Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश


माझ्या प्रिय देशवासियांनो,

आज 27 मार्च, काही वेळापूर्वीच भारतानं एक अभूतपूर्व यश प्राप्त केलं आहे. आज भारताची ‘अंतराळ महाशक्ती’ म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे. भारताचं नाव आता ‘स्पेस पॉवर’ म्हणूनही घेतलं जाणार आहे.

आत्तापर्यंत संपूर्ण जगामध्ये अमेरिका, रशिया आणि चीन या तीन राष्ट्रांकडेच ‘स्पेस पॉवर‘ म्हणजे अंतराळ महाशक्ती होती. आता अशी महाशक्ती प्राप्त करणा-या यादीमध्ये चैाथं नाव, भारताचं जोडलं गेलं आहे. आज प्रत्येक हिंदुस्तानींसाठी इतका महत्वाचा आणि  अभिमानाचा क्षण यापेक्षा दुसरा कोणताच असू शकणार नाही.

काही वेळापूर्वीच, आमच्या शास्त्रज्ञांनी अंतराळामध्ये तीनशे किलोमीटर दूर, एलईओ – ‘लो अर्थ ऑरबिट’मध्ये एका ‘लाइव्ह’ उपग्रहाला नष्ट करून खाली पाडलं आहे.

एलईओ – ‘लो अर्थ ऑरबिट’मध्ये हा  लाइव्ह उपग्रह, एक पूर्व निर्धारित लक्ष्य होतं. त्याला अँटी सॅटेलाइट ( ए-सॅट) च्याव्दारे नष्ट करून खाली पाडण्यात आलं. ही कारवाई फक्त तीन मिनिटांच्या अवधीमध्ये यशस्वी करण्यात आली आहे.

आज करण्यात आलेली कारवाई म्हणजे, ‘मिशन शक्ती’ ही अत्यंत अवघड कारवाई होती. यासाठी अतिशय उच्चकोटीच्या क्षमतेच्या तंत्रज्ञानाची आवश्यकता होती.

वैज्ञानिकांनी जी काही लक्ष्य आणि उद्देश निश्चित केले होते, ते सर्व प्राप्त करण्यात आले आहेत.

आपण सर्व भारतीयांसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. हा पराक्रम भारतामध्ये विकसित करण्यात आलेल्या अँटी-सॅटेलाइट (ए-सॅट) क्षेपणास्त्राव्दारे सिद्ध करण्यात आला आहे.

सर्वात प्रथम या मिशनमध्ये सहभागी झालेल्या ‘डीआरडीओ’च्या सर्व शास्त्रज्ञांचं, संशोधकांचं तसंच याच्याशी संबंधित असलेल्या कर्मचारी वर्गाचं अभिनंदन करतो. आपण सर्वांनी हे असामान्य, अव्दितीय यश मिळवण्यासाठी जे योगदान दिलं, त्याबद्दल अभिनंदन करतो. आज पुन्हा एकदा आपण सर्वांनी देशाचा सन्मान वाढवला आहे. आम्हाला आमच्या या सर्व शास्त्रज्ञांचा गर्व, अभिमान वाटतो.

अंतराळ म्हणजे आज आमच्या जीवनशैलीचा एक महत्वपूर्ण भाग बनला आहे.

आज आमच्याकडे पुरेशा संख्येनं उपग्रह उपलब्ध आहेत.

हे उपग्रह वेगवेगळ्या क्षेत्रांच्या विकासकार्यासाठी आपलं बहुमोल योगदान देत आहेत. उदाहरणार्थ- कृषी, संरक्षण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, दळणवळण, दूरसंचार, हवामान, शिक्षण, नॅव्हिगेशन म्हणजे स्थानदर्शनाचं कार्य.

आपल्या उपग्रहांचा लाभ सर्वांना मिळत आहे. मग तो शेतकरी बांधव असो की मच्छिमार असो, विद्यार्थी असो, सुरक्षा दल असो, सर्वांना मदत होत आहे. दुसरीकडे मग ती रेल्वे असो अथवा विमान किंवा जहाज चालवण्याचं काम असो, या सर्वांसाठी उपग्रहाचा उपयोग केला जात आहे.

विश्वामध्ये अंतराळ आणि उपग्रहाचं महत्व दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. उपग्रहाविना कदाचित जीवन अपूरं राहणार आहे. अशा स्थितीमध्ये या सर्व उपकरणांची सुरक्षा अधिक कडक करणं तितकंच जास्त महत्वाचं आहे.

आजचं अँटी सॅटेलाईट (ए-सॅट) क्षेपणास्त्र भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि भारताच्या विकास यात्रेच्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. यामुळं देश आणखी बळकट होणार आहे. मी आज विश्व समुदायालाही आश्वस्त करू इच्छितो की, आज आम्ही जी नवीन क्षमता प्राप्त केली आहे, ती काही कोणाच्या विरोधासाठी नाही. अतिशय वेगानं प्रगतीपथावर वाटचाल करणा-या हिंदुस्तानच्या रक्षणासाठी उचललेलं हे एक पाऊल आहे.

भारत नेहमीच अंतराळामध्ये शस्त्रास्त्रांची स्पर्धा करण्याच्या विरोधात आहे. आणि आमच्या या धोरणामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आजच्या या परीक्षणानं कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय नियम, कायद्यांचा भंग आम्ही केला नाही. तसंच कोणत्याही सामंजस्य करार, अटींचं उल्लंघन केलेलं नाही. आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशाच्या 130 कोटी नागरिकांची सुरक्षा आणि त्यांचे कल्याण करू इच्छितो.

या क्षेत्रामध्ये शांती आणि सुरक्षेचं वातावरण कायम ठेवण्यासाठी एक मजबूत भारत असणं आवश्यक आहे. आमचा सामरिक उद्देश शांती कायम ठेवण्याचा आहे. युद्धाचं  वातावरण तयार करण्याचा आमचा हेतू नाही.

प्रिय देशवासियांनो,

भारतानं अंतराळ क्षेत्रामध्ये जे कार्य केलं आहे, त्याचा मूळ उद्देश भारताची सुरक्षा, भारताचा आर्थिक विकास आणि भारताची तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करण्याचा आहे.

आजचं हे ‘मिशन’ या स्वप्नांना सुरक्षित करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे.

आजच्या या यशाला आगामी काळामध्ये एक सुरक्षित राष्ट्र, समृद्ध राष्ट्र आणि शांतीप्रिय राष्ट्राच्या दिशेनं पुढं जाणारा देश म्हणून  पाहिलं पाहिजे. आपण पुढची वाटचाल करायची आहेच आणि आपणच आपल्याला  भविष्यातल्या आव्हानांसाठी तयार करायचं आहे, यासाठी हे काम महत्वाचं होतं.

आपण भविष्यातल्या आव्हानांना तोंड द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सकारात्मक परिवर्तन आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही स्वीकार केला पाहिजे. सर्व भारतीवासीयांनी भविष्यातल्या आव्हानांचा सामना आत्मविश्वासाने केला पाहिजे तसंच स्वतः सुरक्षित असल्याचं सर्वांना जाणवलं पाहिजे. हेच आमचं लक्ष्य आहे.

तुम्ही सर्व लोकांनी हे मिशन करताना जी कर्मठता दाखवली, कामाविषयी बांधिलकी, समर्पणाची भावना दाखवली त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळंच हे यश मिळू शकलं आहे, असं मला वाटतं. आपण सर्वजण एकजुटीनं एक शक्तीशाली, आनंदी आणि सुरक्षित भारत नक्कीच निर्माण करणार आहोत.

माझ्या मनामध्ये भारताची एक वेगळी परिकल्पना आहे. माझ्या मनातला भारत काळापेक्षा दोन पावलं पुढचा विचार करतो आणि त्याच विचाराप्रमाणे वाटचाल करण्याचीही हिम्मत त्याच्यामध्ये आहे.

या महान, अव्दितीय यशाबद्दल सर्व देशवासियांचे खूप-खूप अभिनंदन!

धन्यवाद !!

 

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane