Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (30 सप्टेंबर 2018)


माझ्या  प्रिय देशबांधवानो, नमस्कार, आपल्या सशस्त्र सेना, आपल्या लष्कराच्या जवानांचा अभिमान नसणारा भारतीय क्वचितच असू शकेल. प्रत्येक भारतीय, मग तो कोणतेही क्षेत्र, जाती, धर्म, पंथ किंवा भाषेचा असो, आपल्या सैनिकांप्रती, आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. काल भारताच्या सव्वाशे कोटी भारतीयांनी पराक्रम पर्व साजरे केले. 2016 मध्ये केलेल्या लक्ष्य भेदी हल्ल्याचं आपण स्मरण केलं, जेव्हा दहशतवादाच्या आडून छुपं युद्ध छेडणाऱ्यांना, आपल्या सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं. देशाच्या वेगवेगळ्या भागात, आपल्या सशस्त्र बलानी, प्रदर्शने भरवली ज्यायोगे देशाचे जास्तीत जास्त नागरिक, विशेष करून युवा पिढीला आपले सामर्थ्य जाणता येईल. आपण किती सक्षम आहोत आणि आपले सैनिक प्राणाची बाजी लावून आपणा देशवासीयांचे रक्षण कसे करतात हे जाणता येईल. पराक्रम पर्व सारखा दिवस युवकांना आपल्या सशस्त्र दलाच्या गौरवपूर्ण वारशाचे स्मरण करून देतो आणि देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी आपल्याला प्रेरीतही करतो. मी सुद्धा, शूरविराची भूमी राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झालो. आपल्या देशातील शांतता आणि प्रगतीचे वातावरण नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आपले सैनिक चोख प्रत्युत्तर देणार हे निश्चित. शांततेवर आमचा विश्वास आहे आणि त्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता आम्ही कटीबद्ध आहोत मात्र सन्मानाशी तडजोड आणि देशाच्या सार्वभौमत्वाची किंमत चुकवून कदापि नव्हे. भारत शांततेसाठी सदैव कटीबद्ध आणि समर्पित राहिला आहे. 20 व्या शतकात दोन विश्वयुद्धात आपल्या एक लाखाहून जास्त सैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान केले, आपला या युद्धाशी काही संबंध नसताना या सैनिकांनी बलिदान केले. दुसऱ्याच्या भूमीवर आम्ही कधीच नजर ठेवली नाही. शांततेप्रती आमची ती कटीबद्धता होती. काही दिवसांपूर्वीच 23 सप्टेंबरला आम्ही इस्त्रायल मध्ये हैफाच्या लढाईला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मैसूर, हैदराबाद आणि जोधपूर लांसर्सच्या आपल्या शूर सैनिकांचे स्मरण केले ज्यांनी हैफाला आक्रमकांपासून मुक्त केले. शांततेच्या दिशेने आपल्या सैनिकांनी केलेला हा एक पराक्रम होता. आजही संयुक्त राष्ट्रांच्या वेग वेगळ्या शांती सैन्यात जास्तीत जास्त सैनिक पाठवणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. दशकांपासून आपल्या सैनिकांनी निळे हेल्मेट घालून जगभरात शांतता नांदावी यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आकाशाची  गोष्टच वेगळी असते. आकाशात आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवत भारतीय हवाई दलाने प्रत्येक देशवासियांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे यात आश्चर्य नाही. आपल्याला त्यांनी सुरक्षिततेचा विश्वास दिला आहे. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात लोकांना ज्याची उत्कंठा असते त्यापैकी एक म्हणजे फ्लाय पास्टज्यामध्ये आपले हवाई दल चित्त थरारक हवाई प्रात्यक्षिक करून आपल्या सामर्थ्याची चुणूक  दाखवतात. 8 ऑक्टोबरला आपण हवाई दल दिन साजरा करतो. 1932 मधे सहा वैमानिक आणि 19 हवाई दल सैनिकांपासून एक छोटीशी सुरवात करत आपले हवाई दल आता 21 व्या शतकातल्या सर्वात साहसी आणि सामर्थ्यवान हवाई दलापैकी एक बनले आहे. हा एक संस्मरणीय प्रवास आहे. देशासाठी सेवा करणाऱ्या सर्व हवाई सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. 1947 मधे पाकिस्तानी हल्लेखोरानी अप्रत्यक्ष हल्ला सुरु केला तेव्हा, श्रीनगरचा बचाव करण्यासाठी भारतीय सैनिक आणि सामग्री युद्धाच्या मैदानात वेळेवर पोहोचतील याची हवाई दलानेच खातरजमा केली. हवाई दलाने 1965 मधेही शत्रूला चोख  प्रत्युत्तर दिलं. 1971 मधले बांगलादेशचे स्वातंत्र्य युध्द कोण जाणत नाही ? 1999 मधे घुसखोरापासून  कारगिल मुक्त करण्यातही हवाई दलाची महत्वाची भूमिका राहिली आहे. टायगर हिलवर शत्रूच्या आश्रय ठिकाणांवर अहोरात्र बॉम्ब वर्षाव करत हवाई दलाने त्यांना धूळ चारली. मदत आणि बचाव कार्य असो किंवा आपत्ती व्यवस्थापन, आपल्या हवाई दलाच्या या शूरवीरांच्या प्रशंसनीय कामगिरीप्रती, देश कृतज्ञ आहे. वादळ, पूर ते जंगलातल्या आगीपर्यंत नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्याचे आणि देशवासियांना मदत करण्याचे त्यांचे कार्य अद्भुत आहे. देशात स्त्री-पुरुष समानता सुनिश्चित करण्यातही हवाई दलाने आदर्श निर्माण केला आहे, आपल्या प्रत्येक विभागाची दारे त्यांनी मुलींसाठी खुली केली आहेत. आता तर हवाई दल शॉर्ट सर्व्हिस कमिशनबरोबरच परमनंट कमिशनचा पर्यायही देत आहे, ज्याची घोषणा याच वर्षीच्या 15 ऑगस्टला मी लाल किल्ल्यावरून केली होती. आपल्या सशस्त्र दलात पुरुष शक्ती बरोबरच तितकेच  स्त्री शक्तीचे योगदानही  होत आहे असे भारत अभिमानाने सांगू शकतो. महिला सबल तर आहेतच आता सशस्त्रही होत आहेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही दिवसात नौदलाचे आपले एक अधिकारी अभिलाष टॉमी, जीवन-मरणाची झुंज देत होते. त्यांना कसे वाचवता येईल याची संपूर्ण देश चिंता करत होता. अभिलाष टॉमी एक धाडसी वीर अधिकारी आहेत हे आपणा सर्वाना माहित आहेच. कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानावाचून एक छोटीशी नाव घेऊन जगाची सफर करणारे ते पहिले भारतीय अधिकारी आहेत. गेल्या 80  दिवसापासून, दक्षिण  हिंदी महासागरात, गोल्डन ग्लोब रेस मधे भाग घेण्यासाठी समुद्रात आपली गती कायम राखत ते आगेकूच करत होते मात्र भयानक सागरी वादळाने त्यांच्या समोर संकट निर्माण केले मात्र भारतीय नौदलाचा हा वीर समुद्रात अनेक दिवस झुंज देत राहिला, लढत राहिला. अन्न-पाण्यावाचून, पाण्यात लढत राहिला. जीवनाकडून हार मानली नाही. साहस, संकल्प शक्ती, पराक्रम यांचे एक अद्‌भुत उदाहरण. काही दिवसांपूर्वी, अभिलाष यांची समुद्रातून सुखरूप सुटका करण्यात आली त्यानंतर मी दूरध्वनी वरून  त्यांच्याशी संभाषण केले. याआधीही मी त्यांना भेटलो आहे. एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आल्यानंतरही त्यांचं जे मनोबल होते, उत्साह होता, पुन्हा एकदा असा पराक्रम करण्याचा त्यांचा संकल्प त्यांनी मला सांगितला तो देशाच्या युवा पिढीला प्रेरक आहे. मी अभिलाष टॉमी यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना करतो आणि त्याचं हे साहस, त्यांचा पराक्रम, त्यांची संकल्प शक्ती आणि जिंकण्याची दुर्दम्य ताकद आपल्या देशाच्या युवा पिढीला नक्कीच प्रेरणा देईल. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, 2 ऑक्टोबर या दिवसाचे आपल्या देशासाठी काय महत्व आहे हे अगदी लहान मुलांनाही माहित आहे. या वर्षीच्या 2 ऑक्टोबरला आणखी एक विशेष महत्व आहे. आतापासून दोन वर्ष आपण महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंती निमित्त जगभरात अनेक कार्यक्रम करणार आहोत. महात्मा गांधींच्या विचारांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. डॉ मार्टिन ल्युथर किंग ज्यूनिअर असोत किंवा नेल्सन मंडेला, यासारख्या महान विभूतीनी, प्रत्येकाने गांधींच्या विचारातून शक्ती प्राप्त केली आणि आपल्या लोकांना समानता आणि सन्मानाचा हक्क देण्यासाठी दीर्घ लढा देऊ शकले. आजच्या मन की बातमधून मी आपल्या पूज्य बापूंच्या एका आणखी महत्वपूर्ण कार्याची चर्चा करू इच्छितो, जे अधिकाधिक लोकांनी माहित करून घेतले पाहिजे. 1941 मधे, महात्मा गांधींनी  रचनात्मक कार्यक्रमाच्या रूपाने, काही विचार लिहिणे सुरु केले. त्यानंतर 1945 मधे स्वातंत्र्य संग्रामाने जोर घेतला त्यावेळी  त्यांनी या विचारांची सुधारीत प्रत तयार केली. पूज्य बापूंनी, शेतकरी, गाव, श्रमिकांच्या अधिकाराचे रक्षण, स्वच्छता, शिक्षणाचा प्रसार यासारख्या विषयावर आपले विचार देशवासियांसमोर ठेवले. याला गांधी चार्टरअसेही म्हणतात. पूज्य बापू लोक संग्रही होते. लोकांना जोडणे, त्यांच्यात मिसळणे हे बापूंचे वैशिष्ट होते, तो त्यांचा स्वभाव होता. या त्यांच्या आगळ्या वैशिष्ट्याचा प्रत्येकाने केव्हा ना केव्हा नक्कीच अनुभव घेतला होता. त्यांनी प्रत्येकाला हा अनुभव दिला की ती व्यक्ती देशासाठी सर्वात महत्वाची आणि नितांत आवश्यक आहे. स्वातंत्र्य लढ्यातलं त्याचं सर्वात मोठे योगदान हे आहे की त्यांनी या लढ्याला व्यापक जनआंदोलनाचं स्वरूप दिलं. स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनात महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत, समाजाच्या प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक वर्गातल्या लोकांनी स्वतःला झोकून दिलं. बापूंनी आपणा सर्वाना एक प्रेरणादायी मंत्र दिला होता. त्यात गांधीजीनी म्हटलं होते मी आपल्याला एक मंत्र देतो, तुम्हाला जेव्हा कधी शंका असेल किंवा तुमच्या अहंकाराने फणा काढला असेल तर तुम्ही या कसोटीवर आजमावून पहा, तुम्ही जो गरिबातला गरीब आणि कमजोर माणूस पाहिला असेल, त्याचा चेहरा आठवून पहा आणि आपल्या हृदयाला विचारा की जे पाऊल उचलण्याचा तुम्ही विचार करत  आहात, ते त्या माणसासाठी किती उपयुक्त आहे. त्यामुळे त्याला काही लाभ मिळेल का… त्यामुळे तो आपले जीवन आणि भाग्यावर काबु मिळवू शकेल का… यामुळे कोट्यावधी लोकांना स्वराज मिळू शकेल का, जे उपाशी आहेत आणि त्यांचा आत्मा अतृप्त आहे… तेव्हा तुम्हाला आढळेल की तुमची शंका कमी होऊ लागली आहे आणि अहंकार समाप्त होऊ लागला आहे.

माझ्या प्रिय देशवासियानो, गांधीजींचा एक मंत्र आजही तितकाच महत्वाचा आहे. आज देशात मध्यम वर्ग वाढत आहे, त्यांची वाढती आर्थिक ताकद, वाढती क्रय शक्ती, काही खरेदीला जाताना आपण एक क्षण बापुजींचे स्मरण करू शकतो का… पूज्य बापूजींच्या त्या मंत्राचे स्मरण करू शकतो. खरेदी करताना आपण विचार करू शकतो का…. की मी जी गोष्ट विकत घेत आहे त्यामुळे माझ्या देशाच्या कोणत्या नागरिकाला त्याचा लाभ होणार आहे… कोणाच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे… कोण असेल तो भाग्यशाली, ज्याचा या खरेदीमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ होणार आहे… गरीबातल्या गरिबाला लाभ झाला तर मला अधिक जास्त आनंद होईल. गांधीजींचा हा मंत्र लक्षात ठेवून आपण येत्या दिवसात काही दिवसात जी काही खरेदी करू, गांधीजींची 150 वी जयंती साजरी करत असताना आपण याकडे नक्कीच लक्ष द्या की आपल्या खरेदीमुळे कोणत्या ना कोणत्या देश बांधवाचं हित साधलं गेले पाहिजे आणि त्यातही ज्याने आपला घाम गाळला आहे, आपले पैसे, आपली प्रतिभा वापरली आहे त्या सर्वाना कोणत्या ना कोणत्या स्वरुपात लाभ झाला पाहिजे. हाच तर गांधीजींचा मंत्र आहे, हाच तर गांधीजींचा संदेश आहे आणि मला विश्वास आहे, सर्वात गरीब आणि दुर्बल  व्यक्तीच्या जीवनात आपले हे छोटेसे पाऊल मोठा बदल घडवू शकते.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, गांधीजीनी म्हटले होते की स्वच्छता कराल तर स्वातंत्र्य प्राप्त होईल. कदाचित त्यानाही हे नाहीत नसेल की हे कसे होईल… पण हे साध्य झाले, भारताला स्वातंत्र्य मिळाले. याच प्रमाणे आज आपल्याला वाटू शकते की माझ्या या छोट्याश्या कार्यानेही माझ्या देशाच्या आर्थिक प्रगतीत, आर्थिक सशक्तीकरणात, गरिबाला गरिबीविरूद्ध लढण्यासाठी ताकद देण्यात माझं मोठे योगदान राहू शकते. आजच्या युगात हीच खरी देशभक्ती आहे, हीच पूज्य बापूंना कार्याजली आहे. विशेष प्रसंगी खादी आणि हातमाग उत्पादने खरेदी करण्याचा विचार केला तर त्यामुळे विणकराना मदत होईल, असे म्हणतात की लाल बहाद्दूर शास्त्री, खादीची जुनी फाटकी वस्त्रही जपून ठेवत असत  कारण त्यामागे कोणाचे  तरी कष्ट असतात. ते म्हणत ही सर्व खादीची वस्त्रे खूप मेहनतीने तयार केली आहेत, त्याचा प्रत्येक धागा कामी आला पाहिजे. देशाप्रती आत्मीयता आणि देशवासियांप्रति स्न्हेहाची भावना या लहानपणीच्या महामानवाच्या नसानसात भिनलेली होती. दोन दिवसांनी, पूज्य बापूजींच्या जयंती बरोबरच आपण शास्त्रीजींची जयंतीही साजरी करणार आहोत. शास्त्रीजींचे नाव उच्चारताच आपणा भारतवासीयांच्या मनात असीम श्रद्धेचा भाव फुलून येतो. त्यांचे सौम्य व्यक्तीत्व प्रत्येक देशवासीयाला सदैव अभिमानास्पद आहे.

लाल बहाद्दूर शास्त्री यांचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून ते अतिशय विनम्र दिसत असत पण मनातून ते पहाडा प्रमाणे दृढनिश्चयी होते. ‘जय जवान, जय किसानही त्यांची  घोषणा त्यांच्या या विराट व्यक्तीत्वाची ओळख  आहे. राष्ट्राप्रती त्यांच्या  निःस्वार्थ तपस्येचे हे फळ होते की सुमारे दीड वर्षाच्या अल्प कार्य काळात त्यांनी देशाचे जवान आणि शेतकऱ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा मंत्र दिला.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आपण पूज्य बापूंचे स्मरण करत आहोत तर स्वच्छतेबाबत बोलल्याशिवाय राहणार नाही हे तर स्वाभाविकच आहे. 15 सप्टेंबर पासून स्वच्छता ही सेवाया अभियानाला सुरवात झाली. कोट्यवधी लोक यात सहभागी झाले आणि दिल्लीतल्या आंबेडकर शाळेतल्या विद्यार्थ्यासमवेत श्रमदानाचे भाग्य मला लाभले. मी त्या शाळेत गेलो ज्याची पायाभरणी स्वतः पूज्य बाबासाहेबांनी केली होती. देशभरातले सर्व स्तरातले लोक या 15 तारखेला या श्रमदानात सहभागी झाले. संस्थानीही यात हिरीरीने भाग घेतला. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, युवा संघटना, प्रसार माध्यम गट, खाजगी उद्योग जगत सर्वांनी मोठ्या प्रमाणात स्वच्छता श्रमदान केलं. या सर्व स्वच्छता प्रेमीचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. आता ऐकु या एक फोन कॉल

नमस्कार, माझं नाव शैतान सिंह, जिल्हा बिकानेर, तालुका पुगल, राजस्थान मधून बोलत आहे, मी दृष्टीहीन आहे. माझ्या दोन्‍ही डोळ्यांनी मला दिसत नाही. मी सांगू इच्छितो की, मोदीजींनी, स्वच्छ भारत हे पाऊल उचलले आहे ते अतिशय उत्तम आहे. आम्हा दृष्टिहीन व्यक्तींना शौचालयात जाण्यासाठी त्रास होत असे. आता प्रत्येक घरात शौचालय झाल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा झाला आहे. आपण उचललेले हे पाऊल अतिशय उत्तम आहे. हे काम पुढेही सुरु राहू दे

खूप-खूप धन्यवाद. आपण मोठी गोष्ट सांगितली. प्रत्येकाच्या जीवनात स्वच्छतेचे स्वतःचे महत्व आहे आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपल्या घरात शौचालय बांधण्यात आले आणि आपल्याला सुविधा मिळाली, आम्हा सर्वासाठी यापेक्षा आनंदाची बाब काय असू शकते… कदाचित या अभियानाशी संबंधित लोकांनाही माहित नसेल, की प्रज्ञाचक्षु असल्यामुळे आपण पाहू शकत नाही, शौचालय नसल्यामुळे आपणाला किती अडचणींचा सामना करावा लागत होता आणि शौचालय बनल्यामुळे आपले जीवन किती सुलभ झाले, आपण हा पैलू दर्शवत फोन केला नसता तर कदाचित या स्वच्छता अभियानाशी संबंधित लोकांच्या लक्षातही हा संवेदनशील पैलू आला नसता. आपल्या फोन बद्दल मी आपल्याला विशेष धन्यवाद देतो.     

माझ्या प्रिय देशवासियांनो,

स्वच्छ भारत अभियान केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगात एक यशस्वी कहाणी ठरले आहे, ज्याबद्दल प्रत्येक जण बोलत आहे. या वेळी भारत, इतिहासातले सर्वात मोठे जागतिक स्वच्छता संमेलन आयोजित करत आहे. ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनम्हणजेच महात्मा गांधी इंटर नॅशनल सॅनिटेशन कन्व्हेन्शन. जगभरातले स्वच्छता मंत्री आणि या क्षेत्रातले तज्ञ एकत्र येऊन स्वच्छतेविषयी आपले प्रयोग आणि अनुभव विशद करत आहेत. महात्मा गांधी इंटर नॅशनल  सॅनिटेशन कन्व्हेन्शनची समाप्ती 2 ऑक्टोबर 2018 ला  बापूंच्या 150 व्या जयंती समारंभाच्या प्रारंभा बरोबर होणार आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, संस्कृत मधे एक म्हण आहे, ‘न्यायमूलं स्वराज्यं स्यात्म्हणजे स्वराजाच्या मुळाशी न्याय असतो, जेव्हा न्यायाची चर्चा होते तेव्हा मानव अधिकाराची भावना त्यात समविष्ट असते. शोषित, वंचित जनाचे स्वातंत्र्य, शांतता आणि त्यांच्यासाठी न्याय सुनिश्चित करण्यासाठी हे विशेष करून अनिवार्य आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात गरिबांच्या मूळ अधिकारांच्या रक्षणासाठी तरतूद केली गेली आहे. त्यांच्याच दृष्टीकोनातून प्रेरित होऊन 12 ऑक्टोबर 1993 मधे राष्ट्रीय मानव अधिकार आयोग म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशनची, एनएचआरसीची स्थापना करण्यात आली. काही दिवसातच एनएचआरसीला 25 वर्ष पूर्ण होणार आहेत. एनएचआरसीने मानव अधिकारांच्या रक्षणा बरोबरच मानवी प्रतिष्ठा वृद्धींगत करण्याचे कार्य केले आहे. आपले प्रिय नेते, देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी स्पष्ट केले होते की मानव अधिकार ही आमच्यासाठी परकी संकल्पना नाही. आपल्या राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे प्रतिक चिन्हात वैदिक काळातले सर्वे भवन्तु सुखिनःकोरलेले आहे. एनएचआरसीने मानव अधिकारांप्रति व्यापक जागृती निर्माण केली आहे, त्याच बरोबर त्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी प्रशंसनीय भूमिकाही बजावली आहे. 25 वर्षाच्या या प्रवासात या आयोगाने देशवासीयामधे एक आशा आणि विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. एका निरोगी समाजासाठी, उत्तम लोकशाही मूल्यांसाठी ही एक आशादायक गोष्ट आहे असे मी मानतो. आज राष्ट्रीय स्तरावरच्या  मानव अधिकार कार्या बरोबरच 26 राज्य मानव अधिकार आयोगही स्थापित करण्यात आले आहेत. एक समाज म्हणून मानव अधिकारांचे महत्व जाणण्याची आणि आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. हाच सबका साथ, सबका विकासयाचा आधार आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, ऑक्टोबर महिना आहे, जयप्रकाश नारायण यांची जयंती आहे, राजमाता विजयाराजे सिंदिया यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ होत आहे, ही सर्व थोर व्यक्तित्व, आपणा सर्वांना प्रेरणा देत आली आहेत, त्यांना नमन करु या, 31 ऑक्टोबर सरदार साहेब यांची जयंती आहे, पुढच्या मन की बातमधे सविस्तर बोलू इच्छितो, मात्र आज उल्लेख यासाठी करू इच्छितो, की काही वर्षांपासून सरदार साहेब यांच्या जयंती दिनी, 31 ऑक्टोबरला रन फॉर युनिटी’, एकता दौड, हिंदुस्तानच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या शहरात, गावात या एकतेसाठी दौडचे आयोजन केले जाते. या वर्षीही, आपण प्रयत्न पूर्वक आपल्या गावात, शहरात, महानगरात रन फॉर युनिटीचे आयोजन करा. एकतेसाठी दौड हाच सरदार साहेब, त्यांचे स्मरण करण्याचा उत्तम मार्ग आहे कारण त्यांनी आयुष्यभर एकतेसाठी काम केले. मी आपणा सर्वांना आग्रह करतो की 31 ऑक्टोबरला, ‘रन फॉर युनिटीच्या माध्यमातून समाजातला प्रत्येक वर्ग, देशाचा प्रत्येक भाग एकतेच्या सूत्रात गुंफण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ द्या, हीच त्यांना उत्तम श्रद्धांजली ठरेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, नवरात्री, दुर्गा पूजा, विजयादशमी या सर्व पवित्र पर्वासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक अनेक-अनेक शुभेच्छा देतो.

धन्यवाद!

 

N. Sapre/AIR/D.Rane