Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खैल्तमानीग बटुल्गा यांच्या हस्ते बुद्ध पुतळ्याचे अनावरण


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खैल्तमानीग बटुल्गा यांनी संयुक्तरित्या, उलानबटोर इथल्या ऐतिहासिक गंदान बौद्ध मठातील भगवान बुद्धांच्या आणि त्यांच्या दोन शिष्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

पंतप्रधानांनी आपल्या 2015च्या मंगोलिया दौऱ्यात या बौद्ध मठात प्रार्थना केली होती आणि दोन्ही देशांना लाभलेला बौद्ध वारसा, संस्कृतींमधील संबंध, नागरिकांमधले दुवे अधोरेखित करत भगवान बुद्धांच्या पुतळ्याच्या भेटीची घोषणा केली होती.

भगवन बुद्ध बसलेले असून, आपल्या दोघा शिष्यांना शांती आणि सहअस्तित्वासह दयेचा संदेश देत आहेत, असे दर्शवणारा हा पुतळा आहे. उलानबटोर इथे 6 आणि 7 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या तिसऱ्या ‘संवाद’ कार्यक्रमात हा पुतळा गंदान बौद्धमठात स्थापित करण्यात आला. संवाद कार्यक्रमात विविध देशातले बौद्ध धर्माचे अभ्यासक, तज्ज्ञ, धार्मिक नेते बौद्ध धर्माशी संबंधित वर्तमान मुद्यांवर चर्चा करतात.

मंगोलियातील बौद्ध धर्मियांसाठी हा मठ मोठा वारसा असून, महत्वाचे केंद्र आहे. 21 ते 23 जून 2019 दरम्यान एशियन बुद्धिस्ट कॉन्फरन्स फॉर पीसच्या 11व्या महासभेचे यजमानपद मठाने भूषवले होते. भारतासह 14 देशांमधले 150 हून अधिक अतिथी या महासभेत सहभागी झाले होते.

पंतप्रधान आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खैल्तमानीग बटुल्गा यांनी एकत्रितपणे केलेले पुतळ्याचे अनावरण, हे भगवान बुद्धांच्या वैश्विक संदेशाचा दोन्ही देश करत असलेल्या आदराचे प्रतिक आहे.

B.Gokhale/S.Kakade/D.Rane