नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोककल्याण मार्ग 7 येथील त्यांच्या निवासस्थानी सेमीकंडक्टर एक्झिक्युटिव्हजच्या गोलमेज बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले .
त्यांच्या कल्पना केवळ त्यांच्या उद्योगालाच नव्हे तर भारताच्या भविष्याला आकार देतील असे पंतप्रधान या बैठकीत बोलताना म्हणाले. येणारा काळ हा तंत्रज्ञान केंद्रित असेल आणि सेमीकंडक्टर हा डिजिटल युगाचा आधार असेल तसेच तो दिवस दूर नसेल ज्यावेळी सेमीकंडक्टर उद्योग हा आपल्या मूलभूत गरजांचा देखील आधारस्तंभ असेल, असे पंतप्रधान म्हणाले. लोकशाही आणि तंत्रज्ञान हे एकत्रितपणे मानवतेचे हित सुनिश्चित करतील आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील जागतिक स्तरावरील जबाबदारीचे भान ठेवून भारत आपले मार्गक्रमण करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांनी सामाजिक, डिजिटल आणि भौतिक पायाभूत सुविधा विकसित करणे, सर्वसमावेशक विकासाला चालना देणे, अनुपालनाचे ओझे कमी करणे आणि उत्पादन आणि नवकल्पनांमध्ये गुंतवणूक आकर्षित करणे यांचा समावेश असलेल्या विकासाच्या स्तंभांबद्दल सांगितले. वैविध्यपूर्ण अशा सेमीकंडक्टर पुरवठा साखळीमध्ये एक विश्वासार्ह भागीदार बनण्याची भारताची क्षमता असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारतातील प्रतिभासंपदा आणि उद्योगासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध व्हावेत यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर पंतप्रधानांनी भर दिला. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उत्पादनांची निर्मिती करण्यावर भारताचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. अत्याधुनिक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीसाठी भारत ही उत्तम बाजारपेठ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आणि आज सेमीकंडक्टर क्षेत्रातील नेत्यांनी दाखवलेला उत्साह सरकारला या क्षेत्रासाठी कठोर परिश्रम करण्यास प्रेरित करेल, असे ते म्हणाले.भारत सरकार अंदाज वर्तवण्याजोग्या आणि स्थिर धोरणाचे पालन करेल असे आश्वासन पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले. मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्डवर लक्ष केंद्रित करून, सरकार उद्योजकतेला प्रत्येक टप्प्यावर पाठबळ देत राहील, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
सेमीकंडक्टर क्षेत्राच्या वाढीसाठी भारताच्या बांधिलकीचे कौतुक करताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की आज जे घडले आहे ते अभूतपूर्व आहे ज्यामध्ये संपूर्ण सेमीकंडक्टर क्षेत्रातील अग्रणींना एका छताखाली आणले गेले आहे. सेमीकंडक्टर उद्योगाच्या अफाट वाढ आणि भविष्यातील व्याप्तीबद्दल ते बोलले. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताला जागतिक नकाशावर आणणाऱ्या उद्योगासाठी आता देशात योग्य वातावरण असल्याचे नमूद करतानाच सेमीकंडक्टर उद्योगाच्या गुरुत्वाकर्षणाचे केंद्र भारताकडे वळू लागले आहे, असे ते म्हणाले. भारतासाठी जे चांगले आहे ते जगासाठी चांगले असेल, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, सेमीकंडक्टर क्षेत्रातील कच्च्या मालामध्ये जागतिक बलस्थान बनण्याची भारताकडे अद्भुत क्षमता आहे.
भारतातील व्यवसायासाठी अनुकूल वातावरणाचे कौतुक करताना ते म्हणाले की, जटिल भू-राजकीय परिस्थितीत भारत स्थिर आहे. भारताच्या क्षमतेवर त्यांचा प्रचंड विश्वास असल्याचा उल्लेख करताना भारत हे गुंतवणुकीचे ठिकाण आहे यावर उद्योग जगतात एकमत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. गतकाळातही पंतप्रधानांनी दिलेल्या प्रोत्साहनाची आठवण सांगताना आज भारतात असलेल्या प्रचंड संधी यापूर्वी कधीही पाहिल्या नव्हत्या आणि भारतासोबत भागीदारी केल्याचा अभिमान आहे असे त्यांनी नमूद केले.
या बैठकीला सेमी, मायक्रॉन, एनएक्सपी, पीएसएमसी, आयएमईसी, रेनिसास, टीईपीएल, टोक्यो इलेक्ट्रॉन लि.,टॉवर, सिनॉप्सिस, कॅडेन्स, रॅपिडस, जेकब्स, जेएसआर, इन्फिनियॉन, अड्वन्टेस्ट, टेराडायिन, अप्लाइड मटेरिअल्स, लॅम रिसर्च, मर्क, सीजी पॉवर आणि केनेस टेक्नॉलॉजी यासह विविध संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत स्टॅनफोर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया सॅन दिएगो विद्यापीठ आणि आयआयटी भुवनेश्वर येथील प्राध्यापकही उपस्थित होते.
S.Patil/B.Sontakke/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Chaired the Semiconductor Executives’ Roundtable at 7, LKM. Discussed a wide range of subjects relating to the semiconductors sector. I spoke about how this sector can further the development trajectory of our planet. Also highlighted the reforms taking place in India, making our…
— Narendra Modi (@narendramodi) September 10, 2024