नवी दिल्ली, 24 मे 2023
पंतप्रधान अल्बानीज
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
माध्यमातील मित्रवर्ग,
नमस्कार!
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे जे आदरातिथ्य झाले त्याबद्दल आणि आम्हाला मिळालेल्या आदराबद्दल मी ऑस्ट्रेलियातील जनतेचे आणि पंतप्रधान अल्बानीज यांचे मनापासून आभार मानतो. माझे मित्र पंतप्रधान अल्बानीज भारत भेटीवर येऊन गेल्यानंतर दोन महिन्यांच्या आतच मी ऑस्ट्रेलियाला आलो आहे.गेल्या एका वर्षातली आमची ही सहावी भेट आहे.
आपल्यात असलेल्या सर्वसमावेशक संबंधांमधील सखोलता, आपल्या विचारांमधील अभिसरण आणि आपल्या संबंधांमधील परिपक्वता याचे हे द्योतक आहे. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाले तर हे संबंध टी-20 प्रकारासारखे झाले आहेत.
महोदय,
तुम्ही काल म्हटल्याप्रमाणे, आपली लोकशाही मूल्ये ही आपल्या संबंधांचा पाया आहेत. आपले संबंध परस्पर विश्वास आणि आदर यावर आधारित आहेत. ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदाय हा आपल्या दोन्ही देशांना सांधणारा दुवा आहे.काल संध्याकाळी भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधान अल्बानीज आणि मी हॅरिस पार्कच्या ‘लिटल इंडिया’ चे अनावरण केले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान अल्बानीज यांची लोकप्रियता देखील मी अनुभवली.
मित्रांनो,
पंतप्रधान अल्बानीज यांच्यासोबतच्या आजच्या भेटीत, आम्ही भारत-ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पुढील दशकात अधिक उंचीवर नेण्याविषयी बोललो. नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या शक्यतांवर तपशीलवार चर्चा केली. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया– भारत आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (इसीटीए) लागू झाला. आज आम्ही सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करारावर (सीइसीए) वर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे व्यापार आणि आर्थिक सहकार्याला आणखी बळ मिळेल आणि नवीन आयाम मिळेल.खाणकाम आणि प्रमुख खनिजांच्या क्षेत्रात धोरणात्मक सहकार्य मजबूत करण्यावर आम्ही सकारात्मक चर्चा केली.
आम्ही अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी ठोस क्षेत्रे निश्चित केली आहेत. ग्रीन हायड्रोजनवर कृती दल स्थापन करण्याचा निर्णयही आम्ही घेतला. काल माझी ऑस्ट्रेलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत झालेली चर्चा फलदायी ठरली. आज मी व्यापार गोलमेज परिषदेत व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्याबद्दल बोलणार आहे.
स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारावर आज स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे आपल्यातील संबंध अधिक मजबूत होतील. ऑस्ट्रेलियाने बंगळुरूमध्ये नवीन वाणिज्य दूतावास सुरू करण्याची घोषणा केली त्याप्रमाणे भारत लवकरच ब्रिस्बेनमध्ये नवीन भारतीय वाणिज्य दूतावास उघडणार आहे , असे मी काल जाहीर केले. त्यामुळे सतत वृद्धिंगत होणारे दोन देशांतील संबंध अधिक दृढ होतील.
मित्रांनो,
मागील काळात ऑस्ट्रेलियात मंदिरांवर झालेले हल्ले आणि फुटीरतावादी तत्वांच्या कारवायांवर पंतप्रधान अल्बानीज आणि मी आधीही चर्चा केली आहे. आजही या विषयावर चर्चा झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधांना कोणत्याही तत्वाने, त्यांच्या विचारांनी किंवा कृतीने हानी पोहोचवावी हे आम्हाला मान्य नाही. पंतप्रधान अल्बानीज यांनी या संदर्भात उचललेल्या पावलांबद्दल मी त्यांचे आभार मानतो. अशा तत्वाविरोधात कठोर कारवाई करत राहू, असे आश्वासन अल्बानीज यांनी मला पुन्हा दिले.
मित्रांनो,
भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांची व्याप्ती केवळ आपल्या दोन देशांपुरती मर्यादित नाही. प्रादेशिक स्थैर्य, शांतता आणि जागतिक कल्याणाशी देखील हे संबंध जोडले गेलेले आहेत. काही दिवसांपूर्वी हिरोशिमा येथे झालेल्या क्वाड शिखरपरिषदेत पंतप्रधान अल्बानीज यांच्यासोबत आम्ही हिंद -प्रशांत क्षेत्राविषयीही चर्चा केली होती. भारत-ऑस्ट्रेलिया सहकार्य ग्लोबल साउथच्या प्रगतीसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. संपूर्ण जगाला एक कुटुंब म्हणून पाहणारी वसुधैव कुटुंबकमची भारतीय परंपरा ही भारताच्या जी-20 अध्यक्षपदाची मध्यवर्ती संकल्पना आहे. जी-20 मधील आमच्या उपक्रमांना ऑस्ट्रेलियाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी पंतप्रधान अल्बानीज यांचे मनापासून आभार मानतो.
मित्रांनो,
या वर्षी भारतात होणारी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा पाहण्यासाठी मी पंतप्रधान अल्बानीज आणि ऑस्ट्रेलियातील सर्व क्रिकेट चाहत्यांना निमंत्रित करतो. त्यावेळी दिवाळी असल्यामुळे त्यांना क्रिकेटसोबतच दिवाळीच्या सणाचा जल्लोष साजरा होताना बघायला मिळेल.
महोदय
या वर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेसाठी भारतात तुमचे पुन्हा स्वागत करण्यासाठी मी उत्सुक आहे. पुन्हा एकदा खूप खूप आभार!
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Addressing the joint press meet with PM @AlboMP. https://t.co/BPHlImyWv6
— Narendra Modi (@narendramodi) May 24, 2023