Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या धुळे आणि यवतमाळला उद्या म्हणजे 16 फेब्रुवारीला भेट देणार आहेत. राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

यवतमाळ

पंतप्रधान, नांदेड इथल्या एकलव्य आदर्श निवासी शाळेचे बटण दाबून उद्‌घाटन करतील. या शाळेची 420 विद्यार्थ्यांची एकूण क्षमता आहे. या शाळेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठीही मदत होणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या निवडक लाभार्थींच्या ई-गृहप्रवेशासाठी पंतप्रधानांच्या हस्ते या लाभार्थींना घराच्या किल्ल्या प्रदान करण्यात येतील.

नागपूर-अजनी-पुणे दरम्यान धावणाऱ्या या गाडीला व्हिडिओ लिंकद्वारे पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. या गाडीला थ्री टायर वातानुकूलित डबे राहणार आहेत. केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमीपुजनही पंतप्रधान बटण दाबून करणार आहेत.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता गटांना पंतप्रधानांच्या हस्ते प्रशस्तीपत्र/धनादेश प्रदान केले जातील. वित्तीय समावेशकतेच्या उद्देशाबरोबरच सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी हे अभियान काम करते. यामुळे घरोघरी वित्तीय सेवांच्या माध्यमातून कृषक आणि अकृषक उपजीविका संधी सुनिश्चित करण्यासाठी मदत मिळते.

धुळे

यानंतर पंतप्रधान धुळ्याला भेट देतील. प्रधानमंत्री कृषी सिचंन योजनेअंतर्गत निम्न पांझरा मध्यम प्रकल्पाचे ते उद्‌घाटन करतील. 2016-17 मध्ये या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिचंन योजनेत समावेश करण्यात आला. या प्रकल्पाची पाणीसाठवण्याची एकूण क्षमता 109.31 दशलक्ष घनमीटर इतकी असून धुळे जिल्ह्यातल्या 21 गावांमधले 7585 हेक्टर क्षेत्र यामुळे ओलिताखाली येणार आहे.

सुलवाडे-जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल. या योजनेअंतर्गत पावसाळ्यातल्या 124 दिवसात तापी नदीचे 9.24 टीएमसी पुराचं पाणी उचलण्याची क्षमता आहे. यामुळे धुळे जिल्ह्यातल्या 100 गावातले 33,367 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

अमृत योजनेअंतर्गत धुळे शहर पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन पंतप्रधान करणार आहेत. यामुळे पाणी उपलब्ध होऊन औद्योगिक आणि वाणिज्य विकासाला चालना मिळणार आहे.

धुळे-नरडाणा रेल्वे मार्ग आणि जळगांव-मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी करण्यात येईल. भुसावळ-वांद्रे खान्देश एक्स्प्रेस या रेल्वेला पंतप्रधान व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवतील. आठवड्यातून तीन दिवस रात्री धावणाऱ्या या गाडीमुळे मुंबई आणि भुसावळ दरम्यान थेट दळण-वळण शक्य होणार आहे.

जळगांव-उधना दुहेरीकरण आणि विद्युतीकरण रेल्वे प्रकल्पाचे उद्‌घाटन पंतप्रधान करणार आहेत. यामुळे प्रवासी आणि मालवाहतुक क्षमता वाढणार आहे. यामुळे नंदूरबार, धरणगांव आणि या विभागातल्या इतर ठिकाणांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar