Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोझाम्बिकचे राष्ट्रपती फिलीपे जासिंटो न्युसी यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोझाम्बिकचे राष्ट्रपती फिलीपे जासिंटो न्युसी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सध्या सुरु असलेल्या कोविड-19 महामारीमुळे दोन्ही देशात निर्माण झालेल्या आव्हानांची चर्चा उभय नेत्यांनी केली. आवश्यक औषधे आणि उपकरणाच्या तरतुदीसह या आरोग्य संकटात मोझाम्बिकच्या प्रयत्नांना सहकार्य करण्यासाठी भारत तत्पर असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. आरोग्य आणि औषधनिर्मिती क्षेत्रातला पुरवठा यामध्ये दोन्ही देशात असलेल्या घनिष्ट सहकार्याची राष्ट्रपती न्युसी यांनी प्रशंसा केली.

मोझाम्बिकमधली भारतीय गुंतवणूक आणि विकास प्रकल्प यासह इतर महत्वाच्या मुद्यांवरही या नेत्यांनी चर्चा केली. आफ्रिकेशी भारताच्या एकूण भागीदारीमधला मोझाम्बिक हा महत्वाचा स्तंभ असून मोझाम्बिकच्या कोळसा आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात भारतीय कंपन्यांनी मोठी वचनबद्धता दर्शवल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.

संरक्षण आणि सुरक्षा या क्षेत्रात वाढत्या द्विपक्षीय सहकार्याबद्दल या नेत्यांनी समाधान व्यक्त केले.उत्तरी मोझाम्बिक मधल्या दहशतवादाच्या घटनेबद्दल राष्ट्रपती न्युसी यांच्या चिंतेसंदर्भात मोझाम्बिकच्या पोलीस आणि सुरक्षा दलाच्या क्षमता वृद्धीसह शक्य ती सर्व मदत भारताने देऊ केली आहे.

मोझाम्बिकमधल्या भारतीय आणि भारतीय वंशाच्या समुदायाच्या सुरक्षिततेसाठी मोझाम्बिक प्रशासनाच्या प्रयत्नाबद्दल पंतप्रधानांनी विशेष आभार मानले.

सध्याच्या महामारीच्या काळात सहकार्याचे आणखी मार्ग शोधण्यासाठी दोन्ही देशांचे अधिकारी परस्परांच्या संपर्कात राहतील यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar