Israel Hayom Editor-in-Chief Boaz Bismuth with Prime Minister Narendra Modi
सव्वाशे कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणारी, देशात आणि देशाबाहेरही ‘सुपरस्टार’ मानल्या जाणा–या व्यक्तीची भेट होणार, म्हणजे तो काही सर्वसामान्य दिवस आहे, असे मानता येणार नाही. आणि यामुळेच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट विशेष महत्वपूर्ण ठरते.
मोदी यांची इस्राईलची ही ऐतिहासिक भेट 4 जुलै रोजी निश्चित झाली होती. भारतीय पंतप्रधान पहिल्यांदाच इस्राईलला भेट देत होते. आत्तापर्यंत एकाही भारतीय पंतप्रधानांनी या देशाला भेट दिली नाही. अर्थात दोन्ही देशांचे आकारमान, क्षेत्रफळ पाहता आणि इतर गोष्टी लक्षात घेता त्यांच्यामध्ये कोणतीही समानता दिसून येत नाही. मात्र दोन्ही देशांमध्ये समानता आहे.
मोदी वेगळेच प्रकारचे नेते आहेत. भारतीयांमध्ये ते अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांना एखाद्या विषयात सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे, असे वाटले तर ते तसे जाहीरपणे सांगू शकतात. आणि तो बदल घडवून आणण्यासाठी आग्रहही धरू शकतात. भारताला अनेक आघाड्यांवर पुढे नेवून मोदी यांनी जागतिक नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण केली आहे. त्यांच्यामते भारताला अनेक उद्दिष्ट्ये गाठायची असतील, साध्य करायची असतील तर ते इस्राईलच्या मार्गाने जाणे नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. अर्थात मोदी यांच्या या मतामुळे इस्त्रायलींच्या सन्मानामध्ये जणू एका पदकाची भर पडली आहे. इस्राईलवर भारतीयांनी नेहमीच खूप प्रेम केले, सन्मान दिला. परंतु आता इस्राईलसमोर एक मोठं आव्हान निर्माण झाले आहे. त्यामध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये, असा विचार इस्त्रायली करतात.
ज्यावेळी मी मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी आलो, त्यावेळी वेगळेपणा जाणवला. कॅमे–यासमोर चेह–यावर नेहमीच अतिशय कडक दिसणारी व्यक्ती प्रत्यक्षात हस–या चेह–याने, खूप मैत्रीपूर्ण, आश्वासक स्वरात बोलतात. इतकंच नाही तर त्यांना चांगलं हसताही येतं, हेही मला जाणवलं. अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जन्मल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर यश मिळवणं काही सोप नाही, आणि त्याचा सार्थ अभिमानही त्यांना आहे.
सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या सुखासाठी, सर्वांना बरोबर घेऊन , सर्वांचा विकास साध्य करायचा हा जणू त्यांच्या आयुष्याचा मंत्र बनला आहे. असं त्यांच्याबरोबर बोलणा–या प्रत्येकाच्या आर्वजून लक्षात येतं.
भारत आणि इस्राईल यांच्या दरम्यान खूप चांगले, दृढ संबंध कसे निर्माण होतील, याचाच मोदी सखोल विचार करत आहेत, हे मला त्यांची मुलाखत घेताना सारखे जाणवत होते. ते सातत्याने उभय देशांच्या संबंधांचा, करावयाच्या भागीदारीचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, पैलूतून विचार करत होते. भारतीय आणि इस्त्रायली लोक यांचा विचार करत होते. दोन राष्ट्रांचे ऋणानुबंध खूप घट्ट आहेत, असा त्यांचा विश्वास आहे. नवकल्पना, सहभागीता यांना वेगवेगळे पैलू असतात. इस्राईलमध्ये वास्तव्य करणा–या भारतीयांना काय वाटते, त्यांच्या भावना काय आहेत, याचाही त्यांनी विचार केला. 5 जुलै रोजी तेल अविवमध्ये स्थानिक भारतीयांसमवेत रॅली काढण्यासाठी आपण विशेष उत्सुक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. स्थानिक भारतीयांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी अशी रॅली काढणं अतिशय महत्वाचं आहे, असं मोदी यांनी सांगितलं.
प्र. इस्राईलविषयी तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही याआधी कधी इस्राईलला भेट दिली आहे?
‘‘ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असतांना मी 2006 मध्ये इस्राईलला पहिल्यांदा भेट दिली होती. त्याचवेळी या देशाची मला अगदी चांगली माहिती झाली. कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी मी या देशाला भेट दिली होती. आता जवळपास एक दशकापेक्षा जास्त काळानंतर मी पुन्हा इस्त्राईलच्या भेटीवर जाताना मला आनंद होतोय. या मधल्या काळात इस्राईलनं तंत्रज्ञानात आणखी किती प्रगती केली,विकास साधला, हे पाहायला मी खूप उत्सुक आहे.
‘‘इस्राईलच्या प्रगतीविषयी मी याआधी अनेकवेळा परिचितांशी बोललो आहे. माझा अनुभव त्यांना सांगितला आहे. भारताच्या दृष्टीने इस्राईल तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये बलशाली आहे. आणि असंख्य विपरित परिस्थितीत मोठ्या धैर्याने ठामपणे उभा राहणारा हा देश आहे. अनेक तंत्रज्ञानांचे संशोधन, साधनांचा विकास इस्राईलच्या विद्यापीठांमध्ये, प्रयोगशाळांमध्ये झाले आहे. नवसंशोधनाचे बीज तिथल्या माणसांच्या हाडामासांमध्ये रुजले आहे. यामध्ये अगदी यूएसबी ड्राइव्हपासून ते चेरी टोमॅटोपर्यंत असेल, सगळं काही नवीन तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं आहे. पाण्याची प्रचंड कमतरता, अतिशय दुष्काळी देश असतांनाही,त्याचा कायाकल्प घडवून आणून पाण्याची प्रचंड उपलब्धता निर्माण करण्याइतका मोठा बदल घडवून आणण्याचा चमत्कार या देशाने केला आहे. ज्या पद्धतीने तुम्ही देश सुजलाम् सुफला म् बनवला आहे, हे पाहता सगळा काही चमत्कार वाटतो, तुम्ही खूप मेहनत केली, त्याचंच हे फळ आहे. इस्राईलविषयीच्या या सगळ्या प्रतिमांनी माझ्या मनात अगदी खोलवर अमिट ठसा उमटवला आहे.’’
प्र. ही ऐतिहासिक भेट घडवून आणायचीच असा निर्णय तुम्ही का घेतला ?
‘‘उभय देशांमध्ये व्दिपक्षीय संबंध निर्माण करायचे, हा तर महत्वाचा विषय मनात होताच. अलिकडच्या काळात आम्ही अनेक वेगवेगळ्या विचारसरणीच्या देशांशी संबंध प्रस्थापित केले आहेत. उच्चस्तरीय शिष्टमंडळांनी भेटी दिल्या आहेत. अशा प्रकारचे आदान-प्रदान गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणावर झाले आहे. 2015 मध्ये आमच्या राष्ट्रपतींनी पहिल्यांदाच इस्राईलला भेट दिली. त्यापूर्वी एकाही भारतीय पंतप्रधान अथवा राष्ट्रपतींनी कधीच या देशाला भेट दिली नव्हती. त्यानंतर 2016 मध्ये राष्ट्रपती रिउवेन रिवलिन हे भारत भेटीवर आले. भारत दौरा करणारे हे दुसरे इस्त्रायली राष्ट्रपती ठरले.’’
या दोन्ही देशांमध्ये, दोन्ही समाजांमध्ये शतकांपासून चालत आलेले संबंध अधिक प्रगाढ करण्याचा हेतू आहे. याच मुद्याभोवती उच्चस्तरीय चर्चा, बैठका होणार आहेत. भारत आणि इस्राईल यांच्या दरम्यानच्या राजनैतिक संबंधांचे हे 25 वे वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून उभय देशातील संबंधांना नवीन उंचीवर घेवून जाण्याचं उद्दिष्ट ठेवण्याची ही एक अमोल संधी मिळाली आहे, असे मी मानतो. माझा हा दौरा म्हणजे उभय देशांतील राजनैतिक संबंधांची 25 वर्ष साजरे करता येईल.
प्र. संयुक्त राष्ट्रामध्ये इस्राईलची पाठराखण केल्यासारखे नाही होणार?
संयुक्त राष्ट्रामध्ये आमचे स्थान काही विशिष्ट मुद्दे, विषय, आमची तत्वे यावर अवलंबून आहे. आम्ही अनेक नवे मित्र जोडले आहेत. त्यामध्ये अगदी इस्राईलचाही समावेश आहे. आमचे प्राधान्यक्रम, आमचे चिंतेचे विषय, समान प्रश्न, मुद्दे, याचे प्रतिबिंब मैत्रीचे संबंध निर्माण होताना विचारात घेतले जातातच. मात्र संयुक्त राष्ट्रामध्ये भारत उगाचच कोणालाही झुकते माप देणार नाही.
प्र. पश्चिम अथवा पूर्व यांच्याशी भारत स्वतःहून युती अजूनही करणार नाही, असा याचा अर्थ होतो का?
आमचा ‘‘वसुधैव कुटुंबकम’’या तत्वज्ञानावर विश्वास आहे. याचाच अर्थ ‘‘ संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे’’.पूर्व असो वा पश्चिम आम्ही दोन्ही देशांबरोबर भरीव, विधायक कार्य करू इच्छितो.
प्र. इस्राईल आणि भारत या दोन्ही देशांपुढे दहशतवादाचा धोका सारखाच आहे का?
‘‘दहशतवादाचा धोका संपूर्ण जगालाच आहे. केवळ भारत आणि इस्राईल यांचीच ही डोकेदुखी नाही. निष्पाप लोकांची हत्या करणं, हिंसाचारी कृत्ये घडवून आणणे, समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करणं,अशा गोष्टी आम्ही खपवून घेवू शकत नाही. सीमेपलिकडून होणारी दहशतवादी कृत्ये थांबवणे, हे आमच्यासमोरचे खूप मोठे आव्हान आहे. आमच्या देशात हिंसाचार घडवून आणण्यासाठी हे सीमेपलिकडचे लोक धर्माचा एक हत्यार म्हणून गैरवापर करतात. आमच्या देशातल्या युवकांची धर्माच्या नावाखाली दिशाभूल करतात. दहशतवादाचा संबंध एखाद्या विशिष्ट धर्माशी लावून चालणार नाही. भारत आणि इस्राईल या दोन देशांना दहशतवादाचा धोका असून त्यांनी सहकार्याने याला लढा दिला पाहिजे.
प्र. उभय देशातील संबंधांचा दर्जा वाढणार आहे की बदलणार आहे?
‘‘ भारताच्या एकाही पंतप्रधानांनी आत्तापर्यंत इस्राईलला भेट दिली नाही. अशी भेट देणारा मी पहिला आहे. त्यामुळे माझ्या भेटीला एक वेगळेच महत्व आहे. माझ्या या भेटीमुळे उभय देशातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहकार्याचं नवे पर्व या भेटीने सुरू होणार आहे. दोन्ही देशांसाठी सहकार्याची नवी दालने उघडणार आहेत, असा माझा पूर्ण विश्वास आहे.’’
प्र. जेरूसलेमला आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे वेस्टर्न वॉलला भेट देण्याचं तुम्ही मान्य केलं आहे ?
‘‘भारत आणि इस्राईल या दोन्ही देशांमध्ये सहकार्याचं नवं पर्व सुरू करणं हा सर्वात प्रमुख उद्देश माझ्या भेटीचा आहे. मी जेरूसलेमला नक्की भेट देणार आहे. नवीन तंत्रज्ञान, वेगवेगळे शोध, कृषी क्षेत्रात वापरले जाणारे तंत्रज्ञान यांच्याविषयी इस्राईलबरोबरची सहभागीता अधिक वाढवायची आणि त्याचा उपयोग भारताच्या कृषी क्षेत्रात विकास घडवून आणण्यासाठी करायचा. या उद्देशाने मी इस्राईलचा दौरा करत आहे.’’
प्र. जेरुसलेममध्ये सार्वभौमत्वाविषयी आपली भूमिका काय असणार? त्यांचे दुतावास भारत हलवणार?
‘‘ दोन देशांमधला हा प्रश्न शांततापूर्ण मार्गाने चर्चा करून सोडवता येऊ शकतो, यावर आमचा विश्वास आहे. या प्रश्नाचा परिणाम होणा–या सर्व गटांच्या मागण्या, भावना लक्षात घेवून आणि त्याचा आदर करून अंतिम करार केला जावा, असंही आपल्याला वाटतं. जेरूसलेमसहीत जी प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यांचा निपटारा व्हावा, यासाठी भारताचा सर्वमान्य तोडग्याला पाठिंबा असेल. हा प्रश्न तेल अविव येथे आमच्या दुतावासामध्ये नक्कीच चर्चाला येईल, हे मी जाणून आहे. जेरुसलेमविषयी दोन्ही पक्षांचे मनोगत जाणून घेवून होत असलेल्या करारानंतर आम्ही निर्णय घेणार आहे.
प्र.अत्यंत गरीब घरामध्ये जन्मलेला एक मुलगा केवळ आपल्या परिश्रमाच्या जोरावर एका देशाचा प्रमुख बनतो. तुमचे जीवनचरित्र पाहिल्यावर हे खूपच प्रभावी वाटतं. तुमचा भूतकाळ असा असूनही तुम्ही भांडवलशाही पद्धतीचे समर्थन करत आहात, मुक्त आर्थिक धोरणाचा पुरस्कार करत आहात. तुम्ही जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे थोडं विस्तारानं सांगणार ?
‘ माझा कोणत्याही ‘…शाही’ वर विश्वास नाही. असं मी मानत नाही. आणि माझं सरकार ‘ सबका साथ,सबका विकास’ या एकाच उद्देशाने, ध्येयाने काम करते. आमच्या देशाचा युवक केवळ नोकरदार बनला पाहिजे असं मला वाटत नाही, तर त्यानं नोकरी देणारा बनलं पाहिजे. आमच्या जनतेचे राहणीमान उंचावले पाहिजे. आता या गोष्टींना आम्ही प्राधान्य देण्याचं ठरवलं असल्यामुळे त्याप्रमाणेच धोरणं आखली जात आहेत. अशाच पद्धतीचं कार्य मी माझे गृहराज्य- गुजरातमध्ये 13 वर्षे मुख्यमंत्री असताना केले आहे. राज्यात झपाट्याने विकास घडवून आणला आहे. त्यामुळे आता तेच काम देशपातळीवर केले जात आहे.’’
प्र.भारताच्या दुर्गम भागात, खेड्या-पाड्यांमध्ये शौचालय, स्वच्छतागृह यांच्या सोयी, सुविधांचा अभाव आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणत आहात. या कार्यामध्ये इस्राईल काही भूमिका निभावू शकतो का?
‘‘ नक्कीच. भारतामध्ये होत असलेल्या परिवर्तनामध्ये एक तंत्रज्ञान पुरवणारा देश भागिदार बनू शकतो. इतकंच नाही तर आमच्या ‘स्वच्छ गंगा’ त्याचबरोबर ‘स्मार्ट शहरे’ प्रकल्पाला इस्राईलच्या तंत्रज्ञानाची मोठ्याप्रमाणावर मदत मिळू शकते. आमच्या देशातल्या शकडो, हजारो लोकांचे जीवनमान इस्राईलच्या तंत्रज्ञानाची मदत मिळाली तर उंचावू शकते. आमच्याकडच्या ग्रामीण भागात वास्तव्य करत असलेल्या लोकांसाठी इस्राईलच्या तांत्रिक उत्पादनांमध्ये थोडाफार बदल केला तर खूप मोठ्या प्रमाणावर मदत होऊ शकणार आहे. ग्रामीण भागाचा विचार करून यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.
प्र. कोणताही व्यवसाय, शेती आणि इतर क्षेत्रांच्या बाबतीत भारतीय आणि इस्त्रायली यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये नेमका कोणता फरक जाणवतो?
एकूणच समाजाचा विचार केला तर, भारतीय आणि इस्त्रायली यांच्यामध्ये व्यवसायिक भावना, वृत्ती समान आहे. दोन्ही देशांमध्ये असलेली व्यावसायिक संस्कृती अव्दितीय आहे. दोघांमध्ये थोडाफार फरक नक्कीच असेलही, परंतु दोघांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन एकसमान आहे, असं मला वाटतं.
प्र. भारत आणि इस्राईल यांच्यामध्ये होत असलेल्या सहकार्याबद्दल सामान्य लोकांना कोणता लाभ होऊ शकतो?
मला वाटतं, सामान्य माणूस सर्वाधिक जागरूक आहे. आम्ही करत असलेल्या सहकार्याच्या करारांमुळे थेट त्याच्या जीवनामध्ये बदल घडून येणार आहेत. याची त्यांना जाणीव आहे. समाजाची मूल्ये आणि संपत्ती यांना माझ्यामध्ये खूप महत्व आहे. इस्त्रायली आणि भारतीय नवकल्पनांचा अगदी मनापासून स्वीकार करतात. हा गुण त्यांच्या जणू रक्तामध्येच आहे. दोघेही नवनवीन शोधांना पाठिंबा देतात. शाश्वत पर्यावरण व्यवस्था निर्माण करण्यावर त्यांचा विश्वास आहे. हा समान धागाच आपल्या नवकल्पना,नवनिर्मिती यांना प्रोत्साहन देणारा आणि व्यावसासिक प्रगती घडवून आणण्यास मदत करणारा ठरणार आहे.
प्र.इस्राईलमधून कोणत्या प्रकारच्या वस्तूंची आयात भारतामध्ये झाली पाहिजे, असे वाटते?
‘‘ इस्राईलबरोबर पारंपरिक पद्धतीचे आयात-निर्यात संबंध प्रस्थापित करावेत, असा मर्यादित हेतू आमचा नाही. त्यापेक्षा जास्त चांगले विक्रेते आणि खरेदीदार असे नाते उभय देशात निर्माण व्हावे, असे वाटते. तंत्रज्ञानावर आधारित सहभागीता निर्माण झाली तर ‘‘ मेक इन इंडिया’’ या आमच्या धोरणाला अधिक लाभ होणार आहे. भारतामध्ये सकारात्मक बदल घडून येवू शकणार आहे. त्याचबरोबर आमच्या ‘स्वच्छ गंगा’ सारख्या प्रकल्पांना इस्राईलकडून तंत्रज्ञानाचे सहकार्य मिळाले तर अतिशय चांगले होणार आहे.