पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनएच –105 वरील पिंजोर ते नालागढ या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 1690 कोटी रुपये खर्चाच्या सुमारे 31 किमी लांबीच्या प्रकल्पाची पायाभरणी केली. पंतप्रधानांनी एम्स बिलासपूरचे लोकार्पणही केले. तसेच सुमारे 350 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्या नालागढ येथील मेडिकल डिव्हाईस पार्कची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. पंतप्रधानांनी बांदला येथे शासकीय जल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उद्घाटन केले.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी विजया दशमीच्या शुभ प्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रत्येक अडथळ्यावर मात करून संकल्प केलेल्या ‘पंचप्रण’ मार्गावर चालण्यासाठी हा शुभ उत्सव सर्वांना नवी ऊर्जा देईल असे ते म्हणाले. विजयादशमीला हिमाचलमध्ये येण्याची संधी मिळणे हे भविष्यातील प्रत्येक विजयासाठी शुभसंकेत आहेत असे ते म्हणाले.
बिलासपूरला आरोग्य आणि शिक्षणाची दुहेरी भेट मिळाली आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. कुल्लू दसऱ्यात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आभार मानले आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी भगवान रघुनाथजींकडे प्रार्थना करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी जुन्या दिवसांची आठवणही सांगितली , ते म्हणाले की तेव्हा ते आणि त्यांचे सहकारी या भागात रहायचे आणि काम करायचे. “हिमाचल प्रदेशच्या विकासाच्या प्रवासाचा एक भाग बनणे हे माझे सौभाग्य आहे” असे ते म्हणाले,.
हिमाचल प्रदेशात गेल्या काही वर्षात झालेल्या विकासाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, केवळ जनतेने दिलेल्या मतांमुळे हा विकास शक्य झाला. गतिमान विकासाचे श्रेय त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवरील जनतेच्या विश्वासाला दिले.
ते म्हणाले की, शिक्षण, रस्ते, उद्योग, रुग्णालये यासारख्या सुविधा या केवळ मोठ्या शहरांसाठीच आहेत अशीच विचारसरणी प्रदीर्घ काळ होती. डोंगराळ भागात मूलभूत सुविधाही सर्वात शेवटी पोहोचत असायच्या. यामुळे देशाच्या विकासात मोठा असमतोल निर्माण झाला होता, असे पंतप्रधान म्हणाले. ते पुढे म्हणाले, हिमाचल प्रदेशातील लोकांना छोट्या-छोट्या समस्यांसाठी चंदीगडला किंवा दिल्लीला जावे लागत होते. मात्र, गेल्या 8 वर्षांत दुहेरी इंजिनाच्या सरकारने ही परिस्थिती बदलून टाकली. पंतप्रधान म्हणाले की आज हिमाचल प्रदेशमध्ये आयआयटी, आयआयएम आणि आयआयआयटी सारखी केंद्रीय विद्यापीठे आहेत. मोदी पुढे म्हणाले की, एम्स बिलासपूर ही भारतातील वैद्यकीय शिक्षण देणारी सर्वोच्च संस्था असून यामुळे बिलासपूरच्या वैभवात भर पडेल. “गेल्या आठ वर्षात हिमाचल प्रदेशने विकासाची नवी शिखरे गाठली आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले.
आता प्रकल्पांच्या पायाभरणीसोबतच त्यांचे लोकार्पणही निर्धारित मुदतीतच केले जात असल्याच्या सरकारच्या बदललेल्या कार्यशैलीविषयी पंतप्रधानांनी सांगितले.
हिमाचल प्रदेशचे राष्ट्र उभारणीतले योगदान सांगताना पंतप्रधान म्हणाले, देशाच्या संरक्षणात या राज्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि आता बिलासपूर येथे नव्याने उद्घाटन झालेल्या एम्समुळे ते ‘जीवन रक्षणातही महत्त्वाची भूमिका बजावेल. महामारीचे आव्हान असतानाही काम वेळेवर पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारचे कौतुक केले.
बल्क ड्रग्ज पार्कसाठी निवडलेल्या तीन राज्यांपैकी हे एक राज्य असल्याने हिमाचल प्रदेशातील लोकांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. वैद्यकीय उपकरणे पार्कसाठी निवडलेल्या चार राज्यांपैकी एक हिमाचल प्रदेश असून नालागढ मेडिकल डिव्हाइस पार्क हा त्याचाच एक भाग आहे. “ही शूरांची भूमी आहे आणि मी या भूमीचा ऋणी आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
हिमाचल प्रदेशमध्ये अगणित संधी असल्याचे सांगून वैद्यकीय पर्यटनाच्या पैलूंविषयी पंतप्रधानांनी सांगितले. राज्यातील वनौषधी हवा आणि पर्यावरण हे राज्यासाठी लाभाचे मोठे स्रोत ठरू शकतील,असे पंतप्रधान म्हणाले.
गरीब आणि मध्यमवर्गीयांचे जीवनमान सुकर व्हावे हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांविषयी पंतप्रधानांनी सांगितले. दुर्गम ठिकाणी रुग्णालये उपलब्ध करून देण्यासाठी आणि वैद्यकीय बिलांचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच आम्ही एम्सपासून जिल्हा रुग्णालयातील क्रिटिकल केअर आणि गावांमधील जिल्हा रुग्णालये आणि गावांमधील निरामयता केंद्रे यांच्यातील अविरत संपर्कावर काम करत आहोत,असे ते म्हणाले. राज्यातील बहुतांश कुटुंबांना आयुष्मान भारत योजना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध करत आहे. सरकारने देशभरात 45,000 कोटींहून अधिक खर्च केले असून, रूग्णांची सुमारे 90,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे.
डबल इंजिन सरकारचा पाया आमच्या माता, भगिनी आणि मुलींना आनंद, सुलभता, सन्मान, संरक्षण आणि आरोग्य प्रदान करण्यावर आधारित आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “सर्वांना सन्मानाने जगता यावे याच्या सुनिश्चितीला सरकारचे प्राधान्य आहे”असे त्यांनी सांगितले. त्यांनी माता-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी शौचालय बांधकाम, मोफत गॅस कनेक्शन, सॅनिटरी पॅड वितरण योजना, मातृ वंदना योजना आणि हर घर जल अभियान यासारखे उपक्रम नमूद केले.
केंद्रीय योजनांची उत्साहाने आणि वेगाने अंमलबजावणी केल्याबद्दल आणि त्यांची व्याप्ती वाढवल्याबद्दल पंतप्रधानांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. हर घर जल आणि निवृत्तिवेतनासारख्या सामाजिक सुरक्षा योजनांच्या अंमलबजावणीच्या गतीची त्यांनी प्रशंसा केली. त्याचप्रमाणे हिमाचलमधील अनेक कुटुंबांना वन रँक वन पेन्शनचा मोठा फायदा झाला आहे. कोरोना लसीकरण शंभर टक्के पूर्ण करणारे पहिले राज्य ठरल्याबद्दल पंतप्रधानांनी राज्याचे कौतुक केले.
“हिमाचल ही अनेक संधींची भूमी आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. राज्यात वीज निर्मिती होते, सुपीक जमीन आहे आणि पर्यटनामुळे रोजगाराच्या अनंत संधी आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. उत्तम संपर्क सुविधांचा अभाव हा या संधींसमोरील सर्वात मोठा अडथळा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. “2014 पासून हिमाचल प्रदेशातील गावोगावी सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा पोहोचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत”, असे ते म्हणाले. हिमाचलमधील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे कामही चौफेर सुरू असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. “सध्या हिमाचलमधील संपर्क सुविधा कामांवर सुमारे 50 हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत”, असे ते म्हणाले, “जेव्हा पिंजोर ते नालागढ महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल, तेव्हा नालागढ आणि बड्डी या औद्योगिक क्षेत्रांना तर फायदा होईलच, पण चंदीगड आणि अंबाला येथून बिलासपूर, मंडी आणि मनालीकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही याचा लाभ मिळेल. “हिमाचलमधील लोकांना वळणदार रस्त्यांपासून मुक्त करण्यासाठी बोगद्यांचे जाळे देखील पसरवले जात आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
डिजिटल इंडियाच्या ताज्या घडामोडींकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की, हिमाचलमध्येही डिजिटल संपर्क सुविधा क्षेत्रात अभूतपूर्व काम करण्यात आले आहे. “गेल्या 8 वर्षात, मेड इन इंडिया अंतर्गत मोबाईल फोन स्वस्त झाले आहेत आणि खेड्यापाड्यातही नेटवर्क पोचले आहे”, असे ते म्हणाले. उत्तम 4G कनेक्टिव्हिटीमुळे हिमाचल प्रदेश देखील डिजिटल व्यवहारांमध्ये खूप वेगाने पुढे जात आहे. “डिजिटल इंडियाचा सर्वात जास्त फायदा कोणाला होत असेल तर तो तुम्हाला, हिमाचलच्या लोकांना”, पंतप्रधान म्हणाले. या सुविधेमुळे बिलांचा भरणा करणे, बँकेशी संबंधित कामे, प्रवेश घेणे, अर्ज सादर करणे इत्यादींसारखी कामे कमीत कमी वेळात होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
देशातील 5G घडामोडींवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले, “आता देशात प्रथमच, मेड इन इंडिया अंतर्गत 5G सेवा देखील सुरू झाल्या आहेत आणि लवकरच हिमाचलला त्याचे फायदे उपलब्ध करून दिले जातील.” भारतात ड्रोनचे नियम बदलल्यानंतर त्यांचा वाहतूक क्षेत्रातील वापर खूप वाढणार आहे, सोबतच शिक्षण, आरोग्य, कृषी आणि पर्यटन या क्षेत्रांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे, असे त्यांनी सांगितले. हिमाचल प्रदेश हे ड्रोन धोरण अंमलात आणणारे पहिले राज्य असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. “प्रत्येक नागरिकाच्या सोयी वाढतील आणि प्रत्येक नागरिक समृद्धीशी जोडला जाईल, अशा प्रकारच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे विकसित भारत आणि विकसित हिमाचल प्रदेशचा संकल्प सिद्ध करेल”, असे सांगत पंतप्रधानांनी समारोप केला.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा तसेच खासदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेशकुमार कश्यप यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
हिमाचल प्रदेशात विविध प्रकल्प
राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत NH-105 वर पिंजोर ते नालागढ दरम्यान 31 किलोमीटर लांबीच्या १ हजार ६९० कोटी रुपये खर्चाच्या चौपदरी प्रकल्पाची आज कोनशिला बसवण्यात आली. अंबाला, चंदीगड, पंचकुला आणि सोलन/सिमला इथून बिलासपूर, मंडी आणि मनाली इथे प्रवास करणाऱ्या वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा जोडमार्ग ठरणार आहे. या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचा 18 किलोमीटरचा भाग हिमाचल प्रदेशात तर उर्वरित भाग हरियाणामध्ये येत आहे. या महामार्गामुळे हिमाचल प्रदेशचे औद्योगिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नालागढ-बड्डी या भागात वाहतूक सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. तसंच, या क्षेत्रात यापुढील औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे. यामुळे, या राज्यात पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
बिलासपूर एम्स
देशभरात आरोग्य सेवा मजबूत करण्याची पंतप्रधानांची दूरदृष्टी आणि कटीबद्धतेबाबतचा पुनःप्रत्यय बिलासपूरच्या एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या राष्ट्रार्पणाच्या माध्यमातून आला. ऑक्टोबर 2017 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या रुग्णालयाची कोनशिला बसवली होती तसंच केंद्रीय क्षेत्र योजना, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या अंतर्गत या रूग्णालयाची स्थापना होत आहे. आयआयएमएस बिलासपूरच्या उभारणीसाठी 1 हजार 470 कोटी रुपये खर्च झाला असून हे अत्याधुनिक रुग्णालय 18 स्पेशालिटी आणि 17 सुपर स्पेशालिटी विभागांनी सुसज्ज आहे. या रुग्णालयात 18 मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर असून 64 आयसीयू बेड सहित साडेसातशे नियमित बेड आहेत. 247 एकर परिसरात असलेल्या या रुग्णालयात 24 तासाचा आपत्कालीन तसच डायलिसिस सेवा विभाग तसेच अल्ट्रा सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एमआरआय सारख्या आधुनिक उपकरणांनी युक्त विभाग आहेत. या रुग्णालयात अमृत फार्मसी आणि जन औषधी केंद्रासह आयुष विभागाचा तीस खाटांचा स्वतंत्र कक्ष आहे. हिमाचल प्रदेशाच्या ग्रामीण तसंच दुर्गम भागातल्या रुग्णांना सेवा आरोग्य सेवा पुरवण्याच्या उद्देशान या रुग्णालयात डिजिटल आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. हिमालयीन पट्ट्यातल्या काझा, सलूनी आणि केयलोन्ग या दुर्गम तसंच अति उंच भागात मोडणाऱ्या क्षेत्रांसाठी हे रुग्णालय आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून विशेष आरोग्य सेवाही पुरवणार आहे. या रुग्णालयात दरवर्षी वैद्यकीय शिक्षणासाठी शंभर तर नर्सिंगसाठी साठ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
बांदला इथे सरकारी जल अभियांत्रिकी महाविद्यालय
पंतप्रधानांनी आज बांदला इथं सरकारी जल अभियांत्रिकी महाविद्यालयाचं उद्घाटन केलं. बांदला येथे 140 कोटी रुपये खर्चाच्या या महाविद्यालयामुळे हिमाचल प्रदेशासारख्या जल विद्युतनिर्मिती प्रकल्प क्षेत्रात आघाडीच्या राज्यात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. यामुळे युवा वर्गाच्या कौशल्यात वृद्धी होणार असून जलविद्युत प्रकल्प क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहेत
नालागढ इथं मेडिकल डिवाइस पार्क
पंतप्रधानांनी आज नालागढ इथं मेडिकल डिवाइस पार्क अर्थात वैद्यकीय उपकरणे केंद्राची कोनशिला बसवली. 350 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांतर्गत उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी याआधीच 800 कोटी रुपयांहून जास्त मूल्याच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होणार आहेत.
The iconic Dussehra celebrations in Kullu are underway. PM @narendramodi has joined the programme after his previous programme in Bilaspur. pic.twitter.com/CDWD0G9Dhu
— PMO India (@PMOIndia) October 5, 2022
PM @narendramodi at the Rath of Bhagwan Shri Raghunath Ji during the Kullu Dussehra celebrations. pic.twitter.com/6bzd3XnGXo
— PMO India (@PMOIndia) October 5, 2022
***
S.Patil/S.Kane/S.Kakade/S.Mukhedkar/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Elated to be in Devbhoomi Himachal Pradesh. Speaking at launch of development works in Bilaspur. https://t.co/RwjA4KcM0Y
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2022
PM @narendramodi extends Vijaya Dashami greetings to the countrymen. pic.twitter.com/XGJIBEtck6
— PMO India (@PMOIndia) October 5, 2022
Fortunate to have been a part of Himachal Pradesh's development journey, says PM @narendramodi pic.twitter.com/n4o7L9UU4c
— PMO India (@PMOIndia) October 5, 2022
In the last eight years, Himachal Pradesh has scaled new heights of development. pic.twitter.com/6YrdnnzFfd
— PMO India (@PMOIndia) October 5, 2022
Himachal Pradesh plays a crucial role in 'Rashtra Raksha' and now with the newly inaugurated AIIMS at Bilaspur, it will also play pivotal role in 'Jeevan Raksha'. pic.twitter.com/eZWcVzumY7
— PMO India (@PMOIndia) October 5, 2022
A moment of pride for Himachal Pradesh. pic.twitter.com/z3Nr2QgTKg
— PMO India (@PMOIndia) October 5, 2022
When it comes to medical tourism, Himachal Pradesh can benefit a lot. pic.twitter.com/qwsZgHqok0
— PMO India (@PMOIndia) October 5, 2022
Ensuring 'Ease of Living' for the poor and middle class. pic.twitter.com/fInATjsdb0
— PMO India (@PMOIndia) October 5, 2022
Ensuring dignity of life for all is our government's priority. pic.twitter.com/wCXtzaNDwo
— PMO India (@PMOIndia) October 5, 2022
Himachal Pradesh is a land of opportunities. pic.twitter.com/8ACWXIxBtK
— PMO India (@PMOIndia) October 5, 2022