नवी दिल्ली, 26 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 27 जून 2023 रोजी मध्य प्रदेशाच्या भेटीवर जाणार आहेत.
सकाळी साडेदहाच्या सुमारास पंतप्रधान राणी कमलापती रेल्वे स्थानकावर पोहोचतील आणि पाच वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता शाहडोल येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन पंतप्रधान राणी दुर्गावती यांच्या कार्याचा गौरव करतील, राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निवारण अभियानाची सुरुवात करतील तसेच आयुष्मान कार्ड वितरण कार्याची देखील सुरुवात करतील. यावेळी पंतप्रधान शहडोल जिल्ह्यातील पाकरिया गावाला देखील भेट देणार आहेत.
पंतप्रधानांची भोपाळ भेट
भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकात आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पाच वंदे भारत एक्स्प्रेस रवाना करण्यात येईल. या पाच वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या पुढीलप्रमाणे आहेत: राणी कमलापती-जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस, खजुराहो-भोपाळ-इंदोर वंदे भारत एक्स्प्रेस, मडगाव (गोवा)-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस, धारवाड-बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेस आणि हतिया-पटना वंदे भारत एक्स्प्रेस.
राणी कमलापती-जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी जबलपूरच्या महाकौशल भागाला मध्य प्रदेशाच्या मध्यवर्ती भागाशी (भोपाळ) जोडेल. तसेच ही गाडी भेडाघाट, पचमढी,
सातपुडा इत्यादी पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचण्यासाठीची अधिक उत्तम सोय करून देईल. या मार्गांवर सध्या धावणाऱ्या सर्वात जलद गाडीपेक्षा ही गाडी 30 मिनिटांनी अधिक वेगवान असेल.
खजुराहो-भोपाळ-इंदोर वंदे भारत एक्स्प्रेस या गाडीमुळे माळवा प्रांत (इंदोर) आणि बुंदेलखंड क्षेत्र (खजुराहो) हे भाग मध्यवर्ती भागाशी (भोपाळ) अधिक चांगल्या प्रकारे जोडले जातील. महाकालेश्वर, मांडू, महेश्वर, खजुराहो तसेच पन्ना यांसारख्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना देखील या गाडीमुळे फायदा होणार आहे. सध्या या मार्गावरील सर्वात जलद रेल्वे गाडीपेक्षा ही गाडी प्रवासाच्या वेळात सुमारे अडीच तासांची बचत करेल.
मडगाव (गोवा)-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही गोव्यासाठीची पहिलीच वंदे भारत एक्स्प्रेस असणार आहे. ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्याचे मडगाव रेल्वे स्थानक यांच्या दरम्यान धावणार आहे. मुंबई आणि मडगाव यांच्या दरम्यान सध्या धावणाऱ्या सर्वात जलद गाडीच्या प्रवास कालावधीपेक्षा या गाडीला एक तास कमी वेळ लागेल.
धारवाड-बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेस ही गाडी कर्नाटकातील धारवाड, हुबळी आणि दावणगिरी या महत्त्वाच्या शहरांना बेंगळूरू या कर्नाटक राज्याच्या राजधानीच्या शहराशी जोडेल. या भागातील पर्यटक, विद्यार्थी, उद्योजक इत्यादींना या गाडीमुळे खूप फायदा होईल. सध्या या मार्गावरील प्रवासाला लागणाऱ्या वेळेत वंदे भारत गाडीमुळे अर्ध्या तासाची बचत होणार आहे.
हतिया-पटना वंदे भारत एक्स्प्रेस ही झारखंड तसेच बिहार या राज्यांसाठी सुरु होणारी पहिलीच वंदे भारत गाडी आहे. पटना आणि रांची या शहरांच्या जोडणीत सुधारणा करणारी ही गाडी पर्यटक, विद्यार्थी तसेच व्यापाऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. या दोन शहरांदरम्यान सध्या धावणाऱ्या सर्वात वेगवान गाडीपेक्षा वंदे भारत गाडीला एक तास पंचवीस मिनिटांचा वेळ कमी लागेल.
पंतप्रधानांची शहडोल भेट
शहडोल येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ करतील. ते लाभार्थ्यांना सिकलसेल जनुकीय स्थितीचे कार्डही वितरित करतील.
विशेषत्वाने आदिवासी समुदायामध्ये सिकलसेल रोगामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ही मोहीम, सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ओळखला जाणारा सिकलसेल रोग 2047 पर्यंत दूर करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहिमेची घोषणा करण्यात आली होती. ही मोहीम या अजारांने मोठ्या प्रमाणावर प्रभावित 17 राज्यातील 278 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या यादीत गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आसाम, उत्तर प्रदेश, केरळ, बिहार आणि उत्तराखंड या केंद्रीत राज्यांचा समावेश आहे.
पंतप्रधान मध्य प्रदेशात सुमारे 3.57 कोटी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) कार्ड वितरणाची सुरुवात करतील. राज्यभरातील नागरी संस्था, ग्रामपंचायती आणि विकास गटांमध्ये आयुष्मान कार्ड वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयुष्मान कार्ड वितरण मोहीम, हे कल्याणकारी योजनांची 100 टक्के परिपूर्णता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या कार्यक्रमादरम्यान, राणी दुर्गावती यांच्या कार्याचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव करून ‘राणी दुर्गावती गौरव यात्रे’चा समारोप होणार आहे. राणी दुर्गावतींच्या शौर्य आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारद्वारे यात्रेचे आयोजन केले जात आहे. राणी दुर्गावती या 16 व्या शतकाच्या मध्यात गोंडवानाची सत्ताधारी राणी होत्या. मुघलांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढणारी एक शूर, निडर आणि धैर्यशील योद्धा म्हणून त्यांचे स्मरण केले जाते.
पंतप्रधानांची पकारिया गावाला भेट
एका अनोख्या उपक्रमात, पंतप्रधान शहडोल जिल्ह्यातील पकारिया गावाला भेट देतील आणि आदिवासी समुदायाचे नेते, स्वयं-मदत गट, PESA [पंचायत (अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार) कायदा, 1996] समित्यांचे नेते आणि ग्राम फुटबॉल क्लबचे कर्णधार यांच्याशी संवाद साधतील. आदिवासी आणि लोककलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला पंतप्रधान हजेरी लावतील तसेच या गावात रात्रीचे जेवणही घेतील.
* * *
S.Tupe/S.Chitnis/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai