Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी स्टार्टअपशी साधला संवाद

पंतप्रधानांनी स्टार्टअपशी साधला संवाद


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्टार्टअपशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. ग्रोइंग फ्रॉम रूट्स; नजिंग  डीएनए; स्थानिक ते जागतिक; भविष्यातील तंत्रज्ञान; उत्पादन क्षेत्रात जगज्जेते घडवणे आणि शाश्वत विकास या सहा संकल्पनांवर स्टार्टअप्सनी पंतप्रधानांसमोर सादरीकरण केले. या सादरीकरणाच्या उद्देशाने 150 हून अधिक स्टार्टअप्सना सहा कार्य गटांमध्ये विभागण्यात आले. प्रत्येक संकल्पनेसाठी, दोन स्टार्टअप प्रतिनिधींचे सादरीकरण होते, जे त्या विशिष्ट संकल्पनेसाठी निवडलेल्या सर्व स्टार्टअप्सच्या वतीने बोलले.

त्यांच्या सादरीकरणादरम्यान, स्टार्टअप प्रतिनिधींनी त्यांच्या कल्पना सामायिक करण्यासाठी असे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आणि स्टार्टअप परिसंस्थेसाठी त्यांच्या दूरदृष्टीची आणि समर्थनाची प्रशंसा केली. त्यांनी कृषी क्षेत्रातील मजबूत डेटा संकलन यंत्रणा, भारताला प्राधान्याने कृषी व्यवसाय केंद्र बनवणे; तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे आरोग्यसेवा वाढवणे; मानसिक आरोग्य समस्या हाताळणे; व्हर्च्युअल टूर सारख्या नवकल्पनांद्वारे प्रवास आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणे; एज्यु -टेक आणि नोकरीची निवड; अंतराळ क्षेत्र; ऑफलाइन किरकोळ बाजाराला डिजिटल कॉमर्सशी जोडणे; उत्पादन कार्यक्षमता वाढवणे; संरक्षण निर्यात; हरित शाश्वत उत्पादनांचा आणि वाहतुकीच्या शाश्वत साधनांचा प्रचार करणे यासह विविध क्षेत्रे आणि विभागांवर कल्पना आणि माहिती सामायिक केली.

केंद्रीय मंत्री श्री पीयूष गोयल, डॉ मनसुख मांडवीय, श्री अश्विनी वैष्णव, श्री सर्बानंद सोनोवाल, श्री परशोत्तम रूपाला, श्री जी. किशन रेड्डी, श्री पशुपती कुमार पारस, डॉ जितेंद्र सिंह, श्री सोम प्रकाश यावेळी उपस्थित होते.

सादरीकरणांनंतर बोलताना, पंतप्रधान म्हणाले की या स्टार्ट अप इंडिया इनोव्हेशन सप्ताहाचे आयोजन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या यावर्षात अधिक महत्त्वाचे आहे कारण भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात स्टार्ट अप्सची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. मी देशातील सर्व स्टार्ट-अप्सचे, सर्व कल्पक तरुणांचे, जे स्टार्ट-अपच्या जगात भारताचा झेंडा उंचावत आहेत त्यांचे अभिनंदन करतो. स्टार्ट-अप्सची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचण्यासाठी 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.

भारताचे तंत्रज्ञान दशकम्हणून चालू दशकाची संकल्पना लक्षात घेऊन पंतप्रधानांनी या दशकात नवोन्मेष, उद्योजकता आणि स्टार्ट-अप परिसंस्था मजबूत करण्यासाठी सरकार करत असलेल्या मोठ्या बदलांच्या तीन महत्त्वाच्या पैलूंची यादी केली. प्रथम पैलू म्हणजे, सरकारी प्रक्रिया, नोकरशाहीच्या जाळ्यातून उद्योजकता आणि नवकल्पना मुक्त करणे. दुसरा, नवोन्मेषाला चालना देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा निर्माण करणे आणि तिसरा, तरुण नवोन्मेषक आणि तरुण उद्योजकांचा समन्वय. प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया सारख्या कार्यक्रमांचा उल्लेख केला. एंजल टॅक्सच्या समस्या दूर करणे, कर प्रक्रियेचे सुलभीकरण, सरकारी निधीची व्यवस्था करणे, 9 कामगार आणि 3 पर्यावरण कायद्यांचे स्व-प्रमाणीकरण करणे आणि 25 हजारांहून अधिक अनुपालन काढून टाकणे यासारख्या उपाययोजनांनी प्रक्रिया पुढे नेली आहे. गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) प्लॅटफॉर्मचा स्टार्टअप द्वारे वापर सरकारला स्टार्टअप सेवांची तरतूद सुलभ करत आहे.

लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये नाविन्याचे आकर्षण निर्माण करून देशात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 9000 हून अधिक अटल टिंकरिंग लॅब मुलांना शाळेत नवोन्मेषाची आणि अभिनव कल्पनांवर काम करण्याची संधी देत आहेत. ते पुढे म्हणाले की, ड्रोनचे नवे नियम असोत किंवा नवीन अवकाश धोरण असो, जास्तीत जास्त तरुणांना नवनिर्मितीची संधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्राधान्य आहे. आमच्या सरकारने आयपीआर नोंदणीशी संबंधित नियमही सोपे केले आहेत, असेही ते म्हणाले.

नवोन्मेषाच्या निर्देशांकांमध्ये झालेली मोठी वाढ  पंतप्रधानांनी नमूद केली. वर्ष  2013-14 मध्ये 4000 पेटंट मंजूर झाली  होते, गेल्या वर्षी 28 हजारांहून अधिक पेटंटस  मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.  वर्ष 2013-14 मध्येसुमारे 70,000 ट्रेडमार्क  नोंदणीकृत  झाले  होते वर्ष 2020-21 मध्ये 2.5 लाखांहून अधिक ट्रेडमार्क नोंदणीकृत झाले आहेत. सन 2013-14 मध्ये, केवळ  4000 कॉपीराइट मंजूर झाले होते, गेल्या वर्षी त्यांची संख्या 16,000 च्या वर गेली आहे. भारताच्या नवोन्मेष अभियानाच्या  परिणामस्वरूप  जागतिक नवोन्मेष  निर्देशांकात भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली असल्याचे  पंतप्रधानांनी निदर्शनाला आणून दिले.  जागतिक नवोन्मेष निर्देशांकात आधी 81 व्या क्रमांकावर असलेला भारत आता  46 व्या क्रमांकावर आहे.

भारतातील स्टार्टअप्स 55 विभिन्न  उद्योगांसह काम करत आहेत आणि स्टार्टअप्सची संख्या पाच वर्षांपूर्वी 500 पेक्षा कमी होती ती आज 60 हजारांहून अधिक झाली आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी  दिली. पंतप्रधान म्हणाले, आपले  स्टार्ट-अप्स परिस्थिती  बदलत आहेत. त्यामुळेच मला विश्वास आहे की स्टार्ट-अप्स नवीन भारताचा कणा ठरणार आहेत. गेल्या वर्षी देशात 42 युनिकॉर्न तयार झाल्याचे  पंतप्रधानांनी नमूद केले. हजारो कोटी रुपयांच्या या कंपन्या स्वावलंबी आणि आत्मविश्वासपूर्ण भारताचे प्रमाणचिन्ह असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले आज भारत झपाट्याने युनिकॉर्नचे शतक पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मला असे वाटते, भारतातील स्टार्ट अप्सचा सुवर्णकाळ आता सुरू होत आहे

विकास आणि प्रादेशिक-लिंग विषमतेच्या समस्या सोडवण्यासाठी उद्योजकतेद्वारे सक्षमीकरणाची भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली. त्यांनी नमूद केले की, आज देशातील 625 जिल्ह्यांपैकी प्रत्येक जिल्ह्यात  किमान एक स्टार्टअप आहे आणि अर्ध्याहून अधिक स्टार्टअप दुसऱ्या  आणि तिसऱ्या स्तरातील  शहरांमधील आहेत.  सामान्य गरीब कुटुंबातील कल्पनांचे व्यवसायात रूपांतर ते घडवत  आहेत आणि लाखो तरुणांना रोजगार मिळत आहे.

भारताची वैविध्यता ही भारताचे मुख्य बळ असून ती  भारताची  जागतिक ओळखही असल्याचे मोदी यांनी सांगितले.  ते म्हणाले की भारतीय युनिकॉर्न आणि स्टार्टअप या विविधतेचे दूत आहेत. भारतातील स्टार्टअप्स जगातील इतर देशांमध्ये सहज पोहोचू शकतात,असे त्यांनी सांगितले.  त्यामुळे  तुमची स्वप्ने फक्त स्थानिक ठेवू नका, त्यांना जागतिक बनवा. हा मंत्र लक्षात ठेवा- चला भारतासाठी नवनिर्मिती करूया, भारतातून नवनिर्मिती करूया, असे  आवाहन त्यांनी नवोन्मेषकांना केले.

स्टार्टअप परिसंस्था जिथे  मोठी भूमिका बजावू शकते,अशी अनेक क्षेत्रे पंतप्रधानांनी सुचवली.  ते म्हणाले की पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनवरील अतिरिक्त जागा ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांसाठी वापरली जाऊ शकते. त्याचप्रमाणे, संरक्षण उत्पादन, चिप उत्पादन यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठा वाव आहे. त्यांनी ड्रोन क्षेत्राकडे  लक्ष वेधले.   नवीन ड्रोन धोरणानंतर अनेक गुंतवणूकदार ड्रोन स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.  लष्कर, नौदल आणि हवाई दलाने ड्रोन स्टार्टअप्सना 500 कोटी रुपयांच्या ऑर्डर दिल्या आहेत. शहर नियोजन, पंतप्रधानांनी वॉक टू वर्कसंकल्पना, एकात्मिक औद्योगिक वसाहती आणि स्मार्ट गमनशीलता  या संभाव्य क्षेत्रांचा  उल्लेख  केला.

आजचे युवा कुटुंबांची समृद्धी आणि राष्ट्राच्या आत्मनिर्भरतेचा आधारस्तंभ आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.  ग्रामीण अर्थव्यवस्थेपासून ते उद्योग 4.0 पर्यंत, आपल्या गरजा आणि आपल्या  क्षमता या दोन्ही अमर्याद आहेत. भविष्यातील तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन आणि विकासावर गुंतवणूक करणे याला आज सरकारचे प्राधान्य  आहे,असे  ते म्हणाले.

भविष्यातील संभाव्यतेचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, सध्या आपली केवळ  निम्मी लोकसंख्याच  ऑनलाइन आहे, त्यामुळे भविष्यातील संभाव्यता  अपार आहेत आणि त्यांनी स्टार्टअप्सना गावांकडेही जाण्याचे आवाहन केले. “मोबाईल इंटरनेट असो, ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी असो किंवा भौतिक कनेक्टिव्हिटी असो, खेड्यांच्या आकांक्षा वाढत आहेत आणि ग्रामीण आणि निमशहरी भाग विस्ताराच्या नव्या  लाटेची प्रतीक्षा करत आहे”, ते म्हणाले.

पंतप्रधानांनी स्टार्टअप्सना सांगितले कीहे नवोन्मेषाचे  म्हणजेच कल्पना, उद्योग आणि गुंतवणूकीचे नवीन युग आहे आणि त्यांचे श्रम, उद्योग, संपत्ती निर्माण आणि रोजगार निर्मिती भारतासाठी असली पाहिजे. मी तुमच्या पाठीशी उभा आहे, सरकार तुमच्या पाठीशी आहे आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

***

M.Chopade/S.Kakade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com