पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कतारचे राजे शेख तमिम बिन हमद अल थानि यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
कोविद- 19 या जागतिक महामारी संबंधित बाबींवर तसंच त्याच्या सामाजिक आणि आर्थिक परिणामांवर त्यांनी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. विषाणूचा प्रसार रोखण्यासंबंधी आपापल्या देशांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी एकमेकांना दिली. सार्क राष्ट्रांनी यासंदर्भात घेतलेला स्थानिक पुढाकार तसेच G-20 राष्ट्रांच्या नेत्यांनी आज घेतलेली व्हर्च्युअल परिषद यांची माहिती पंतप्रधानांनी शेख तमिम बिन हमद अल थानि यांना दिली.
या रोगाचा परिणाम भोगावा लागत असलेल्या सर्व संबंधित राष्ट्रांनी त्याचा प्रसार रोखण्यासंदर्भात केलेल्या प्रयत्नांमुळे तसंच या बाबतीत घेतलेल्या खबरदारीचे सकारात्मक परिणाम होतील आणि ही साथ लवकर आटोक्यात येईल असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.
या महामारीशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकता प्रस्थापित होणे तसेच माहितीची देवाण-घेवाण होण्याच्या आवश्यकतेवर दोघांनी भर दिला.
कतारमध्ये रहात असलेल्या तसेच कामानिमित्त गेलेल्या भारतीय नागरिकांची जातीने दखल घेऊन विशेषतः सध्याच्या परिस्थितीत त्यांची योग्य काळजी घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी हिज हायनेस शेख तमिम बिन हमद थानी यांचे आभार मानले.
कतारमधल्या सर्व भारतीय प्रवाशांची सुरक्षा आणि योग्य ती काळजी घेण्यासंदर्भात अमीर यांनी पंतप्रधानांना आश्वस्त केले.
सध्या उद्भवलेल्या परिस्थितीत नियमित संपर्क ठेवणे आणि सल्लामसलत करणे यावर पंतप्रधान आणि हिज हायनेस अमिर या दोघांचेही एकमत झाले.
B.Gokhale/ V.Sahajrao/P.Kor