Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

ग्रुप ऑफ सेवनच्या (G-7) अमेरिकेच्या अध्यक्षपदाबाबत आणि या गटाच्या सध्याच्या सदस्यत्वाचा विस्तार करत भारतासह आणखी महत्वाच्या देशांचा समावेश करण्याचा मनोदय राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत होणाऱ्या पुढच्या जी -7 शिखर परिषदेसाठीला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले.

कोविड नंतरच्या जागतिक परिस्थितीत येणारे वास्तव लक्षात घेऊन हा मंच विस्तारित करण्याच्या तथ्याची दखल घेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सर्जनशील आणि दूरदृष्टी असलेल्या दृष्टीकोनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची प्रशंसा केली.

या प्रस्तावित परिषदेच्या यशासाठी अमेरिका आणि इतर राष्ट्रांसमवेत काम करण्यात भारताला आनंदच होईल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

अमेरिकेत सुरु असलेल्या सध्याच्या नागरी अशांततेबाबत पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आणि या परिस्थितीवर लवकर तोडगा निघावा अशी सदिच्छा व्यक्त केली.

दोन्ही नेत्यांनी उभय देशातल्या कोविड-19 परिस्थिती, भारत-चीन सीमेवरची परिस्थिती, जागतिक आरोग्य संघटनेतल्या सुधारणांची आवश्यकता यासह इतर सामायिक मुद्यांवर चर्चा केली.

या वर्षाच्या फेब्रुवारीमधल्या आपल्या भारत भेटीचे स्मरण ट्रम्प यांनी केले. ही भेट अनेक कारणांमुळे ऐतिहासिक आणि स्मरणीय ठरल्याचे सांगून या भेटीने द्विपक्षीय संबंधाना नवा आयाम प्राप्त झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

या मनमोकळ्या आणि स्नेहपूर्ण संभाषणातून भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांचे विशेष स्वरूप तसेच उभय नेत्यामधली मैत्री आणि आदर प्रतीत होत आहे.

R.Tidke/N.Chitale/P.Malandkar