पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांच्याशी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि दोन्ही देशांनी आरोग्यविषयक आणि आर्थिक परिणामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली.
भारतीय वंशाचे डॉक्टर आणि परिचारिका यांनी आयर्लंडमध्ये या संसर्गाचा प्रतिबंध करण्यामध्ये बजावलेल्या भूमिकेची आयर्लंडचे पंतप्रधान वराडकर यांनी प्रशंसा केली. आयर्लंडमधील भारतीय नागरिकांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी आयर्लंडने केलेल्या उपाययोजनांबद्दल पंतप्रधानांनी आयर्लंडच्या पंतप्रधानांचे आभार मानले आणि तशाच प्रकारच्या सुविधा भारतातील आयरिश नागरिकांना देण्याची ग्वाही दिली.
या जागतिक महामारीच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी भारत आणि आयर्लंड आपल्या औषधनिर्मिती आणि वैद्यकीय क्षेत्राला आणखी बळ देऊ शकतील, याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. कोविड संकटापश्चात आयर्लंडसोबत आणि त्याचबरोबर युरोपीय संघासोबत सहकार्य बळकट करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबतही त्यांनी चर्चा केली.
या आपत्तीमधून उद्भवणाऱ्या स्थितीबाबत परस्परांच्या सातत्याने संपर्कात राहण्याबाबतही दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.
B.Gokhale/S.Patil/D.Rane
Discussed COVID-19 pandemic with Ireland’s PM, Mr. @LeoVaradkar. India and Ireland share similar approaches on many global issues. We will work together to further strengthen our partnership in health, science & technology, to jointly address challenges of the post-COVID world.
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2020