Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी साहिबजादा अजित सिंग नगर (मोहाली))येथील होमी भाभा कर्करोग रूग्णालय आणि संशोधन केंद्र राष्ट्राला केले समर्पित

पंतप्रधानांनी साहिबजादा अजित सिंग नगर (मोहाली))येथील होमी भाभा कर्करोग रूग्णालय आणि संशोधन केंद्र राष्ट्राला केले समर्पित


नवी दिल्‍ली, 24 ऑगस्‍ट 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साहिबजादा अजित सिंग नगर (मोहाली))येथील होमी भाभा कर्करोग रूग्णालय आणि संशोधन केंद्र राष्ट्राला समर्पित केले. यावेळी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान, केद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले,  आजच्या या कार्यक्रमावर देशामध्ये आरोग्य सेवा सुविधा क्षेत्रामध्ये घडून आलेल्या सुधारणांचे प्रतिबिंब दिसून येत आहे. पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील लोकांना हे रूग्णालय सेवा देईल. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमध्ये सर्व जण उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल त्यांनी पंजाबच्या जनतेचे आभार मानले.

भारताला विकसित राष्ट्रª बनविण्याची घोषणा आपण स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्याच्या बुरूजावरून केली असल्याचे पुन्हा एकदा सांगून पंतप्रधान म्हणाले, ‘‘भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी, आरोग्य सेवा विकसित करणे तितकेच महत्वाचे आहे’’. ज्यावेळी भारतातल्या लोकांना आधुनिक सुविधांनीयुक्त रूग्णालये मिळतील, त्यावेळी ते लवकर बरे होतील आणि त्यांची ऊर्जा योग्य दिशेने वळवणे  शक्य होईल. कर्करोगाच्या उपचारासाठी सुविधा निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरूच्चार केला. तसेच सांगितले की, टाटा मेमोरियल सेंटर आता दरवर्षी 1.5 लाख नवीन रूग्णांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज आहे. बिलासपूर येथील नवीन रूग्णालय आणि एम्समुळे पीजीआय चंदीगड रूग्णालयावर येणारा ताण आता कमी होईल.यामुळे रूग्ण आणि रूग्णाच्या परिवाराला मोठा दिलासा मिळेल. 

चांगली आरोग्य व्यवस्था म्हणजे फक्त चार भिंती उभ्या करणे नाही, असे स्पष्ट करून पंतप्रधान म्हणाले की, शक्य असेल त्या मार्गाने औषधोपचार योजना उपलब्ध करून देणे, पावलोपावली आधार देणे म्हणजे  कोणत्याही देशाची आरोग्य व्यवस्था मजबूत करणे आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, ‘‘गेल्या आठ वर्षांमध्ये देशातील सर्वोच्च प्राधान्यक्रमांमध्ये सर्वांगीण आरोग्यसेवेला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे.’’ 

देशामध्ये आरोग्य सुविधा सुधारण्याचे काम आज सहा आघाड्यांवर एकत्रितपणे केले जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी  नमूद केले. या सर्व सहा आघाड्या कोणत्या हे सांगताना ते म्हणाले, पहिली आघाडी म्हणजे, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला चालना देणे, दुसरी आघाडी म्हणजे ग्रामीण भागात लहान आणि आधुनिक रूग्णालये उभारणे , तिसरी आघाडी म्हणजे शहरात वैद्यकीय महाविद्यालये आणि मोठ्या वैद्यकीय संशोधन संस्था सुरू करणे. चौथी आघाडी- देशभरातले डॉक्टर्स, निमवैद्यकीय  कर्मचारी यांची संख्या वाढविणे, पाचवी आघाडी- रूग्णांना स्वस्त दरामध्ये औषधे, स्वस्त उपकरणे मिळावीत यासाठी काम, आणि सहावी आघाडी म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून रूग्णांना होणा-या अडचणी कमी करणे आहे.

प्रतिबंधात्मक दृष्टिकोनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जल जीवन मिशनमुळे जलजन्य आजारांनी ग्रस्त होणा-या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता, योगासने, तंदुरूस्तीविषयी वाढलेला कल, पोषण अभियान, स्वयंपाकाचा गॅस अशा सुविधांमुळे रूग्णसंख्या कमी होत आहे. दुस-या आघाडीवर दर्जेदार चाचणी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत आणि 1.5 लाखांपेक्षा जास्त आरोग्य आणि निरामय केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. त्यापैकी 1.25  याआधीच स्थापन झाली आहेत. पंजाबमध्ये अशी सुमारे 3000 केंद्रे कार्यरत आहेत. देशभरामध्ये 22 कोटींपेक्षा जास्त लोकांची कर्करोगविषयक तपासणी करण्यात आली आहे,  त्यापैकी पंजाबमध्ये 60 लाख जणांची तपासणी करण्यात आली आहे. 

पंतप्रधान पुढे म्हणाले की, एकदा रोग निदान झाले की जिथे गंभीर स्वरूपाच्या आजारांवर योग्य उपचार होऊ शकतील अशा आधुनिक रुग्णालयांची गरज निर्माण होते. देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे ध्येय निश्चित करून त्याप्रमाणे केंद्र सरकार काम करत आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियानाच्या अंतर्गत सुरु झालेल्या आयुष्मान भारत योजनेतून जिल्हा पातळीवर 64 हजार कोटी रुपये खर्चून आधुनिक आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत आहेत असे त्यांनी पुढे सांगितले. देशात एकेकाळी केवळ 7 एम्स रुग्णालये होती, मात्र त्यात वाढ करण्यात आल्यामुळे देशातील एम्स रुग्णालयांची संख्या आता 21 झाली आहे याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. सरकारने देशभरात कर्करोगावरील उपचार पुरविणाऱ्या 40 संस्थांना मंजुरी दिली असून त्यापैकी अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना सेवा पुरविण्यास सुरुवात देखील झाली आहे असे त्यांनी सांगितले.

देशात नवी रुग्णालये उभारणे जसे महत्त्वाचे आहे तसेच त्या रुग्णालयांमध्ये पुरेशा संख्येने चांगले डॉक्टर्स आणि इतर निमवैद्यकीय कर्मचारी वर्गाची नेमणूक करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. आजघडीला, देशभरात हे काम युध्दपातळीवर सुरु आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. “वर्ष 2014 पूर्वी देशभरात 400 पेक्षा कमी वैद्यकीय महाविद्यालये होती. म्हणजेच 70 वर्षांच्या काळात देशात 400 पेक्षाही कमी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन होऊ शकली. मात्र, गेल्या 8 वर्षांत, देशात 200 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात आली आहेत,” पंतप्रधान मोदी म्हणाले. केंद्र सरकारने 5 लाखांहून अधिक आयुष डॉक्टरांना अॅलोपॅथी डॉक्टर म्हणून मान्यता देखील दिली आणि त्यामुळे देशातील डॉक्टर आणि रुग्ण यांच्या संख्येचे गुणोत्तर सुधारण्यात मदत झाली. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेतून गरीब नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाच्या वैद्यकीय उपचारांची सोय करून दिली आणि या योजनेतून आतापर्यंत साडेतीन कोटी रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या साडेतीन कोटी रुग्णांपैकी अनेक जण कर्करुग्ण होते अशी माहिती देखील पंतप्रधानांनी यावेळी दिली. आयुष्मान भारत योजनेमुळे रुग्णांचे उपचारांवर खर्च होणारे सुमारे 40 हजार कोटी रुपये वाचले आहेत. कर्करोगावरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या 500 हून अधिक औषधांच्या किंमती 90 टक्क्यापर्यंत कमी झाल्यामुळे रुग्णांच्या एक हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आरोग्य क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य अभियानामुळे प्रत्येक रुग्णाला वेळेवर आणि सुलभ रित्या दर्जेदार आरोग्यसुविधा मिळण्याची सुनिश्चिती झाली आहे. नियोजित स्वदेशी 5जी सेवेची सुरुवात झाल्यानंतर देशातील दुर्गम भागातील आरोग्यसुविधा क्षेत्रात क्रांती घडून येईल. “यानंतर खेडोपाड्यातील गरीब कुटुंबातील रुग्णांना उपचारासाठी पुनःपुन्हा मोठ्या रुग्णालयांना भेटी देण्याची अनिवार्यता कमी होईल”असे  ते म्हणाले. कर्करोगामुळे रुग्णाला येणाऱ्या नैराश्याशी लढा देण्यासाठी रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले, “एक प्रगतीशील समाज म्हणून, आपण मानसिक स्वास्थ्याबाबतच्या आपल्या विचारधारणेत बदल करून अधिक खुलेपणा आणणे ही देखील आपली जबाबदारी आहे. तेव्हाच या समस्येवर योग्य उपाययोजना करता येतील.”

 

पार्श्वभूमी

पंजाब आणि याच्या शेजारील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांतील रहिवाशांना जागतिक दर्जाची कर्करोगविषयक आरोग्य उपचार सेवा पुरविण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहाली मधील साहिबजादा अजित सिंग नगर जिल्ह्यात, नवीन चंदीगड परिसरात मुल्लानपूर येथे उभारण्यात आलेल्या ‘होमी भाभा कर्करोग रुग्णालय तसेच संशोधन केंद्रा’चे लोकार्पण केले. भारत सरकारच्या अणुउर्जा विभागाच्या अखत्यारीतील टाटा मेमोरियल सेंटर या अनुदानित संस्थेतर्फे 660 कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय उभारण्यात आले आहे.

या कर्करोग रुग्णालयात 300 रुग्णांच्या उपचाराची सोय आहे. कर्करोगावरील उपचारासाठी आवश्यक शस्त्रक्रिया, रेडीओथेरपी आणि वैद्यकीय कर्करोगशास्त्रातील केमोथेरपी, इम्म्युनोथेरपी तसेच अस्थिमगज प्रत्यारोपण यांसारख्या आधुनिक वैद्यकशास्त्रात सध्या उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या उपचाराची व्यवस्था या रुग्णालयात केलेली आहे.

हे रुग्णालय या भागातील रुग्णांसाठी कर्करोगावरील उपचार आणि सुविधेसाठीचे केंद्र म्हणून काम करेल आणि या मुख्य रुग्णालयाची शाखा म्हणून संगरुर येथील 100 खाटांचे रुग्णालय काम करेल.
 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

N.Chitale/Suvarna/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai