Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी, परीक्षा पे चर्चा 2023 मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधला संवाद

पंतप्रधानांनी, परीक्षा पे चर्चा 2023 मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधला संवाद

पंतप्रधानांनी, परीक्षा पे चर्चा 2023 मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधला संवाद


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चाच्या (पीपीसी) सहाव्या भागात नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. संवादापूर्वी कार्यक्रमस्थळी भरविण्‍यात आलेले विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शनही त्यांनी पाहिले. पंतप्रधानांनीच परीक्षा पे चर्चाची संकल्पना मांडली असून यात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक जीवन आणि परीक्षांशी संबंधित विविध विषयांवर पंतप्रधानींशी संवाद साधतात.  पीपीसीच्या या वर्षीच्या भागात 155 देशांमधून सुमारे 38.80 लाखजणांनी नोंदणी केली.

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान परिक्षा पे चर्चेची ही पहिलीच वेळ असल्याचे पंतप्रधानांनी मेळाव्याला संबोधित करताना अधोरेखित केले. इतर राज्यांमधून नवी दिल्लीला भेट देणाऱ्यांनाही प्रजासत्ताक दिनाची झलक मिळाल्याचेही नमूद केले.  स्वत: पंतप्रधानांसाठी परीक्षा पे चर्चाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे त्यांना येत असलेल्‍या  लाखो प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले आणि भारतातील तरुण पिढीकडून येणा-या प्रश्‍नांमुळे आपल्याला अंतर्दृष्टी मिळते, त्याचबरोबर आपल्‍याला तरूणांच्या अंतरंगामध्‍ये डोकावण्‍याची संधी मिळते, असे ते म्हणाले. हे प्रश्न माझ्यासाठी खजिन्यासारखे आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. अशा गतिमान काळात तरुण विद्यार्थ्यांच्या मनाचा सविस्तर वेध घेणा-या  या सर्व प्रश्नांचे संकलन येत्या काही वर्षात समाज शास्त्रज्ञ करू शकतील, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

 

निराशा हाताळताना

तमिळनाडूतील मदुराई येथील केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थिनी अश्विनी, पीतमपुरा दिल्ली केव्ही येथील नवतेज, दिल्लीतील नवतेज आणि पाटणा येथील नवीन बालिका शाळेतील प्रियंका कुमारी यांच्या खराब गुणांच्या बाबतीत कुटुंबातील निराशेविषयीच्या प्रश्नाला मार्गदर्शन करताना कौटुंबिक अपेक्षांबाबत पंतप्रधान म्हणाले कीयात काहीही चुकीचे नाही. तथापि, जर या अपेक्षा, सामाजिक स्थिती-संबंधित अपेक्षांमुळे असतील तर ते चिंताजनक आहे. मोदींनी कामगिरीविषयी सतत वाढणारी  मानके आणि प्रत्येक यशासह वाढत्या अपेक्षांबद्दलही मत व्यक्त केले.

अपेक्षेच्या जाळ्यात अडकून पडणे चांगले नाही, प्रत्येकाने आत्मपरिक्षण केले पाहिजे आणि अपेक्षांना स्वतःच्या क्षमता, गरजा, हेतू आणि प्राधान्यक्रमांशी जोडले पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले. क्रिकेटच्या खेळाचे उदाहरण देताना , पंतप्रधान म्हणाले कीजिथे लोक चौकार आणि षटकारांसाठी गजर करत राहतातप्रेक्षकातील अनेक लोक षटकार किंवा षटकारांसाठी विनवणीही करत असतात, अशावेळी फलंदाजीसाठी बाहेर पडलेला क्रिकेटपटू  अविचलित राहतो.  क्रिकेटच्या मैदानावरील फलंदाजाचे चित्त आणि विद्यार्थ्यांचे मन यांच्यातील दुवा साधत पंतप्रधान म्हणाले की, तुम्ही लक्ष केंद्रित केले तर अपेक्षांचे दडपण नष्ट, नाहीसे होऊ शकते.

आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे न टाकण्याचे आवाहनही त्यांनी पालकांना केले. विद्यार्थ्यांनी नेहमी त्यांच्या क्षमतेनुसार स्वतःचे मूल्यमापन करावे असेही सांगितले.  तथापि, विद्यार्थ्यांनी दडपणाचे विश्लेषण करावे आणि ते त्यांच्या स्वत: च्या क्षमतेला न्याय देत आहेत का ते पहावे. अशा परिस्थितीत या अपेक्षा चांगल्या कामगिरीला चालना देऊ शकतात असे पंतप्रधान म्हणाले.

 

परीक्षेची तयारी आणि वेळेचे व्यवस्थापन

परीक्षेची तयारी कोठून सुरू करावीहे अनेकदा कळत नाही आणि तणावपूर्ण परिस्थिती विस्मरणाला कारणीभूत ठरतेयासंदर्भातील प्रश्न केव्ही, डलहौसी येथील इयत्ता 11वीची विद्यार्थिनी आरुषी ठाकूर  हिने विचारले  तर कृष्णा पब्लिक स्कूल, रायपूर येथील आदिती दिवाणने परीक्षेदरम्यान वेळेच्या व्यवस्थापनाविषयीचे प्रश्न विचारले.  त्यावर उत्तर देताना पंतप्रधानांनी परीक्षा असेल किंवा नसेल सामान्य जीवनात वेळेच्या व्यवस्थापनाच्या महत्त्वावर भर दिला. काम कधीच थकत नाही, खरे तर काम माणसाला थकवत नाही, असे ते म्हणाले. विद्यार्थी करत असलेल्या विविध गोष्टींसाठी ते किती वेळ देतात याची नोंद करा, असे त्यांनी सुचविले. एखादी व्यक्ती आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी अधिक वेळ घालवते ही सर्वसाधारण प्रवृत्ती आहे,असे ते म्हणाले. एखाद्या विषयासाठी वेळ देताना, मन ताजेतवाने असताना कमीतकमी मनोरंजक किंवा सर्वात कठीण विषय घ्यावा. अनिच्छेने मार्ग काढण्याऐवजी, विद्यार्थ्यांनी निवांत मानसिकतेने गुंतागुंतीचा सामना करावा, असा सल्ला त्यांनी दिला. प्रत्येक काम वेळेवर करणाऱ्या घरातील मातांचे वेळेच्या व्यवस्थापनाचे कौशल्य विद्यार्थ्यांनी पाहिले आहे का, असा सवाल त्यांनी केला. सर्व कामे करून मातांना थकवा येतोच पण उरलेल्या वेळेत काही सर्जनशील कामे करायलाही वेळ मिळतो, असे त्यांनी सांगितले. मातांचे निरीक्षण जरी केले तरी वेळेच्या सूक्ष्म व्यवस्थापनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजू शकते आणि त्याद्वारे प्रत्येक विषयासाठी विशिष्ट तास समर्पित करता येऊ शकतात, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तुम्ही तुमचा वेळ अधिक फायद्यासाठी वितरित केला पाहिजे, पंतप्रधानांनी टिप्पणी केली.

 

परीक्षेतील गैरप्रकार आणि शॉर्टकट घेणे

बस्तर येथील स्वामी आत्मानंद सरकारी शाळेतील इयत्ता 9वीचा विद्यार्थी रुपेश कश्यप याने परीक्षेतील अनुचित मार्ग टाळण्याचे मार्ग विचारले. ओडिशामधल्या कोणार्क पुरी येथील तन्मय बिस्वालनेही परीक्षेतील फसवणूक दूर करण्याबाबत विचारले. विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना सामोरे जाण्याचे मार्ग शोधण्याचा विषय उपस्थित केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थी परीक्षेत फसवणूक करताना पर्यवेक्षकाला मूर्ख बनविल्याबद्दल अभिमान बाळगतो, हा नैतिकतेला मारक असा बदल असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. “ही एक अतिशय धोकादायक प्रवृत्ती आहे, संपूर्ण समाजाने याबद्दल विचार करावा “असे पंतप्रधान म्हणाले.  काही शाळा किंवा शिक्षक शिकवणी वर्ग चालवतात आणि त्यांचे विद्यार्थी परीक्षेत उत्कृष्टरीत्या उत्तीर्ण व्हावेत यासाठी अन्यायकारक मार्गाचा अवलंब करतात हे चुकीचे असून विद्यार्थ्यांनी असले मार्ग शोधण्यात आणि फसवणूकीचे साहित्य तयार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ शिकण्यात घालवावा असे आवाहन त्यांनी केले.

या बदलत्या काळात आपल्या सभोवतालचे जीवन बदलत असताना तुम्हाला प्रत्येक पायरीवर परीक्षेला सामोरे जावे लागते, असे पंतप्रधान म्हणाले. गैरप्रकार करणारे लोक फक्त काही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात परंतु शेवटी जीवनात अपयशी ठरतात, असे त्यांनी सांगितले.  “फसवणूक करून जीवन यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही एक-दोन परीक्षा पास करू शकता पण आयुष्यभर त्याविषयी मनात संशय राहील, असे ते पुढे म्हणाले. फसवणूक करणाऱ्यांच्या तात्पुरत्या यशाने निराश होऊ नका, कठोर परिश्रम आयुष्यात नेहमीच फायदेशीर ठरतील ,असे पंतप्रधानांनी कष्टाळू विद्यार्थ्यांना सांगितले “परीक्षा येतात आणि जातात पण आयुष्य पूर्णपणे जगायचे असते”, असे ते म्हणाले. फूट ओव्हरब्रिज ओलांडण्याऐवजी रेल्वे रुळांवरून प्लॅटफॉर्म ओलांडणाऱ्या रेल्वे स्टेशनवरील लोकांचे उदाहरण देताना पंतप्रधानांनी शॉर्टकट तुम्हाला कुठेही नेणार नाही याकडे लक्ष वेधले आणि म्हणाले, शॉर्टकट नाहीत तर कठोर परिश्रम तुम्हाला योग्य दिशा देतील.

केरळमधील कोझिकोडच्या एका विद्यार्थ्याने स्मार्ट वर्क विरुद्ध कठोर परिश्रमाची गरज आणि गतिशीलता याबद्दल विचारले. तहान शमवण्यासाठी घागरीत दगड टाकणाऱ्या तहानलेल्या कावळ्याची उपमा स्मार्ट वर्कचे उदाहरण दिले. त्यांनी कामाचे बारकाईने विश्लेषण आणि समजून घेण्याची गरज प्रतिपादित केली आणि कठोर, हुशारीने, चातुर्याने  काम करणाऱ्या कावळ्याच्या कथेतून नैतिकतेवर प्रकाश टाकला. प्रत्येक कामाची आधी नीट तपासणी झाली पाहिजे, असे ते पुढे म्हणाले. त्यांनी एका हुशार मेकॅनिकचे उदाहरण दिले. या मेकॅनिकने दोन मिनिटांत एक जीप दोनशे रुपयांत फिक्स केली. काम करताना किती वेळ जातो यापेक्षा कामाचा अनुभव महत्त्वाचा असतो, असे पंतप्रधान म्हणाले. फक्त कष्टानेच सर्व काही साध्य होऊ शकत नाहीत्यासाठी विशेष प्रशिक्षण महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. काय करणे आवश्यक आहे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. माणसाने चतुराईने आणि महत्त्वाच्या क्षेत्रात कठोर परिश्रम केले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

 

एखाद्याची क्षमता ओळखणे

सरासरी विद्यार्थी म्हणून परीक्षेत चांगले यश मिळवण्याबद्दल जवाहर नवोदय विद्यालय, गुरुग्राम येथील इयत्ता 10वीची विद्यार्थिनी जोविता पात्रा हिने प्रश्न विचारला. स्वतःविषयी वास्तववादी आकलन असण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. मर्यादा आणि सकारात्मक गुण ओळखून विद्यार्थ्यांनी योग्य ध्येये आणि कौशल्ये निश्चित केली पाहिजेत. एखाद्याची क्षमता जाणून घेतल्याने माणूस खूप सक्षम होतो, असे ते म्हणाले. त्यांनी पालकांना त्यांच्या मुलांचे योग्य मूल्यमापन करण्यास सांगितले. बहुतेक लोक सरासरी आणि सामान्य असतात परंतु जेव्हा हे सामान्य लोक असामान्य कर्म करतात तेव्हा ते नवीन उंची गाठतात, असेही त्यांनी नमूद केले. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताकडे नवीन आशा म्हणून पाहिले जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारतीय अर्थतज्ञ आणि अगदी पंतप्रधानांकडे प्रवीण अर्थतज्ञ म्हणून पाहिले जात नव्हते असा एक काळ होता, परंतु आज भारत जगाच्या तुलनात्मक अर्थशास्त्रात चमकताना दिसत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. “आपण सरासरी आहोत या दडपणाखाली कधीही राहू नका आणि जरी आपण सरासरी असलो तरीही आपल्यामध्ये काहीतरी विलक्षण असेल, आपल्याला फक्त ते ओळखणे आणि त्याला खतपाणी घालणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

 

टीकेला तोंड देण्याविषयी

चंदीगडच्या सेंट जोसेफ सेकंडरी स्कूलचे मन्नत बाजवा, अहमदाबाद येथील बारावीचे विद्यार्थी कुमकुम प्रतापभाई सोलंकी आणि बंगळुरूच्या व्हाईटफिल्ड ग्लोबल स्कूलचा बारावीचा विद्यार्थी आकाश दरिरा यांनी त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार करणाऱ्या आणि तशीच मते बाळगणाऱ्या लोकांचा सामना करण्याविषयी पंतप्रधानांना विचारले, तसेच या वागणुकीमुळे त्यांच्यावर होणाऱ्या परिणांमांविषयीदेखील त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. दक्षिण सिक्कीममधील डीएव्ही पब्लिक स्कूलमधील अकरावीत शिकणाऱ्या अष्टमी सेन या विद्यार्थिनीनेही प्रसारमाध्यमांमधून व्यक्त होणाऱ्या टीकात्मक भूमिकेचा कसा सामना करावा याबद्दलचा प्रश्न विचारला. या प्रश्नांवर उत्तर देताना पंतप्रधानांनी सांगितले की, खरे तर टीका म्हणजे त्यांना शुद्धीकरणाचाच यज्ञ वाटतो आणि एका समृद्ध लोकशाहीसाठी टीका होत राहणे ही अनिवार्य गोष्टच असल्याचे ते म्हणाले. या तत्त्वावर स्वतःचा विश्वास असल्याचेही पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले. अभिप्राय मिळणे का गरजेचे असते, याबद्दल सांगताना पंतप्रधानांनी एका प्रोग्रॅमरचे जो आपल्या प्रोग्रॅमध्ये सुधारणा करता याव्यात यासाठी ओपन सोर्सवर आपला कोड ठेवतो आणि कंपन्याही ज्या आपले विक्रीसाठीचे उत्पादन ग्राहकांसमोर ठेवून, ग्राहकांनी त्यातल्या त्रुटी सांगाव्यात असे आवाहन करतात, याबाबतचे उदाहरण मुलांसमोर मांडले. आपल्या कामावर नेमकं कोण टीका करत आहे, हे लक्षात घेणेही महत्त्वाचे असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. आजकाल पालकांना आपल्या मुलांवर रचनात्मक टीका करण्याऐवजी, त्यांना अडवण्याची सवय लागली आहे, आपण असे वागत राहिलो तर अशा रितीने बंधनात अडकलेल्या मुलांच्या आयुष्याला योग्य आकार मिळणार नाही, असे सांगून पालकांनी ही सवय सोडून द्यायला हवी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पंतप्रधानांनी संसदेच्या अधिवेशनातील एका सदस्याचे उदाहरण मुलांसमोर मांडले, जो एका विषयावर भाषण करत असताना, त्याच्या भाषणात इतर सदस्यांनी अनेकदा व्यत्यय आणल्यानंतरही  विचलित झाला नाही. यावेळी पंतप्रधानांनी टीका म्हणजेच एका अर्थाने समीक्षा करण्यातही संशोधनवृत्ती कशी सामावलेली असते, आणि यासाठीही कसे कष्ट लागतात हे ही अधोरेखित केले, त्याचवेळेला सध्याच्या काळात अनेकजण, जवळचा मार्ग अर्थात शॉर्टकटचा मार्ग स्वीकारतात आणि समीक्षेऐवजी आरोप करतात ही बाबही ठळकपणे अधोरेखित केली. “आरोप आणि टीका किंवा समीक्षा यात मोठा फरक आहे”, असे नूमद करत, हा फरक समजून घेण्यात आपण चूक करू नये असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

 

गेमींग आणि ऑनलाईन माध्यमांच्या व्यसनाविषयी

भोपाळचा दीपेश अहिरवार आणि दहावीत शिकणाऱ्या आदिताभने इंडिया टीव्हीच्या माध्यमातून, कामाक्षी हिने रिपब्लिक टीव्ही आणि मनन मित्तल यांनी झी टीव्हीच्या माध्यमातून पंतप्रधानांना प्रश्न विचारले. या मुलांनी पंतप्रधानांना ऑनलाईन गेम्स आणि समाज माध्यमांच्या व्यसनाबद्दल प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, आपण स्मार्ट आहोत की आपले गॅजेट स्मार्ट आहे, याबाबतचा निर्णय आपण सर्वात आधी घ्यायला हवा. जेव्हा आपण गॅजेटला आपल्यापेक्षा हुशार समजू लागतो,   तेव्हापासून समस्या सुरू होते. पण दुसऱ्या बाजूला एखाद्याने स्वतःचा स्मार्टनेस अमलात आणला, तर स्मार्ट गॅजेटचा स्मार्टपणे वापर करणे आणि उत्पादकतेचे साधन म्हणून ते वापरात येणे शक्य होऊ शकेल. एका अभ्यासानुसार, एका भारतीयाचा सरासरी स्क्रीन टाइम हा सहा तासांपर्यंतचा असल्याचे सांगून याबाबत पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. अशा परिस्थितीत गॅजेट आपल्याला गुलाम बनवते, असे ते म्हणाले. देवाने आपल्याला स्वतंत्रपणे इच्छा व्यक्त करू शकणारे आणि स्वतंत्र असलेले व्यक्तिमत्व दिले आहे, अशावेळी आपण आपल्या गॅजेट्सचे गुलाम होणार नाही याबद्दल नेहमीच जागरुक राहिले पाहिजे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. याबाबत आपले स्वतःचे उदाहरण मांडतांना पंतप्रधानांनी सांगितले की, ते बऱ्याच प्रमाणात सक्रीय असतात, मात्र असे असूनही ते स्वतः मोबाइलसोबत क्वचितच दिसतात. मोबाईलच्या वापरासारख्या क्रिया प्रक्रियांसाठी आपण दिवसातला ठराविक वेळच बाजूला ठेवतो, असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान कोणीही टाळू नये, तर त्याउलट स्वत:ची गरज आणि उपयुक्ततेनुसार अशा गोष्टींचा वापर मर्यादित ठेवावा असा सल्ला त्यांनी दिला. विद्यार्थ्यांमध्ये पाढे म्हणण्याची क्षमता कमी होत असल्याचे उदाहरणही त्यांनी मांडले. आपल्याला मूलतः ज्या क्षमतांची देणगी मिळाली आहे, त्या न गमावता आपण आपल्या क्षमतांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता त्यांनी मांडली.  आपली सर्जनशीलता जपण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या युगात स्वतःची कायम चाचपणी करून पाहिली पाहीजे आणि शिकणं सुरू ठेवलं पाहीजे असं ते म्हणाले. आपण नियमित कालावधीने टेक्नॉलॉजी उपवास करायला हवा असा सल्ला त्यांनी दिला. प्रत्येक घरात टेक्नॉलॉजी फ्री झोनम्हणून एखादी जागा निश्चित करावी अशी सूचनाही त्यांनी केली. यामुळे जगण्याच्या आनंदात वाढ होईल आणि आपण गॅजेट्सच्या गुलामगिरीतूनही बाहेर पडू शकू असं पंतप्रधान म्हणाले.

 

परीक्षेनंतर येणाऱ्या ताणाविषयी

कठोर परिश्रम करूनही अपेक्षित निकाल न मिळाल्यामुळे आलेला ताण तणाव दूर कसा करावा याबद्दल जम्मूच्या शासकीय मॉडेल हायस्कूलमधील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या निदाहने प्रश्न विचारला, तर हरयाणातील पालावाल इथल्या शहीद नाईक राजेंद्र सिंग राजकीय विद्यालयातील प्रशांत या विद्यार्थ्याने याच संदर्भात विचारलेल्या प्रश्नांनाही पंतप्रधान उत्तर दिले. ते म्हणाले की, परीक्षेनंतर येणाऱ्या तणावाचे मुख्य कारण हे, खरे तर परीक्षा चांगल्या प्रकारे पार पडली असल्याचे वास्तव मान्य न करण्यात आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेली स्पर्धा हाही तणाव निर्माण करणारा महत्वाचा घटक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी आपल्या अंतर्गत क्षमतांमध्ये अधिक वृद्धी करावी, आणि या प्रक्रियेअंतर्गत स्वत:कडून तसेच आपल्या सभोवतालच्या वातावरणातून कायम शिकत राहिले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन या संकल्पनेवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.

ते म्हणाले की, केवळ एक परीक्षा म्हणजे आयुष्याचा अंत नाही. निकाल काय असेल याचा अतिविचार करणे ही आपल्या रोजच्या जगण्याची सवय व्हायला नको असा मोलाचा सल्लाही पंतप्रधानांनी दिला.

 

नवीन भाषा शिकण्याच्या फायद्यांबाबत

एखादी व्यक्ती अधिक भाषा कशी शिकू शकते आणि त्याचा कसा फायदा होऊ शकतो? असा प्रश्न तेलंगणातील रंगारेड्डी येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारी इयत्ता 9 वीची विद्यार्थिनी आर. अक्षरसिरी आणि भोपाळच्या राजकीय माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 12 वीची विद्यार्थिनी रितिका यांनी विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधानांनी भारताची सांस्कृतिक विविधता आणि समृद्ध वारसा अधोरेखित केला. भारत हा शेकडो भाषा आणि हजारो बोलींचे माहेरघर आहे ही अभिमानास्पद बाब आहे, असे पंतप्रधान म्हणाले. नवीन भाषा शिकणे हे नवीन वाद्य शिकण्यासारखे आहे. प्रादेशिक भाषा शिकण्याचा प्रयत्न करून, आपण केवळ अभिव्यक्तीसाठी भाषा शिकत नाही तर त्या प्रदेशाशी संबंधित इतिहास आणि वारशाचे दरवाजे देखील उघडत आहात असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी रोजच्या दिनचर्येत कसलेही ओझे न वाढवता नवीन भाषा शिकण्यावर भर दिला. ज्याप्रमाणे दोन हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या देशाच्या स्मारकाचा नागरिकांना अभिमान वाटतो तसेच साधर्म्य राखत पृथ्वीवरील सर्वात जुनी भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तमिळ भाषेचाही देशाने अभिमान बाळगला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेल्या आपल्या शेवटच्या भाषणाची आठवण करून दिली आणि त्यांनी विशेषत्वाने तमिळ भाषेबद्दलची तथ्ये कशी मांडली ते अधोरेखित केले. कारण त्यांना जगाला सांगायचे होते की त्यांना सर्वात जुनी भाषा असलेल्या देशाचा अभिमान आहे. उत्तर भारतातील लोक दक्षिण भारतातील स्वादिष्ट पदार्थ तर दक्षिण भारतातील लोक उत्तर भारतातील रुचकर पदार्थ आवडीने खातात हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. मातृभाषेव्यतिरिक्त भारतातील किमान एक प्रादेशिक भाषा जाणून घेण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. आपण लोकांशी जेंव्हा त्यांच्या मातृभाषेत बोलता तेंव्हा त्या लोकांचे चेहरे कसे आनंदाने उजळतील हे पहाण्यावर त्यांनी भर दिला. बंगाली, मल्याळम, मराठी आणि गुजराती अशा विविध भाषा बोलणाऱ्या गुजरातमधील एका स्थलांतरित मजुराच्या ८ वर्षांच्या मुलीचे उदाहरण पंतप्रधानांनी दिले. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केलेल्या भाषणाची आठवण करून देताना पंतप्रधानांनी पंच प्रणांपैकी एक प्रण (पाच प्रतिज्ञा) वारसा अभिमान बाळगण्यावर प्रकाश टाकला. प्रत्येक भारतीयाने भारताच्या भाषांचा अभिमान बाळगला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.

 

विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात शिक्षकांच्या भूमिकेबाबत

ओडिशाच्या कटक येथील शिक्षिका सुनन्या त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याबद्दल आणि वर्गांला मनोरंजक तसेच शिस्तबद्ध ठेवण्याबद्दल पंतप्रधानांना प्रश्न विचारले. याला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की शिक्षकांनी लवचिक असावे आणि एखाद्या विषयाबाबत किंवा अभ्यासक्रमाबाबत फारसे कठोर नसावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला पाहिजे यावर त्यांनी भर दिला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच जिज्ञासा वाढवली पाहिजे कारण जिज्ञासा हीच विद्यार्थ्यांची मोठी ताकद आहे, असे ते म्हणाले. आजही विद्यार्थी आपल्या शिक्षकांना खूप महत्त्व देत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी वेळ काढला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. शिस्त प्रस्थापित करण्याच्या पद्धतींबाबत पंतप्रधान म्हणाले की, कमकुवत विद्यार्थ्यांना अपमानित करण्याऐवजी शिक्षकांनी हुशार विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून बक्षिस दिले पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अहंकाराला धक्का न लावता शिस्तीच्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी संवाद प्रस्थापित केल्यास त्यांच्या वर्तनाला योग्य दिशा मिळू शकते, असेही ते म्हणाले. ” आपण शिस्त लावण्यासाठी शारीरिक शिक्षेच्या मार्गावर जाऊ नये, आपण संवाद आणि परस्परसंवाद निवडला पाहिजे यावर माझा विश्वास आहे” असे पंतप्रधान म्हणाले.

 

विद्यार्थ्यांच्या वर्तनाबाबत

समाजातील विद्यार्थ्यांच्या वर्तनाबाबत नवी दिल्लीतील पालक सुमन मिश्रा यांच्या प्रश्नावर उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की पालकांनी विद्यार्थ्यांच्या समाजातील वर्तनाची व्याप्ती मर्यादित करू नये. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी समाजात सर्वांगीण दृष्टीकोन असू द्यावा अशी सूचना त्यांनी केली. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना एका अरुंद क्षेत्रात मर्यादित न ठेवण्याचा सल्ला दिला आणि विद्यार्थ्यांसाठी विस्तारित वर्तुळ निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना बाहेरगावी प्रवास करण्यास आणि त्यांचे अनुभव नोंदवण्यास प्रोत्साहित केले पाहिजे अशा पंतप्रधानांनी यापूर्वी दिलेल्या आपल्या सल्ल्याची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे स्वातंत्र्य दिल्यामुळे बरेच काही शिकता येईल, असे ते म्हणाले. 12 वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्याबाहेर जाण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पालकांनी आपल्या मुलांना नवीन अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला. पालकांनी मुलाची मनःस्थिती आणि परिस्थितीबद्दल जागरुक राहावे असे पंतप्रधानांनी सुचवले. जेव्हा पालक स्वतःला देवाच्या देणगीचे म्हणजे मुलांचे संरक्षक बनवतील तेव्हाच हे शक्य होईल असे पंतप्रधान म्हणाले.

भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे आभार मानले. विद्यार्थ्यांचे माता पिता, शिक्षक आणि पालकांनी परीक्षेदरम्यान निर्माण होणारे तणावपूर्ण वातावरण शक्य तितक्या प्रमाणात कमी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. परिणामी, परीक्षांचे रूपांतर विद्यार्थ्यांच्या जीवनात उत्साह भरणाऱ्या उत्सवात होईल आणि हाच उत्साह विद्यार्थ्यांच्या उत्कृष्टतेची हमी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

***

S.Bedekar/V.Ghode/P.Jambhekar/T.Pawar/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai