Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान ज्युसेपे कोंते यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान ज्युसेपे कोंते यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली.

कोविड-19 महामारीमुळे इटलीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. या संकटाच्या काळात इटलीच्या नागरिकांनी दाखवलेल्या धैर्याची त्यांनी प्रशंसा केली.

दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशात तसेच जागतिक स्तरावर महामारीच्या आरोग्यविषयक आणि आर्थिक परिणामांचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यांनी एकमेकांप्रति एकजुटता व्‍यक्‍त केली आणि एकमेकांच्या देशात अडकलेल्या नागरिकांना दिलेल्या परस्पर सहकार्याची प्रशंसा केली.

इटलीला आवश्यक औषधे आणि अन्य सामुग्री पुरवण्यात भारत उदार हस्ते मदत करेल असे आश्वासन पंतप्रधानांनी कोंते यांना दिले.

भारत आणि इटली दरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत बनवण्यासाठी सक्रिय सल्ला-मसलत आणि सहकार्य सुरु ठेवण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

इटलीच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोयीनुसार योग्य वेळी इटलीला भेट देण्याचे निमंत्रण दिले.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar