पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 12 मार्च रोजी कर्नाटकला भेट देणार असून तिथे ते सुमारे 16,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. दुपारी 12 वाजता पंतप्रधान मंड्या येथील प्रमुख रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर दुपारी 3.15 वाजता ते हुबळी–धारवाडमधील विविध विकास उपक्रमांचे लोकार्पण,उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
मंड्या येथील पंतप्रधानांचे कार्यक्रम
पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासाचा वेग हा देशभरात जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा पुरावा आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून पंतप्रधान बेंगळुरू–म्हैसूर द्रुतगती मार्ग राष्ट्राला समर्पित करतील. राष्ट्रीय महामार्ग 275 च्या बेंगळुरू–निदाघट्टा–म्हैसूर विभागाच्या 6-पदरी मार्गाचा या प्रकल्पात समावेश आहे. 118 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प एकूण 8,480 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. यामुळे बेंगळुरू आणि म्हैसूर दरम्यानचा प्रवास वेळ सुमारे 3 तासांवरून 75 मिनिट म्हणजेच सव्वा तासापर्यंत कमी होईल. हे या क्षेत्राच्या सामाजिक–आर्थिक विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल.
म्हैसूर–खुशालनगर 4-पदरी महामार्गाची पायाभरणी ही पंतप्रधान करणार आहेत. 92 किमी लांबीचा हा महामार्ग सुमारे 4,130 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प विकासित केला जाणार आहे. कुशलनगरची बेंगळुरूशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल आणि प्रवासाचा वेळ 5 तासांवरून 2.5 तासांपर्यंत कमी करण्यात मदत करेल.
हुबळी–धारवाड येथील पंतप्रधानांचे कार्यक्रम
पंतप्रधान भारतीय तंत्रज्ञान संस्था, धारवाड ची इमारत राष्ट्राला समर्पित करणार आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधानांच्या हस्तेच या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. 850 कोटी रुपयाहून अधिक खर्च यासाठी करण्यात आला. या संस्थेच्या माध्यमातून सध्या 4 वर्षांचा बी.टेक. कार्यक्रम, 5-वर्षीय BS-MS आंतर–विद्याशाखीय कार्यक्रम, एम.टेक. कार्यक्रम आणि पीएच.डी. कार्यक्रम चालविले जाणार आहेत.
पंतप्रधान श्री सिद्धरुद्ध स्वामीजी हुबळी स्टेशनवरचा जगातील सर्वात लांब रेल्वे फलाट राष्ट्राला समर्पित करतील. या विक्रमाला नुकतीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने मान्यता दिली आहे. सुमारे 1,507 मीटर लांबीचा हा रेल्वे फलाट 20 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.
या भागातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी पंतप्रधान होस्पेट – हुबळी – तीनाईघाट विभागाचे विद्युतीकरण आणि होस्पेट स्टेशनचे आधुनिकीकरण प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. 530 कोटींहून अधिक रक्कम खर्च करून विकसित केलेला हा विद्युतीकरण प्रकल्प इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर अखंडित रेल्वे सेवा पुरविण्यास सज्ज आहे. पुनर्विकसित होस्पेट स्टेशन प्रवाशांना सोयीस्कर आणि आधुनिक सुविधा देईल. विशेष म्हणजे याची रचना हम्पीच्या स्मारकांप्रमाणेच करण्यात आली आहे.
हुबळी–धारवाड स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांचे पंतप्रधान उद्घाटन आणि पायाभरणी करतील. या प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत सुमारे 520 कोटी रुपये आहे. हे प्रयत्न स्वच्छ, सुरक्षित आणि कार्यक्षम सार्वजनिक जागा निर्माण करून जीवनाची गुणवत्ता वाढवतील आणि शहराला भविष्यकालीन शहरी केंद्रात रूपांतरित करतील.
जयदेव रुग्णालय आणि संशोधन केंद्राची पायाभरणी सुद्धा पंतप्रधान करणार आहेत. सुमारे 250 कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय विकसित केले जाणार आहे. हे रुग्णालय प्रदेशातील लोकांना ह्रदयरोग उपचार सेवा प्रदान करेल. पंतप्रधान धारवाड बहु ग्राम पाणीपुरवठा योजनेची पायाभरणी करतील, ज्याचा खर्च 1040 कोटी रुपये इतका आहे.सुमारे 150 कोटी रुपये खर्चून विकसित केल्या जाणाऱ्या तुप्परीहल्ला पूर नियंत्रण प्रकल्पाची पायाभरणीही ते करणार आहेत. या प्रकल्पाचे उद्दिष्ट पुरामुळे होणारे नुकसान कमी करणे आहे आणि त्यात पुररोधक भिंत आणि तटबंदी बांधणे यांचा सुद्धा समावेश आहे.
***
JPS/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai