पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना 51,000 पेक्षा जास्त नियुक्ती पत्रे वितरित केली. देशभरातून निवडण्यात आलेले हे उमेदवार रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये/विभागांमध्ये रुजू होतील. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान देशभरातील 37 ठिकाणे मेळाव्याशी जोडली गेली होती.
या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की रोजगार मेळाव्यांचा प्रवास एका महत्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली. केंद्र आणि रालोआ शासित राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित विविध रोजगार मेळाव्यांमध्ये लाखो तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. आजही 50,000 पेक्षा जास्त तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पंतप्रधानांनी उमेदवारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले.
विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित रोजगार मेळावे हे तरुणांच्या भविष्याप्रति केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचे द्योतक आहेत, या बाबतीत युद्धपातळीवर काम सुरू आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “आम्ही केवळ रोजगारच पुरवत नाही तर पारदर्शक व्यवस्थाही कायम राखत आहोत” असे सांगत, भरती प्रक्रियेवर युवा वर्गाचा विश्वास वाढला आहे, यावर मोदी यांनी भर दिला. ते म्हणाले की सरकार केवळ प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठीच नव्हे तर परीक्षा प्रक्रियेची पुनर्रचना करण्याचा देखील प्रयत्न करत आहे. कर्मचारी निवड प्रक्रियेअंतर्गत भरतीसाठी लागणारा कालावधीही निम्म्यावर आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “रोजगाराच्या अधिसूचनेपासून ते नियुक्ती पत्रादरम्यानचा एकूण वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. एसएससी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या काही परीक्षांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींनी माहिती दिली की या परीक्षा आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये घेतल्या जात असून परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना भाषेचा अडथळा दूर करणे सोपे होईल.
विकासाच्या गतीमुळे प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. संयुक्त राष्ट्रांकडून सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पुरस्कार मिळविलेले धोर्डो गाव आणि होयसाळा मंदिर परिसर तसेच शांती निकेतनला जागतिक वारसा स्थळ म्हणून मिळालेली मान्यता, या बाबींचा त्यांनी उल्लेख केला. या घडामोडी आणि वाढलेले पर्यटन, युवा वर्गासाठी नवीन संधी निर्माण करतील. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातली प्रगतीही नव्या संधी निर्माण करत आहे, असे ते म्हणाले.
“रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार्या पारंपारिक क्षेत्रांना सरकार बळकट करत आहे, त्याचबरोबर नवीकरणीय ऊर्जा, अंतराळ, ऑटोमेशन आणि संरक्षण निर्यात यासारख्या नवीन क्षेत्रांना प्रोत्साहन देत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन संधी खुल्या होत आहेत असे सांगत, त्यांनी, ड्रोनच्या मदतीने पिकांचे मूल्यांकन आणि पोषक तत्वांच्या फवारणीची उदाहरणे दिली. स्वामित्व योजनेंतर्गत जमिनीच्या मॅपिंगसाठी ड्रोनचा वापर केला जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती भागात ड्रोनचा वापर करून औषधे वितरित केल्याचा त्यांनी उल्लेख केला, ज्यामुळे अंदाजे वेळ 2 तासांवरून 20-30 मिनिटांपर्यंत कमी झाला आहे. स्टार्टअप्सना ड्रोनचा खूप फायदा झाला आहे आणि नवीन रचना आणि तंत्रज्ञान तयार करण्यात मदत झाली आहे.
10 वर्षांपूर्वी फक्त 30 हजार कोटी रुपयांच्या खादी विक्रीच्या तुलनेत आता विक्रीत 1.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यामुळे खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात अनेक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, याचा विशेष करुन महिलांना फायदा झाला आहे.
कोणत्याही देशाच्या कोणत्याही प्रकारच्या स्पर्धात्मक फायद्यासाठी युवा वर्गाची शक्ती पूर्णत: जाणून घेणे आवश्यक असते, असे पंतप्रधान म्हणाले. नवीन संधींचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी युवकांना सुसज्ज करणाऱ्या कौशल्य आणि शिक्षणाच्या उपक्रमांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नवीन वैद्यकीय महाविद्यालये, आयआयटी, आयआयएम आणि आयआयआयटी सुरू झाले आहेत आणि पंतप्रधान कौशल विकास योजनेंतर्गत करोडो तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. विश्वकर्मा मित्रांसाठी पीएम विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे. कौशल्यांचे पुनर्शिक्षण आणि कौशल्य अद्ययावत करणे हा आजचा क्रम असल्याने, पीएम विश्वकर्मा योजना सर्व विश्वकर्मांना आधुनिक तंत्रज्ञान आणि साधनांशी जोडत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा राष्ट्रनिर्मिती प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग असून यामुळे भारताचा विकसित राष्ट्र बनण्याचा मार्ग मोकळा होईल, असे पंतप्रधान म्हणाले. या मेळ्याद्वारे भरती केलेले तरुणच सरकारी योजना पुढे नेतील आणि त्यांची सर्व स्तरांवर अंमलबजावणी करतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. “आज तुम्ही सर्वजण राष्ट्रनिर्मितीच्या आमच्या प्रवासात महत्त्वाचे सहयोगी बनत आहात”, असे पंतप्रधान म्हणाले. आपले नव भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व शक्तीनिशी योगदान देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. या भरती झालेल्या तरुणांनी iGOT कर्मयोगी पोर्टलचा वापर करून त्यांची शिकण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी, असे आवाहन देखील पंतप्रधानांनी केले. “तुमचे प्रत्येक पाऊल देशाला विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्यास मदत करेल”, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी, शरद पौर्णिमेच्या शुभ मुहूर्ताची नोंद केली आणि भरती करणार्या कंपन्यांनी देशात रोजगार निर्मितीचे एक माध्यम असलेल्या ‘व्होकल फॉर लोकल‘चा संदेश प्रसारित करावा, असे आवाहन केले.
पार्श्वभूमी
देशभरात 37 ठिकाणी रोजगार मेळा होणार आहे. या उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश सरकार समर्थित उपक्रमांमध्ये भरती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासह विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सरकारमध्ये रुजू होतील.
रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल आहे. रोजगार मेळा भविष्यात रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.
नव्याने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना iGOT कर्मयोगी पोर्टलवरील कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाइन मॉड्यूलद्वारे स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी देखील मिळणार आहे. या पोर्टलवर 750 पेक्षा जास्त ई-लर्निंग अभ्यासक्रम ‘कुठेही कोणत्याही डिव्हाइसवर’ प्रशिक्षणासाठी उपलब्ध या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Addressing the Rashtriya Rozgar Mela. Best wishes to the newly inducted appointees. https://t.co/IRZUeVQ5yl
— Narendra Modi (@narendramodi) October 28, 2023
Our government is working in mission mode keeping in mind the future of the youth. pic.twitter.com/rv1pasJOGa
— PMO India (@PMOIndia) October 28, 2023
Today, India’s trajectory and the pace of its progress are generating new employment prospects across all sectors. pic.twitter.com/nCkd9hWxmq
— PMO India (@PMOIndia) October 28, 2023
Today, India is equipping its youth with skills and education to harness emerging opportunities. pic.twitter.com/HKthTqqqRp
— PMO India (@PMOIndia) October 28, 2023
***
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
M.Pange/S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
Addressing the Rashtriya Rozgar Mela. Best wishes to the newly inducted appointees. https://t.co/IRZUeVQ5yl
— Narendra Modi (@narendramodi) October 28, 2023
Our government is working in mission mode keeping in mind the future of the youth. pic.twitter.com/rv1pasJOGa
— PMO India (@PMOIndia) October 28, 2023
Today, India's trajectory and the pace of its progress are generating new employment prospects across all sectors. pic.twitter.com/nCkd9hWxmq
— PMO India (@PMOIndia) October 28, 2023
Today, India is equipping its youth with skills and education to harness emerging opportunities. pic.twitter.com/HKthTqqqRp
— PMO India (@PMOIndia) October 28, 2023