Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या वाराणसीच्या दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 19 फेब्रुवारी 2019 ला उत्तर प्रदेशातल्या वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे विविध विकासकामांचे अनावरण ते करतील.

डिझेलवरून विजेवर परिवर्तीत झालेल्या पहिल्या रेल्वेगाडीला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. रेल्वेगाडीची पाहणी ते करतील. तसेच प्रदर्शनाला भेट देतील.

‘मेक इन इंडियां’तर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. यासाठीचे संशोधन आणि विकास भारतातच झाला.

सिरगोवर्धनपूर इथल्या श्री गुरू रविदास जन्मस्थान मंदिरात, गुरू रविदास जन्मस्थान विकासासाठीच्या प्रकल्पासाठी पायाभरणी, पंतप्रधान करतील. श्री गुरू रविदासांच्या पुतळ्याला ते आदरांजली वाहतील. तसेच सभेला संबोधित करतील.

बनारस हिंदू विद्यापीठाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या मदनमोहन मालवीय कर्करोग केंद्राचे उद्‌घाटन पंतप्रधान करतील. उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तराखंड आणि नेपाळमधून आलेल्या कर्करोगग्रस्तांना सर्वसमावेशक आणि परवडणाऱ्या दरात सेवा पुरवेल.

लेहरतारा येथे होमी भाभा कर्करोग रुग्णालयाचे उद्‌घाटन पंतप्रधान करतील. या दोन कर्करोग रुग्णालयांच्या उद्घाटनामुळे कर्करोगावर गुणवत्तापूर्ण उपचार पुरवणारे केंद्र वाराणसी ठरेल.

पहिल्या नव्या ‘भाभाट्रॉन’चे राष्ट्रार्पण पंतप्रधान करतील.

बनारस हिंदू विद्यापीठात वाराणसी घाटाच्या भित्तीचित्रांचे आणि पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान करतील. आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांशी ते संवाद साधतील.

त्यानंतर वाराणसीतल्या आऊरे गावात अनेक विकासकामांचे उद्‌घाटन पंतप्रधान करतील. विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र ते देतील. दिव्यांग व्यक्तींना मदत आणि सहाय्यक उपकरणे ते प्रदान करतील. त्यानंतर एका सभेला पंतप्रधान संबोधित करतील.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor