Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून येथे डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट 2018 ला संबोधित केले


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून येथे डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट 2018 ला संबोधित केले. ते म्हणाले की भारत जलद गतीने बदल करीत आहे. आगामी दशकात भारत हा जागतिक वाढीचा एक प्रमुख इंजिन असल्याचे मानले जात आहे. त्यांनी सांगितले की भारतातील आर्थिक सुधारणांचा वेग आणि प्रमाण अभूतपूर्व आहे. या संदर्भात त्यांनी सांगितले की भारताने उद्योग सुलभतेच्या क्रमवारीत 42 क्रमांकाने सुधारणा केली आहे. करप्रणालीत सुरू झालेल्या सुधारणांविषयी पंतप्रधानांनी भाष्य केले. ते म्हणाले की नादारी आणि दिवाळखोरी कायद्याने व्यवसाय करणे सोपे केले आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात आतापर्यंत जीएसटीची अंमलबजावणी सर्वात मोठी कर सुधारणा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे देशाला एकल बाजारपेठेत रूपांतरित केले आहे आणि कर आधार वाढविण्यात मदत झाली आहे.

पंतप्रधान म्हणाले की, पायाभूत सुविधा क्षेत्र वेगाने प्रगती करीत आहे. त्यांनी रस्ते बांधकाम, रेल्वे लाइन बांधकाम, नवीन मेट्रो प्रणाली, हाय स्पीड रेल्वे प्रकल्प आणि समर्पित मालवाहक कॉरिडॉर बद्दलही सांगितले. हवाई क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आणि लोकांसाठी गृहनिर्माण, ऊर्जा, स्वच्छ इंधन, आरोग्य आणि बँकिंग सेवा क्षेत्रातील प्रगतीचादेखील पंतप्रधानांनी उल्लेख केला. अलीकडेच सुरू केलेल्या आयुषमान भारत योजनेमुळे श्रेणी – 2 आणि श्रेणी – 3 शहरांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील सुविधांच्या विकासाला प्रोत्साहन मिळेल.

पंतप्रधानांनी सांगितले की, नवीन भारत हे गुंतवणूकीसाठी एक उत्तम ठिकाण आहे आणि “गंतव्य उत्तराखंड” त्याचे प्रतिनिधित्व करतो. राज्यातील गुंतवणूकदारांच्या सुलभतेसाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी चर्चा केली. सर्व ऋतूंसाठी अनुकूल चार-धाम रस्ते प्रकल्प आणि ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे लाइन प्रकल्पासह राज्यात दळणवळण सुधारण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेल्या प्रगतीविषयी देखील सांगितले. राज्याच्या पर्यटन क्षेत्रातील प्रचंड क्षमतेविषयी पंतप्रधानांनी उल्लेख केला.

अन्न प्रक्रिया आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रामध्ये घेतलेल्या पुढाकाराबद्दल पंतप्रधानांनी भाष्य केले. “मेक इन इंडिया” या उपक्रमाच्या प्रगतीचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

 

N.Sapre/S.Tupe