे मला एक वेगळाच अनुभव मिळाला.
तरन्नुम खान: हो सर हे ऐकून खूपच चांगले वाटले सर.
पंतप्रधान: धन्यवाद!
तरन्नुम खान: मी तरन्नुम बोलते आहे.
पंतप्रधान: हा बोला.
तरन्नुम खान: आपली परवानगी असेल तर मला एक प्रश्न विचारायचा आहे.
पंतप्रधान: हो विचारा ना.
तरन्नुम खान: सर, आपण आपल्या संदेशात आम्हाला सांगितलं आहे कि प्रत्येक भारतीय नागरिकांनी तीन वर्षात कमीत कमी पंधरा ठिकाणी तरी जायलाच हवं. तर तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की आम्ही कुठे जावे आणि तुम्हाला कोणत्या जागी जाऊन सर्वात चांगले वाटले होते?
पंतप्रधान: तसं तर मी नेहमी हिमालय जास्त पसंत करतो.
तरन्नुम खान: हो
पंतप्रधान: तरीपण मी भारतीय लोकांना आग्रह करेन कि जर का तुम्हाला निसर्गाविषयी प्रेम असेल.
तरन्नुम खान: हां
पंतप्रधान: घनदाट जंगल, झरे, एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण बघायचं असेल तर मी म्हणेन की आपण ईशान्य भारतात नक्की जा.
तरन्नुम खान: हो सर
पंतप्रधान: हे मी नेहमी सांगतो आणि त्यामुळे ईशान्य भारतातील पर्यटन खूप वाढेल, अर्थव्यवस्थेला पण बराच फायदा होईल आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या स्वप्नाला अजून बळकटी मिळेल.
तरन्नुम खान: हो सर
पंतप्रधान: पण हिंदुस्थानात प्रत्येक ठिकाणी खूप काही बघण्याजोगे आहे, शिकण्याजोगे आहे आणि एका प्रकारे मन प्रसन्न करण्याजोगे आहे.
श्री हरी जी वी : प्रधानमंत्रीजी, मी श्री हरी बोलतो आहे.
पंतप्रधान: हां, हरी बोला
श्री हरी जी वी: मी आपल्याकडून जाणू इच्छितो, आपण जर का एक राजकारणी झाला नसतात तर काय झाला असता?
पंतप्रधान: हा तर खूपच अवघड प्रश्न कारण प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अनेक टप्पे येतात. कधी हे व्हावे असं वाटतं तर कधी ते व्हावं असं वाटतं. पण ही गोष्ट मात्र खरी आहे की मला कधीही राजकारणात जावं असं वाटलं नव्हतं. कधी मी तसा विचारही केला नव्हता. पण आता जेव्हा पोहोचलोच आहे तर सर्वस्वाने देशाच्या कामी कसा येईन त्याचाच विचार करत राहतो आणि म्हणूनच तर आता, ‘मी इथे नसतो तर कुठे असतो’ असा विचारच मला करायला नको. आता तर तनामनाने जिथे आहे तिथेच मनःपूर्वक जगायला पाहिजे, सर्वस्व अर्पण केले पाहिजे आणि देशासाठी खूप काम केलं पाहिजे. ना दिवस बघायचा आहे न रात्र. याच एका उद्देशाने मी स्वतःला समर्पित केले आहे.
अखिल: प्रधानमंत्रीजी..
पंतप्रधान: हं
अखिल: आपण दिवसभर इतके व्यस्त असता तर मला कुतूहल आहे की तुम्हाला टीव्ही बघायला, सिनेमा बघायला किंवा पुस्तक वाचायला वेळ कधी मिळतो?
पंतप्रधान: हं, तसं तर मला पुस्तक वाचायला आवडायचं. सिनेमा बघायला कधीच विशेष आवडलं नाही. यात वेळेचे बंधन तर आहेच. कधी टीव्ही पण पाहू शकत नाही. खूपच कमी पाहतो. पूर्वी कधीतरी डिस्कव्हरी चॅनल पाहायचो, जिज्ञासा म्हणून. पुस्तकं देखील वाचायचो. पण आजकाल मात्र वाचायला वेळ मिळत नाही आणि दुसरे म्हणजे गुगल मुळे वाईट सवय लागली आहे की काही संदर्भ बघायचा असेल तर लगेच शॉर्टकट शोधतो. जशी सगळ्यांचीच सवय बिघडली आहे, माझी पण बिघडली आहे.
चला मित्रांनो, मला तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि मी तुमच्या माध्यमातून एनसीसीच्या सगळ्या छात्रांना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो धन्यवाद.
सगळे छात्र: खुप खुप धन्यवाद सर
पंतप्रधान: धन्यवाद धन्यवाद
सगळे छात्र: जय हिंद सर
पंतप्रधान: जय हिंद
सगळेछात्र: जय हिंद सर
पंतप्रधान: जय हिंद जय हिंद
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपण सगळ्या देशवासियांनी हे कधीच विसरून चालणार नाही कि सात डिसेंबरला सशस्त्र सेनादलाचा ध्वजदिन साजरा केला जातो. हा तोच दिवस आहे जेव्हा आम्ही आमच्या शूर सैनिकांचे, त्यांच्या पराक्रमाचे, त्यांच्या बलिदानाचे स्मरण करतो आणि आपलेही काही योगदान देतो. फक्त सन्मानाचा भाव असून चालणार नाही, सहभाग पण हवा.
7 डिसेंबरला प्रत्येक नागरिकाने पुढे आले पाहिजे. प्रत्येकाच्या जवळ त्या दिवशी सशस्त्र सेनादलाचा ध्वज असला पाहिजे आणि प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे. चला तर या प्रसंगी आपण आपल्या सशस्त्र सेनादलाच्या अदम्य साहसाच्या, शौर्याच्या आणि समर्पण भावनेच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करूया आणि वीर सैनिकांचं स्मरण करूया.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, भारतातील ‘फिट इंडिया’ चळवळीशी तर आपण परिचित आहात. सीबीएससीने एक प्रशंसनीय सुरुवात केली आहे – फिट इंडिया सप्ताहाची.
सगळी विद्यालये ‘फिट इंडिया’ सप्ताह डिसेंबर महिन्यात कधीही साजरा करू शकतात. यात फिटनेस विषयी अनेक प्रकारचे आयोजन करायचे आहे. त्यात कोडी, निबंध, लेख, चित्रकला, पारंपरिक आणि स्थानिक खेळ, योगासने, नृत्य आणि क्रीडा स्पर्धा सामील आहेत. या सप्ताहात विद्यार्थ्यांच्या सोबतच त्यांचे शिक्षक आणि पालक पण सहभागी होऊ शकतात. पण हे विसरू नका, कि याचा अर्थ फक्त बुद्धीची कसरत, कागदावरची कसरत किंवा लॅपटॉप कॉम्प्युटर किंवा मोबाइल फोनवर फिटनेस असा नाही तर घाम गाळायला पाहिजे. खाण्याच्या सवयी बदलायला पाहिजेत, जास्त लक्ष देऊन व्यायाम करायची सवय लागली पाहिजे.
मी देशातील सर्व राज्यातील स्कूल बोर्ड आणि शाळा व्यवस्थापन यांना आवाहन करतो की प्रत्येक शाळेत डिसेंबर महिन्यात सप्ताह साजरा केला जावा. यामुळे फिटनेस ची सवय आमच्या सगळ्यांच्या दैनंदिनीत सामील होईल. फिट इंडिया चळवळी मध्ये फिटनेस या विषयात शाळांच्या रँकींगची व्यवस्था केली गेली आहे. फिट इंडिया थ्री स्टार आणि फिट इंडिया फाइव स्टार रेटिंग दिले जाईल. हे रँकिंग मिळवणाऱ्या सगळ्या शाळा फिट इंडिया मानचिन्ह आणि ध्वजाचा वापर करू शकतील. फिट इंडिया पोर्टलवर जाऊन शाळांनी स्वतःला फिट घोषित करायचे आहे. फिट इंडिया थ्री स्टार आणि फिट इंडिया फाईव्ह स्टार अशी रेटिंगस् पण दिली जाईल. मी विनंती करतो कि सगळ्या शाळा फिट इंडिया रँकिंग मध्ये सामील व्हाव्यात आणि फिट इंडिया हा एक सहज स्वभाव बनेल, एक जनआंदोलन बनेल, ह्या विषयी जागरुकता निर्माण होईल, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपला देश इतका विशाल आहे इतक्या विविधतेने नटलेला आहे, इतका प्राचीन आहे कि अनेक गोष्टी आमच्या लक्षात येत नाहीत आणि ते स्वाभाविक पण आहे. अशीच एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. काही दिवसांपूर्वी ‘माय गव’ वर एका कॉमेंट वर माझी नजर गेली. ही कॉमेंट आसाममधील नागावच्या रमेश शर्माजी यांनी लिहिली होती. त्यांनी लिहिलं होतं, ब्रह्मपुत्र नदीवर एक उत्सव चालू आहे. त्याचे नाव आहे ब्रह्मपुत्र पुष्कर. 4 नोव्हेंबरपासून 16 नोव्हेंबरपर्यंत हा उत्सव होता आणि ह्या ब्रह्मपुत्र पुष्कर मध्ये सामील होण्यासाठी देशातील वेगवेगळ्या भागातून खूप लोक तिथे आले होते. ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटले ना? हं, हीच तर विशेष गोष्ट आहे! हा इतका महत्वपूर्ण उत्सव आहे आणि आपल्या पूर्वजांनी याची अशी रचना केलेली आहे की जेव्हा संपूर्ण माहिती ऐकाल तेव्हा आपल्यालाही खूपच आश्चर्य वाटेल. पण आपले दुर्भाग्य आहे ह्याचा जितका व्यापक प्रचार व्हायला हवा, देशाच्या कानाकोपऱ्यात याची माहिती व्हायला हवी तितक्या प्रमाणात ती होत नाही. ही गोष्ट तर खरी आहे की हे पूर्ण आयोजन एकाप्रकारे ‘एक देश एक संदेश’ आणि ‘आपण सगळे एक आहोत’ हा भाव दृढ करणारे आहे. या भावनेला ताकद देणारे आहे. सर्वात आधी रमेशजी, आपल्याला खूप खूप धन्यवाद!
कारण की आपण मन की बातच्या माध्यमातून देशवासियां पर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा निश्चय केलात. आपण अशी खंत पण व्यक्त केली कि इतक्या महत्त्वाच्या गोष्टीची व्यापक चर्चा होत नाही, प्रचार होत नाही. आपली खंत मी समजू शकतो. देशातील जास्त लोकांना याविषयी माहिती नाही. हं, पण जर का कोणी याला ‘आंतरराष्ट्रीय नदी उत्सव’ असं म्हटलं असतं, खूप मोठ्या मोठ्या दिमाखदार शब्दांचा उपयोग केला असता तर कदाचित आपल्या देशातील काही लोक असे आहेत कि त्यांनी त्याच्यावर चर्चा केली असती, प्रचार झाला असता !!
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपण कधी पुष्करम, पुष्करालू, पुष्कर: हे शब्द ऐकले आहेत का? आपल्याला माहिती तरी आहे का की हे काय आहे? मी सांगतो की देशातील बारा वेगवेगळ्या नद्यांवर जे उत्सव होतात त्यांना वेगवेगळी नावे आहेत. प्रत्येक वर्षी एका नदीवर म्हणजे प्रत्येक नदी चा नंबर बारा वर्षांनी येणार आणि हा उत्सव देशातील वेगवेगळ्या भागातील बारा नद्यांवर पाळीपाळीने होणार. बारा दिवस चालणारा हा उत्सवदेखील कुंभ सारखाच राष्ट्रीय एकता वाढवणारा आहे. “एक भारत श्रेष्ठ भारत” चे दर्शन दाखवणारा आहे पुष्करम हा एक असा उत्सव आहे, ज्यात नदीचे महात्म्य, नदीचा गौरव आयुष्यातील नदीचे महत्व अगदी सहज रूपाने स्पष्ट होते.
आमच्या पूर्वजांनी निसर्गाला, पर्यावरणाला, पाण्याला, जमिनीला, जंगलांना खूप महत्व दिले. त्यांना नद्यांचे महत्त्व समजले होते आणि समाजात नद्यांच्याविषयी सकारात्मक भावना कशी निर्माण होईल, एक संस्कार कसा होईल, नदीच्या सोबतच संस्कृतीची धारा, नदीच्या सोबतच संस्कारांची धारा, नदीच्या सोबतच समाज जोडण्याचा हा प्रयत्न निरंतर चालू होता आणि मजेची गोष्ट ही कि समाज नद्यांच्या बरोबर पण जोडला गेला आणि आपापसात पण जोडला गेला.
गेल्यावर्षी तामिळनाडूमध्ये नदीवर पुष्करम झाले होते. यावर्षी ब्रह्मपुत्रा नदीवर आयोजित झाले आणि येणाऱ्या वर्षी तुंगभद्रा नदी म्हणजेच आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात आयोजित होईल. एका प्रकारे आपण या 12 स्थळांची यात्रा एका पर्यटन साखळीच्या रूपात करू शकता. इथे मी आसामच्या लोकांचा उत्साह, त्यांचे आतिथ्य यांची प्रशंसा करू इच्छितो की ज्यांनी पूर्ण देशभरातून आलेल्या यात्रेकरूंचे स्वागत केले, सत्कार केला. आयोजकांनी स्वच्छतेकडे पण खूप लक्ष दिलं होते. प्लास्टिक फ्री झोन निश्चित केले गेले. जागोजागी बायो टॉयलेट ची पण व्यवस्था केली गेली. मला आशा आहे नद्यांच्या विषयीचा आपला आदर जागवणारा, हजारो वर्षे जुना असणारा हा उत्सव भावी पिढ्यांना पण जोडेल. निसर्ग, पर्यावरण, पाणी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पर्यटनाचा पण भाग बनतील, जीवनाचा भाग बनतील.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, ‘नमो ॲप’ वर मध्यप्रदेशातील श्वेता बेटी लिहिते आहे, तिने लिहिले आहे,” सर, मी नववीत आहे. माझ्या बोर्डाच्या परीक्षेला अजून एक वर्षाचा वेळ आहे. पण मी विद्यार्थ्यांबरोबरच्या आणि एक्झाम वॉरियर्स बरोबरच्या आपल्या चर्चा नेहमी ऐकते. मी आपल्याला यासाठी लिहिते आहे कारण की आत्तापर्यंत आपण आम्हाला हे सांगितले नाहीत की पुढची परीक्षेवरील चर्चा केव्हा असेल? कृपया लवकरात लवकर करा.शक्य असेल तर जानेवारीतच हा कार्यक्रम आयोजित करा.”
मित्रांनो, ‘मन की बात’ विषयी हीच गोष्ट मला खूप आवडते. ती म्हणजे माझे युवा मित्र ज्या अधिकाराने , ज्या प्रेमाने तक्रार करतात,आदेश देतात, सूचना देतात हे बघून मला खूप आनंद होतो. श्वेता, आपण खूपच योग्यवेळी हा विषय काढला आहे. परीक्षा येणार आहेत तर दरवर्षीप्रमाणे आम्हाला परीक्षांवर चर्चा पण करायची आहे. आपलं म्हणणं तर खरंच आहे की हा कार्यक्रम थोडा आधी आयोजित करायची आवश्यकता आहे.
गेल्या कार्यक्रमानंतर अनेक लोकांनी हा कार्यक्रम अधिक प्रभावी व्हावा म्हणून सूचना पाठवल्या आहेत आणि तक्रार देखील केली आहे. गेल्या वेळी हा कार्यक्रम उशिरा झाला होता, परीक्षा अगदी जवळ आल्यावर झाला होता. श्वेताची सूचना योग्यच आहे. मला हा कार्यक्रम जानेवारीत करायला हवा. मनुष्य बळ विकास मंत्रालय आणि “my gov “चा संच मिळून ह्या कार्यक्रमासाठी काम करत आहेत. पण मी प्रयत्न करीन यावेळी परिक्षांवरची चर्चा जानेवारीच्या सुरुवातीला किंवा मध्यावर होईल. देशभरातल्या विद्यार्थी मित्रांजवळ दोन संधी आहेत. पहिली म्हणजे आपल्या शाळेतून त्या कार्यक्रमाचा भाग बनणे आणि दुसरी म्हणजे दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाचा भाग बनणे. दिल्लीतील कार्यक्रमासाठी देशभरातल्या विद्यार्थ्यांची निवड “my gov “च्या माध्यमातून केली जाईल.
मित्रांनो आपल्या सगळ्यांना मिळून परीक्षेच्या भीतीला दूर पळवायचे आहे. माझे युवा मित्र परिक्षेच्या वेळी मनमोकळे हसताना दिसावे, पालक तणावमुक्त असावेत, शिक्षक आश्वस्त असावेत याच उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून आम्ही “मन की बात”च्या माध्यमातून परीक्षांवर चर्चा, टाऊन हॉल च्या माध्यमातून किंवा एक्झाम वॉरियर्स पुस्तकाच्या माध्यमातून करण्याचा सतत प्रयत्न करत आहोत. या उपक्रमाला देशभरातील विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी गती दिली याबद्दल मी ह्या सगळ्यांचा आभारी आहे. आणि येणाऱ्या परीक्षेवर चर्चा हा कार्यक्रम आपण सगळे मिळून करूयात. आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे.
मित्रांनो गेल्यावेळच्या “मन की बात” मध्ये आपण 2010 मध्ये आयोध्या प्रकरणात आलेल्या अलाहाबाद हायकोर्टाच्या निकाला विषयी चर्चा केली होती आणि मी त्यावेळी सांगितले होते की देशाने त्यावेळी निर्णय येण्याच्या आधीदेखील आणि निर्णय लागल्यावर देखील शांती आणि बंधुभाव कसा टिकवून ठेवला होता. यावेळी देखील 9 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तेव्हा एकशे तीस कोटी भारतीयांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्यांच्यासाठी देश हितापेक्षा जास्त महत्वाचे काहीही नाही. देशातील शांती, एकता आणि सद्भावना ही मूल्ये सर्वात महत्वाची आहेत. राम मंदिराविषयीचा निर्णय जेव्हा आला तेव्हा संपूर्ण देशाने त्याचे हार्दिक स्वागत केले. अगदी सहजतेने आणि शांतीपूर्वक स्वीकार केला. आज ‘मन कि बात’च्या माध्यमातून मी देशवासीयांना साधुवाद देतो, धन्यवाद देतो. त्यांनी ज्या प्रकारे धैर्य, संयम आणि परिपक्वता दाखवली त्यासाठी मी विशेष आभार प्रगट करू इच्छितो. एकीकडे जेव्हा प्रदीर्घ कालावधीनंतर कायद्याची लढाई समाप्त झाली आहे तेव्हा दुसरीकडे न्यायव्यवस्थेविषयी असलेला देशाचा आदरभाव अजूनच वाढलेला आहे. खऱ्या अर्थाने आमच्या न्याय व्यवस्थेसाठी पण हा मैलाचा दगड ठरला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या ऐतिहासिक निकालानंतर आता देश नवीन उमेद, नवीन आकांक्षांच्या साथीने नव्या मार्गावर नवे ध्येय घेऊन वाटचाल करु लागला आहे.
नवा भारत याच भावनेला आपलेसे करून शांती, एकता आणि सद्भावनेच्या सोबत पुढे जावा अशी माझी इच्छा आहे. आपणा सर्वांची ही इच्छा आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आमची परंपरा, संस्कृती आणि भाषा संपूर्ण जगाला ‘विविधतेतून एकता’ हा संदेश देतात. एकशे तीस कोटी भारतीयांचा हा तोच देश आहे जेथे म्हंटले जाते की “कोसा-कोसांवर बदलते पाणी आणि चार कोसांवर बदलते वाणी” आमची भारत भूमी शतकानुशतके अनेक भाषा जोपासत आली आहे. खरंतर आम्हाला कधीकधी याची पण चिंता वाटते कि काही भाषा, काही बोली नष्ट तर होणार नाहीत ना?
काही दिवसांपूर्वी मला उत्तराखंडमधील धारचुला ची गोष्ट वाचायला मिळाली. मला खूप आनंद झाला. ह्या गोष्टीतून समजते की कशा प्रकारे लोक आपली भाषा आणि तिच्या प्रगतीसाठी पुढे येत आहेत, काही नवे प्रयोग करत आहेत. पूर्वी मी धारचुला मध्ये प्रवासात येता-जाता थांबत असे यामुळे देखील धारचुलाच्या बातमीकडे लक्ष गेले. त्याबाजूला नेपाळ, या बाजूला कालीगंगा. तर साहजिकच धारचुला हा शब्द ऐकताच या बातमीकडे माझं लक्ष गेले. पिथौरागढच्या धारचुला मध्ये रंग समुदायाचे खूप लोक राहतात आणि “रंगलो” हि त्यांची आपापसातील व्यवहाराची बोली भाषा आहे. हे लोक असा विचार करून खूप दुःखीकष्टी व्हायचे कि ही भाषा बोलणारे लोक सतत कमी-कमी होत आहेत. मग एक दिवस या सगळ्यांनी आपल्या भाषेला वाचवण्याचा संकल्प केला. पाहता पाहता या कार्यात रंग समुदायातील अनेक लोक सामील होत गेले.
तुम्हाला आश्चर्य वाटेल कि ह्या समुदायातील लोकांची संख्या अगदी मोजता येण्याजोगी आहे. साधारण म्हणू शकतो की बहुतेक दहा हजार असेल. पण रंग भाषा वाचवण्यासाठी प्रत्येक जण काम करू लागला. मग ते 84 वर्षांचे जेष्ठ दिवान सिंह असतील किंवा 22 वर्षांची युवा वैशाली गरब्याल. प्रोफेसर असो किंवा व्यापारी, प्रत्येक जण शक्य ते सर्व प्रयत्न करू लागला. या कार्यात सोशल मीडियाचा पण खूप वापर केला गेला. अनेक व्हाट्सअप ग्रुप बनवले गेले आणि शेकडो लोकांना त्याद्वारे जोडलं गेलं. या भाषेची काही लिपी नाहीये. फक्त बोलीभाषेत प्रचलित आहे. अलीकडे मग लोक गोष्टी कविता-गाणी पोस्ट करायला लागले. परस्परांची भाषा सुधारू लागले. एक प्रकारे व्हाट्सअप जणू शाळेचा वर्ग बनला. इथे प्रत्येक जण शिक्षक आणि प्रत्येक जणच विद्यार्थी. रंगलो भाषेला वाचवण्याची धडपड ह्या सर्व प्रयत्नात आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आहे. पत्रिका प्रकाशित केली जाते आहे आणि यासाठी सामाजिक संस्थांची मदत पण मिळते आहे.
मित्रांनो विशेष गोष्ट ही आहे की संयुक्त राष्ट्रांनी 2019 म्हणजेच या वर्षाला ‘International Year of Indigenous Languages’- स्थानिक भाषांसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष” म्हणून घोषित केले आहे. म्हणजेच ज्या भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर येऊन ठेपलेल्या आहेत, त्या भाषांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. दीडशे वर्षांपूर्वी आधुनिक हिंदीचे जनक भारतेंदु हरिश्चंद्रजी ह्यांनी म्हटलं होतं,
“निज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल,
बिन निज भाषा-ज्ञान के, मिटत न हिय को सूल ||”
अर्थात मातृभाषेच्या ज्ञानाशिवाय प्रगती शक्य नाही. अशातच रंग समुदायाने काढलेला हा मार्ग पूर्ण विश्वाला मार्गदर्शक ठरला आहे.जर का आपल्यालाही या गोष्टीने प्रेरणा मिळाली असेल तर आजपासूनच आपल्या मातृभाषेचा, आपल्या बोली चा उपयोग करा. आपल्या कुटुंबाला, समाजाला प्रेरित करा. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी महाकवी सुब्रमण्यम भारती तमिळमध्ये म्हणाले होते, ते पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायक आहे.
मुप्पदु कोडी मुगमुडैयाळ
उयिर् मोइम्बुर ओंद्दुडैयाळ
इवळ सेप्पु मोळी पधिनेट्टूडैयाळ
एनिर् सिन्दनै ओंद्दुडैयाळ
(Muppadhu kodi mugamudayal, enil maipuram ondrudayal
Ival seppumozhi padhinetudayal, enil sindhanai ondrudayal)
आणि ही एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातली गोष्ट आहे. त्यांनी म्हटलं होतं, भारत मातेचे तीस कोटी चेहरे आहेत पण शरीर एक आहे. इथे 18 भाषा बोलल्या जातात पण विचार एक आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, कधीकधी आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी पण आम्हाला खूप मोठा संदेश देऊन जातात. आता हेच बघा ना, प्रसार माध्यमातच स्कुबा डायव्हर्सची एक गोष्ट वाचत होतो. एक अशी गोष्ट जी प्रत्येक भारतवासीयाला प्रेरणा देईल. विशाखापट्टणम मध्ये गोताखोरीचे प्रशिक्षण देणारे स्कुबा डायव्हर्स एक दिवस मंगमेरीपेटा बीचवर समुद्रातून परत येत होते तेव्हा समुद्रात तरंगणाऱ्या काही प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांशी त्यांची टक्कर होत होती. ते सगळं साफ करताना त्यांना गोष्ट मोठी गंभीर वाटली. आमचा समुद्र कशाप्रकारे कचऱ्याने भरला जातो आहे?? आता गेल्या काही दिवसांपासून हे पाणबुडे समुद्र किनाऱ्यापासून जवळपास शंभर मीटर दूर जातात, खोल पाण्यात डुबकी मारतात आणि मग तिथे असलेला कचरा बाहेर काढतात. मला सांगितलं गेलं की तेरा दिवसातच म्हणजे दोन आठवड्यातच जवळ जवळ चार हजार किलोहून अधिक प्लास्टिकचा कचरा त्यांनी समुद्रातून बाहेर काढला आहे. या स्कुबा डायव्हर्सच्या एका छोट्याश्या सुरुवातीने एका मोठ्या चळवळीचं रूप घेतले आहे. आता त्यांना स्थानिक लोकांची मदत मिळते आहे. आसपासचे कोळी पण त्यांना सर्व प्रकारची मदत करायला लागले आहेत. जरा विचार करा या स्कुबा डायव्हर्स पासून प्रेरणा घेऊन जर आपण पण आपल्या आसपासच्या भागाला प्लास्टिकच्या कचऱ्यापासून मुक्त करायचा संकल्प केला तर मग प्लास्टिक मुक्त भारत संपूर्ण विश्वासाठी एक नवे उदाहरण ठरेल.
माझ्या प्रिय देशवासीयांनो दोन दिवसांनंतर 26 नोव्हेंबर आहे. हा दिवस संपूर्ण देशासाठी खूप विशेष आहे. आमच्या गणतंत्रासाठी तर विशेषत्वाने महत्त्वाचा आहे कारण या दिवशी आम्ही ‘संविधान दिवस’ साजरा करतो. आणि ह्या वर्षीचा संविधान दिवस विशेष आहे कारण यावर्षी संविधानाला 70 वर्ष पूर्ण होत आहेत. याप्रसंगी संसदेत विशेष आयोजन होईल आणि मग पूर्ण वर्षभर संपूर्ण देशात वेगवेगळे कार्यक्रम होतील. चला तर, या प्रसंगी आपण आपल्या संविधान समितीच्या सर्व सदस्यांना आदरपूर्वक नमस्कार करुया. आपली श्रद्धा अर्पित करूया. भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांचे आणि सन्मानाचे रक्षण करते आणि हे सगळे आमच्या संविधान निर्मात्यांच्या दूरदर्शीपणा मुळेच सुनिश्चित होऊ शकले आहे. मी आशा करतो की संविधान दिवसाच्या निमित्ताने आमच्या संविधानातील आदर्शांना कायम ठेवण्याचा आणि राष्ट्रनिर्माणात आपले योगदान देण्याचा आमचा निश्चय अधिक दृढ होईल. हेच तर स्वप्न आमच्या संविधान निर्मात्यांनी पाहिलं होतं.
माझ्या प्रिय देशवासीयांनो हिवाळा सुरू होतो आहे. गुलाबी थंडी आता अनुभवास येते आहे. हिमालयाच्या काही भागाने बर्फाची चादर ओढणे सुरू केलं आहे. पण हा ऋतू, “फिट इंडिया” चळवळीचा ऋतू आहे. आपण, आपला परिवार, आपला मित्र वर्ग, आपले सोबती ही संधी वाया जाऊ देऊ नका. फिट इंडिया चळवळ पुढे नेण्यासाठी या मोसमाचा संपूर्ण फायदा उठवा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद!!!
S.Tupe/D.Rane/AIR
Today's #MannKiBaat begins with a special interaction with a few youngsters.
— PMO India (@PMOIndia) November 24, 2019
These are youngsters associated with the NCC.
PM Modi also conveys greetings to all NCC Cadets on NCC Day. https://t.co/omR3Qf3sSY
NCC Cadets are sharing their experiences with PM @narendramodi.
— PMO India (@PMOIndia) November 24, 2019
They are sharing how NCC has helped further national integration.
They are also narrating to PM about their recent visit to Singapore.
Do tune in. #MannKiBaat https://t.co/jjjScOqsPP
One of the NCC Cadets asks PM @narendramodi - were you ever punished while you were associated with the NCC?
— PMO India (@PMOIndia) November 24, 2019
Know what PM has to say. #MannKiBaat https://t.co/jjjScOqsPP
I have always liked being in the Himalayas.
— PMO India (@PMOIndia) November 24, 2019
But, if someone likes nature I would strongly urge you all to go to India's Northeast: PM @narendramodi #MannKiBaat
During #MannKiBaat, PM talks about the significance of Armed Forces Flag Day.
— PMO India (@PMOIndia) November 24, 2019
He pays tributes to the valour of our armed forces and at the same time appeals to the people of India to contribute towards the well-being of the welfare of the personnel of the armed forces.
Highlighting an interesting initiative by CBSE to promote fitness among youngsters.
— PMO India (@PMOIndia) November 24, 2019
PM @narendramodi also urges schools to follow a Fit India week in the month of December. #MannKiBaat pic.twitter.com/8HGflknTos
Do you know about Pushkaram?
— PMO India (@PMOIndia) November 24, 2019
A great festival held across various rivers, occurring once a year on the banks of each river.
It teaches us to respect nature, especially our rivers. #MannKiBaat pic.twitter.com/q10azETeb5
On the basis of valuable feedback, the 'Pariksha Pe Charcha' programme will be held earlier, sometime in January.
— PMO India (@PMOIndia) November 24, 2019
The feedback received after the last Town Hall Programme and from Exam Warriors book has been very valuable, says PM @narendramodi. #MannKiBaat pic.twitter.com/m9uZMmQFwT
PM @narendramodi once again thanks the 130 crore people of India for the manner in which the spirit of unity and brotherhood was furthered after the verdict on the Ram Janmabhoomi case. #MannKiBaat pic.twitter.com/ftmaoPsUYN
— PMO India (@PMOIndia) November 24, 2019
A news report from Uttarakhand's Dharchula caught PM @narendramodi's eye.
— PMO India (@PMOIndia) November 24, 2019
This was about how a group of people, across all age groups came together to preserve their language and further their culture. #MannKiBaat pic.twitter.com/ewxw8ZhN8t
A group of scuba divers made a strong contribution towards furthering cleanliness.
— PMO India (@PMOIndia) November 24, 2019
PM @narendramodi highlights their effort during #MannKiBaat. pic.twitter.com/8cATW4ClZk
A special Constitution Day this 26th.
— PMO India (@PMOIndia) November 24, 2019
Come, let us rededicate ourselves to the values enshrined in our Constitution. #MannKiBaat pic.twitter.com/kjSSzRG5Mx